All posts by Vinayak Pandit

रणातला जनमेजय आणि इतर… २

भाग १ इथे वाचा!
जनमेजयानं मनातलं प्रस्थान प्रत्यक्षात आणलं खरं पण सहनिवासाच्या मुख्य द्वारी येऊन तो थबकला…
मोर्चे, मिरवणूक, जथ्था, जत्रा, यात्रा, वारी… काय म्हणायचं या सगळ्याला? त्याला सहनिवासाच्या प्रवेशद्वाराच्याही पुढे जाता येईना. सगळे रस्ते प्रवेशद्वाराशी आल्यासारखे. सगळेच येणारे. जाणारा तो एकटाच. असं कसं? चिवट इच्छाशक्तीनं मार्ग काढायचं ठरवलं. समोर येऊन ठेपलेले सगळे काळ्या कपड्यातले होते. काळे शर्ट किंवा झब्बे आणि काळ्या लुंग्या. अनवाणी. शर्टाची बटणं उघडी. चेहेरे रापलेले. पण तेही अस्ताव्यस्त दाढ्यांमधून ते दिसत कुठे होते? डोळे लाल. ते कश्यामुळे? सगळ्याच चेहेर्‍यांवर आलेली गुर्मी नैसर्गिक होती? की वेषांतरामुळे तसं वाटत होतं? हे वेषांतर होतं की- मनाला भरपूर फुरसत असते. पण काट्यांना नसते. त्यांना घाई पार्श्वभाग बडवण्याची- हे जमलेले सगळे कसला निषेध करत आहेत? स्वत:चा?- मनाच्या फुरसतीला दाबून व्यवहारी जनमेजय मेंढा झाला. डोकं वाकवून गर्दीत खुपसल्यावर सगळं सोप्पं. काळ्या गर्दीच्या अंगचटीला येत किंवा तिचं अंगचटीला येणं थोपवत त्याला पुढे जायचं होतं. काळी गर्दी संपली आणि भगवी कधी सुरू झाली? तीही संपली आणि तेवलेले लामणदिवे, पांढर्‍या काचोळ्या आणि लाल किनारीच्या साड्या, गजरे घातलेल्या गरत्या काळ्या ओबडधोबड स्त्रिया फुरसतीतले पद्न्यास कधी करू लागल्या? एवढ्या सकाळी? आणि तोपर्यंत एक लांबलचक गाडी चालवणारी बाई आणि तिच्यामागे अबब- नग्नं देह, बरेचसे म्हातारे, एकामागोमाग, व्हीलचेअरसदृश गाड्यांवर बसलेले, नेमक्या जागी मोरपिसांच्या चवर्‍या ठेऊन- आता पुढे काय- आपण पुढे जातोय ते कुठे- जनमेजय फंबलला. गर्दी संपली. ती कधीच संपणार नाही हे शपथेवर सांगणारं मन नंतर आलेल्या लांबलचक मोकळ्या मैदानामुळे गचकन ब्रेक दाबून थांबल्यासारखं झालं. हे मैदान रोज लागतं आपल्याला? की सगळी गर्दी आधीच शोषून घेतली गेल्यामुळे आता सगळंच ओकंबोकं झालं होतं? पुढचं दृष्यं बघून तो आनंदला. सगळे एकजात रिक्षाचालक मुतायला किंवा हागायला लागलेय पण होत नाहीये, करवत नाहीये अश्या अवस्थेत उभे. उकीडवे, डोक्याला हात लाऊन बसलेले. असं कधी होईल म्हणून जन्मेजयाने वाट बघितली होती. सतत चिडचिडून स्वत:च्याच हृदयाला खार लाऊन घेतला होता. त्याने आनंदाने गर्दीचं मनापासून अभिनंदन करायला मागे वळून बघितलं. अवघा रंग एकचि झाला होत. गर्दीचा. आणि अलिकडे प्ले ग्रुप या नावाने  प्रसिध्द आणि नावारूपाला आलेली शिक्षणसंस्था सुटून चिमुकली टिमुकली त्या रंगीत गर्दीच्या मागे धावत असलेली. तो त्या गर्दीकडे बघत राहिला…
क्रमश:

रणातला जनमेजय आणि इतर… १

जनमेजय
जनमेजयानं प्रस्थान ठेवलं. मनात ते सकाळपासूनच ठेवावं लागे. रात्रभर ते ठेवण्याच्या विचाराने अनेकदा जाग यायची, दचकून. तशी ती अनेक कारणांनी यायची अनेकदा. आकृतीताईचा पुरू, आठ वर्षाचा, गगनग्रास सहनिवासातच जास्त रमणारा, रात्रभर लोळ लोळ लोळे सर्वभर आणि पेकाटात लाथ हाणत राही. रात्रभर. तो नसेल तर विभूतीताईची शर्मिष्ठा, सहा वर्षाची, झोप झोप झोपत नसे रात्रभर. तीही इथेच रमणारी. ती चुकून झोपलेली असेल तर समीक्षाताई पुण्याहून आलेली असे. तिच्या जुळयांना घेऊन चार वर्षाच्या. त्याना बघायला, त्यांच्या लीलांचं कौतुक करायला आख्खा गगनग्रास सहनिवास लोटे. रात्रभर. किंवा मग बाळंतीण मीमांसाताईचं तान्हंबाळ असेच. रात्रभर. काहीच नसेल रात्रभर तर मग समिधाताईचं मित्रमंडळ असे ख्या ख्या करत हॉलमधे.

जवळजवळ रात्रभर. किंवा मग किचनमधे माधवस्वामी आणि कृपामाई- जनमेजयाचे जन्मदाते-समिधाच्या लग्नासकट कुठल्या न कुठल्या विषयाचा खल करत बसत. पहाटेपर्यंत. किंवा मग जनमेजयालाच झोप लागत नसे. उगाचच. पहाटेपर्यंत. पहाटे डोळा लागावा मस्त आणि ओटीपोटात हुरहूर सुरू व्हावी सुखद, आणखी खाली सरकणारी, तर दचकून जाग यावी प्रस्थान ठेवण्याच्या विचाराने. तर असं हे प्रस्थान.
सकाळी सकाळ झाली म्हणून मनातल्या मनात ते ठेऊन तो उठला तर त्याला कळलंच नाही आधी कुठल्या दिशेनं जावं. मग ते ध्यानात येतंय तर वाट सापडेना बाहेर पडायची. समिधाताईच्या मित्रमंडळींपैकी कुणीतरी, आकृतीताईचा नवरा, मीमांसाताईचा दीर, वरच्या चुलत चुलत गगनग्रासांकडचे पाहुणे अशी जनता आडवीतिडवी पसरलेली. नेहेमीप्रमाणे. बेसिनपर्यंत जातोय तर ब्रश कुणीतरी पळवलेला.  नेहेमीसारखा.  आंघोळीसाठी स्वतःचा टॉवेल शोधतोय तर तो आधीच ओलागिच्च. नेहमीच्या प्रथेप्रमाणे. चहाची वाट बघतोय तर आई योगाच्या क्लासला. आणि नाश्त्याचं बघावं तर विभूतीताई आंघोळीला आणि आता कुठे झोपेला आलेली शर्मिष्ठा याच्या कडेवर. अशी जनमेजयाची अवस्था. त्या धबडग्यात पोटात कळ. संडासात आधीच गेलेला. जाणार असणारा. त्यांच्यामधूनच तीर मारणारा भलता. असं करत करत करत शॉवरचे चार शिंतोडे अंगावर घेऊन तो पुन्हा बेडरूममधे येतोय तर दारातच आकृतीताईच्या सौभाग्याने तंगडया दोन दिशांना पसरवलेल्या. स्वतःच्या घरी असल्यासारखं खाजवणं. आकृतीताईचा प्रेमविवाह. ती पदवीधर होऊनही बुध्दिनं शालेयच राहिलेली. तिचा कथाकथनाचा चमू. त्याच्या ध्वनिफिती काढून विकणं हा सौभाग्याचा प्रमुख व्यवसाय. त्याच्या दोन टांगांवरून खापरी खापरी करत, मीमांसाताईचा दीर, समिधाताईचा मित्र नं.१ यांचे हातपाय चुकवत जनमेजय कपडयांच्या कपाटाजवळ आला. ते उघडल्यावर खरी कर्तबगारी होती. पँटशर्ट अमाप होते. ताया सगळया या ना त्या कारणाने तेच देत. ते प्रमाणाबाहेर वाढले की आई त्याचे पैसे घेई. हल्ली कपडयांवर भांडे मिळायचे बंद झाले होते. कर्तबगारी पुढे होती. पुढचं शोधण्यात. टयूब लावायला बंदी. अंधुक उजेडात, कपडयांच्या कपाटात, माझी कुठली आणि कुणाकुणाची कुठली? गोष्ट छोटी मुद्दा गौण पण हातात आली ती घातली आणि चालला असं एकदोनदा झालं तेव्हा रात्रीपर्यंत कोण पंचाईत झाली. आपल्या दोन टांगांमधला टॉवेल अर्धवट पकडत अर्धवट सोडत तो हातात आलेल्या- ती आपलीच आहे याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत- तिच्याशी झटापट करू लागला. भेलकांडू लागला. पुन्हा सावरू लागला. ते करत असताना पुन्हा पुन्हा त्याचं लक्ष दारात पसरलेल्या त्या आडदांड तंगड्यांकडे, हापपँटीतल्या, उगीचच जात राहिलं. सुखी माणसाची हापपँट अशी असते. आडदांड तंगड्यांवर चढलेली. काळ्या. मागे बुधबृहस्पती पुढे प्रजापती. एवढंच कर्तृत्व. हा विचार आला म्हणून जनमेजयाला कसंतरीच वाटलं मनात. लोखंडी कपड्याच्या कपाटावर हात हलके ठेवून दार बंद करताना अंगावर चरा उमटवणारं त्याचं कुरकुरणं दाबून टाकत त्यानं या विचाराचं प्रायश्चित्त घेतलं. तोपर्यंत त्या अंधुक उजेडात कुणीतरी धडपडत उठला. मीमांसाताईचा दीर किंवा समिधाताईचा मित्र नं.२ किंवा आणखी कुणीतरी. अंधारात सगळे सारखेच. अंधारात म्हणजे अंधुक उजेडात. तर तो उठला. घड्याळात बघितलं. सुटला तो उलट्याच दिशेने. जनमेजयाला आडवा. दोघांच्या आट्यापाट्या. नंतर त्याला योग्य दिशा सापडणं. मागोमाग जनमेजयालाही. जनमेजय थोडा थबकलेला. किचनमधे जावं की सरळ बाहेरच पडावं आता. आईचा योगा म्हणजे बाहेरच पडावं. बा- बाहेर- ही निजलेले- या बहुतेक निजलेल्या. समिधाताईचा चमू. जरा जपूनच उड्या मारल्या नाहीत तर थेट विनयभंग. टींग- टॉंग- टींग- आलंच कुणीतरी- अजून?- जनमेजयानं दार उघडलं. दारात माधवस्वामी- जन्मदाते आणि त्यांचे बैठकीतले मित्र. पीजे. आता एकापाठोपाठ. हं! सुरू… असं जनमेजय मनात म्हणाला आणि माधवस्वामींच्या दोस्तांनी जनमेजयाला समोर बघताच त्याचं नाव, त्याचं वय, घरातलं स्थान, क्रम, त्याचं वागणं, रहाणं सगळ्यावर विनोद सुरु केले. त्याची वाट अडवून. पूर्वाश्रमीचे स्वयंसेवक आता आपला वेगळा गट बनवून प्रात:बैठका घेणारे. बरेचसे एका उपासना ट्रस्टचे विश्वस्त. आपल्या बहुमूल्य मताला धार्मिक आधार असणारे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. त्यांच्या अध्यात्मिक विनोदातून फिल्टर होऊन जनमेजय सदनिकेबाहेर पाय ठेवतोय तर कानांवर जन्मदात्याचा खाकरा आवाज, आरे… लवकर ये आज! बंड्या- मग दोस्तांकडे नजर जाऊन माधवस्वामी कंटिन्यू- बंडू रे- आज बंडू गगनग्रासाच्या मुलीला पहायला येणारेत… हा बंड्या गगनग्रास म्हणजे नक्की कोण? चुलत चुलत चुलता की- याचा शोध एकदा घेतलाच पाहिजे- हा बंड्या तर मग तो- नाही नाही- तड लावलीच पाहिजे- असं मनाला समजावत आणि मानेने जन्मदात्याला होकार भरत तो टणाटण गगनग्रास सहनिवासाच्या पायर्‍या उतरु लागला. वाटेत अनेक गगनग्रास किंवा इथून तिथून गगनग्रास, मागावर असल्यासारखे किंवा वाट अडवल्यासारखे- तेच चुलत चुलत इत्यादी- त्याना चुकवत, हुलकावत, वेळच तशी, सगळ्यानाच घाई, कामवाल्यांना, चुकारांना, बेकारांना आणि रिकामांनाही. तड जनमेजयाला आत्ताच लावता आली असती हा रवि आणि हा जयद्रथ करुन. कुठला गगनग्रास नक्की कुठला याची. कारण सगळे याच वेळी एकमेकाला आडवेतिडवे होणारे. पण घडाळ्याचे काटे जनमेजयाच्या पार्श्वभागी रुतत तरी होते, घुसत होते किंवा पार्श्वभाग ते बडवून तरी काढत होते. नेहेमीप्रमाणे. तो रस्त्यावर उघडणार्‍या मुख्य फाटकाजवळ थडकला त्यांचा मार खात- गगनग्रासांचा आणि काट्यांचा- आणि थबकला…
क्रमश:

युनिक फीचर्सच्या अनुभव जानेवारी २०१६ अंकात ’गुरुजनां प्रथमं वंदे’ कादंबरीबद्दल…

युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांचे मन:पूर्वक आभार.
लेखकानं स्वत:चं पुस्तक प्रकाशित करणं हे एकांड्या शिलेदारीचं काम असतं. 
युनिक फीचर्स आणि अनुभव मासिकाच्या संपादकांनी अनुभवच्या जानेवारी २०१६ च्या अंकात गुरुजनां प्रथमं वंदे या कादंबरीची ‘पुस्तक शिफारस’ या स्तंभात तत्परतेने दखल घेतली. 
वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या कामात अशा प्रकारचं सहाय्य हा सगळ्यात मोठा हातभार असतो. 
युनिक फीचर्स तुमचे मन:पूर्वक आभार!

