बिढार – भालचंद्र नेमाडे

या विभागात तुम्ही वाचलेल्या, तुम्हाला आवडलेल्या-नअवडलेल्या पुस्तकांचे परिक्षण लिहावे.
latenightevent
Rgistered member
Rgistered member
Posts: 15
Joined: 20 May 2016 19:49
नाव: Abhishek
आडनाव: Buchke

बिढार – भालचंद्र नेमाडे

Postby latenightevent » 07 Sep 2016 02:02

B.E. चं तेवढं लवकर आटपून नौकरीला लागावं. घरी निव्वळ बापाच्या खानावळीत राहिल्यासारखं वाटतं.
#बिढार #भालचंद्र_नेमाडे

भालचंद्र नेमाडे म्हणजे अवलिया माणूस. त्यांच्या कादंबर्‍या म्हणजे वास्तववादाचं दर्शन असतं. म्हणजे, हिन्दी चित्रपटात आजकाल #अनुराग_कश्यप चे चित्रपट जसे असतात तशाच प्रकारचा अनुभव नेमाडेंची कादंबरी वाचताना होतो. प्रसंग अन घटना गंभीर असले तरी त्यात एक व्यंग आणि विनोदी छटा असतात. वर लिहिलेलं वाक्य हे केवळ सामान्य वाक्य नसून ती अनेक बेरोजगार तरुणांची भावना आहे. कमी शब्दांत अतिशय उत्तम प्रकारे बोलणं मांडायची हातोटी. म्हणजे नौकरी लागत नाही म्हणून दोन वेळेच्या अन्नासाठी आई-वडलांच्यावर अवलंबून राहावं लागतं असे त्यातील भाव एखादा तरुण आपल्या मित्राकडे कसं बोलेल, हे क्षणात सांगून मोकळा होतो. बेरोजगार तरुण निराश, चिंताग्रस्त तर असतो पण त्याच्या बोलण्या-वागण्यात, मित्रांत उठ-बस करताना तिरकसपणा अन मर्म विनोद काही सुटत नाही. यात मनात कितीही हतबलता असली तरी ती अश्रु गाळत उगाच सहानुभूती मिळवायचा प्रकार तरुणांना नसतो. जी सल असते ती एखाद्याला नावं ठेऊन बाहेर काढण्याची कला आत्मसात झालेली असते.

