महिमा अंगठीचा

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
चेतन सुभाष गुगळे
Rgistered member
Rgistered member
Posts: 2
Joined: 24 Oct 2010 15:47
नाव: चेतन
आडनाव: गुगळे
Location: PUNE
Contact:

महिमा अंगठीचा

Postby चेतन सुभाष गुगळे » 16 Feb 2011 16:01

मला ओळखणार्‍या मंडळींना लेखाचे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार. म्हणजे मी काही कोणी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे आणि अनेक लोक मला ओळखतात असा काही माझा दावा नाही पण माझ्या वर्तूळातले जे काही थोडे फार (किंवा खरं तर फार थोडे) लोक मला ओळखतात, माझे विचार जाणून आहेत त्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की मी नास्तिक आहे. त्यामुळे अंगठीच्या वापराने भाग्य उजळेल असं तर मी निश्चितच सांगणार नाहीय.
त्याशिवाय दागिन्यांच्या वापराला देखील माझा नेहमीच विरोध असतो व तो मी वेळोवेळी खासगीत तसेच जाहीरपणेदेखील प्रदर्शित केलाय. त्यातही सुरूवातीला माझा शरीराला छेद पाडून वापरल्या जाणार्‍या दागिन्यांना जास्त विरोध होता; पण एका घटनेने माझा अंगठीच्या वापराला असलेला विरोध देखील तितकाच तीव्र झाला. १९९८ साली माझ्या एका शेजार्‍याला घेऊन मी इस्पितळात गेलो असता तिथे टेल्को चा एक अभियंता उपचाराकरिता आलेला मला दिसला. त्याच्या हाताच्या बोटांवर अवजड वस्तू पडून गंभीर दुखापत झाली होती. डॊक्टरांना पुढील उपचार / क्ष-किरण तपासणी या करिता त्याच्या बोटात असलेली अंगठी काढणे गरजेचे होते पण बोटात ज्या भागावर अंगठी होती त्याच्या पुढच्या भागावरच गंभीर जखम झाली होती. आता ती घट्ट बसलेली अंगठी (अंगठी सर्वसाधारणपणे घट्ट बसणारीच असते अन्यथा ती कधीही बोटातून निसटून पडू शकते) काढायची तर त्या दुखापत झालेल्या भागाला घासूनच काढावी लागणार म्हणजे पुन्हा असह्य वेदनांना सामोरे जाणे आले. शेवटी तिथली परिचारिका म्हणाली, “अब तो काट ही डालनी पडेगी.” मी घाबरून विचारले, “तो क्या अब आप इनकी उंगली काट डालेंगे?” तेव्हा माझ्या कडे आश्चर्याने पाहत ती उत्तरली, “नही, उंगली नही इनकी अंगुठी काट देंगे.” पण बोट कापणे ज्यांना शक्य आहे असे इस्पितळातले विशारदही अंगठी कापू शकत नाहीत, त्याकरिता मग दागिन्याच्या दुकानातून कारागिरास पाचारण करण्यात आले आणि त्या रूग्णाच्या पुढील उपचारांना अजूनच विलंब झाला. त्यानंतर माझ्या डोक्यात अंगठी चा वापर एकदम निषिद्ध हा विचार पक्का रूजला.
मग आता लेखाचे शीर्षक अशा पद्धतीने देण्याचे मला कारण तरी काय असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल तर त्याचे स्पष्टीकरण असे की लेखाच्या शीर्षकात वापरलेला अंगठी हा शब्द प्रतीकात्मक आहे. आपल्या सर्वांना अल्लाउद्दीन आणि त्याच्या जादुई दिव्याची गोष्ट ठाऊक असेलच. या गोष्टीतील हा जादुई दिवा मूळात अल्लाउद्दीनच्या मालकीचा नसतो तर त्याचा काका म्हणवून घेणारा एक जण (जो या कथेचा खलनायक आहे) त्याला आपल्या सोबत घेऊन जातो आणि एका अंधार्‍या तळघरातून मोठा धोका पत्करून हा दिवा शोधून आणण्याचे काम अल्लाउद्दीनवर सोपवितो. अल्लाउद्दीनला या कार्यासाठी तळघरात पाठविण्यापुर्वी हा त्याचा तथाकथित काका त्याच्या बोटात एक अंगठी चढवतो. ह्या अंगठीत देखील दिव्याप्रमाणेच घासल्यावर आज्ञाधारक राक्षसाला प्रकट करण्याचा गुण असतो. फक्त दिव्याच्या तूलनेत या अंगठीच्या राक्षसाच्या काही मर्यादा असतात व क्षमता कमी असते. ही अंगठी अल्लाउद्दीनला तात्पुरत्या स्वरूपात तळघरातील मोहिमेत काही अडचण आल्यास