संजयचा खून आणि...

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
kkamleshr
Posts: 1
Joined: 01 Dec 2010 12:47
नाव: kamlesh
आडनाव: kulkarni

संजयचा खून आणि...

Postby kkamleshr » 16 Feb 2011 09:53

‘कुख्यात गुंड’ संजय उर्फ पिंट्या मारणे मारला गेला त्याला आता सहा महिने होत आलेत. (खातरजमा करण्यासाठी ही लिंक पहा http://www.indianexpress.com/news/Gangs ... red/660451. संजय जाणारच होता. भर चौकात रक्ताच्या थारोळ्यात. हे त्यालाही ठाऊक होतं. वेगळं काहीच घडलं नाही.
मी हे ठामपणे म्हणतोय कारण संजय माझा मित्र होता. वर्गमित्र-बेंचमित्र. लहानपणापासून तो जाईपर्यंत वरवर का होईना पण माझा त्याच्याशी मैत्रीपुरता संबंध होता. त्यामुळेच त्याच्या बाबतीतल्या ब-यावाईट गोष्टी मला अनुभवयला मिळाल्या आहेत.
कुख्यात गुंड ही उपाधी घेऊन संजय ‘नावा-रूपाला ’ आला आणि गेला. एरव्ही असा कुठलाही गुंड गेला असता तर “बरं झालं, असंच होत त्यांचं” अशा शब्दांतच मी आणि माझ्या मित्रांनी प्रतिक्रिया दिल्या असत्या. तेही प्रतिक्रिया द्यायच्या सवयीमुळे. अन्यथा तेही केलं नसतं.
आज सहा महिने होऊनही संजय डोक्यातून गेला नाही. लहानपणापासून त्याला पाहिलं होतं. यातून मला संजय मारणेचं उदात्तीकरण करायचय असा अर्थ घेऊ नका. त्यासाठी फ़िल्मस पुरेशा आहेत.

शाळा आणि पाळण्यातले पाय...

आम्ही एका खेडेगावात एका शाळेत एका वर्गात होतो. संजयचे पाळण्यातले पाय ६ वीत असताना दिसल्याच विशेष आठवते आहे.
मुळशी-मावळात बिबा किंवा बिबई नावाचे एक झाड आहे. त्याचा चीक अंगावर उततो. म्हणजे अंगावर पुरळ येतात , मोठाले फोड येतात , त्वचा भाजल्यासारखी होऊन जाते. तर या बिब्याचा चीक जमवून संजयने त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर ‘मर्द’ असा शब्द स्वतःच्याच हाताने आयुष्यभरासाठी गोंदवून घेतला होता. बाकी आम्हां मुलांसाठी हा विषय खुप चर्चेचा ठरला होता. बाईंनी त्याला त्यासाठी दोन दिवस वर्गाबाहेर कोंबडा करून शिक्षा दिल्याचही आठवतय. आम्ही त्याला पुढे शाळा सोडेपर्यंत तो मर्द वाला त्वचेवरचा डाग भाया वर करुन दाखवायला लावायचो. हा मर्द शब्द त्याला कुठल्याशा एका चित्रपटानेच देऊ केला होता.
तसा तो भांडकुदळ किंवा अहंकारीही नव्हता पण खुप खोड्या करायचा. अर्थात वर्गात इतरही बरीचशी मुले त्याच कॅटॅगरीतली असल्यामुळे तेव्हा संजय वेगळा ठरला नाही.
याउलट संजय अभ्यासात बरा होता. त्याचं अक्षर छान होतं. दर वर्षी होणा-या गॅदरींगमधेही संजय आवर्जून भाग घ्यायचा. नाटकासाठी लागणारं पाठांतर संजयकडे होतं. शाळा बुडवून इतर मुलांसारखे उद्योग त्याने केले नाहीत. त्यामुळे वर्गातल्या अ‍ॅव्हरेज मुलांसारखाच तोही एक.

शाळेनंतर...