नजरेतून अभिव्यक्त होणं…

नजरेतून व्यक्त होणं हा कॅमे-यासमोरच्या अभिनयाचा महत्वाचा भाग आहे.
नजरेतून व्यक्त होणं, चेहे-यातून व्यक्त होणं, आवाजातून व्यक्त होणं, हातवारे, हालचालीतून व्यक्त होणं हे सोईसाठी सुटंसुटं समजलं गेलं तरी संपूर्ण देहातून व्यक्त होणं हे अभिनयाचं मर्म आहे.
एरवी एखादा एखाद्या अंगाने आपसुकच चांगला व्यक्त होत असतो. या कामात आपण यशस्वी होतोय हे त्याला जाणवू लागतं. तो बनचुका होऊ लागतो.
व्यावसायिक क्षेत्रात अशा एखाद्या यशस्वी अंगाची शैली बनते. लोक त्यावर फिदा होत असतात. ते करणारा स्वत:वर फिदा होऊ लागतो. मग ते हास्यास्पद होऊ लागतं.
पूर्णपणे भूमिकेत शिरणं, स्वत:चा संपूर्ण कायापालट करणं ही खूप मोठी साधना आहे. काही जणांमधे असं करण्याची क्षमता उपजतच असू शकते पण म्हणून सततच्या साधनेचं महत्व कमी होत नाही.
सर्वसाधारणत: भूमिका वठवण्याच्या दोन ठळक पद्धती मानल्या जातात. भूमिका काय आहे हे समजल्यावर आतूनच तिची तयारी चालू होणं. आधी आत्मा गवसणं आणि मग भूमिकेला शरीर मिळणं अशी एक पद्धती मानली जाते तर भूमिकेबद्दलच्या कलाकाराच्या आकलनानुसार  शरीर, आवाज, हावभाव आधी नक्की करुन भूमिकेच्या आत्म्यात शिरायचा प्रयत्न चालू करणं ही दुसरी पद्धती मानली जाते.
अभिनयात तंत्राचा भाग खूप आहे. केवळ उत्स्फूर्ततेवर कायम अवलंबून रहाता येणं शक्य नाही.
अभिनयासंदर्भात काही जण केवळ उत्स्फूर्ततेचा उच्चार करत असले तरी त्यानी तंत्र घोटवून अगदी सहज वाटावं इथपर्यंत मुरवलं असल्याचं ध्यानी येतं.
नजरेतून यथार्थपणे व्यक्त होण्यासाठी संपूर्ण कायापालटाची गरज असते तरी नजरेचा वापर कसा करावा याचीही तंत्रे आहेत.
मी शिकलो ते एकांकिका नाटकं करत करतच. प्रत्यक्ष नाट्यशिक्षणवर्गातून शिकणं कायम मला हुलकावणी देत राहिलं.
पण मला सुरवातीलाच एक हाडाचा शिक्षक म्हणा, तालिम मास्तर म्हणा लाभला. नवीन माणूस अभिनयाला जरासा अनुकूल वाटला तर त्याला त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे कसा तयार करायचा हे कसब त्याच्याकडे होतं.
एका जुन्या जमान्यातली कालांतराने पडझड होऊन अज्ञातवासात गेलेली चित्रपटनायिका प्रमुख पात्र असलेल्या एकांकिकेत मी एक फारसा वाव नसलेली भूमिका करत होतो. लेखक-दिग्दर्शक तुलनेनं नवीन होता. माझ्याकडून त्याला हवं ते काढून काढून तो दमला. त्याचं आणि वर वर्णन केलेल्या हाडाच्या शिक्षक- तालिम मास्तराचं याबद्दल काही बोलणं झालं असावं. तालिममास्तर दुस-या दिवशी तालमीला आला. माझ्या सीनची तालिम सुरु झाली. चार पाच वाक्यांचा माझा काही भाग होता. ती वाक्यं मी कशी अभिव्यक्त करायची हे सांगत असताना त्याने नजरेचा प्रवास उलगडूनच दाखवला.
मी करत असलेलं पात्र नायिकेशी बोलत असतं असा प्रसंग होता. सुरवातीला त्या पात्राची नजर नायिकेच्या चेहे-यावर आहे. तिच्याशी बोलत असताना ते पात्र त्या दोघांच्या गतायुष्यात शिरतं. पात्राचा चेहेरा आणि त्याची नजर नायिकेच्या चेहे-यावरुन निघून प्रेक्षागृहावर प्रवास करु लागते. त्यानंतर ते पात्र त्या आठवणींमधे रमतं. नजर प्रेक्षागृहावर एका काल्पनिक बिंदूवर स्थिरावते. हरवते. या तंत्राचा सराव करायला लागल्यावर माझा ताण बराच कमी झाला. त्या प्रसंगापुरतं तरी मला भूमिकेच्या अंतरंगाकडे जाणं सोपं वाटू लागलं.
भूमिका केवळ ती सादर करणा-यालाच पटून चालत नाही तर समोरच्या प्रेक्षकांना ती पटवून द्यावी लागते. नजरेच्या प्रवासासंदर्भात पात्र गतकालात गेलं आहे, ते विचारात पडलं आहे, ते तंद्रावस्थेत गेलं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी यथार्थपणे सादर करण्याचं तंत्र असं एकिकडे पात्राला भूमिकेत शिरायला मदत करतं आणि प्रेक्षकाला वास्तवाजवळ नेतं. तालिममास्तर हे अचूक करुन दाखवायचा. समजावून सांगायचा…
कालांतराने एका मालिकेत काम करत असताना एका देखण्या नटाला कॅमे-यामागे आणि कॅमे-यासमोर पहाण्याची संधी मिळाली. कॅमे-यामागे तो सतत वात येईल इतपत बडबड, चेष्टामस्करी करत असायचा. हातात सीनचे कागद असायचे. कॅमे-यासमोर गेल्यावर मात्र त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला असायचा. भावदर्शन तर तो उत्तम करायचाच पण प्रेक्षकाला टीव्हीची चौकट नेमकी केवढी दिसते याचं चांगलं भान त्याला असावं. आपण कल्पिलेल्या त्या चौकटीच्या अवकाशात तो नजरेचा प्रवास मांडायचा. माॅनेटरवर तो सीन बघताना त्या सीनमधे तो करत असलेल्या पात्राला काय म्हणायचं आहे ते अचूक कळत असे. पुढे त्याला हिंदी महामालिका मिळाली. त्यात त्याचा हा प्रवास बघणं रंजक तर होतंच पण शिकवणारंही होतं…
नजरेत भय, आश्चर्य, भेदकता, अंगार इत्यादी ढोबळ भावना दाखवून लोकप्रिय होण्याचा एक काळ होता. त्याकालातले हरवलेले काही आजही सापडतील. पण नजरेतून व्यक्त होणं हे केवळ तेवढंच नक्कीच नाही.
नजरेचा यथार्थ वापर अभिनयात करताना, नजरेच्या प्रवासाचं हे तंत्र अभिनय करणा-याला भूमिकेच्या विचाराच्या सतत सान्निध्यात ठेवायला मदत करणारं आहे.
हे सगळं आठवलं एका ताज्या मालिकेतल्या एका तुलनेने नवोदित अभिनेत्रीला नजरेचा वापर यथार्थपणे करताना बघून… जे या माध्यमात विरळाच बघायला मिळतं…
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

