शेवटचा श्वास
चार दिवसांपासून केवळ एकच घोषा लावलेला, ‘बापू आला का?’ म्हणून,,,नजर सतत दरवाजाकडे लागलेली...कान बापूच्या पाऊलांच्या आवाजाकडे...सारेच बापूच्या येण्याची वाट बघत...म्हातारीची लवकर सुटका व्हावी म्हणून सारेच थांबलेले...आवाजाचा कानोसा आणि दूरपर्यंत डोळे लावून बसलेले सारेचजण...ती अडलेली तसे सारेच अडलेले...शेवटच्या श्वासाची वाट बघत...श्वास निघत नव्हता...पायही निघत नव्हता...तिच्या जगण्याची आशा सगळ्यांनीच सोडून दिलेली...तिने लवकर इथलं बस्तान गुंडाळावं म्हणून किंवा देवानं लवकरात लवकर सारंकाही संपवावं एवढीच इच्छा बाळगणारे सारेच...तरीही तिचं तिथलं बस्तान अजूनही टिकून होतं...तिच्या छातीकडे एकटक बघत असलेली तिची सून सुभद्रा...चमच्या चमच्यानं अधुनमधून तिच्या जिभेवर पाणी टाकताना तिचीही नजर तिच्या धन्याच्या येण्याकडे लागलेली...गणू आणि शेवंता, तिची मुलं, जमीनीवर झोपलेल्या आजीकडे, डोळ्यातून आसवं काढणा-या मायकडे आणि घरी येऊन ‘आहे अजून की गेली’ ह्या प्रश्नचेह-याकडे बघत शांतपणे सुभद्रेच्या जवळ बसलेली...पोटात भूक दाटलेली परंतु तरीही न बोलता, ‘मोठीमाय कवा ब्येस व्हईल’ ह्याचा विचार करणारी.
बापू, सुभद्रा, त्यांची दोन मुलं गणू-शेवंता आणि बापूची विधवा आई एवढसं हे कुटुंब, पाच एकराच्या तुकड्यावर जगणारं म्हणण्यापेक्षा दिवस काढणारं, तरीही आहे त्या स्थितीत सुख मानणारं. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यावरच्या कामासाठी सारं कुटुंब गांव सोडायचं आणि पावसाळ्याच्या अगोदर पुन्हा गांवात परतायचं.
पांडुरंगावर कुटुंबाची श्रद्धा. आपल्यावर त्या पांडुरंगाचीच कृपा असल्याची खात्री. बापूचं मायवर, सुभद्राचं सासुवर आणि मुलांचा मोठ्या मायवर खूप जीव. तिचा शब्द खाली जाणार नाही ह्याची काळजी घेणारं सारं कुटुंब. सुखाची अपेक्षा आणि दु:खाची चर्चा न करणारं कुटुंब, कुणाशी भांडण, तंटा, अबोला, वाद-विवाद, शत्रुत्व नसलेलं कुटुंब, बालपणापासून पांडुरंगावर पूर्ण भार टाकून गेलेल्या दिवसाला आनंदाने निरोप आणि नव्या दिवसाचं सहर्ष स्वागत करणारं कुटुंब, पांडुरंगाच्या भक्तीत स्वत:ला गुंतवून टाकणारं कुटुंब.
बापूचा बाप दर आषाढीला सहकुटुंब पंढरपूरच्या वारीला जायचा. एका वारीला तुळशीमाळ घालून पांडुरंगाच्या वारीहून परतताना रात्री ताप भरल्याचं निमित्त्य झालं आणि बापूचा बाप देह सोडून गेला. पांडुरंगाच्या दर्शनाने पावन झालेल्या देहाचे क्रियाकर्म रस्त्यातच आटोपून दु:खी अंत:करणानं कुटुंब गावी परतलं आणि बापाच्या अचानक झालेल्या मृत्युनं दु:खी झालेल्या बापूनं एक कठोर निर्णय घेतला की आता ह्यानंतर पुन्हा वारीला जायचं नाही. बापूची पांडुरंगावरची श्रद्धा मात्र ह्या प्रसंगामुळे कमी झालेली नव्हती. परंतु बापाच्या वारीतील मृत्युची एक खोल जखम त्याला वारीला जायला अडवित होती एवढेच.
गेल्या दोन वर्षापासूनच्या काळात बापूने आयुष्यात थोडी सुगी अनुभवली. मुलं शाळेत जायला लागलेली, मोठ्या मायला पुस्तक वाचून दाखवायची आणि ते बघून बापू आणि सुभद्रा सुखावून जायचे. घरात खूप भरभरून जरी नव्हतं तरीही समाधान मात्र काठोकाठ भरलेलं. ह्या समाधानातही मनात छोटी छोटी वादळं कधी कधी उसळायचीच परंतु भरपूर मिळण्याची अपेक्षाच नसल्यानं ती तिथल्या तिथं विरूनही जायची.