दहावी नंतर आमच्याबरोबरीचे बहूतांश मित्र पुण्यात आलो. (रोजीरोटी, शिक्षण या कारणांसाठी) यात मी आणि संजयही होतोच. संजयने दहवी नंतर शिक्षणाच्या आईचा .... घो केला. मग आम्हा सर्वांचाच रोजचा संबंध संपला होता. कधे मधे कुणाकुणाची भेट झाली की एकामेकांविषयी चर्चा व्हायच्या. त्यात मला संजय वरचेवर भेटायचा त्याचं कारण म्हणजे त्यावेळी तो सिटर रिक्षा चालवित असे. मी कॉलेजला जाताना ब-याचदा त्याचीच रिक्षेत गेलोय. साधारण ३ वर्षे आम्ही असे भेटायचो. गावच्या, मित्रांच्या, शाळेच्या अशा रूटीन गप्पा व्हायच्या. शाळेबाहेर आणि गावाबाहेरचे हे संबंध मला छान वाटायचे. आणि बहूदा त्यालाही. पण नंतर माझ्याकडे गाडी आल्यामुळे ते वरचेवर भेटणंही कमी झालं.

एक किस्सा ...

पुढे साधारण वर्षभराने संजय मला रस्त्यात भेटला. त्याची बॉडी लॅंग्वेज आणि पोषाखात बरीच सुधारणा होती.
मी विचारलं “हल्ली दिसत नाहीस?”
त्यावर त्याने आपण रिक्षा चालवणे सोडून केबलचा आणि गॅरेजचा व्यवसाय सुरू केल्याचे सांगितले. मला आश्चर्य वाटले. इतक्या कमी वयात संजय सेटल होत होता. याउलट मी अजून शिकतच होतो. मला त्याचे कौतुक वाटले.
पण नंतर चहा पिता पिता तो म्हंटला; “ कमल्या आपन आता अजून एक बिझनेस सुरू केलाय. सुपारीचा.”
मी विचारलं; “काय सांगतोस? येवढ्या सुपा-या खपतात की सुपारीचा बिझनेस होईल.”
तो हसला म्हणाला; “खायची सुपारी नाय. द्यायची आणि घ्यायची सुपारी.”
माझं त्यावेळचं अद्ग्न्यान पाहून संजय शांतपणे आणि विस्ताराने सांगू लागला ; सिनेमात असते तशी सुपारी. म्हणजे एखाद्या माणसाचं कुठलं तरी काम आडून आहे ते सरळ मार्गाने होत नाहीये तर मग ते दुस-या मार्गाने करायचं. भाईगिरी करून. अशा कामाला सध्या खुप डिमांड आहे. पैसापण खुप आहे. कुठं रोज रोज मगजमारी करत जगा.
मी गमतीने म्हंटलं; “म्हणजे तूला वास्तव मधला ‘संजूबाबा’ व्हायचय तर...”
त्यावर त्याने शर्टचे एक बटन उघडून गळ्यातली जाडजूड चेन दाखवली आणि हातावर टाळी मारली. जाता जाता म्हणाला ; “तुला कुणीही त्रास दिला तर आपल्याला सांग. पार जीव्व मारायचं असलं तरी सांग. आपल्या माणसांसाठी काम नाय करायचं तर मग कुणासाठी? ”
मी म्हणालो; ( अर्थात गमतीनेच. त्यावेळी मला कविता लिहिण्या-वाचण्याचं भारी वेड जडलं होतं. त्यामुळे) “ठिक आहे. मला कुणाला मारावसं वाटलं तर मी तुला सांगेन आणि समजा तुझ्या आयुष्यात असा कुणी माणूस आलाच की जो जगण्याला वैतागलाय तर तू त्याला माझ्याकडे पाठव. मी त्याला जगायला प्रवृत्त करीन.”
माझ्यासाठी महत्वाची ठरलेली गोष्ट अशी की त्यावेळी मी जे बोललो त्याचा अर्थ संजयला व्यवस्थित कळला होता कारण नंतरच्या प्रत्येक भेटीत संजय माझ्याशी खुप तारतम्य राखूनच बोलला.

पुढे पुढे...