कथा: ‘तोरण’ ‘कान्हेरी’ दिवाळी अंक २०१५

तेव्हाच मी टोकलं होतं अभ्याला… तोरणाचं म्हणाला तेव्हाच. म्हटलं आज तोरण म्हणेल. उद्या म्हणेल मापच ओलांड. परवा आणखी काही म्हणेल. उदाहरणार्थ, आला श्रावण आता वगैरे, वगैरे.. आधी रहाणारच किती वेळ या जागेत आम्ही .. इन मिन तीन- साडेतीन महिने, एका वर्षभरात. चार- साडेचार महिने म्हणजे डोक्यावरुन पाणी. दोघे मिळून एकत्र रहाणार त्याहीपेक्षा कमी काळंच. मी हॅम्बुर्ग, जर्मनीत. तो कॅनडात- ओटावामधे. पण त्याचं म्हणणं माझं पहिलं घर. माझ्या स्वत:च्या मालकीचं. म्हणजे मी अर्धी मालकीण होतेच. त्याच्या मान्यतेची गरज नव्हती. तोही नाकारत नव्हता म्हणा. तर, दोघांनी मिळून हवं तसं बाविसाव्या मजल्यावरचं, जिम, गार्डन विथ भला मोठा राऊंड जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल असं सगळं असलेलं घेतलं घर. ते घ्यायलाही पार शहराच्या त्या टोकापर्यंत जावं लागलं. मी नकोच म्हणत होते. बड्जेट आणखी वाढवूया म्हणाले. इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ घेऊया म्हटलं तर अभ्याचं म्हणणं, नको. राष्ट्रीय उद्यानाजवळ पाहिजे… आणि तोरणाचं म्हणाल तर तोरण म्हणजे शुभसुरवातीचं एक प्रतिक, माझ्या दृष्टिने… बस्स…
मला… केवळ तोरण इत्यादी माझा प्रॉब्लेम नव्हता. एखाद दुसर्‍या अशा परंपरेमुळे मला फरक पडत नव्हता, काही ऑबजेक्शन नव्हतं. पण अभ्याचा प्रवास मी जज करत होते. अभ्या त्यात खरा उतरताना दिसत होता. त्याचा विचार मला करायला लागत होता…
अभ्यानं मग केलंच हाऊस वार्मिंग. मी हॅंबुर्गला असताना. मला कळल्यावर अर्धातास स्काईपवर झापला त्याला. केलंसच का? मी नसताना का? असताना का नाही?… काय उत्तर दिलं असेल? म्हणाला, केळकरगुरुजींना वचन दिलं होतं ना… वचन??? कसलं वचन?… आणि गुरुजी कसले आमच्याच स्कूलमधे होता तो शिक्या… शिक्या केळकर. कसा होता, काय होता, त्याला आता काय स्टेटस झालंय… ते जाऊ द्या… नेमकी तेव्हा मोठी आत्या होती माझ्याजवळ. जर्मनी पहायला आलेली. म्हणाली, “तुलाही दिलं असतं वचन तुझ्या त्या अभ्यानं, सप्तपदी घातली असतीस तर… आता काय उपयोग? भाऊ बिचारा कंटाळून गेला शेवटी!” इथे गेला वर चांगलाच जोर दिलेला. “भाऊला वाटलं आज ना उद्या घालशील तू सप्त-” ती गळा काढायच्या बेतात होती अगदी. ते काय ते नक्राश्रू की काय म्हणतात तसलं. मी लगेच तिला आणखी एक साईट दाखवली टुरिझमची. सगळं विसरली.
अभ्याचं हे काही नवीन नव्हतं मला. समजुतीनंच घेत गेले. कसं असतं, सोशिकबिशिक असतोच आम्ही पहिल्यापासून. एवढंतेवढं ॲडजस्ट करणं हा व्यवहार आहेच. दोन्हीकडून समजूत असली की फ्रिक्शन रहात नाही- म्हणजे काय ते- हं, संघर्ष! संघर्ष रहात नाही. संघर्ष- अभ्याचा शब्द. तो असे, गांभीर्य, संघर्ष असे शब्दं सहज वापरतो येता जाता. सुरवातीला बरा होता अभ्या. ओटावाला सेटल झाल्यापासून जरा वाढलंच त्याचं. इथे नव्हता तेवढा तसा झाला तो मातृभूमीपासून दूर गेल्यावर. बरंच गांभीर्य का काय ते बाळगून बाळगून…
मला भेटला अभ्या, त्या आधीपासून माझे मित्र होते. त्याला माहित होते. मान्य होते. काळाच्या ओघात आणखी होणार हे ही तो जाणून होता. ॲज द टाइम पासेस यू नो… ही हॅड हिज सेट ऑफ प्रायरिटीज… मी कधीच चॅलेंज नाही त्याला. बट हिज लव फॉर द ट्रॅडिशन… नॉट लव आय से, बट ऑब्सेशन- सॉरी- काय होतं बोलताना, नॅरेट करताना, बरंच इंग्लिश येतं माझ्याकडून. आय ट्राय टू अवॉईड, बट यू नो… हा कामाचा भाग आहे. हॅम्बुर्गला तर इंग्लिशही नाही जास्त चालत. जर्मनच. एकदा तुम्ही ग्लोबल झालात की हे आलंच. मग तुम्ही वर्ल्ड लिटरेचर वाचायचं, वर्ल्डली व्ह्यूव्ज समजून घ्यायचे की… आय आय अग्री… तुम्ही तुमच्या मुळाकडे प्रवास करायला लागता. मला आठवतं की माझं आजोळ! ते खेडगाव. जिथे आमचं रान होतं. शेती होती. आमचं म्हणजे माझ्या मामालोकांचं. आईला हिस्से दिले प्रॉपर. तिची अपेक्षा नसतानाही. आम्ही जात नव्हतो शेंदूर फासलेल्या म्हसोबाला? खेडेगावी राह्यचो चार दिवस तेव्हा रोज जायचो. पण म्हणून काही कोणी तेच धरुन उलटा प्रवास करत नाही. यू टर्न.. ऑर से अबाऊट टर्न…
हे हे म्हणाले मी अभ्याला तेव्हापासून आमचं जरा… “अबाऊट टर्न करु नकोस तू अभ्या!”… मी स्पष्ट म्हणाले. माझा स्वभावंच तसा आहे. ते जुन्या बायकांसारखं सजेस्टीव- काय ते सूचक- पुन्हा अभ्याचा शब्द.. नाय बोलता येत यार आपल्याला. थेट हृदयाला का काय म्हणतात तशी साद घालायची… तेच अभ्याला आवडलं नव्हतं माझ्यातलं?! थेट विचारलं होतं मीच. आर यू अग्री टू लिव विथ मी?… त्यानंच वेळ घेतला. आय वॉज डॅम शुअर अबाऊट मायसेल्फ! मला आत्मविश्वास यायला वेळ लागत नाही. निर्णय घ्यायला त्याहून नाही. आय लाईक्ड हिम. होते मला मित्र. सगळ्या थरातले होते समाजातल्या. इच अन एवरी स्ट्राटा. मी इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधे होते. आरटीआय वर्कर म्हणून काम करत होते… खूप इंटरेस्ट होता मला त्या सगळ्यात. हत्त्या झाल्या काही माहिती अधिकाराच्या अधिकारासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांच्या तेव्हा मी बराच फॉलोअप केला होता.. सिंगल हॅंडेडली… मग गवर्मेंट टॉपल झालं. नवं राज्य आलं. ते सहिष्णू की काय ते असेल, असं जनमत तयार झालं.. पण अंदरकी बात- तशा बर्‍याच होत्या- बाता… मला उमजायला लागल्या होत्या… सगळ्यात राहून राहून. वयही वाढतं ना… मुलींचं लवकर वाढतं म्हणायचे पूर्वी… समज येतेच… मला आलीच. मग मी हळू हळू बस्तान हलवलं जर्मनीला. इथली नाळ तोडायची नव्हती. जॉब अपॉर्च्युनिटी, वाढत चाललेलं वय, काम करण्यायोग्य परिस्थिती सगळ्याचा विचार होत जातो. ब्रेन ड्रेन म्हणा अथवा ब्रेन गेन म्हणा… अभ्या स्कॉलर होता. त्याची वाट तीच असणार होती. त्याला तर नाळ अजिबात तोडायची नव्हती…
…मला भेटला अभ्या तेव्हा एका अभ्यासगटात होता. जरासाच गंभीर. आतासारखा गांभीर्य कोळून प्यायल्यासारखा नव्हता. वेकेशनमधे एका एनजीओशी अटॅच्ड होता. हाईक्स, ट्रेक्स करत होता. इनसंस भावला होता त्याचा तेव्हा. निरागसता- त्याने सांगितला हा शब्द नंतर कधीतरी. मला ज्याम म्हणजे ज्याम आवडला होता तो शब्द… अभ्यासुद्धा. न आवडण्यासारखं काही नव्हतंच त्याच्यात… माझ्यातही… मला लग्न करायचं नाही ह्यावर मी ठाम होते. हां! हे कदाचित माझ्यातलं न आवडण्यासारखं होतं. बर्‍याच जणांना नाही आवडलं. भाऊंना देखील सुरवातीला अभिमान वाटायचा. भाऊवहिनी दोघांनीही वाढवलं मला ओपन वातावरणात. एकदम खुलं. मोठी आत्या टॉम बॉईश म्हणून टोमणे मारत रहायची. मी माझा अभ्यास, अवांतर वाचनाची पालकांनी लावलेली गोडी आणि माझं उपजत कम्युनिकेशन स्किल यात मश्गुल होते. म्हातार्‍याकोतार्‍यांशीही माझी चट्कन मैत्री व्हायची. अभ्याचं माझ्या उलट. अभ्या स्वत:तच असायचा. ग्रुपमधे असूनही एकटं असणं जमायचं त्याला. माणूसघाणा नव्हता. बोलायला, चेष्टामस्करी करायला लागला की भरभरुन करायचा आणि लगेच कसा काय बुवा डिटॅच्ड होतो हा?… मी एकदा ओठांचा चंबू की काय तो करुन त्याला विचारलं हे. तर तो आपला इसेन्स ऑफ इनसन्स… निरागसतेची दैवी मूर्ती. मग मला कळलं त्याला स्वत:ला त्याच्याबद्दलचं हे ठाऊकंच नव्हतं ओपिनियन. मग तो म्हणतो की त्यानं हळूहळू स्टडी करायला सुरवात केला स्वत:चा… मीही सुरवात केली दरम्यान त्याच्यासारखं डिटॅच्ड होण्याची. अलिप्त होण्याची. योग्यवेळी. योग्यप्रकारे. फार वाहून घ्यायचे मी स्वत:ला सगळ्यात. आणि मग त्रास मलाच व्हायचा. बुद्धी आणि भावना फार तरल आहेत तुझ्या- भाऊ म्हणायचे. वहिनी- म्हणजे माझी आई भाऊंच्या उद्गाराच्या मधे ’नको तेवढ्या तरल’ अशी पुस्ती जोडायची. कधी चिडलेली असताना कधी मज्येत… एकत्र कुटुंबातनं विभक्त कुटुंबात आले भाऊवहिनी त्या काळी. यावं लागलं. बरीच कारणं होती. मुळात डिसइंटिग्रेशनचा काळ होता तो. ही दुसरी पिढी त्यांची. भावंडांतला मोठा म्हणून भाऊ. भावंडं वहिनी म्हणायची म्हणून आम्हीही वहिनी म्हणायचो आईला. चंद्या- चंदन माझा धाकटा भाऊ आता युएसला असतो. वेल सेटल्ड. नो झिकझिक. इकडचा गणपती युएसमधे नेऊन जश्याचा तसा बसवावा तसंच. सगळं तसंच. वाईट काय म्हणा. सुखी आहे तो. ते महत्वाचं… तो असा कसा झाला चंद्या?… त्याचं त्याला माहित. भाऊवहिनींनी त्यालाही कधी आडकाठी केली नाही. वेळोवेळी समजुतीचे चार शब्द सांगितले मात्र…
तर… अभ्या आवडला. अभ्याला निक्षून सांगितलं लिव-इन म्हणजे लिव-इन. कितीही आवडलेला असलास तरी. अभ्यानं बराच विचार केला. घरी वगैरे सांगितलेलंच असावं. विचारही घेतले असावेत कुणाकुणाचे. मी कुणाचेच विचार घेतले नाहीत. माझा निर्णय सांगितल्यावर कुणी कुणी ते आपणहून दिले. भाऊवहिनींसकट. भाऊवहिनी मला प्रमाण होते. ते दोघेही मनाने खुले. दोघांच्या मनात कुचकुच असावी असं मला जाणवत होतं. कधी ती कमी दिसायची कधी जास्त. डिसकशन्स व्हायची. त्या डिसकशन्सचा एंड त्याना माहित असायचा. शेवटचं माझं भरत का काय ते वाक्य त्याना माहित असायचं. माझ्या दृष्टीनं विषय भरकटायचा नाही. त्यांच्या दृष्टीनं मी काही वावगं करणार नाही हयाबद्दल ते निश्चिंत होते…
वावगं… या शब्दावर माझी बरीच मतं आहेत. ती धाडसी वाटावी अशी आहेत नक्कीच. पण ती माझी स्वत:ची आहेत. मी ती अभ्यास करुन कमावलेली आहेत. अभ्यास म्हणजे पुस्तकी नव्हे. प्रत्यक्ष. इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस- समाज विज्ञान संस्थेत होते तेव्हा बरेच सर्वे केले. सगळ्या राज्यभर हिंडले. स्त्री हा विषय अध्याहृत असणारच होता… अनेक आयुष्यं बघितली. अशा आयुष्यांचं अवलोकन करत असताना आपण स्वत:लाही असेस करत असतो. कळत नकळत स्वत:बद्दलची धोरणं ठरवत असतो. मी मला नकळत वाटत असलेल्या गोष्टींनाही कागदावर मांडत गेले. लग्न न करता रहाणार्‍या मुलींचं वाढतं प्रमाण कुणाच्याही नजरेत भरण्यासारखं होतं. मी त्यामागची अनेक कारणं शोधली. नक्की काय गोची होते आहे? गोची होते आहे का नक्की?… इथपासून अनेक उलटसुलट प्रश्न स्वत:ला, संस्थेतल्या प्राध्यापकांना, विविध क्षेत्रातल्या दिग्गजांना वेगवेगळ्या निमित्ताने विचारुन पाहिले…
एक मुख्य मुद्दा लक्षात आला प्रौढ कुमारिकांच्या प्रत्यक्ष जगण्यातला. स्वत:चं मन मारुन जगण्याचा. त्यात अनेकांसाठी म्हणून जगणार्‍या होत्या. विशिष्ट करियर फक्त कवटाळून जगणार्‍या होत्या. स्वत:च्या खाजगी इच्छांना तिलांजली देऊन जगणार्‍यांची संख्या प्रमाणाबाहेर होती. मी ते नाकारलं. पहिली नाकारली योनीसुचिता… हे तुम्हाला धाडसी वाटण्यापुरेसं नक्की आहे… योनिसुचिता न पाळणं आणि स्वैराचार करणं यात फरक आहे हे इथे मुद्दाम नमूद करते…
अभ्या लिव-इनला तयार झाला, त्याच्याच शब्दात विचार मंथनानंतर, त्याचं नाही म्हटलं तरी मला आश्चर्यच वाटलं… ‘तुला अभ्याच का आवडला?’ हा प्रश्न अनेकांनी मला विचारला, विचारतात. मी आधीच सांगितलंय एकमेकाना न आवडण्यासारखं आमच्यात काही नव्हतंच. शिवाय सामान्य संसार्‍यांप्रमाणे जन्मोजन्मीची ही गाठ नव्हती. लिव-इन कक्षेत आम्ही स्वतंत्र होतो… हे विधान जरा विचारपूर्वक करतेय मी… एकत्र या, रहा, वेळ आली की विभक्त व्हा हा जरी लिव-इनचा मूलमंत्र मानला जात असला तरी सढळपणे, सवंगपणे (दोन्ही अभ्याचे शब्दं) त्याचा वापर करायचा नाही असं मी ठरवलं होतं. अभ्यानंही. तर… अभ्या आवडला. या आवडण्याला मला तसं एक्झॅक्ट लॉजिक सापडलं नाही, हे कबूल करते. मग तुम्ही अपोझिट पोल्स अट्रॅक्ट इचआदर म्हणा, प्रेम आंधळं असतं म्हणा.
अभ्याचं माझं इंटरॅक्शन, संवाद कितपत होता?… व्यवस्थित होता. एकमत होतं. माझ्या निरपेक्ष, खुल्या इत्यादी मनोवृत्तीला त्याचा आक्षेप नव्हता. होत्या त्याच्यात परंपरेशी जुळत रहाणार्‍या ट्रेट्स. त्याचं मला काही वावडं नव्हतं.
आमचं बॅकग्राऊंड, वाढलो ती परिस्थिती भिन्न होती. मध्यमवर्ग म्हणून एक टॅग असला तरी त्यात आपल्याकडे जात, मग तिच्या अनुषंगाने जडणघडण, व्यवहार, बोलचाल, जेवणखाण यात फरक असतो. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोण आपलेच पालक, आप्त पूर्वग्रहांनी वेढून टाकतात… इति अभ्याच… अभ्या कामगार वस्तीसारख्या वस्तीने वेढलेल्या मध्यम उच्चमध्यम भागातला. त्यांचं घर परंपराप्रिय होतं. सुखनैव सगळं चाललं होतं. कष्टातून वर आलेलं कुटुंब. व्यवहार आणि आधुनिकतेशी नात जोडणारंही होतं ते. त्याचे बाबा व्यवहारी होते. माणसं प्रिय असलेले. सणांच्या निमित्ताने अनेक कुटुंब या कुटुंबाशी जोडलेली. गावगाड्याशी अजूनही चांगलाच संपर्क होता… अभ्या स्कॉलर निपजला आणि तो आणखी काही डिग्रीज वर आला. मुख्य प्रवाह- हा त्याचाच शब्द- आता त्याला जवळचा होता… अभ्यासगट, ट्रेक, हाईक्स, वाचन, मित्रमंडळं, चर्चा… सगळ्यात छान गुंतला. म्हणून तर आमची भेट झाली…