कसं असतं ना, गरीबीला आपल्या इच्छा, आशा कायम मनातच दाबून टाकाव्या लागत असतात. त्या पूर्ण होण्याची स्वप्नेच बघण्याची त्यांना इतकी सवय झाली असते नां की त्यांनी इच्छीलेली एखादी सामान्य गोष्टही प्रत्यक्षात आली ना की त्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. खूप आशा करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्या नशीबात नसतं; परंतु स्वप्नातून पूर्ण झालेली इच्छाही त्यांना घाबरवून टाकते आणि आपल्या आयुष्यात अचानक काहीतरी भयानक घडल्याचं त्यांना कायम जाणवत राहातं. एकप्रकारचं दडपण त्यांच्यावर आलेलं असतं आणि ह्या दडपणाखाली जगताना आपलं जसं काही होतं ना तेच योग्य होतं आणि तेच आपलं सुख होतं अशी त्यांची खात्री होत जाते.
मोठी माय मात्र आपल्या मनातली इच्छा मनातच दाबत राहीली. प्रत्येक आषाढी वारीला बापूच्या बापाच्या आठवणी तिच्या डोळ्यात भरून यायच्या. बापूच्या बापाला अग्नी दिला त्या जागेवर आयुष्यात एकदातरी भेट देण्याची तिला लागलेली आस. परंतु ती बापूला आपल्या मनातलं मोकळेपणे सांगत नव्हती मात्र मनातल्या मनात झुरत होती. तिचं असं मन मारून राहाणं, असं झुरणं तिच्या प्रकृतीवर परिणाम करीत होतं, दिवसेंदिवस तिची तब्येत खालावतच होती. मायच्या तब्येतीची काळजी बापूला सतावत राहीली आणि जसजशी आषाढी वारीचे दिवस जवळ जवळ यायला लागले तसतशी माय अस्वस्थ होत गेली.
खाटल्यावर पडून असलेल्या मोठ्या मायच्या मनातलं सुभद्रानं ओळखलं होतं आणि बापूला ते मायसमोर सांगणं आवश्यक होतं. रात्री जेवताना तिनं विषय काढला आणि बापूला मायच्या अस्वस्थपणाची जाणीव झाली. वारीला मायला घेऊन जाणं तर शक्य नव्हतं. कसंही करून ह्या वारीला निघायचं आणि परतताना बापाला जाळलं तिथली माती सोबत घेऊन यायची असा निर्णय त्याने घेतला.
आषाढी एकादशी होऊन चार दिवस झाले होते परंतु बापू अजून परतला नव्हता. बापूचा पाय घरातून निघाल्यापासून म्हातारीची तब्येत अधीकच खालावली आणि गेल्या चार दिवसांपासून जमीनीवर निपचित पडलेला तिचा देह फक्त बापूच्या येण्याची वाट बघत राहीलेला.
म्हातारीच्या जाण्याची वाट बघत असणारे हळुहळु कमी व्हायला लागलेले. रात्रीचा अंधार पसरलेला. गावातली कुत्री अचानक अशुभ ओरडायला लागली. घरात सुभद्रा आणि तिची दोन मुलं मोठ्या मायपाशी बसलेले...कुत्र्यांच्या अशुभ भुंकण्याने घाबरलेले कुटुंब... म्हातारीचा श्वास अचानक वाढलेला...छातीचा भाता वरखाली होणारा...अचानक सोसाट्याचा वारा सूरू झालेला...झाडांची सळसळ वाढलेली...थोड्या वेळात सारं वातावरण शांत झालेलं...मोठ्या मायचा श्वासही सामान्य झालेला...कुटुंबाला डोळा लागलेला. पहाटे पक्षांच्या किलबिलाटाने सुभद्राला जाग आली...बघीतलं मोठ्या मायच्या शेजारी एक पिशवी व त्यात काळीशार माती...तिने उघड्या दाराकडे बघीतलं, दुरून बापू येताना दिसला...चेहरा भकास...कपडे फाटलेले...हात मोकळे आणि पाय लंगडणारे...ती धावत त्याच्याकडे गेली...त्याला आधार देत तिने त्याला दारापाशी आणलं...बापूचं लक्ष मायकडे आणि त्या पिशवीकडे गेलं...माय शांत झाली होती, शेवटचा श्वास घेऊन.
मधुसूदन (मदन)पुराणिक,चंद्रपूर
शेवटचा श्वास (लघुकथा)
Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कथा,गोष्टी जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
- madhusudanpuranik
- Rgistered member
- Posts: 4
- Joined: 08 Oct 2016 09:38
- नाव: मधुसूदन
- आडनाव: पुराणिक
- Location: chandrapur (India)
Who is online
Registered users: Bing [Bot]