पुढे एके दिवशी एका खुनात संजयचा हात असल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकली आणि झोप उडाली. मग गावाकडचा कुठलाही माणूस भेटला तरी संजयचा विषय निघाला नाही असं नाही. काही जणांना तो खुप पुढे गेला असं वाटलं. तर काहींना त्याचा आणि आमचा काहीच संबंध नाही इतपतच मत नोंदवण्यात धन्यता वाटली. खंडणी, खुन, अपहरण अशा बातम्यातून संजय वाचायला मिळू लागला.
मी एका मित्राला म्हंटलं; “संजय जे करतोय त्याचा शेवट काय होतो हे त्याला कळत असेल म्हणजे झालं”.
त्यावर मित्र म्हणाला; “जाऊ दे रे. हल्ली पैसा खुप महत्वाचा आहे. तो त्याच्या जीवावर कमवतोय. आज त्याच्याकडे २ फ्लॅट आणि २ अलिशान गाड्या आहे. आपल्या सात पिढ्या विकल्या तरी येतिल का येवढे पैसे?”
मला काय बोलावं ते कळेना. मीच कन्फ्यूज झालो.

गुंड झाल्यानंतरच्या भेटी...

अर्थात नंतर आम्ही संजयची चर्चा करत असलो तरी त्याला भेटणे टाळू लागलो तो ज्या एरीयात बसायचा तिथे शक्यतो जायचे नाही. तोंड लपवायचे वगैरे. कारण नंतर त्याच्याशी काय बोलायचे हाच खुप मोठा प्रश्न होता.
गुंड म्हणून जग जाहीर झाल्यावर संजय एकदा भेटला. मला भीती वाटत होती. उगीच इकडची तिकडची विचारपूस झाली. मग त्याने चहाचा आग्रह केला. बसलो. चहाचं फर्मान सुटलं.
म्हणाला; “हल्ली गावातलं कुणी भेटतच नाय. सगळी पोरं काम धंद्याला लागलीत.”
मी “हं” करत होतो. मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं; “लग्न केलस का रे?”
तो तत्काळ; “हो. दोन महिने झाले. (अजून धक्का). तुला बोलवायचं राहिलं. घाईत झालं. एका खुनासाठी सहा महिने जेल मधे होतो. मग बाहेर आल्यावर लगेच लग्न केलं. पुढचं काही सांगता येत नाय ना... आता आपण लै फेमस झालोय. ***दादांचा आपण उजवा हात झालोय. त्यांनीच जेल मधून सोडवलं. लग्नासाठी एक पाच गुंठ्याचा पिस दिला एका बिल्डरनी.”
संजय बोलतोय म्हणूण मी धाडसाने विचारलं; “तुला हे सगळं करताना भीती नाही का वाटत?”
म्हंटला;“कुनाची भीती? आपल्याला लोक घाबरतात. आपण नाय कुनाच्या बापाला भीत.”
मग पुढे कधे मधे संजय आणि मी भेटलो. नंतर त्याची भीती नाहीशी झाली पण त्याच्या ‘प्रतापां’विषयीचे कुतूहल वाढत राहिले.
नंतर भेटलो तेव्हा तो म्हणाला; “काय कमल्या, बिझनेस चालू केलास कळवलं नाहीस. हिच का दोस्ती? बरोबरे तुम्ही आम्हांला कशाला बोलवाल? तुमचे दोस्त स्टॅंडर्ड.” त्याला माझ्या कामाविषयी कुणाकडून कळलं होतं. त्यावर मी काही तरी सारवासारव करून वेळ मारून नेली. पण त्यातून संजयला समाजात टिकून राहण्याची गरज दिसली. त्यावेळी तो म्हणाला होता की बिझनेसमधे पेमेंट थकलं, कुणी त्रास दिला तर सांग. सगळे लोक चांगले नसतात. तुझं काम करून देईल. तुझ्यासारख्या सज्जन माणसाचं काम करुन पूण्यच मिळेल. (त्याच्या सुपारीच्या क्षेत्रामुळे मी त्याला ‘सज्जन’ वाटणं सहाजीक असावं. असो.) पण त्यावेळी वेळापुरता का होईना मला संजयचा आधार वाटला. वर्थ सिच्यूएशनला एक तरी हक्काचं माणूस मागे असल्याचा. (पुढे अशी गरज पडू द्यायची नाही आणि पडली तर हा मार्गही निवडायचा नाही हेही उमगलं.)
मी एकदा विचारलं की तुला जीवाची, पोलिसांची इतकी भीती आहे मग हा धंदा सोडावासा वाटत नाही का?
त्यावर तो म्हणाला की रिस्क सगळीकडे असते. इथे जरा जास्त. डायरेक्ट वरचा रस्ता. त्याची भीती वाटते कधी काय होईल नेम नाही. म्हणूनच आता मी राजकारणात उतरणारे. कॉर्पोरेशनला. (धक्के पे धक्का) ***दादांशी बोललोय. त्यांनी तिकीटाचं कबूलही केलय. मग आता वॉर्डात रक्तदान, वॄक्षारोपण चालवलय. शाळा काढणारे. लोकांचा पाठिंबा आहे आपल्याकडं. ऑफिस टाकलय. वगैरे.
त्यावेळी मात्र मला चरचरल्यासारखं झालं. उद्या संजयसारख्या माणसाला आपण आपला नेता म्हणून पहायचं? त्यात तसं करून त्याचे बाकीचे धंदे बंद होणार असते तरी काही हरकत नव्हती. पण तशी शक्यता तरी कुठली. तो जीवाच्या भितीने सेफ व्हायला राजकारणात येऊ पाहत होता.
संजय बरोबरच्या गप्पातून लॅंड माफिया, बिल्डर्स आणि राजकारणी यांचं परस्पर हितसंबंधांचं साटोलोटं समजलं. दुसरीकडे आपण सगळे सामान्य माणसं यापासून किती दूर आहोत हेही उमगलं.