अभ्याला त्याच्या परिस्थितीनुसार आम्हाला हवा होता तो निर्णय घ्यायला वेळ लागणं अपरिहार्य होतं… आमची थांबायची तयारी होती. तेव्हा आमच्या दोघांच्याही डोक्यात ग्लोबल होण्याचं नव्हतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वेगवेगळ्या रचनात्मक कामात दोघेही व्यस्त होतो. अभ्या माझ्यापेक्षा वयाने लहान होता- दोन, चार वर्षांनी. एक… zeal होती त्या वयात. दोघांच्याही ठिकाणी. लौकिकापेक्षा ज्ञानार्जन, भवताल समजून घेणं यात गुंततो नं आपण तसं…
हळूहळू भवताल बदलत असतो. बर्‍याच वेळा त्याची गति भल्याभल्या म्हणणार्‍यालाही थांग न लागणारी असते.
आम्ही एकत्र राहू लागलो. शहरात लगेच काही स्वत:ची जागा स्वत:च्या बळावर घेण्याची कुवत नसते कुणाची. दोघे मिळून असलो तरी. इनवेस्टमेंट्स वगैरेचा विचार अभ्याच्या डोक्यात होता. त्याचं कुटुंब, भावंडं होती. माझ्या डोक्यात तो विचार अजिबात नव्हता. अभ्या नोकरीला लागला. ती करून तो स्टार्ट अप लॉन्च करण्याच्या प्रयत्नात होता. मित्रांच्या मदतीने. ती सगळी उलाढालच होती. लायसन्सेस, हजारो परवानग्या, जागा… अशा कामांचा मला फारसा गंध नव्हता. मी सोशल सायन्सेस शिकवत होते. फिल्डवर्क करत होते… अभ्या अस्वस्थ होता. स्टार्ट अप्स तेव्हा काही कॉमन नव्हत्या… रेंटवर रहायचं, तेही शहराच्या मध्यभागात, कारण दोघांचाही कनविनियन्स… तेवढा रेंट भरायला प्रॉब्लेम नव्हता. डिपॉझिटची खटपट अभ्यानंच केली. माझा शेअर उभा करताना मला पहिल्यांदा कळलं गुंतवणूक इत्यादीचं महत्व…
आम्ही मजेत होतो. ठेवणारे नावं ठेवत होते. बर्‍याच नजरा मला सहन कराव्या लागत होत्या. अभ्याला अनाहुत सल्ले मिळत होते. लिव-इन शहराच्या आमच्या भागात तरी नवीनच होतं की. महानगर म्हटलं तरी…
आमचं खाजगी आयुष्य कसं होतं?… मी हे जरी ब्लॉगवर लिहून तुमच्यासमोर सादर करत असले तरी अनेकांसारखं सगळं पूर्णपणे सोशल साईट्सवर उघडं करणं मला मान्य नाही. मी स्पष्टवक्ती असले तरी. पहिल्यांदा एक क्लिअर करते… आम्ही दोघंही नऊ ते पाच किंवा दहा ते सहा आणि मग रात्री दहा-बारा अशा जातकुळीतले नव्हतो, नाही. हे मला कुणाला डिग्रेड करायचं, कमी लेखायचं म्हणून सांगत नाही पण आमचं सहजीवन सरासरी असतं तसंच नव्हतं. सेक्शुअल लाईफ समाधानकारक व्हायला काही काळ जावा लागतो तसा आमचाही गेला. दोघांनाही पुर्वानुभव होता. घरासंबंधातली कामं दोघात आपोआप वाटली जात. वॉशिंग मशीन येईपर्यंत कपडे सरळ लॉंड्रीला जात. खर्च झाला तरी सुटसुटीतपणा अपरिहार्य होता कारण रुटीन इतरांच्या मानाने जास्त जबाबदारीचं होतं. नुसती नोकरी करायची नव्हती. एकेकदा मी पाहिलेली, तेव्हा तुरळक असलेली जोडपी बर्‍याच काळानंतर कन्फ्युज होत. हे आपण लिव-इनमधे रहातोय की लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे रहातोय हे त्याना कळायचं नाही. काही वेळा दोघांचे आप्त चान्स घ्यायचे. बर्‍याचदा लिव-इनचं लग्नात रुपांतर व्हायचं… ह्या सगळ्यात अमुक चांगलं तमुक वाईट असं काही नाही पण सर्वसाधारण असं होत होतं असं म्हणता येईल. काही हा पार्टनर सोडून दुसरा असं सहजगत्या करत पण ते विशिष्ट क्षेत्रातले असत. विशिष्ट वर्गातले असत. आम्हीच बरोबर होतो असा माझा दावा नाही. शिवाय लिव-इनही इतकी रिजिड- बांधीव टर्म नाही असं मला वाटतं. अशा सोशल इश्यूजचे अर्थ माणसा, वर्गा, समूहाप्रमाणे वेगळे असू शकतात, लावले जाऊ शकतात…
घरातले सणसमारंभ हा एक मुद्दा होता. अभ्यानं स्वत:च माझ्याबद्दल घरी स्पष्ट करुन टाकलं. ती माझी लग्नाची बायको नाही. तिला जमेल, पटेल, रुचेल तशी ती सगळ्यात भाग घेईल. मी विरुद्ध घरातल्या इतर बायका असा सामना मी माझ्या हुशारीने संपवला. पलटवलाच नाही तर समंजसपणे सोडवला. घरातल्या, अभ्याच्या कुटुंबाशी संबंधित गावगाडयातल्या जवळजवळ प्रत्येक स्त्रीशी माझं चांगलं नातं तयार झालं. मला काय म्हणून संबोधायचं?- कॉमन प्रश्न. मी म्हणाले मला सरळ माझ्या नावाने हाक मारा. त्याना सुरवातीला जड गेलं सगळंच. त्यांच्या नजरा, माझ्या पाठीमागे त्यांचे माझ्या आणि अभ्याविषयी अभिप्राय, बोलणं, हसणं सगळं मी माझ्या स्वभानुसार सहज घेतलं, पेललं. मला सार्वजनिक जीवनाची सवय होती. ती इथेही कामी आली…
सभोवताल बदलत असतो. आपण वयाने वाढत असतो. काही घटनांचे दूरगामी अर्थ जेव्हाच्या तेव्हा आपल्या टाळक्यात शिरतातच असं नाही. आपल्या संबंधितांमधे होणारे बदल आपण पूर्ण तटस्थपणे पाहू शकतो का?… आपल्या आयुष्यात महत्वाचं काही वळण येतंय हे लक्षात आल्यावर आपल्याला मागचे सगळे संदर्भ, सगळे अर्थ जुळताएत असं वाटतं का?…
महानगरात बॉंबस्फोटांची मालिका झाली तेव्हा मी नुकतीच ग्रॅज्युएट झाले होते. अभ्या कॉलेजमधेच असेल. आम्ही भेटलो तेव्हाच त्याचं इंजिनियरींग संपण्याच्या बेतात होतं… ती बॉंबस्फोट मालिका म्हणजे फार मोठा हादसा होता तो महानगरासाठी, इथल्या सामान्य लोकांसाठी. थेट प्रत्यक्ष संबंध न आलेल्यांसाठीही. गोदीतला मोठा बॉंबस्फोट ऐकले पाहिलेली मागची पिढी होती. पण ह्यावेळचं सगळं निराळं होतं… मी खोलात जात नाही. पर्यायानं हे बरंच ताजं आहे. अनेकांच्या स्मरणात आहे. एखादा पक्ष सत्तेवर येण्यासाठी एखादं कॅंपेन करतो. ते धर्मावर अधिष्ठित असतं. त्याचा जोर वाढत जाऊन एक फार खोलवर परिणाम करणारी घटना घडते, घडवली जाते… त्याचा पडसाद म्हणून महानगरात एकाच वेळी दुर्दैवी स्फोटांची मालिका घडत जाते. सामान्य, ज्यांचा या सगळ्याशी प्रत्यक्ष, अर्थाअर्थी संबंध नाही ते यात हकनाक भरडले जातात…
अभ्या, मी भेटलो तेव्हा आम्ही एका ग्रुपमधे भेटत होतो. माझे असे अनेक ग्रुप्स होते. अभ्याचा हा पहिलाच सोशल ग्रुप असावा. शाळा, कॉलेज, आपण रहातो तिथला ग्रुप असे प्रत्येकाचे असतातच. सर्वांगाने वेगवेगळी मुलं मुली असणारा या अर्थाने मी सोशल ग्रुप अशी टर्म वापरते आहे. सगळे वर्ग, वर्ण, जाती इत्यादींनी बनलेल्या समाजाबद्दलचं भान आपल्याला अशा समुहामधनं, अशा वेगवेगळ्या समुहांमधनं येत असतं. मी अनुभवी, बोलकी आणि समाज हा अभ्यासाचा विषय असल्यामुळे व्यक्त होत असे. अभ्या तुलनेने नवीन होता. अबोल होता. ऐकण्याचं काम तो उत्तम करत असावा. त्याचे पूर्वग्रह असतील, ग्रुपमधल्या चर्चा ऐकून नवे ग्रहही तयार होत असतील. त्यानं आपलं वाचन या काळात प्रयत्नपूर्वक वाढवलं.
आमच्या सगळ्याच सामान्यांच्या दृष्टीने त्या घटनेनंतरच्या काळात एक शांत मध्यंतर आलं… सगळे वैयक्तिक आयुष्यात स्थित्यंतराच्या प्रक्रियेत होते. आम्ही दोघं भेटू लागलो. फिरु लागलो. अभ्यानं नोकर्‍या केल्या. त्याला स्टार्ट अपचा किडा सुरवातीपासून चावला होताच… आम्ही एकत्र राहू लागलो. त्यानंतरचं सगळं वर आलंच आहे…
करियरमधेही आम्ही प्रगती करतच होतो. देश परदेश यांतल्या सीमा आता आमच्यासारख्यांसाठी पुसट होत होत्या. आम्हा दोघांमधे चर्चा होत. त्या इंटेन्सही असत. अनेक विषय, पुस्तकं, चित्रपट, नाटकं या सगळ्यांबद्दलच्या. मी बर्‍याचदा त्यातली जास्त जाणकार व्यक्ती असायचे. अभ्या ऐकून घ्यायचा. पटलं नाही तर बोलायचा.
नवं सरकार, अणुचाचण्या, सरकारातला त्रिशंकूपणा, घोटाळे, वेगवेगळ्या पक्षांचे उदय, नवे अजेंडे हे सगळं चालू असताना आमचं प्रत्येकाचं आपापल्या कामासाठी परदेशी जाणंयेणं चालू राहिलं…
हे सगळं तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलंय. तेच ते सगळं सांगत रहाण्यात काही हशील नाही. मला पोचायच्या मुद्याकडे जाण्यासाठी मी बांधत असलेल्या साखळीच्या या कड्या आहेत…
… तर माझ्या आता असं लक्षात येतंय की हळूहळू धार्मिकता, तिच्या अंगाने होणारं राजकारण, त्याचे दूरगामी आणि मूलगामी परिणाम याबद्दल मला काही निश्चित संकेत मिळायला सुरवात झाली. भवतालातूनच. मी माझ्या परखड, फटकळ म्हणा स्वभानुसार सामाजिकरित्या, खाजगीत अभ्याबरोबर व्यक्तही होत होते. माझ्या आता असं लक्षात येतंय की धार्मिकता, राजकारण आणि धार्मिकता अशा मुद्यांवर माझं- त्याच्या भाषेतलं प्रवचन- सुरु झालं की अभ्या गप्पच बसत असे…
या त्याच्या गप्प बसण्याच्या अर्थ मला लगेच का लागला नाही? मी माझ्या व्यक्त होण्यातच मग्न होते? मी अभ्याला गृहित धरलं होतं? अभ्याला त्याचं स्टार्ट अपचं क्षेत्र सापडलंय आता तो त्यात व्यस्त होतोय, ते सगळं उभं करण्यासाठी त्याला पूर्णपणे त्यावरच केंद्रित व्हावं लागतंय… एवढीच त्याच्या बाबतीतली माझी समज राहिली?… त्याचं या विशेष इश्यूबद्दल काही वेगळं मत होतं तर ते तो मांडत का नव्हता? मला दुखवायचं नाही म्हणून? मी त्याचं मत मानणारच नाही म्हणून? की त्याचं स्वत:चं काही निश्चित धोरण चाललं होतं त्याच्या मनाच्या तळात?…
दरम्यानच्या काळात आम्ही आपापल्या क्षेत्रात जास्तीत जास्त व्यस्त होत गेलो. आम्हाला एकमेकांची इतकी सवय झाली की सततचा प्रत्यक्ष सहवास आणि वर्च्युअल सहवास यात फार काही वेगळं नाही असं आम्हाला, मला वाटायला लागलं? की अनेक वर्षांच्या सहवासामुळे एक अलिप्तपणा येऊ लागतो, फिजिकलीही आपण आपोआप अंतरानेही दूर होऊ लागतो?…
याच दरम्यान आमचा फ्लॅट झाला. दोघांनी कर्ज काढून. तोरण, हाऊस वार्मिंग इत्यादी… तेव्हाही अभ्यानं सगळं लाईटलीच घेतल्यासारखं दाखवलं?… मी लग्नाची बायको असते तर त्याचा पवित्रा वेगळा झाला असता?… आम्ही दोघं आपापल्या व्यवसायाच्या देशात आता जास्त काळ व्यतीत करत होतो…
या, यानंतरच्या काळात तुम्हाआम्हाला माहित अनेक असलेल्या घटना घडलेल्या आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा भेटत होतो तेव्हा एकमेकांच्या सहवासात मोकळे होत होतो. गप्पा, चर्चा, ग्रुप्स, मित्रमंडळी सगळं सगळं त्या त्या वेळी अतिशय नॉर्मल पद्धतीने, माझ्यामते चालू राहिलं होतं…
आमच्या दोघांतला नेमका सल अभ्यानं आधीच जाणला होता? तू तुझ्या मार्गावर मी माझ्या मार्गावर असलो, असले- तरी आपण अभंगच रहायचं असं त्यानंही ठरवलं होतं?… की त्याचं काही वेगळं धोरण आतल्याआत ठरत होतं?… तो अतिशय कनींगली ते त्याच्यापाशी ठेऊन आहे?… आणि मी मात्र सगळं खुलं ठेऊन वावरते आहे… असंच आहे सगळं?
आजच मला हे सगळं तीव्रतेने का जाणवतं आहे?… मी माझी तीव्रता व्यक्त करत सुटायचं आणि अभ्यानं ती आत वळवून ठेवायची?… गाठीला बांधून?…
बर्‍याच काही तुम्हा- आम्हाला माहित असलेल्या गोष्टी घडल्यात भोवतालात. अनेक मोठे धर्माधिष्ठीत हल्ले झालेत, दंगली झाल्यात… दंगल थांबवू शकणारा पण तसं न करणार्‍याला जेव्हा सर्वेसर्वा पद मिळतं… अनेक शिकले सवरलेले, तरुण, प्रौढ आनंदाने त्याचं गुणगान गाऊ लागतात… मला आश्चर्य वाटू लागतं… पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल साशंकता वाढू लागते… अभ्या यांच्यातलाच आहे?… तो माझा आहे म्हणून मी त्याला वेगळा मानते आहे?… बदलत चाललं आहे सगळंच? समाजसुधारकांच्या हत्या होतात… त्यांचे तपास अधांतरीच रहातात… याबद्दल अभ्याचं नक्की काय मत आहे?…
माझ्या स्वभावाप्रमाणे मी जास्त वाट पाहिलेली नाही तुम्हाला सांगते…
मी आणि अभ्या भेटतो आहोत. लवकरच. मला काही गंभीर बोलायचंय, अशा माझ्या संदेशाला अभ्यानं होकार दिलाय. हे समाज माध्यमांचे दिवस आहेत. आम्ही दोघंही समाज माध्यमातल्या साईट्सवर सतत हजर नसतो. पण तरीही कळत नकळत माझं निरीक्षण चालू असतं. समाज हा माझा जवळचा विषय. अभय, त्याचे व्यवसायातले आणि इतर मित्र यांच्या चॅट्स मला वाचायला मिळतात. व्यावसायिक म्हणून अभ्याला माझ्या शब्दात- काही प्रमाणात तरी बोटचेपं रहावं लागणार -हे मला मान्य आहे. पण… ही पण नंतरची टिंबं मी आमच्या भेटीत अभ्याकडून समजून घेणार आहे…
लग्नाशिवाय एकत्र रहात असतानाही काही गोष्टी सहन करायच्या असतात, पाळायच्या असतात. मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही केवळ नऊ ते पाच काम करुन एकत्र रहाणारे नाही. तरी एकमेकांच्या सवयी एकमेकाला आपापल्या सवयीच्या करुन घ्याव्या लागतात. ते दरवेळीच तितकं सोप्पं असत नाही. साध्या साध्या गोष्टी वेगळं होण्याच्या मार्गावर आपसूक नेऊ शकतात.
यापेक्षाही मला या संबंधात असं जाणवतं की खोलवरच्या तुमच्या मानसिकता एकमेकांशी जुळतात का? तुम्ही सहजगत्या, प्रेमाने त्या जुळवून घेता का?… खोलवरच्या मानसिकतेतून वरचे, वरवरचे सगळे विचार, कृती प्रकट होत असतात. माझी एक ठाम मानसिकता आतापर्यंत तुमच्या लक्षात आली असेल. दूरगामी सामाजिक परिणामांबद्दल मी वैयक्तिक आयुष्यातील परिणामांइतकीच दक्ष आहे… काकणभर जास्तच…
अभ्याबद्दल मला संदेह आहे… आम्ही भेटतो आहोत… त्यानंतर कदाचित आमच्या दोघांची नवी सुरवात होईल. शुभ सुरवात.
आजवर या ब्लॉगवर समाजासंबंधातले माझे विचार तुम्ही वाचलेत, प्रतिक्रिया दिल्यात. आज मी माझ्या वैयक्तिक जीवनासंबंधी पहिल्यांदाच व्यक्त होतेय… तुमच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत… मी वाट पहाते आहे…
पुढची ब्लॉगपोस्ट, तुमची उत्सुकता असेल, तर माझ्या आणि अभ्याच्या भेटीनंतर नक्की… गुडबाय…