मदतीकरिता दिली गेलेली असते. नंतर जेव्हा अल्लाउद्दीन दिवा मिळवितो तेव्हा हा काका म्हणविणारा इसम लबाड असल्याचे त्याला कळते व तो दिवा त्याला द्यायचे नाकारतो आणि स्वत:साठीच त्या दिव्याचा वापर करतो. मालकाच्या इच्छापूर्तीबाबत दिव्याच्या राक्षसाची क्षमता प्रचंड असल्यामुळे पुढे दिव्याचाच वापर मोठ्या प्रमाणात केला गेल्याचा कथेत उल्लेख येत राहतो. त्यासोबतच खलनायकाचे दिवा स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि नायकाने खलनायकापासून दिव्याची केलेली जपणूक या बाबीही कथानकाच्या प्रवासात पुढे वाचकांच्या समोर येत राहतात.
पुढे एका प्रसंगी खलनायक अल्लाउद्दीनचा हा जादुई दिवा स्वत:च्या ताब्यात घेण्यात यशस्वी होतो. आता अल्लाउद्दीनचे कसे होणार या काळजीत पडलेला वाचकदेखील नायक व खलनायकासोबत एव्हाना अंगठीला विसरलेला असला तरी लेखक मात्र तिला ध्यानात ठेवून असतो आणि ही योग्य संधी साधून पुन्हा ती लोकांच्या नजरेत आणून देतो. त्याचे असे होते की, दिवा नाहीसा झाल्यामुळे हताश झालेला अल्लाउद्दीन हातावर हात चोळत बसलेला असतो तेव्हा त्याच्याकडून नकळत बोटातील अंगठी घासली जाऊन त्यातून राक्षस प्रकट होतो. अल्लाउद्दीनला कळतच नाही की दिवा हरवला असला तरी आता राक्षस कुठून आला ते. मग राक्षस त्याला आपण अंगठीच्या मालकाचे गुलाम असल्याचे सांगतो. तेव्हा अल्लाउद्दीन त्याला प्रथम दिवा आणून देण्यास फर्मावतो. राक्षस त्याला दिव्याची ताकद अंगठीहून मोठी असल्याने तसे शक्य नसल्याचे समजावतो पण त्याचसोबत इतर लहान मोठी मदत करण्याचे आश्वासन देतो. पुढे ह्या अंगठीच्या राक्षसाचे मर्यादित सहकार्य आणि अल्लाउद्दीनचे बुद्धिचातुर्य ह्या दोहोंच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळून दिवा पुन्हा अल्लाउद्दीन च्या ताब्यात येतो. या कथेत अंगठी दिव्यापेक्षा कमी क्षमतेची असल्याचे दाखविली गेले असले तरी दिवा पुन्हा मिळविण्यासाठी या अंगठीची मदत मोलाची ठरल्याचे वाचकांच्या लक्षात येते.
या गोष्टीत उल्लेख केलेल्या अंगठीसारखी किमान एक तरी अंगठी आपल्यापैकी प्रत्येकाकडे असते आणि ती म्हणजे आपल्यापाशी असलेले दुय्यम कौशल्य. एक मुख्य कौशल्य आपल्याकडे असते ज्याच्या बळावर आपण आपला चरितार्थ चालवित असतो जसे डॊक्टर, इंजिनीयर, वकील, इत्यादी. त्याशिवाय आपणापाशी अजुनही एखादे कौशल्य असू शकते की ज्याचा आपण व्यावसायिक वापर करीत नसलो तरी तो आपला छंद असू शकतो जसे गायन, वादन, लेखन, चित्ररेखाटन, इत्यादी. अल्लाउद्दीनचा दिवा त्याच्या ताब्यातून नाहीसा झाला तसे पुढे आयुष्यात काही कारणाने आपल्याला आपल्या मुख्य कौशल्यास बाजूला ठेवावे लागले (म्हणजे पगारदारांना सक्तीची/स्वेच्छा निवृत्ती आणि व्यावसायिकांना अपयश इत्यादींमुळे) तरी आपले हे दुय्यम कौशल्य अल्लाउद्दीनच्या गोष्टीतील अंगठीप्रमाणे आपल्या मदतीला धावून येऊ शकते आणि उत्पन्नाचे साधन देखील ठरू शकते. क्वचित प्रसंगी आपल्या मूळ व्यावसायिक कौशल्यापेक्षा ह्या छंदामुळेच आपल्याला जास्त पैसा, प्रसिद्धी व समाधान मिळू शकते.
देशातील सर्वात मोठे महाकाव्य समजले जाणार्‍या महाभारतात देखील पांडवांना जेव्हा बारा वर्षे वनवास व एक वर्ष विजनवास भोगावा लागला तेव्हा पांडवांनी आपल्या दुय्यम कौशल्यांच्या जोरावर ते एक वर्ष विराट राजाच्या पदरी व्यतीत केले. गदायुद्धात प्रवीण असलेला भीम त्याच्या भोजनप्रेमामुळेच चांगला आचारी देखील होता व बल्लवाच्या रूपात त्याने ते सिद्ध करून दाखविले तर सौंदर्यसम्राज्ञी द्रौपदी सौंदर्योपचारांविषयी ज्ञान असल्यामुळे त्या काळातील सुदेष्णा राणीची ब्युटीशिअन म्हणून सैरंध्री या नावाने यशस्वीपणे वावरली. भालाफेकीत कुशल असलेल्या युधिष्ठिराने आपण शकुनीच्या कपटामुळे हरलो असलो तरी द्युतातील कौशल्य अंगी असल्याचे दाखवून दिले आणि धनुर्धारी अर्जुनाने नृत्याच्या स्टेप्समध्येही आपला नेम चूकत नसल्याचेच राजकुमारी उत्तरेचा नृत्य शिक्षक म्हणून वावरताना बृहन्नडेच्या रूपात सिद्ध केले.