बिढार. नेमाडेंची अजून एक कादंबरी. चांगदेव_चतुष्टय मधील पहिला भाग. चांगदेव पाटील ह्या तारुण्याच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच एका आजारपणामुळे निराशेच्या गर्तेत झोकला गेलेला तरुण. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेला. एकत्र कुटुंब पद्धतीत अन लहानशा गावात ‘पाटील’ म्हणून वाढलेला मुलगा, पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत येतो अन सुरू होते आयुष्याची प्रवासयात्रा. कुठलाही प्रवास सरळ अन सहज नसतो. त्यात कधींना कधी खडतर वाटा. घाट वळणे येतातच. पण ह्या प्रवासाची सुरूवातच शेवटाकडे नेणारी असेल तर त्या भल्या-मोठ्या अन अधांतरी प्रवासाची काहीच गोडी राहत नाही. उलट येतो तो वीट, तिरस्कार, संताप, चिडचिड, भय, न्युंनगंड अन नैराश्य!!! कथेतील नायक चांगदेव पाटील याला समजतं की त्याला काहीतरी अगम्य आजार आहे जो त्याला शेवटाकडे नेणार आहे तेंव्हा त्याचं भान हरपत जातं अन तो मरणाची वाट बघू लागतो. मृत्यू ह्या सगळ्या जाचातून सोडवू पाहणारा मदतनीस आहे असं त्याला वाटू लागतं. जगण्याकडे बघण्याचा त्याचा संपूर्ण दृष्टीकोण नकारात्मक होतो. आनंदाने जगण्याची ओढ अन रस निघून जातो. निष्काळजीपणा वाढत जातो. फार काय तर आपण मारून जाऊ, हेच त्याचं स्वतःला सांगणं असतं. त्यामुळे जेथे जाईल तेथे झोकून देऊन काम करायचा त्याचा इरादा असतो. त्यात एकत्र कुटुंबात वारंवार खटके उडत असतात. त्याच्या एका भावाचा अकाली मृत्यू झालेला असतो. आपला बाप आपल्यासाठी, आपल्या शिक्षणासाठी इकडे-तिकडे लबाडी करून पैसे मिळवतो अशी त्याची धारणा असते. एकत्र कुटुंबातील वाद अन कटकटी त्याला खूपच अस्वस्थ करत असतात जेणेकरून त्याचा संताप अन नकारात्मक पवित्रा वाढत जातो. आपल्याला झालेला रोग हा असाध्य आहे जो आपण घरी सांगूही शकत नाही ही बोच मनात असते. पुन्हापुन्हा, मरण हे त्याला ह्या सगळ्यातून सुटका करणारी भेटवस्तू वाटत असते. तो मग नैराष्यातून सगळं सोडून मुंबईला निघून जातो आणि रममान होतो जादुई नगरीत… मित्रांच्या सानिध्यात!!!
कादंबरीतील चांगदेव पाटील अन त्याची मित्रमंडळी ही बी.ए. वगैरे करणारी असतात. कादंबरीत १९६० च्या आसपासचा कालावधी उल्लेख केलेला आहे. त्या काळीही शिक्षण, नोकरी, बेरोजगारी अन राहायच्या जागेची अवस्था आजपेक्षा वेगळी नव्हती हे प्रामुख्याने अधोरेखित होतं. अशा ह्या अवाढव्य मुंबईत पोरांचा सगळा कल्ला बघायला भेटतो. तारुण्यात माणूस जितका आशावादी असतो तितकाच निराशावादीही असतो. समाजातील घटना वगैरे त्याला अस्वस्थ करत असतात अन त्याला बदलण्याची धमक अंगी आहे असा तरुणाईचा सळसळता उत्साह असतो. आपण काहीतरी नवीन करू, वेगळं करू, बदल घडवू अशी त्याची धारणा अन प्रयत्न असतात. हे सगळे तरुण, त्यांचे बसायचे अड्डे, त्यांच्या चर्चेचे मुद्दे, भांडणं, शिवीगाळ, एकमेकांवर जळणे वगैरे सदासर्वकाळ अमर असणार्‍या घडामोडी कादंबरीत आहेत ज्या कादंबरीला कायम चिरतरुण ठेवतात. आजकालच्या तरुणांचे चर्चेचे मुद्दे बदलले असतील, बसायची ठिकाणे बदलली असतील, जीवनशैली बदललेली असेल तरी मूळ भावना ह्या नेहमीच मूलभूत असतात. एकमेकांना कितीही शिव्या दिल्या, भांडणे झाली तरी असे काही मित्र असतात जे पैशाच्या, जागेच्या आणि अन्य बाबतीत नेहमीच डोळे झाकून मदत करतात. मुंबईत माणूस पैशांशिवाय, जागेशिवाय, अन्नाशिवाय जगू शकतो पण मित्रांशिवाय जगू शकत नाही असं कादंबरीतून नमूद होतं. प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात वेळ येते जेंव्हा त्याला मित्र सोडून ‘करियर’ निवडावं लागतं. ते होतच असतं. एखादा मित्र खूप श्रीमंत होतो, एखाद प्रसिद्धीच्या झोतात येतो, एखाद नशीबवान निघतो, काही तसेच धडपडे राहतात पण मनात कुठेतरी मैत्रीची ठिणगी तशीच धगधगत असते. जुने दिवस आठवतात; त्यांची लाजही असते अन अभिमानही. पण सगळं मनातच कुठेतरी हरवलेलं. चांगदेवचे मित्र सारंग, शंकर, नारायण, भैय्या, अप्पा, वगैरे अस्सल पात्रे आहेत. सगळ्यांची स्वतंत्र विचारसरणी आहे, आयुष्य आहे, भूमिका अन क्षेत्र आहेत पण तरीही सगळे मित्र आहेत. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरची तरुण मंडळी एकत्र येऊन आयुष्य नावाचा गाडा खडतर रस्त्यावरून अतिशय कष्टाने पण तितक्याच तिरकस-खट्याळ-मजेशीर पद्धतीने पुढे ढकलत असतात.

त्या काळी असलेली परिस्थिती अन आजची परिस्थिती फारशी बदललेली वाटत नाही. लेखकांची तर तेंव्हाही अवहेलनाच होती आणि ती तशीच आजही आहे हेच दिसतं. विनाकारण बौद्धिकतेचा आव आणला तरी त्याला पोट भागवायलाही पुरेसे पैसे मिळत नाहीत. वृत्तपत्रात किती विचारांचे चन्दन उगाळले तरी शेवटी महिन्याखर रद्दीत घालतानाच त्याचं वजन ठरतं. लिहिणं वगैरे म्हणजे उपाशी मरायचे धंदे आहेत हे तेंव्हाही खरं होतं आणि आजही खरं आहे. ह्याच परिस्थितीवरून दोन पात्रांत वाद झालेला किस्सा आहे. मराठीत असं का आणि इंग्लिश अन परदेशात असं का नाही याचा वास्तविक वाद चर्चेत येतो. अशा अनेक मूलभूत अन महत्वाच्या बाबींवर कादंबरीतून मनमोकळा भाष्य आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर, रस्त्याच्या कडेला एक स्त्री पडलेली असते. तिचा कदाचित सामूहिक बलात्कार झालेला असतो आणि अजून दोन लोक तिला ‘वापरायला’ बघत असतात. ती बिचारी पाय घट्ट दाबून पडलेली असते. तो काळ अन आजचा काळ यात कितीसा फरक आहे? याचं उत्तर मिळतं. समाज वगैरे बदलतोय, विज्ञानयुग, पुरोगामित्व वगैरे अवतरलं आहे, हे म्हणजे थापा आहेत असच वाटतं. कम्युनिस्ट असलेला नारायण मर-मर मरून काम करत असतो पण शेवटी तिथे काहीतरी गफलत होते आणि शेवटी तो सगळं सोडून ‘सुखी आयुष्य’ जगण्याचा मार्ग निवडतो. हे सगळं खरं तर एका पातळीवर खिन्न करणारं असलं तरी तोच व्यावहारिक निर्णय आहे हे नारायण-चांगदेव संवादातून समोर येतं. आजचा माणूस असेल किंवा कोणत्याही काळातला, त्याला तडजोड करून आयुष्याचा रहाटगाडा पुढे चालू ठेवावा लागतो. मिळाले नाही म्हणून द्राक्षं आंबट असे म्हणणारे कोल्हे तर प्रत्येक मानसाच्या मनात दबा धरून असतातच.