‘गुरुजनां प्रथमं वंदे’ पुस्तक उपलब्ध…

अभिलेख प्रकाशनातर्फे ”गुरुजनां प्रथमं वंदे” या कादंबरीची पुस्तकं पुस्तकवाले डाॅट काॅम, आयडिअल-दादर, मॅजेस्टिक-शिवाजी मंदिर, पीपल्स बुक हाऊस-फोर्ट, शब्द द बुक गॅलरी- बोरिवली, बुकगंगा-पुणे, रसिक साहित्य-पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत…
           
               प्रस्तावना  : श्रीनिवास हेमाडे

मराठी व्युत्पत्ती कोशकार कृ पां. कुलकर्णी यांच्या नोंदीनुसार ‘प्रस्ताव’ या संज्ञेचा अर्थ शोधण्यासाठी ज्ञानदेवांपर्यंत प्रवास करावा लागतो. ज्ञानदेवांनी सांगितलेला अर्थ उपक्रम, प्रसंग (occasion) असा असून ‘प्रस्तावणे’ चा अनुषंगिक अर्थ ‘सांगण्यास आरंभ करणे’. गेल्या काही दशकापासून ‘ठराव’ (resolution) हा प्रशासनीय अर्थ जोडला गेला आहे, असेही कृपां. नमूद करतात. उपोद्घात, आरंभ हे अन्य समानार्थी मराठी शब्द. Preface, Prelude, Precursor, Preamble, Prologue, Forward, Protasis, Prolusion, Prolepsis, Prolegomena, Prefix हे आणखी काही आंग्ल भाषेतील समानार्थी शब्द. या प्रत्येक शब्दाचा अर्थ नेमका निश्चित करणे शक्य आहे (पण त्या जंजाळात शिरण्याची ही जागा नव्हे). Preface, Prelude इत्यादी संज्ञा शोधनिबंध, प्रबंध इत्यादी ज्ञानक्षेत्रात (academic field) वापरले जातात आणि तेथे ते फिट बसतात.
मी येथे ‘प्रस्तावना’ हा शब्द Forward या अर्थाने घेत आहे. पुढे जाणे, जात राहणे, सरकवणे, विद्यमान स्थिती ओलांडून प्रगत दिशेन जाणे या अर्थाने Forward  उपयोगात येतो. या कादंबरीत जे काही वास्तव (वास्तवातील किंवा कल्पितातील) वाचकाच्या समोर येईल, त्या पलीकडे त्याने जावे, काहीएक विचार करावा; असे सूचन येथे अपेक्षित आहे.
तस्मात, ही प्रस्तावना म्हणजे या कादंबरीत काय आहे याचा गोषवारा देऊन तिचा परिचय देणे नाही. त्याचप्रमाणे समीक्षा करणेही नाही. ग्रंथ परिचय व समीक्षा यात फरक आहे, हे आपण जाणतो. या दोन्ही मूलतः स्वतंत्र साहित्यिक कृती आहेतच. ग्रंथ परिचय देण्यात समीक्षा नसते, पण समीक्षेत परीक्षणासह ग्रंथाचा, कलाकृतीचा परिचय तिच्या विविध अंगासह येतो. समीक्षा परिचयापेक्षा व्यापक असते. त्यामुळे परिचय देणे, समीक्षा करणे हाही प्रस्तावनेचा हेतू नसतो.
           प्रस्तावना म्हणजे लेखनाची जाहिरातही नसते. त्यासाठी बाजार खुला आहे.
‘प्रस्तावना’ हा शब्द Forward या अर्थाने घेतला तर प्रस्तावनेच्या निमित्ताने लेखकाने, कवीने, साहित्यिकाने हाताळलेला विषय वाचकासमोर आणणे, लेखनाची समकालिन उचितता आणि विद्यमान काळात तिचे महत्त्व अधोरेखित करणे, असे मी मानतो. पण येथेही  न थांबता प्रस्तुत कादंबरीच्या विषयाचा, आशयाचा आलेख पाहता ती सामाजिक वास्तव मांडणारी असल्याने त्या वास्तवाचा प्रथमपुरुषी एकवचनी वाचकाने स्वतःशी कोणते नाते आहे, याचा शोध घ्यावा, हे अपेक्षित आहे. म्हणजेच वाचन आणि मनरंजन या पलिकडे वाचकाने जाणे अपेक्षित आहे.
           लेखक म्हणून विनायक पंडितांना हा विषय सुचला, भावला. याचा अर्थ त्यांच्या अंर्तमनात कुठेतरी खोलवर त्यांना यातील भंपकपणाची जाणीव झाली. त्याचवेळी माणूस विचारापेक्षा विकारांपुढे, अंध रूढी, परंपरापुढे  झुकतो, या कटू वास्तवाची जाणीवही झाली. ती सगळी अस्वस्थता त्यांच्या लेखनातून, त्यातील उपहासात्मकतेतून पुढे येते. हे एका संवेदनशील मनाचे जाणवणे आहे. त्यांच्या या भावनेशी आपण समरस होऊ शकतो का ? हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे.
            कादंबरीचे कथानक म्हणजे धर्मभावनेचे होणारे औद्योगिकीकरण. पाच गुरुजनांनी मांडलेला जीवघेणा खेळ- गुरुपंचक ! एक आधुनिक गुरुरिसॉर्ट. ‘रिसॉर्ट’ म्हणजे विश्रांतीस्थळ. ही आधुनिक मूलतः पाश्चात्य-युरोपीय बाब आहे. आठवडाभर मरमर काम करून आठवड्याच्या शेवटी शरीर, मन, बुद्धि यांना विश्रांती देणे, पुढील काळासाठी त्यांना ताजेतवाने करणे हे आरोग्यविषयक सूत्र यात सामावलेले आहे. गुरुसंकुल किंवा गुरुरिसॉर्ट ही काय संकल्पना आहे?
गुरुरिसॉर्ट हे आजच्या भीषण भारतीय समाजाचे वास्तव आहे. भारतीय धर्मजीवन कसा अधिकाधिक अवनातीकडे प्रवास करीत आहे, याचे हे भेदक चित्रण आहे. ते करताना लेखक विनायक पंडित यांची आतील जाणीव त्यांच्या भाषेला उपहासाची, तिरकसपणाचा आविष्कार देते. भाषेचे अनेक नमुने प्रगट करण्यास प्रवृत्त करते.मद मोह काम या रिपुंच्या विळख्यातून बाहेर न पडलेल्या या गुर मंडळींचं सत्य रिपुग्रस्तरूपदर्शन घडवित लेखक अखेरीस लोकशाही प्रशासन, विज्ञान- तंत्रज्ञान कसं उपकारक ठरत, याचा पुरावा देतो.
हा खेळ भारतीय भूमीत घडतो. भारतीय मानसिकता प्राचीन काळापासून आगतिक आहे. भारत विज्ञानवादी देश असल्याचा, वैज्ञानिकता या मातीत असल्याचा दावा करणारी ही संस्कृती वास्तवात वैज्ञानिक वृत्ती विकसित करू शकली नाही. हे घडते, कारण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मानवी गरजेचा आपण धंदा करण्यास शिकलो आहोत ! विशेषतः १९९० नंतरच्या तथाकथित जागतिकीकरणाच्या लाटेने मुलभूत मानवी भावना बाजारू बनविल्या गेल्या. त्या कशा याचे दर्शन लेखक विनायक पंडित येथे तपशिलासह घडवितात.
संस्कृतीची विक्री करता येते का ? तिला बाजारपेठेत उभी करता येते का ? तिचा धंदा, उद्योग करता येतो का ? तसे करणे किती नैतिक आहे ? संस्कृती उद्योगाची नैतिक पातळी कोणती ? या सारखे प्रश्न उपस्थित करता येणे आवश्यक आहे, तरच आपण योग्य ‘प्रस्तावना'(Forward) करीत आहोत, असे वाचकांना वाटेल, अन्यथा नाही. प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे पुढे सरकणे, योग्य दिशेने कूच करणे.
संस्कृतीची व्याख्या करता करता जगातील तत्त्ववेत्ते , विचारवंत , क्रांतिकारक, राज्यकर्ते, राजकीय तत्त्ववेत्ते थकून गेले. जगण्याची रिती असलेली संस्कृती बाजारपेठेत वस्तू म्हणून आली तर तिचे स्वरूप काय राहील ? या कृतीला संस्कृतीचे स्वरूप मानता येईल का ? मग अशी संस्कृती ही कोणती संस्कृती ?
            उत्तर शोधता येईल.
            ‘संस्कृती उद्योग’ या संकल्पनेची मांडणी प्रथम थीओडोर अडोर्नो (१९०३ -१९६९ Theodor Ludwig Wiesengrund, Adorno)  आणि मॅक्स हॉर्कहायमेर (१८९५-१९७३ Max Horkheimer) या दोन जर्मन ज्यू समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्त्यांनी केली. जर्मनीतील फ्रॅन्कफूर्ट स्कूल (Frankfurt School) या नावाने प्रसिद्ध पावलेल्या विचारसरणीशी दोघेही निगडीत होते. समीक्षात्मक सिद्धान्त ( critical theory) हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.  
   ‘संस्कृती उद्योग’ (The Culture Industry) हा शब्दप्रयोग त्यांनी त्यांच्या डायलेक्टीक ऑफ एनलायटेनमेन्ट (Dialectic of Enlightenment १९४४) या ग्रंथातील “दि कल्चर इंडस्ट्री : एनलायटेनमेन्ट अॅज मास डिसेप्शन” (“The Culture Industry: Enlightenment as Mass Deception”) या प्रकरणात वापरला.
‘संस्कृती उद्योग’ (The Culture Industry) ही संज्ञा ‘अस्सल संस्कृती’ (authentic culture) च्या विरोधी अर्थाने ते वापरतात. संस्कृतीचे बाजारीकरण करणे म्हणजे ‘संस्कृती उद्योग’. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा काही प्रमाणात व्यापारी तत्त्वावर उपलब्ध होणे, ही समाज व्यवस्थेचे अंग होऊ शकतात. पण त्यांचे व्यापक प्रमाणावर बाजारीकरण होणे आणि शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, यासारख्या लोकशाहीने मान्य केलेल्या गरजांचे उद्योगीकरण होणे यात फरक केला पाहिजे.
       ‘संस्कृती उद्योग’ या संकल्पनेतील ‘उद्योग’ चा अर्थ समजावून घेतला पाहिजे. प्रत्येक सांस्कृतिक कृतीला बाजारपेठीय मूल्य देणे, म्हणजेच ती पैसे देवून विकत घेता येईल आणि विकता येईल, अशी एक वस्तू बनविणे, हे या उद्योगाचे स्वरूप आहे. एकदा ती खरेदी-विक्रीची वस्तू बनली की तिला बाजारपेठेचे विपणन, जाहिरात, वितरण यांचे नियम लागू होतात. मग अनेक ठिकाणच्या लाखो ग्राहकांना ती उपलब्ध व्हावी, यासाठी ती एकसाची बनविली जाते. यात त्या वस्तूची मौलिकता आणि विविधता मारली जाते. MACDOLAD, KFC, PIZZAHUT, किंवा असेच काहीतरी अथवा मॉल्स ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. कोणत्याही दुकानात खरेदी केलेली वस्तू त्या कंपनीच्या अन्य कुठल्याही दुकानात कुठेही बदलता येण्याची सवलत याचा अर्थ सर्वत्र एकसाची वस्तू मिळतील, असा होतो.  
          अडोर्नोच्या मते, प्रगत भांडवलशाही हाच सामान्य जनतेविरुद्ध एक मोठा  कट आहे आणि ‘संस्कृती उद्योग’ (Culture Industry) हा त्याचा अनिवार्य हिस्सा आहे.
          अडोर्नो संस्कृती उद्योग आणि जनसंस्कृती यात फरक करतो. जनसंस्कृती ही साऱ्या समाजाचा सहभाग असणारी, प्रत्येक माणूस ज्याचा निर्मिक, वाहक व उपभोक्ता आहे, जो पुढच्या पिढीला आपल वारसा म्हणून संक्रमित करतो अशी असते. त्या उलट अस्सल संस्कृती अशी स्वयंमेव मूल्यवान असते. ती उत्क्रांत झालेली आहे, ती दीर्घकालीन मानवी सर्जक प्रक्रिया आहे. ती मानवी कल्पकता, जगण्याचा संघर्ष करते. धर्म, तत्त्वज्ञान निर्माण करते. ती अशी काही पूर्वनियोजित रचित नसते. जनसंस्कृती ही उत्क्रांत झालेली अवस्था आहे तर ‘संस्कृती उद्योग’ अनेक कृत्रिम गरजांना जन्म देतो. त्यात साधा पाव ते पिझ्झापासून धार्मिक समजला जाणारा उन्मादक अनुभव यांचा उद्योगधंदा करणारी वस्तूंच्या यादीत समावेश होतो.
कुठल्याही उद्योग धंद्याप्रमाणे संस्कृती उद्योगाचाही एकच हेतू राहतो- केवळ नफा ! म्हणजे या उद्योगाचे स्वरूप सांस्कृतिक न राहता निव्वळ आर्थिक बनते. खाणे, पिणे, कपडेलत्ते, घरे, रस्ते प्रत्येक गोष्ट विकणे आणि विकत घ्यावयास लावणे हा संस्कृतीचा उद्योग करणे असते. जी जी गोष्ट सांस्कृतिक म्हणविली जाईल ती प्रत्येक कृती, वस्तू, घटना म्हणजे सण, उत्सवासह रोजचे दैनंदिन खानपान सुद्धा विक्रीला आणणे. साध्या गप्पा मारणे ते घरचा गणपती, मंगळागौर, घटस्थापना, या साऱ्याचे सार्वजनिकरीत्या साजरे करणे, त्या करण्याची कंत्राटे घेणे हा उद्योगधंदा बनतो. मंगलाष्टकं, भटजी ते साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ लग्नाची पहिली रात्रीची तयारी यांचे कंत्राट बनते. मग त्यात एकसाचीपणा आणला जातो. अशा कार्यक्रमात, समारंभात घरच्या प्रत्येक माणसाचा, मित्र, आप्तेष्टांचा असलेला सहभाग नष्ट होतो. ‘संस्कृती’ या नावाने जी विविध वस्तूची दुकाने, हॉटेल्स पहिले की लक्षात येईल.  
             मानवी संस्कृतीचाच अनोखा आविष्कार असलेला ‘धर्म’ सुद्धा ‘धंद्याच्या’ विषारी विळख्यातून सुटत नाही. प्रत्येक धर्म जणू काही दुकान बनला आहे. परिणामी,
(१)धर्म ही अमूर्त मूळ भावना, त्यास जोडून येणारा धार्मिक अनुभव, धर्मविषयक ज्ञान ही बाब
     एक उत्पादन’ बनते.
(२) गुरु, शिष्य ही माणसे विक्रेते बनतात.
(३) गुरुशिष्य परंपरा ही व्यवस्था विक्रीव्यवस्था बनते.
(४) मंदिरे, मशिदी, चर्च,गुरुद्वारा इत्यादी प्रार्थनास्थळे म्हणजे दुकाने बनतात.
अशा  रीतीने समग्र धर्मसंस्था हा एक उद्योगसमूह बनतो.(उदा. पीके हा चित्रपट )
माणसाची जगण्यासाठीची होणारी लढाई निरर्थक आहे, त्याऐवजी त्यांनी देवी-देवता, बाप्पा, बजरंगबली, महादेव,गुरु महाराज, योगी पुरुष, अम्मा, माताजी, बापू, तांत्रिक, मांत्रिक यांना शरण जावे, त्यांना जगणे समर्पित करावे अशी योजना ‘संस्कृती उद्योगसमूहा’ कडून आखली जाते. माध्यमे केवळ त्याचसाठी वापरली जातात, असे अडोर्नो स्पष्ट करतो. व्यक्तीची आणि जनसमूहाची सामाजिक जाणीव, सामाजिक नैतिकता नष्ट होऊन समाज जास्तीत जास्त अंधश्रद्धा बाळगणारा होईल, आंधळा, बहिरा, अविचारी शिष्यवर्ग तयार होईल, असे पहिले जाते. “वर्तमान समाज व्यवस्था ही एक सकारात्मक, विधायक व्यवस्था असून ती ईश्वर निर्मित आहे, ईश्वर सर्वांचा तारणहार आहे” हे ठसविण्यासाठी मधले दलाल म्हणून समस्त अण्णा बापू महाराज मंडळीची स्थापना केली जाते.        
 अडोर्नो- हॉर्कहायमेरच्या मते, संस्कृतीच्या उद्योगीकीकरणाचे माध्यम कोणते ? तर चित्रपट, रेडीओ, टीव्ही, टेलीफोन ही लोकमाध्यमे. या जनमाध्यमांनी “लोकप्रिय संस्कृतीला’ (पॉप्युलर कल्चर) ला जन्म दिला. ही संस्कृती लोकांना मनोरंजनाच्या गुंगीत ठेवते आणि समाजातील खऱ्या समस्यांपासून त्यांचे परात्मीकरण करते, त्यांना निष्क्रिय बनविते. लोकांची आर्थिक परिस्थिती कशीही कितीही हलाखीची असली तरी ही जनमाध्यमे लोकांना अंधानुयायी आणि आत्मतुष्ट करून टाकते. स्वातंत्र्य, सर्जकता आणि आनंद या माणसाच्या अस्सल मानसिक गरजा असताना त्यांना मिथ्या उच्च कलांमध्ये आणि चंगळवादी भांडवली गरजांमध्ये गुरफटवून टाकते. या गरजा केवळ भांडवलशाहीच पूर्ण करू शकेल, असा खोटा विश्वास त्यांना देते.  
            हे कोण करतं ? तर जगातील विविध कंपन्या, मोठाले उद्योगसमूह. आधुनिक भांडवलशाहीचे अपत्य असणारी ही कंपनी संस्कृती हे कारस्थान करते. मोबाईल, वडापाव ते गृहनिर्माण संकुले यांचे ते जणूकाही मॉल्स उभे करतात. अडोर्नोच्या म्हणण्यांनुसार आधुनिक भांडवलाचा एकमेव हेतू संपूर्ण मानवी समाज कह्यात घेणे, त्यासाठी विविध मानव गटातील बारीकसारीक मतभेद मिटविणे, त्यांना एका समान गरजेच्या एका सूत्रात गोवणे हा आहे. गरज समान झाली की माणसाची चिकित्सक वृत्ती नाहीशी होते किंवा ती नाहीशी करणे सोपे जाते. हे काम ‘संस्कृती उद्योग’ नावाचा उद्योगसमूह उभारून करता येते. संस्कृती उद्योगधंद्यामधूनच ‘सुखासीनतेचा उद्योग’ (The leisure industry) विकसित झाला. पर्यटन, हॉटेल व्यवस्थापन हे उद्योग त्यातून आले. त्याचाच भाग म्हणून सेक्स टुरिझम आला.
            ‘मानवी संस्कृती’ एकदा ‘उद्योग’ म्हणून मान्य झाली की काय घडते ? तर ती लोकांमधील मुळची संस्कृती निर्माण करण्याची नैसर्गिक अभिवृत्ती, प्रवृत्ती, इच्छा यांची हत्या होते. ते एकसाची जीवन जगू लागतात. हा नवा सर्वंकषवाद (Totalitarianism) बनतो.
          दुसरीकडे संस्कृती निर्माण करण्यावर मक्तेदारी निर्माण होते. भांडवलशाही संस्कृती उत्पादकाची जागा घेते. तीच ‘संस्कृती म्हणजे काय ? ” ते ठरविते. म्हणजे  जी गोष्ट सर्वांची असते ती काही मूठभरांची होते. या प्रक्रियेत संस्कृती नष्ट होऊ शकते. लोकांच्या हाती केवळ उपभोग घेणे राहाते आणि लोक मग तेच करीत राहतात. परिणामी सर्व चित्रपट, टीव्ही वरील कार्यक्रम एकसाची होतात. उत्पादनातील एकसाचीपणा हे यांचे वैशिष्ट्य बनते. परिणामी मॉल्समध्ये एकसारख्या वस्तू उपलब्ध होतात.
           ‘संस्कृती उद्योग’ या संकल्पनेची सांगड भारतीय समाजाशी घातली तर ‘आधुनिक भारतीय संस्कृती उद्योग’ या नावाची नवी गोष्ट मिळते. पण यातील आधुनिक म्हणजे लोकशाहीप्रधान असे नसून ‘नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाने युक्त केवळ उपभोगी समाज’ असा अर्थ लावावा लागतो. वैज्ञानिक दृष्टी विकसित झालेला समाज असा अर्थ लावता येत नाही. तसे झाले असते तर विनायक पंडितांची हीच कादंबरी काय, पण अशा प्रकारे रहस्यभेद करणारी कोणतीही कादंबरी अथवा  कलाकृती निष्पन्न होण्याची वेळ आली नसती !
        भारतात भांडवलशाही आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यांचा अनोखा मिलाफ झालेला दिसून येतो. वास्तवात हिंदुत्ववादी विचारसरणीत भांडवल नावाची गोष्ट नाही. तेथे सत्ता आहे आणि ती सांस्कृतिक स्वरुपाची आहे. ज्ञान हे या सत्तेचे मुळरूप आहे आणि समग्र संस्कृती हा तिचा आविष्कार आहे. पुरुषार्थ व्यवस्था, आश्रम व्यवस्था आणि वर्ण-जाती-जमाती व्यवस्था यांचा एक अत्यंत गहिरा अंर्तनिहित तार्किक संबंध दाखविता येतो. आर्थिक भांडवल या विचारसरणीत कधीही महत्वाचे नव्हते आणि नाही. ज्या हिंदुत्ववादी घटकांना अर्थ हेच बल वाटते, ते खऱ्या अर्थाने हिंदूत्ववादी  नसतात. ज्यांची नावे आर्थिक व्यवहारांशी म्हणजे भ्रष्टाचार, गुप्त-सुप्त गुंतवणुकी, इत्यादीत जे गुंतलेले असतात, ते हिंदू असतील पण अस्सल हिंदुत्ववादी नसतात.
       पण हिंदुत्ववादी, इस्लामवादी इत्यादी धर्मगुरूंना वर्ण-जात-लिंगभेद व्यवस्थेत ‘संस्कृती उद्योग’ गवसला आणि कमाल हीनतम राजकारण सुरु झाले. संस्कृती हा ‘उद्योग’ खरे तर नफेखोरीचा धंदा (trade)  बनल्याचा परिणाम भारतात अतिभीषण झाला. एकतर,  प्राचीन  काळात विविध कारणांमुळे भयंकर प्रसिद्ध झालेली अवैदिक-वैदिक अशा दोन्ही परंपरेतील गुरु-शिष्य पद्धती, गुरुकुल रिती बदनाम झाली.  मुळात ही पद्धती वर्ण, जात, लिंगभेदानीं ग्रस्त झालेली, पक्षपाती होतीच. पण आज विसाव्या शतकात तिला थेट धंद्याचे स्वरूप दिले गेले आणि पुन्हा एकदा ती ‘आहे रे नाही रे’ च्या विळख्यात सापडली. दुसरीकडे, साईबाबासारखे सर्वधर्मसमभाव असणारी सुफी संतपीठे म्हणजे धार्मिक उद्योगसमूह झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र या सारख्या सणांना तर उघडपणे उद्योगाचे स्वरूप दिले गेले आहे.
          आपण हे लक्षात घेतले पाहिजे की  धर्म, धर्मभाव, धार्मिकता, धर्मसंस्था, धर्मगुरू, धर्मसंप्रदाय यांचे मुलभूत सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक कार्य पाहता आणि भूमिका लक्षात घेता धर्म भावनेने मानवी मनाची, मानवी बौद्धिकतेची, त्याच्या प्रज्ञेची रचना केली आहे. ‘धर्म’ ही संस्कृत किंवा देवनागरी भाषेत मांडली जाणारी वैदिक हिंदू संकल्पना आणि तिची समांतर असणारी Religion ही ग्रीक-पाश्चात्य संकल्पना   इस्लाम, ख्रिस्ती,शिंतो इत्यादी धर्म कल्पना याही आणखी इतर वैशिष्ट्यांनी सजलेल्या आहेत.
        ‘धर्म’ या संकल्पनेचे विवेचन, विवरण, त्याचा अन्वय, मुलार्थ, लक्षार्थ या तत्त्व जंजाळात पडण्याचे येथे काही कारण नाही. तो पंडितांचा, विद्वानांचा, अभ्यासकांचा अभ्यासाचा प्रांत आहे. अर्थात अभ्यास आणि जगणे यात फरक करता येणे आणि या दोन जीवन पद्धतींना एकमेकांपासून अलग करता येणे शक्य आहे. या अभ्यासाचाच एक भाग म्हणून धर्माचे तत्त्वज्ञान ही अधिपातळीवर जाणारी आणि नेणारी अन्य एक चिंतन शाखा आहे.    
        इथे एक फरक लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. सर्वधर्म अध्ययन केंद्र आणि सर्वधर्मसंकुल या दोन भिन्न गोष्टी आहेत. तसेच धर्मातील तत्त्वज्ञान आणि धर्माचे तत्त्वज्ञान या दोन स्वतंत्र  बौद्धिक घटना आहेत. धर्मातील तत्त्वज्ञान म्हणजे त्या त्या धर्मातील तत्त्वे, जीवनरिती, त्यांचे नियंत्रण सांगणे. धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे धर्म या संकल्पनेची सर्वांगीण काटेकोर तार्किक चिकित्सा करणे. सर्वधर्म अध्ययन केंद्र ही  चिकित्सा करते तर सर्वधर्मसंकुल धर्माचे दुकान मांडते, धार्मिक दहशतवाद निर्माण करते. त्यात आणखी प्रगत टप्पा नमूद करावयाचा असेल तर धर्माचे नीतिशास्त्र  ही  बौद्धिक घटना देखील आणखी वेगळी आहे.      
            जगाकडे नसलेला एक अहिंसक उपाय भारताकडे गांधीवाद रूपाने अस्तिवात होता आणि आहे. तो स्वदेश, वीर-झारा, चक दे  इंडिया,  लगे रहो मुन्नाभाई, ओ माय गॉड,  देऊळ आणि आजचा पीके  सारख्या चित्रपटात आढळतो.
           धर्मसंकुल काय भीषण परिणाम करते, कोणता अमल चालविते, याचे चित्रण करण्यात लेखक विनायक पंडित यशस्वी झाले आहेत. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो…