पौराणिक कथांना बाजुला ठेवले तरी चालु काळातही मोहन आगाशे, गिरीश ओक व श्रीराम लागू यांच्यासारख्या लोकांनी वैद्यकीय व्यवसायापेक्षाही अभिनयातून नेत्रदीपक यश कमावल्याचे आपणांस दिसून येते. यापैकी श्रीराम लागू यांना तर ऎनासिनच्या जाहिरातीत काम केल्यामुळे वैद्यकीय व्यवसायापासून त्यांच्या संघटनेने वंचित केले आहे तरी त्यांच्या चरितार्थावर यामुळे फरक पडलाच नाही. सलील अंकोला ह्या क्रिकेटपटूला त्याच्या दुखापतीमुळे खेळापासून मुकावे लागले तरी त्याने अभिनयाद्वारे दूरदर्शनमालिकांमध्ये स्वत:चे बस्तान बसविले. बॆरिस्टर जीना व जवाहरलाल नेहरू हे राजकारणाइतकेच वकिलीत देखील यशस्वी ठरले. हल्लीचे अनेक राजकारणी सुद्धा वकिली व्यवसायातील पदवीधर असतात.
कधी कधी तर एखाद्या व्यक्तिकडे इतकी कौशल्ये असतात आणि सगळीच इतकी महत्वाची असतात की कशाला दुय्यम म्हणावे हा प्रश्नच पडतो. गायक / अभिनेता म्हणून परिचित असलेले स्व. श्री. किशोरकुमार हे तितकेच उत्तम गीतकार, संगीतकार, लेखक व दिग्दर्शकही होते. अतिशय यशस्वी शास्त्रज्ञ असलेले डॊ. ए.पी.जे अब्दुल कलाम जगभर ओळखले गेले ते भारताचे राष्ट्रपती झाल्यावर. त्या पदावरून निवृत्त झाल्यावरही त्यांनी आपली ओळख एक विद्वान प्राध्यापकाच्या रूपात जगापुढे ठेवलीय. ह्या लोकांपाशी एकाहून अधिक अंगठ्या असल्यामुळे ह्यांना आयुष्यात कधीही ’पुढे काय?’ अशी विवंचना सतावणार नाही हे नक्की. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी ह्या प्रतीकात्मक अंगठीचा एवढा महिमा जाणून घेतल्यावर निदान एकतरी अंगठी बाळगायला (खरं म्हणजे ओळखायला कारण आपल्याकडे ती असतेच पण आपण तिच्याकडे लक्ष देत नाही) हवीच, कोणास ठाऊक दिवा कधी हातातून निसटेल तेव्हा हातावर हात चोळत बसायची वेळ आलीच तर बोटात घट्ट बसलेली अंगठीच मदतीला धावून येईल ना?

[blink]चेतन सुभाष गुगळे[/blink]
Last edited by चेतन सुभाष गुगळे on 07 Mar 2011 22:13, edited 1 time in total.


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: महिमा अंगठीचा

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:15

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

Re: महिमा अंगठीचा

Postby आपली मराठी » 11 Mar 2011 23:02

चेतनजी आपल्या लेखाचा गाभा पोहोचला, अशी प्रतिकात्मक अंगठी सर्वांकडेच असते हेही पटले, कदाचित काही लोकांना कस्तुरीमृगाप्रमाणे त्याची माहीती नसते.


pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
Posts: 38
Joined: 18 Oct 2010 12:06

Re: महिमा अंगठीचा

Postby pallavi kulkarni » 13 Mar 2011 17:29

सुंदर लेख! शिर्षकावरुन आधी कल्पना येत नाही..पण विषय चांगला फ़ुलवत नेला आहे.आणि शिवाय संदेश ही छान! आवडला मनापासून!


सौ.पल्लवी

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 4 users online :: 0 registered, 0 hidden and 4 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1804
Total topics 1437
Total members 638
Our newest member maharashtrianamit
No birthdays today