भालचंद्र नेमाडे. केवळ अप्रतिम! वास्तववादी चित्रण! म्हणजे, कुठेही काहीही रूपकात्मक, नाटकीय, अतिशयोक्ति वाटत नाही. सहजपणा हाच त्यांच्या लिखाणाचा आत्मा आहे. चार मित्र भेटल्यावर किंवा सामान्य तरुण कुठली भाषा वापरतो, कसा बोलतो, कसा विचार करतो हे तंतोतंत जुळतं. नायकाला उगाचच ‘आदर्शवादी’ दाखवण्याचा प्रयत्न नाही हे विशेष. म्हणजे, सिगरेट पिणे, पैसे नसतील तर उपाशी झोपणे, पाव खाऊन दिवस काढणे, अस्वच्छ जागा, दारू, एखादा बाईचा नाद असलेला मित्र वगैरे गोष्टी ओघाने आल्याच. कादंबरी वाचत असताना राहून-राहून अनुराग कश्यप यांच्या चित्रपतील दृश्य नजरेसमोर येतात. तारुण्यात असलेली बेफिकिरी, रग, अहंकार वगैरे वारंवार उफाळून येताना दिसतो. यातील चौहान प्रकरण तर ग्रेट आहे. असले पात्र प्रत्येक रूमवर असतातच. मित्रांमध्ये बसल्यावर एकमेकांच्या वडलांना बाप, म्हातारा वगैरे म्हणायची प्रथा आजही अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे एकमेकांच्या वडलांना, तुझे वडील, तुझे बाबा वगैरे म्हणायचा सभ्यपणा नसलेल्या तरुणांची ही गोष्ट आहे.
तरुणांच्या अनेक समस्या असतात आणि रोजच्या जगण्यात असंख्य अडचणी असतात पण त्या दुखाचा उगाच बाऊ न करता, तसे निराशाचे झेंडे फडकवत न राहता शिव्या, विनोद, मस्करी, टोकाचे वाद ह्यातून तो दबाव बाहेर पडायचा. कादंबरीची भाषा म्हणजे अनौपचारिक गप्पा असल्याप्रमाणेच आहे. त्यात प्रकाशक कुलकर्णी प्रकरण हे तर फार रंगलं आहे. तारुण्यात ज्या काही भानगडींचा सामना सामान्य तरुणांना करावा लागतो, त्याची नोंद येथे सापडेल. तरुणांच्या शक्तीचा अन भावनेचा गैरवापर करून घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणारे हे आज जन्माला आले नाहीत हे कुलकर्णी प्रकरणावरून समजतं. कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. उलट पुढचा भाग वाचल्याशिवाय चैन पडत नाही. टप्प्याटप्प्याने येणारे प्रसंग रममाण करणारे आहेत. यात केवळ चांगदेव याच्या आयुष्यावर प्रकाशझोत आहे अशातला भाग नसून, त्याच्या मित्रांच्या आयुष्यावरही लक्ष वेधलं जातं. ही मित्रांची गोष्ट आहे. त्या मित्रांमध्ये आपण कुठेतरी स्वतःला सापडतोच. जगाच्या उंबरठ्यावर असलेले तरुण काळ-वेळेनुसार काय निर्णय घेतात आणि मार्गक्रमण करतात याचं रेखाटन मन स्थिर-अस्थिर कक्षेत घेऊन जातं.

जीवन नावाचा सारीपाट कधीच कोणालाच पुर्णपणे उलगडत नसतो. एक-एक सोंगटी पडत जाते. खेळ कधी रंगतो तर कधी भंगतो. सवंगडी कधी अर्ध्यावर डाव सोडून जातात तर काही सवंगड्याचा डाव आपल्याला सांभाळून घ्यावा लागतो. आयुष्याचा हा गमतीशीर #वनवास वाचताना हसू आणतो आणि भावुकही करून जातो.

तारुण्यातील सळसळतं जीवन जगलेल्या प्रत्येकाने एकदा तरी वाचावं असं पुस्तक!!!
http://latenightedition.in/wp/?p=1900


Return to “पुस्तक परिक्षण”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there is 1 user online :: 0 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today