जुळी

कारण, कार्यकारणभाव चित्रपटकृतीसाठी कितपत आवश्यक असतो?…

चित्रपटकृतीची रचना करताना आशय, कंटेंटमधे डिवाईसेसचं महत्व किती?…
बाय डिवाईसेस आय मीन लाॅस्ट अँड फाऊंड फार्म्युला, फ्लॅशबॅक तंत्र, बॅक अँड फोर्थ पद्धतीची रचना (उदा. रंग दे बसंती), डाॅ जेकील अँड मि. हाईड फाॅर्म्युला आणि गेलाबाजार वेषांतरं, डबल रोल…
डबल रोल हे साधन कुठून आलं असावं?… परदेशी कलाकृती हा इथल्या तमाम कलाकृतींचा आदर्श, कच्चामाल, चोरी करण्यासाठीचं उत्तम, आधीच तावून सुलाखून सिद्ध झालेलं साधन…
एखाद्या कलाकृतीची चोरी ही चोरी पण कल्पना एकासारख्या एक कुणालाही सुचू शकतात हे मान्य झालं की संपलंच… चित्रपटसृष्टीसाठी तर नक्कीच… इथल्या चित्रपटसृष्टीसाठी तर… असो!
बिमल राॅयच्या दर्जा सांभाळून रंजन करणार्‍या शिष्यांमधल्या एका शिष्याच्या कलाकृतींच्या मूळ स्फूर्ती बर्‍याचशा बंगाली आणि एखाद परदेशीसुद्धा… त्याने त्या आपल्या कुशलतेने त्या त्या काळात परिणामकारक ठरवल्या. आजही त्याचे चहाते त्या नावाजतात…
याबाबतीत मूळ प्रेरणेपेक्षा तुम्ही तिचा वापर तुमच्या कलाकृतीत कसा केलाय हे निदान व्यावसायिक चित्रपटसृष्टीत तरी महत्वाचं मानलं गेलंय…
मुद्दा आहे डबलरोल या डिवाईसच्या वापराचा. नुकत्या नावाजल्या गेलेल्या एका चित्रपटातला नायिकेचा डबलरोल जास्तीत जास्त खरा वाटेल असा वठलाय. एरवी नायकाचं पडद्यापेक्षा मोठं असणं आणखी कॅश (?) करणं, केवळ श्वेतधवल सुष्टदुष्ट संघर्ष दाखवणं यासाठी डबलरोल हे साधन वापरलं गेलं. वर उल्लेखलेल्या नुकत्याच आलेल्या चित्रपटात दुसर्‍या भूमिकेतली व्यक्तिरेखा ही आपल्या मोडक्या संसारातल्या बायकोसारखी दिसणं हा नायक पुरुषाच्या अंगानं आणि एकूणच भारतीय पुरुषी मनाच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. आपला नवरा पुन्हा लग्न करतोय हे कळल्यावर त्या बायकोनं हे दुसरं लग्न लागेपर्यंतचा काळ सतत त्या नवर्‍याच्या नजरेसमोर असण्याचा अट्टहास करणं हा वेगळा भाग इथे आहे… बायकोसदृष व्यक्तिरेखा व्यवहारी रोखठोक तर मुळातली बायको प्रचंड मानसिक गोंधळ असलेली…
सदृष व्यक्तिरेखांमधला फरक दाखवताना ढोबळ सुष्टदुष्टपणा दाखवणं (गोरा और काला), विशिष्ट मॅनेरिझममधला फरक दाखवणं, एक लाचार, दुसरा सेव्हिअर- रक्षणकर्ता दाखवणं… अशी सतत वापरलेली म्हणून लोकप्रिय आणि लोकप्रिय म्हणून सतत वापरली गेलेली आवर्तनं लगेच आठवतात…
एकसारखे दिसणारे बाप, दोन मुलगे आणि त्याहीपुढे नवरसांच्या धर्तीवर नऊ भूमिकाही सादर झाल्या. लोकप्रिय झाल्या…
गुलजारच्या मौसम (loosely based on the novel, The Judas Tree, by A.J. Cronin.) नायकाच्या आयुष्यातली प्रेयसी आणि तिच्यापासून झालेली मुलगी यांतलं कमालीचं सादृष्य आणि नायक, प्रेयसीच्या आठवणी आणि वेश्येच्या रुपातली मुलगी हा तिढा परिणामकारक ठरण्यात डबलरोल साधनाचा महत्वाचा भाग आहे.
गुलजारनं त्याही पुढे महानाटककाराच्या ’काॅमेडी ऑफ एरर्स’चं देशी रुप सादर केलं. यात दोन- खरं तर चार- व्यक्तिरेखांमधलं ढोबळ वेगळं रुप, स्वभाव इत्यादी न दाखवता एका जुळ्या जोडीच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीत दुसरी जोडी आणून छान गोंधळ घातला गेला होता. (mistaken identity) ‘दो दुनी चार’ हा जुना सिनेमा याच थीमवरचा, जो गुलजार यांनीच लिहिला होता. किशोरकुमार, असित सेन यांच्या यात भूमिका होत्या…
त्यामुळे डबलरोलचं मूळ शेक्सपियरपर्यंत जाऊन पोहोचतं किंवा त्याही आधीच्या लोककथांमधे. शेक्सपियरची बहुतांश नाटकं अशा परंपरागत कथांवर आणि जुन्या नाटकांवर आधारित होती असं म्हटलं जातं…
’तनु वेड्स मनू रिटर्न्स’ या ताज्या चित्रपटात दुसर्‍या भूमिकेच्या रंगभूषेत सरळ केसांचा विग आणि समोरच्या दातांमधे अगदी हलका बदल केलाय. बॉलिवूडमधे अलिकडे ’इन’ असलेल्या हरयानवी बोलीचा वापर केलाय. त्याहीपुढे कंगना रानावत या अभिनेत्रीचं कौतुक म्हणजे कुसुम- दत्तोच्या भूमिकेत ती तिचे डोळे पूर्णपणे ब्लॅंक, भावनाहीन वाटतील असे ठेवते. आणि तरीही होत असलेल्या लग्नाला बाणेदार नकार दिलेली कुसुम- दत्तो, लग्नवेदीवरुन तडक निघते आणि एका कुडाच्या भिंतीआड बसकण मारते, ओक्साबोक्शी रडते तेव्हा ती वास्तवातलीही वाटते. पहिली भूमिका नको तेवढी संवेदनशील असणारी, सहज चक्रम या सदरात मोडेल अशी. तिचे डोळे वेगळे… कंगनाने हे खूप सहज दाखवल्याचं जाणवतं… पुढचं काम संवादांनी केलंय… कुर्सीकी पेटीकाय किंवा हारजीत आणि कन्सोलेशन प्राईजकाय…
एकूण व्यावसायिक ढाच्यात प्रयोगशीलतेला, वास्तवतेला वाव असतो. असे प्रयोग प्रेक्षकांना रुचतात. 
मनुष्य, त्याचा स्वभाव हा चित्रपटकृतीसारख्या कलेचा कच्चा माल आहे. तो भाबडेपणे, अतिरंजीतपणे मांडणं आजच्या दिग्दर्शकांनी टाळलेलं दिसतं. भारतीय प्रेक्षकांच्या सरासरी बौद्धिक वयाबद्दलही नेहेमी एक विधान केलं जातं, ते वय आता उंचावलं आहे असं म्हणता येईल. मल्टिप्लेक्समुळे विविध जॉनरच्या चित्रपटांना वाव ही सुद्धा महत्वाची बाब.
जुळ्या व्यक्तिरेखा दाखवण्यामधे माणसातले परस्परविरोधी पैलू उजेडात आणणं हा सुप्त हेतू असू शकतो. एक तर दृकश्राव्य माध्यम आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, व्यवसाय साधणं म्हणून जुळ्या भूमिकांची संकल्पना ढोबळमानाने सहाय्यभूत ठरु शकत असेल…
मानवी मन हे एक अधिक एक दोन असं निश्चित नाही. हा एक कॅलिडोस्कोप आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा किंचितसा प्रयत्न आपल्याकडे होतो आहे का? हे बघणं महत्वाचं आहे…
जगभरात असे प्रयत्न झालेले दिसतात. मराठीत ’देवराई’ हे नाव या पद्धतीचा सिनेमा म्हणून लगेच सुचतं. त्या आधी मला आठवतो तो श्वेतधवल ’पेडगावचे शहाणे’ मधला राजाभाऊ परांजप्यांचा कातरी बघितल्यानंतरचा टाईट क्लोज… अजय फणसेकरांचा ’रात्रआरंभ’… आणखी काही चित्रपट मराठीत आहेत?…
’ब्लॅक’ या चित्रपटात हेलन किलर पासून स्फूर्ती घेतलेल्या व्यक्तिरेखेबरोबरच तिचा शिक्षक असलेल्या व्यक्तिरेखेच्या अल्झायमर या स्मृती संदर्भातल्या आजाराचं प्रत्ययकारी चित्रण आढळतं. 
नुकत्याच दिवंगत झालेला थोर गणितज्ज्ञ जॉन नॅशच्या पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनिया या आजारातलं, त्याच्या सुरवातीचं आयुष्याचं चित्रण ’ब्युटिफुल माईंड’ या २००१ सालच्या चित्रपटामधे मांडलं गेलंय…  DISSOCIATIVE IDENTITY DISORDER ह्या मानसिक आजारामधे रोग्यावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिमत्वं आळीपाळीने ताबा घेत असल्याचं दिसतं… या विषयावरची इंग्रजी कादंबरी चाळल्याचं आठवतं…
हे झालं मानसिक आजारासंदर्भात. व्यवहारात, एकच माणूस अनेकांना वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा दिसतो, भासतो किंवा एकच माणूस वेगवेगळ्या परिस्थितींमधे वेगवेगळा वाटतो अशासारखी विधानं सर्वसाधारपणे आपण करत असतो…
केवळ दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदृष्य व्यक्तिरेखांची गोष्टं ते एकाच मानवी मनातल्या दोन किंवा बहुसंख्य व्यक्तिमत्वांचं आणि पर्यायानं होणार्‍या गुंत्याचं, तिढ्याचं चंदेरी पडद्यावरचं प्रकटीकरण हा कुठून कुठे झालेला प्रवास वाटतो…
मानवी मनातल्या अनेक व्यक्तिमत्वांचा असा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरात झालेला असू शकतो. जाणकार यावर निश्चित प्रकाश टाकू शकतील… 
(संदर्भ, छायाचित्र साभार: विकीपिडिया)

मित्र, सुहृद, मार्गदर्शक…

 खरं तर हा उलटा प्रवास आहे… इथे प्रकाशित केलेलं आणखी वाचकवर्गासाठी इतरत्र प्रकाशित करतो आपण. एकटं वाटण्याच्या अवस्थेत आणि एकाकी न होण्याच्या प्रयत्नात काही ऋणानुंबध आठवतात. ते सहज पोचण्यासाठी आभासी जगात जवळचे झालेले, ज्ञात जगात आभासी झालेले इत्यादी इत्यादी, त्यांच्या त्यांच्या सवडीने का होईना आणि आभासी का होईना सहवेदनेत सामील होत असतात… त्यातून नवीन वास्तवातले ऋणानुबंधही अस्तित्वात येतात.. जग जवळही येतं, ते लांबही असतं… आभासीही असतं आणि वास्तवही असतं… माणूस आहे तोपर्यंत भोवताल असणार, जग असणार… त्याच्या अस्तित्वातली व्यामिश्रताही असणार.
भूतकाळातल्या अनेक सुहृदांना बरंच काही सांगायचं राहून गेलेलं असतं, आत्ता आवर्जून सांगावं असं काही… त्यावेळी सहज वाटणारं काही आता कृतज्ञतेच्या स्वरुपात दाटून येत असतं…
तुकड्या तुकड्यानं व्यक्त होण्याची सवय भिनत चाललेली असली तरी ते सगळं कुठेतरी संग्रहित असावं असंही वाटत असतं…
मूळात व्यक्त व्हायला माध्यम सहज हाताशी असतं…
असे काही तुकडे जोडण्याचा प्रयत्न… पुन:प्रकाशित स्वरुपात… 


माणसं जमवणारा- पेक्षा मुलं जमवणारा, समूह तयार करणारा, संघटनकौशल्य असलेला आणि अर्थातच नेता असणारा एक मित्र… उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनयाची उपजत देणगी असणारा, लेखक, दिग्दर्शक, निर्माता… उरापोटी धडपडून वर्षानुवर्षं प्रायोगिक संस्था चालवत रहाणारा… मी काहीही प्रयत्न न करता मला सामोरा आलेला, मला हाताला धरुन एकांकिकेच्या तालमीच्या हाॅलमधे घेऊन आलेला… मीच काय कोणीही बसून राहील, सहजासहजी उठणार नाही इतकं सहज मार्दव त्याच्या चालण्याबोलण्यात होतं… त्याचं बोट धरलं आणि मी त्या लखलखत्या गुहेत शिरलो…
त्यानं कै प्रा. कृ रा सावंत यांच्याकडे नाट्यशिक्षण घेतलं होतं… एकांकिका स्पर्धा तेव्हा उपनगरात जोशात होत्या… ग्रीक पद्धतीची नाटकं आणि पर्यायानं नाट्यशिक्षण हा सावंतसरांचा -आता ज्याला युएसपी असा शब्द आहे- तो होता… हा मित्र स्वत: हे रंगकर्मी अष्टपैलुत्व शिकला, त्याच्या शाळेतल्या त्याच्या बरोबरच्या, मागच्या वर्गातल्या, आमच्यासारख्या कित्येक, कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्यांना रंगमंचावर आणलं, तयार केलंच पण माजी विद्यार्थी संघासारख्या संस्थेला कार्यरत ठेवून या मुलांना सामाजिक कामाची ओळख करुन दिली… नेता असूनही मित्रत्वाचं नातं संपर्कातल्या लहानथोरांशी आजतागायत टिकवणं ही तुझी खासियत… तुझा ‘समुद्रशिकारी’ नाटकातला न-नायक, तुझं लेखन, दिग्दर्शन, नेपथ्यसंकल्पना, उत्कृष्ट निर्मितीमूल्यं.. बघणा-या आम्हालाही स्वप्नवत होतं सगळं… शाळेच्या इमारत निधीसाठी त्यावेळी कोप-यातल्या उपनगरातल्या, आपल्या कोप-यातल्या वसाहतीत होणारे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग म्हणजे पर्वणी असायची… ‘समुद्रशिकारी’ बघताना मला त्या नाटकांची आठवण झाली होती… मग ‘संभूसांच्या चाळीत’ बघतानाही… सरकारी पुस्तक आणि प्रकाशने खात्यात तू असताना, ओल्ड कस्टम्स हाऊसमधे, दुपारच्या भेटींदरम्यान तू सतत अस्वस्थ आहेस हे जाणवायचं… ती सुरक्षित नोकरी तू सोडलीस, नव्याने संघर्ष केलास… पत्रकारितेसारख्या, तुला आवडणा-या पण त्यावेळी बेभरवशाच्या असलेल्या क्षेत्रात शिरलास…
आज तू जो काही आहेस त्या आधीचा प्रवास आम्ही जवळून पाहिलाय आणि त्या प्रवासाचा आणि तुझा अभिमान वाटतो संजय डहाळे…