संजयचा खुन...

संजयचा खुन झाल्याची बातमी मला आमच्या एका मित्राने सांगितली. तेव्हा तो म्हणाला की तू जे म्हणायचास तसच झालं पण हे येवढ्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. संजय गेला हा संजयच्या बाबतीतला फायनल धक्का होता. खरच हे इतक्या लवकर होईल असं ध्यानीमनी नव्हतं. पण हे होणार होतं हे खरं.
संजयच म्हणाला होता एकदा “तसा भरवसा नाही कधी काय होईल. इतक्या लोकांचे तळतळात आहेत उरावर...” आणि मला हेही तो म्हणायचा की “भेटत जा. तू भेटलास की बरं वाटतं. बोलावसं वाटतं. लोक टाळतात मला.”
आता संजय भुतकाळ आहे. वर्तमानात असे अनेक संजय आजूबाजुला असतीलच. याचे अर्थ आणि याची उत्तर काय हे प्रश्न तसेच पडून आहेत. कदाचित जगभर...

:- कमलेश कुलकर्णी


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: संजयचा खून आणि...

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:15

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

Re: संजयचा खून आणि...

Postby आपली मराठी » 11 Mar 2011 22:56

वाचत गेलो, ..........वाचत गेलो,..........क्षणभर काय प्रतिक्रीया लिहावी हे कळेचना...असे अनुभव खुप काही शिकवतात पण खंत ही वाटते की ज्यांनी हे वाचायला पाहीजे ते मात्र अस काहीच आणि कधीच वाचत नाहीत..असो सुंदर........


pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
Posts: 38
Joined: 18 Oct 2010 12:06

Re: संजयचा खून आणि...

Postby pallavi kulkarni » 13 Mar 2011 17:44

विचार आवडले...असा विषय समोर मांडुन वाचकां समोर प्रश्न उभा केलात...पन आपन या साठी काही प्रयत्न केला की नाही..त्याला बाहेर पडण्यासाठी, या कामातुन त्याला बाहेर पडण्याचे काही प्रयत्न केल्याचे वाचनात यावे या साठी उत्सुक होते...पन निराशा पदरी आली..मग जगात किती का असेनात...आपल्या जवलचा मित्र खड्ड्यात पडताना दिसत असून आपण काहीही प्रयत्न केले नाहीत ..मग जगाकडुन कसली अपेक्षा?
असो !
लेख म्हणुन प्रयत्न चांगला.


सौ.पल्लवी

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 1 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today