…आयुष्यातला काळोखी काळ असतो. मित्राच्या, आपल्या. घनिष्ठता निर्माण होते. तसा एक मित्र होता. ‘नेमाडे’ हे नाव त्याच्याकडून पहिल्यांदा ऐकलं.. दोघेही ओवरड्यू ‘कारे’. मला असं काही जवळचं वाचायला पहिल्यांदा सापडलं. मग अनुक्रमे ‘चातुष्टयं’ वाचणं, भारावणं आलंच… या मित्रानं मला एका उपक्षेत्राचा परिचय करुन दिला. हाताला धरुन नेलं. ही व्यावसायिक कामं होती… वाचन, विचार करणं, एकूण भान, मनन ह्या दृष्टिनं मी एका निश्चित वळणावर त्याच्यामुळे आलो…
त्याचं दु:ख माझ्या मानाने खूपचखूप दारुण होतं… मी सुरक्षित वातावरणात होतो त्या मानाने…
दु:ख असणं, गहिरं असणं आणि नंतर ते आपण जास्त गडद करत नेणं, कुठेतरी आत्मकरुणा आपला कब्जा घेते आहे की काय?… असं त्याच्या बाबतीत जाणवायला लागलं. माझं दु:ख त्यामानाने जेमतेम असून मी आत्मकरुणेत वहावतोय की काय असं वाटायला लागलं…
कालांतराने दोन ओंडके वेगळे झाले. त्यानंतर काही काळाने मला कळलं, त्यानं मला ‘डिलीट’ केलंय. आता ब्लाॅक करतात तसं… तो नेहेमी म्हणायचा अमुक एक कालाने मी त्यावेळचे घनिष्ठ संबंध स्वत:हून तोडून टाकतो आणि नवीन संबंध जोडतो… पहिल्यापासून मला असं काही घाऊक स्वरुपात करणं अघोरी वाटायचं… हे शक्य असतं?… हे आपल्याला, इतरांना सोपं जातं?… भावस्थितीची मशागत करायला हा योग्य, उत्तम उपाय आहे?…
आज तो चांगल्या पदावर काम करतो. अचानक रस्त्यात भेटला आणि त्याचा ‘डिलीट’ प्रतिसाद बघून तो मला पूर्वीसारखाच वाटला…
बाबा, सतीश तांबे वरचे काही प्रश्नं… या घटनेतला मित्र तुझा चांगला मित्र होता. एका व्यावसायिक क्षेत्रात तू, त्याला आणलंस असं तो म्हणायचा… तू माझा शेजारी होतास. तुझ्या ‘छापल्या कविता’ तेव्हा प्रकाशित झाल्या होत्या. तू कवि आहेस, विद्यापिठाचा सुवर्णपदक विजेता आहेस आणि हे तू कशाकशातून जाऊन केलएस ह्या माहितीमुळे तुझ्याबद्दल आदरयुक्त भीती निर्माण झाली. मला नोकरी लागल्यावर तू मला बोलवून याच पदावर राहू नकोस. पुढची परिक्षा, त्याचे फायदे सांगितलेस. एक जाहिरात उतरवून घ्यायला सांगितलीस. तो जमाना कटपेस्ट, फाॅरवर्डसेंडचा नव्हता…
आपण तिघे, कालांतराने एकदा भेटलो. हे सगळं तुला आठवेलच असं नाही. या भेटीत मी एका क्षेत्रात वहावत जाणारे एका क्षणी विमनस्क होतात, तसा होतो. तू तुझ्या प्रश्नांनी मला स्वत:चं पुनरावलोकन करायला प्रवृत्त केलंस… ’तुझं वय काय? आता तू कुठे आहेस? जिथे जायचंय तिथे आता तू कुठे असायला हवंस?…’
भानावर आणणं हे ख-या मित्राचं  काम असतं. तू अनेकांशी या स्वरुपाचं वागला असशील.
घनिष्टता, जवळीकीसारख्या प्रसंगांबरोबर हे प्रसंग आठवतात. आपला परिचय तरी होता. काही वेळा अकस्मात जुजबी ओळखीचा किंवा पूर्णपणे अनोळखी कुणी ख-या मित्राचं काम बजावतो हे आठवलं, लक्षात आलं तेव्हा ‘मैत्र जिवाचे’ चा अर्थ नव्याने कळला. आज स्टे कनेक्टेड वर्च्युअली असं असलं तरी या भिंतीचा उपयोग असा संवाद साधायला होतो हे लक्षात येतं आणि आनंद होतो..


कुवतीप्रमाणे जमेल ते करत राहिलो असताना मुख्य, महत्वाचा जोडधंदा कुणातरी अवलियाला पकडून समूहानं ख्या ख्या खी खी करत रहाण्याचा राहिला… तेव्हाही उच्चभ्रू की कसले भ्रू नटवे, नटव्या ‘काय ह्ये’ म्हणून हिणवत राहिल्या तरी घेतला वसा सोडला नाही… सोडणार नाही…
गजू तायडे, तुमच्या पोष्टी वाचून मला गतायुष्यातल्या माझ्या दोन मित्रांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही…
एक कै. सुहास बावडेकर, दुसरा रवि कुरसंगे…
सुहास जेजेला होता. कमल (शेडगे) त्याचा गुरु. त्याच्या खांद्यावर याचा हात. तो अरेतुरे करायचा म्हणून इथे शेडगेंचा उल्लेख एकेरी केला… एरवी त्यांचा मोठेपणा मी काय सांगू. ही दोस्ती टाइम्समधली. चित्रकार माळी, सायन्स टुडे करणारा नाना शिवलकर, अरविंद मुखेडकर… नानाचे भंकसचे किस्से रॅगिंगच्या जवळपास जाणारे. पायाला पँटवर दोरखंड बांधणारा… माळींच्या डब्यावर त्यानं काढलेलं हुबेहूब डालडाचं चित्रं, ते माळींना माहित नाही पण इतर सगळ्याना माहित. नानाची ‘ष्टा’ ने संपणारी अत्रंग म्हण… सुहास आमच्या परिसरातला भांडणाचा किस्सा सांगायचा. ‘नून’ हा शब्द एकानं वापरला म्हणून दुस-यानं वापरुन त्यात आख्खं खानदान कसं आणलं… आम्ही रिपीट प्रेक्षक रात्रीबेरात्री ख्या ख्या करत उभे…
दुसरा रवि… हाफ मर्डरमधे अंदर, आणिबाणीत समाजवाद्यांना भेटला जेलमधे… क्युबिझम चित्रशैलीत चित्रं काढायचा. ‘झुलवा’ चं नेपत्थ्य त्याने केलं. त्याहीपेक्षा धारावीतून जोगते, जोगतिणी तालमीत आणले त्याने… कीच, रांडपुनव हे त्या जमातीतले कुणालाही प्रवेश निषिद्ध असलेले विधी वामन (केंद्रे) ला दाखवले त्याने… संस्थेच्या डबक्यात इगोबिगोची लपडी होऊन वातावरण तंग झालं की तो संस्थेतल्या ए पासून झेड पर्यंत सगळ्यांच्या अप्रतिम नकला करायचा… आम्हाला ख्या ख्या पर्वणी… तो परे मधे कॅटरिंग इनचार्ज होता. दौ-यात जेवणाची सोय त्याची… सतीश काळसेकर, राजन बावडेकर यांनी भालचंद्र नेमाडेंची घेतलेली आणि नेमाडेंनी रिस्ट्रिक्ट केलेली पानबैठक चर्चगेटला कॅन्टिनवरच्या अर्ध्यामाळ्यावरच्या रविच्या केबिनमधे झाली होती. त्यात माझ्यासारख्याला प्रवेश मिळाला रविमुळे… चाळीशीनंतर त्यानं लफडं केलं, मग लग्न केलं दुसरं. सध्या मुक्काम ‘मामाचा गाव’ ला…
असे दोन अत्रंग… माझ्यावर जीव होता त्यांचा असं वाटून माझी छाती फुगवून आणि कितीतरी इंच होते…
आपण केलेलं काम दुस-याला दाखवायची हौस प्रत्येक काही करणा-याला असते… म्हणून असेल पण ज्या आपुलकीने हे माझे मित्र मला आपली कामं दाखवायचे त्यातून माझ्यासारख्या कलेशी काही संबंध नसणा-याला किंवा नंतर नटवा बनून चमकायचीच खुजली निर्माण होण्यासारखी परिस्थिती असताना, त्यांच्यामुळे मला वेगळं जग बघायला मिळालं…
सुहास आमच्या नगरातल्या गणेशोत्सवात वेगवेगळ्या गणेशमंदिरांच्या प्रतिकृती इतक्या बेमालूम करायचा की भल्याभल्यांची गर्दी जमायची आणि तो त्यांच्यासमोर आम्हाला त्यातले बारकावे समजाऊन सांगत असायचा… कमलच्या खांद्यावर जसा त्याचा हात असायचा तसा आपल्या अमोलच्याही. बाप लेकाच्या खांद्यावर हात टाकून त्याला गाण्याचे प्राथमिक धडे देत गल्ल्यांतून फिरतोय हे माझ्यासारख्यासाठी तरी विलोभनीय होतं… अमोलला नंतर त्याने वाडकरांकडे शिकायला पाठवलं. अभिषेकी नगरातले सामान्याना माहित नसलेले थोर गायक रत्नाकर पै यांच्याकडे गाणं शिकायला यायचे. त्या दोघांकडे सुहास शिकला होता…
रविचं झुलवापेक्षा अनिल बांदिवडेकरांच्या एकांकिकांचं नेपथ्य अफलातून असायचं. एका एकांकिकेत त्याने दोन दरवाज्यांच्या फ्रेम्स, सभोवताली अनेक सुशोभित कुंड्यांची रचना करुन टाळ्या घेणारा सेट बनवला होता. त्याहीपेक्षा त्याने त्यात निरनिराळ्या अभिनयक्षेत्रांचा विचार करुन मग एकसंध सेट तयार केला ह्याचं अप्रूप जास्त…
सुहासनंही शेवटच्या काही वर्षांत व्यावसायिक नाटकांसाठी नेपथ्यं केली होती…
वामन आमच्यासाठी हाडाचा शिक्षक, दिग्दर्शक राहिला. केवळ त्याच्यामुळे माझ्यासारख्याला अशोक रानड्यांच्या भाषा, वाणी शिबिरात प्रवेश मिळाला. पीटर ब्रुक महाभारत घेऊन आला तेव्हा त्याच्या वर्कशाॅपसाठी वामननं शिव्या घातल्या पण घरातल्या आजारपणामुळं ते हुकलं… त्या वर्कशाॅपमधे रविने त्याच्या भलत्या भाषेतल्या इंप्रोवायझेशन्सनी धमाल उडवली होती म्हणे…
सुहास आणि रविसारखी हरहुन्नरी, अप्रतिम विनोदबुद्धी आणि टॅलंट असलेली माणसं लवकर विस्मृतीत गेलेली बघून वाईट वाटतं…
आमच्यासारख्या को-यांवर त्यानी आपुलकीनं केलेल्या संस्कारातून त्यांची आठवण तरी निघावी…
सांगावं तेवढं कमी… दोघांबद्दल…
पिपल्स बुक हाऊस, फोर्ट मधे भारतीय बैठकीवर मर्यादित रसिकांसाठी कवि नारायण सुर्व्यांची मैफल झाली होती… तोंडाचा आ वासून सुर्व्यांना थेट बघितलं, ऐकलं ते रविमुळे… दिलिप चित्रे, अरुण कोलटकर त्याच्यामुळे माहित झाले.. फोर्टमधून जाताना त्याने लांबून कोलटकर दाखवून त्यांचे किस्से सांगितले होते. रविनं ‘इंद्रियारण्य’ नावाचा स्वत:चा कवितासंग्रह प्रकाशित केला स्वखर्चानं. त्या ‘अविसुर’ प्रकाशनातल्या वि मधे मी होतो. ’झाल पल्ल्यावर’ ही त्याच्या आदिवासी भाषेतली कविता त्यात होती. इराणचा म्हातारा, बशी हा संदर्भ सांगून त्याला जमेल तशी त्यानं केलेली एक कविता त्यात होती. चित्रे, सारंग मला माहित झाले त्याच्यामुळे… मी कवडा झालो तेव्हा माझ्यापेक्षा त्याला बापासारखा आनंद झाला होता. त्यानं वही घालून दिलेली मी जपून ठेवलीए अजून…
सुहासमुळे दूरदर्शन केंद्र बघितलं पहिल्यांदा. रमण रणदिवेंच्या कविता सुहासच्या आवाजात रेकाॅर्ड झाल्या. सुहासची ती पहिली स्वतंत्र दोन गाणी अजून माझ्या स्मरणात आहेत. निर्माता कै. अनिल दिवेकरसारखा अत्रंग माणूस त्यानं दाखवला… केंद्रावरच, नविन आहे म्हणून निश्चल आहे, अभिनय करत नाही हा जोकही ऐकवला… वर तो असे जोक करणा-या प्रथितयश साहित्यिकानं तो केला असता तर डोक्यावर घेतला गेला असता हे ही… 😉
सुहासचे आजोबा चं वि बावडेकर साहित्यसंघाशी संबंधित होते. त्यावेळचं एक प्रसिद्ध नियतकालिक- आलमगीर- त्याचे संस्थापक, संपादक. त्यांचा थेट फायदा सुहासला मिळाला नाही. मधली पिढी वेगळ्या क्षेत्रात. (अमोल पालेकर सुहासच्या वडलांचा मित्र झाला. त्याच्यावरुन या अमोलचं नामकरण) संगीत नट अरविंद पिळगावकर सुहासचे मामा अजून हयात आहेत…
रवि भटकाविमुक्त… तो या मातीतला नाहीच… त्याला त्या फ्रेंच की काय जीवनपद्धतीचं आकर्षण. तेव्हा ती त्याची चूष वाटायची पण तो जगला तसा. आताही एका अर्थानं कोप-यातल्या मामाच्या गावात मॅनेजरकी करताना तो आवर्जून मित्रांना बोलवतो. आम्हीच गद्धे अजून जात नाही… रविनं एक अबसर्ड नाटक लिहून, त्याचं वाचन करवलं होतं चर्चगेट बुकिंगच्या वरच्या मजल्यावरच्या त्याच्या विश्राम केबिनमधे. हे असं काही असतं ते त्याच्यामुळे कळलं. इथेच त्याचं क्युबिझम पेंटिंग होतं. हे तो कालिना चर्चमधल्या फादरकडून शिकला… कालिनातल्याच एका मारामारीत तो आत गेला… तेव्हा आणिबाणी होती… रविला आणिबाणीमधल्या बंदींची मैत्री लाभत गेली…
कवि भुजंग मेश्राम, युवराज मोहिते यांच्या भेटी त्यानं इथे घडवलेल्या आठवतात…
रविबद्दल माझ्यापेक्षा जास्त जवळ असणारा अजित आचार्य.
तर सुहासबरोबरचा सुरेश कुलकर्णी.
असो… आता खरंच इत्यलम्…
(चित्र: आंतरजालावरुन साभार…)

“मी मराठी Live” वर्तमानपत्रात “दिवेलागण” या “अभिलेख” वरील नोंदीची दखल…

मी मराठी Live हे वृत्तपत्र मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सुरु झालं… १५ मार्च रोजी मी मराठी लाईव वृत्तपत्राच्या फीचर्स विभागाच्या उपसंपादक शीतल गवस यांचा ’दिवेलागण’ ही ’अभिलेख’ वरील नोंद रविवार मी मराठी लाईवच्या ’सप्तमी’ या सदरासाठी परवानगी मागणारा मेल आला. लगतच्या रविवारी २२ मार्च रोजी “दिवेलागण” लेख स्वरुपात प्रसिद्ध झालं…
मी मराठी लाईव आणि शीतल गवस यांचे अगदी मनापासून आभार…

आम आदमी करतो सुपडा साफ????

मतदार राजा टोकाचा कौल देऊ लागला आहे…
आदिकाली पर्यायी पक्षच नव्हता… मग विरुद्ध पक्षांमधे प्रत्येकी एखाददुसरं नेतृत्व तयार झालं. आणिबाणीनंतर विरोध्यांना सत्तेची चव कळली. ती लगेच उलटली. पुन्हा मतदारराजानं आणिबाणीवालीचीच लाट आणली… आपल्याकडचा लोलक चांगलाच झुकतो.
राजकीय मृत्यू हे अपघात असतात, कारस्थानांची फलितं असतात, की दहशतवादाची?…
पुन्हा प्रेमाची लाट येते… साऊथला कटाऊटस्, मंदिरं, आत्महत्या असे विशेष मतदारराजा दाखवतो. त्याचीच जराशी पातळ प्रतिमा देशपातळीवर दिसते?…
हे आवर्ती होतंय म्हणून की काय धर्म ह्या मुद्याचे पद्धतशीर आणि संवेदनाहीन राजकारण आणले जाते?… चेहेरा, दाखवण्याचा वेगळा, मुळातला वेगळा… पाडापाड, दंगली, जाळपोळ… अजूनही दंगलीनंतरची छायाचित्रं आठवली, स्त्री, भृणहत्यांच्या बातम्या आठवल्यावर सामान्यातला सामान्य मतदार चरकतो? की ‘आपलं’ बरोबर आहे, ‘त्याना’ असंच शासन पाहिजे हे त्याच्या जाणिवरुपी अस्तित्वात मुरुन गेलंय?
राजकारणातलं वेगळं वळण आणि शेजारी शत्रू या दोघांमुळे पराकोटीचा दहशतवाद माजला, की कुणा एकामुळे?… यात सगळ्यात जास्त सर्वतोपरी हानी कुणाची झाली?…
मग पुन्हा जोरदार पलटी… त्या आधीची काही त्रिशंकू मध्यंतरं… कसरती, सारवासारव्या…
मतदारराजानं पुन्हा घराणेशाही, परित्यक्तासमान विधवेबद्दल सहानुभूती अशी जुनीपुराणी मतं कवटाळली? त्या विजयाला सत्ताधारिणीने त्यागाचं कोंदण घालून स्वप्रतिमा उजळवली? वर त्याला मुस्काट दाबलेला, सज्जन विकासाचा चेहेरा दिला? ज्या चेहे-यानं परंपरागत विकसनशील देश विकसित जगात पाय रोवू लागला होता, त्याच चेहेर्‍याला वापरुन घेऊन? अशा प्रतिभा, कर्तृत्ववान चेहेर्‍यानं मंद, निब्बर दगडी कवचाआड स्वत:ला वापरुन देऊन देशाला कुठे आणून ठेवलं?….
सामान्यातला सामान्य राजा सगळंच स्वीकारतो?…
पैसे खा पण आमची कामं करा… हे सगळे येतात ते तुंबडी भरायलाच हो… असं दर राज्यकर्त्याला म्हणतो…
धोरणलकव्याने तरी किंवा दुहीच्या बीजाने तरी आल्टूनपाल्टून रसातळाला दोन बोटं उरताहेत…
लकवा खूपच मारलाय आता जालिम डोस शोधायला लागला मतदार राजा. लकवेकर खूब दिला लकवा म्हणून माजात होते आणि कथित दंगल, जाळपोळीचा कथित सूत्रधार, कथित बनावट चकमककिंग वगैरे बिरुदावली मिळालेला अंडरडाॅग हळूहळू उभा राहिला. आपला मतदार राजा हुशार, चाणाक्ष. त्याने काट्यावर नायट्याचा हिशोब केला. प्रचंड विजयामुळे, त्या विजयाअलिकडच्या पलिकडच्या भल्याभल्यांच्या प्रतिक्रियांपुढे मतदार राजा समूहात काहीशी भांबवाभांबवी झाली का? की नाही? रोगापेक्षा इलाज भयंकर असं वाटून?….
पुढचं तर अगदी अलिकडचं… नमोंकीत सूट इत्यादी… महर्गता, वेतनकरार, सवलती… यात काही अनुकुलता?
मतदार राज्याचं सुपडा साफ करण्याचं व्रत चालूच आहे…
राज्य पातळीवर नवनिर्माणाचंच खळ्ळं खट्याक करत आता तर तो सोन्याचा झाडू हातात घेऊन राजधानीवरच उभा आहे…
‘सुसा’ट मतदार राजा आणि अप्पलपोटे राजकारणी यांतला हा विळ्याभोपळ्याचा खेळ केवळ खेळाचा आनंद देत-घेत रहाणार की आपली लोकशाही, पोरखेळातून बाहेर पडून सज्ञान होणार? की सरळ ठोकशाहीच येणार?…
केंद्रात ज्याचं सरकार आहे त्याची शत्रूसरकारं राज्यात आली की प्रगतीच प्रगती, हे पुस्तकी राजकारण अजून मतदार राजाचा कब्जा घेऊन आहे?… सत्ताधीश, त्यांचे कथित स्पाॅट इत्यादी नाना काही वेगळे उजले रंग दाखवणार?….
असा हा सामना दोन राजांमधला…  हे कलगीवाले आणि तुरेवाले दोघेही, तटस्थ निरीक्षकाला सारखेच अनप्रेडिक्टेबल- अनाकलनीय वाटतात?….
मुळात ताटस्थ्य इत्यादी खिजगणतीत आहे?
नाही… एक मॅगसेसे विजेता, भूतपूर्व आदर्श नोकरशहा, सुवर्णपदकविजेता, मुख्यमंत्रीपदी असतानाही चौकात धरणं धरुन बसणारा… राजधानीद्वारी सोनियाचा झाडू धरुन शड्डू मारता झाला आहे… या पार्श्वभूमीवर या सगळ्याच प्रश्नांचं मूल्य काय आहे?…
उद्या महासत्ता होण्याच्या दिशेवरचा सोपान दृगोचर झालाच तर… म्हणून विचारतोय…
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

ज्ञानपिठ…

प्रेषिताचेच काय
प्रत्येकाचेच पाय मातीचे
कुणी काय करायचं
ते आणखी कुणीतरी ठरवायचं
कोणात नक्की केवढं आहे तेही
एखादा वांड मुलगा असतो
मला वाटेल, पटेल ते मी
त्या त्या वेळी करीन
काय करायचं ते घ्या करुन म्हणतो
प्रत्येकाचा एक काळ असतो
वेळ असते
पाणी अमुक वळणावरच जातं
शिमगा जातो, कवित्व उरतं
विचार पक्के हवेत
विरुद्ध विचार पक्के हवेत
एकमेकांबद्दलचा आदर चिरंतन रहावाच
गळ्यात गळे, तत्व वेगळी
वर्ग की वर्ण संघर्ष डोकं वर काढत रहावा
अंतर्विरोध का काय तो असतोच
झुक्या… त्याला किती लवकर कळलं
पार नाहीसे झाले 
लोकलमधे चावडी कसली 
घुसमट शरीरांची, श्वासांची, प्रसंगी प्राणाची
वर्तमान पत्र बाद, संजयी वाहिन्या उद्बोधक
व्यक्त होण्याची, लढत रहाण्याची असोशीच असोशी
झुक्यानं सगळं घरात आणलं, हातात दिलं
त्याला किती लवकर समजलं
आयुष्य…

समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा…

व्यक्तिमत्वाची समृद्ध जडणघडण नाट्य आणि साहित्य या माध्यमांतल्या घटकांचा प्रत्यक्ष उपयोग करुन दिलेल्या प्रशिक्षणामुळे परिणामकारकपणे होत असते…
सभाधीटपणा, संवादकौशल्य, संघभावना, भाषेची ओळख, शब्द, शब्दांमागचे विविध अर्थ, भाव, भावना प्रकटन… 
अशा गोष्टींचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी “अभिलेख” येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रीकृष्णनगर, बोरिवली (पूर्व) परिसरात ‘समृद्ध व्यक्तिमत्व कार्यशाळा’ आयोजित करत आहे…

एकटेपणा, अवकाश, कला, मैत्र… इत्यादी इत्यादी…

लहान मुलाला झोप आल्याचं कळत नाही. ते त्रासतं, त्रासवतं, कंटाळतं, ओरडा खातं. पालकालाही अनेक वेळा समजत नाही, ते असं का करतं?
आता एकेकट्या मुलांची कुटुंब अनेक आहेत. किमान दोन मुलं असावीत या विचाराला जोडपी पुन्हा लागली अाहेत. बरोबर कुणी असणं महत्वाचं वाटतं. सहवास, सह अनुभूती, एकमेकाला सहभागी करुन घेण्याची वृत्ती. मिळून काही करण्याची उर्मी महत्वाची अाहे…
जाणत्या माणसाला अनेकदा खुटखुटत रहातं. लहान मुुलाची बैचेनी… किर्केगोर- किर्केयोर, नित्शे माणसाच्या एकटेपणाचं तत्वज्ञान मांडतात. फ्राॅईड म्हणतो, कामप्रेरणा आणि मोठं होण्याची इच्छा सतत मानवी मनाचा कब्जा घेऊन रहातात.
हल्ली मुलांना निरनिराळ्या क्लासना घातलं जातं. व्यक्तिमत्वविकासासाठी… कला, खेळ, ज्ञान… हे सगळं शिकवण्याची घाऊक केंद्रं तयार आहेत… त्यातून काही चांगलं, काही वाईट निश्चित घडत रहाणार…
संगणक, आंतरजाल, भ्रमणध्वनी, लॅपटाॅप, टॅब… हात जोडून उभंच आहे…

बाजूलाच पोकळीही आहे… ती वाढते आहे असं निरीक्षक म्हणताहेत…
कितीही काही केलंत तरी पोकळी अविभाज्य आहे. ती कशी भरायची हा निर्णय ज्याचा, त्याचा… विचारवंत, स्वयंविकास शिकवणारे तज्ज्ञ या दिशेने सांगू पहाताहेत…
निर्णय घ्यायला लागणं ही माणसामागे लागलेली एक ब्याद आहे, निर्णय घ्यायला लागणं पेक्षा निर्णयापश्चात घडणार्‍या परिणामांची जबाबदारी घ्यायला घेणं…
मग धर्म, कला, खेळ… इत्यादीत मानवी इतिकर्तव्य शोधायचं… कुणी कसं, कुणी कसं…
स्वातंत्र्य ही आणखी एक ब्याद… त्याचं काय करायचं?… विचार बंद करता येतात? झापडबंद रहाता येतं?… मग अातून नाही नाही ते कढ येतात, त्यांचं काय करायचं?…
झोकून द्यायचं स्वत:ला आयुष्याच्या प्रवाहात?… ते कधी न कधी करावंच लागतं!… पालकांचं वाढतं सुरक्षाकवच अंतिम समृद्धपणे जगण्याच्या आड येतं का? समृद्धी म्हणजे नेमकं काय?…
मग पूर्वी एका अर्थानं नाळ तोडून जगात टाकलं जात होतं; परिस्थितीमुळं, जाणीवपूर्वक, नाईलाजानं, जन्मदात्यांच्या परस्पर असामंजस्यामुळं, प्रत्यक्ष किंवा लाक्षणिक… ते सुदृढ जगण्याला पर्यायानं उपकारक ठरत होतं का?… परिणाम करणारे विविध घटक काही ठाम विधानं करु देतात की नाहीच?…
हा सगळा पट डोक्यात सुरु झाला तो दोन मित्रांच्या आठवणीमुळं. मित्र म्हणायचे तर समवयस्क नव्हेत. मी भिडस्त म्हणजे चुचकारल्याशिवाय कुण्याच्या अध्यातमध्यात नाही. एकदा मध्यात आलो की वहावणार… ज्याचा, त्याचा स्वभाव. तर ह्या मित्रांनी ज्ञात नव्हतं त्याचा परिचय करुन दिला. चित्रं, गाणं, नेपथ्य, साहित्य, व्यसन जडेल अशा गोष्टी…
वास्तव्य आहे ते शहरात असलं तरी गावासारखं. हद्दीला नदी. त्या नदीपलिकडं नेलं या महाभागांनी. नदीपलिकडं जाणं म्हणजे सर्वार्थानं. मग अलिकडच्या कशातच मन रमत नसल्यासारखं. मोठ्ठी दरी… अपसमज, गैरसमज… त्यांचीही सवय…
दोन्ही मित्रं वेगवेगळ्या पार्श्वभूमीतले. माझं वर्तुळ मर्यादित.

कुठल्याही नव्या क्षेत्रात गेलं की समवयस्क, शिक्षक, मित्र… अशी वेगवेगळ्या तर्‍हेची नाती जडतात. अनुभवी, हाताला धरुन अमुक दिशेने नेणारा जवळचा होतो. मैत्रीची त्याची ओढ आपल्यापेक्षा त्याला जास्त प्रसंगी. त्यानं आपण सुखावून दबलेलो. तो हे दबलेपणही नाहीसं करतो आणि संस्कारांची दालनं उघडत जातो, शिक्षकाचा अविर्भाव न आणता.
असे गतायुष्यातले दोन मित्र चटकन् आठवले…
कालांतराने त्यांच्यातले आपल्याला वाटणारे दोषही जाणवले. आपल्यातही त्याना काही दोष जाणवले असतील हा विचार मनातच आला नाही…
खूप काही असून ते तसे विस्मृतीतच गेले… ते का? याचं ढोबळ मूल्यमापन केलं मनाशी… स्वस्थ झालो आपल्या मार्गावर… जैसे थे राहिलं नातं…
वय वाढत जातं तशी भिडस्त माणसं आणखी आणखी आत्मकेंद्रित होत जातात?…
मग खुटखुटत रहातं… ते का हे समजत नाही, लहान मुलासारखं… नकळत समजतं… मग संबंध जोडायची धडपड चालू होते… ते रक्तात नसल्यामुळे ती पाहिजे तशी जमत नाही…
आजुबाजूला व्हर्च्युएलिटी वाढलेली… तिथले संबंध हाडामांसाचे वाटतात? असतात?…
गतायुष्यात योगायोगाने मिळालेल्या समूहाची आठवण प्रकर्षाने होते. अनेक प्रकारची नाती तिथे जमली होती हे जाणवतं. सगळं सहज होतं. अनेक तरंगणारी ओंडकी योगायोगाने एकत्र अाली… आपापली वेळ झाल्यावर अलग विलग झाली…
एकटं अपरिहार्य अस्तित्व आणि सोबतीची आस. फुटकळ सोबत असली तरी समूहाच्या सोबतीची आस… सोबत, सोबतच सोबत, सोबतीचं अजीर्ण… मग सोबतीशीचीच झुंज… हेच आयुष्य… रुटिन होणं अाणि ते प्रयत्नपूर्वक तोडत नव्या अनुभवाकडे झेपावणं यात कुठेतरी काही हाती लागत असावं… समृद्धपण?…

परंपरा मराठी कथेची… (संकलन) आश्लेषा दिवाळी अंक २०१४

या वर्षी “आश्लेषा” या दिवाळी अंकात ’परंपरा’ या लेखमालिकेत ’परंपरा मराठी कथेची…’ हा संकलन स्वरुपातील लेख लिहिण्याचा योग आला.
मराठी कथा: उगम आणि विकास, लेखिका: इंदुमती शेवडे, सोमैया पब्लिकेशन प्रा. लि., १९७३, १९८२) हे पुस्तक वाचनात आलं आणि इंदुमती शेवडे यांच्या अभ्यासाने, विश्लेषणाने, लेखनपद्धतीने मला स्वत:ला ही परंपरा साक्षात दृगोचर झाली. हे पुस्तक सध्या प्राप्त नाही. ते पुन:प्रकाशित झाल्यास अनेक अभ्यासकांना त्याचा लाभ मिळेल. तो जरुर मिळावा अशी मनापासून इच्छा आहे. १९८२ साली ह्या पुस्तकाची दुसरी, शेवटची आवृत्ती निघाली असावी. साधारण या कालखंडापर्यंतच या पुस्तकात विश्लेषण उपलब्ध आहे. त्यापुढेही मराठी कथेची परंपरा आजतागायत कायम आहे. या पुढच्या प्रवासाबाबतचं विश्लेषण मला स्वत:ला अभ्यासायला आवडेल. जाणकारांनी जरुर मार्गदर्शन करावे…
सर्वसामान्य वाचकांना या परंपरेबद्दल थोडक्यात माहिती उपलब्ध होईल या हेतूने या पुस्तकातील लेखनाचं संकलन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात काही त्रुटी असतील तर जाणकारांंनी त्या दुरुस्त कराव्यात ही नम्र विनंती… 
सदर लेख आंतरजालीय वाचकांसाठी इथे उपलब्ध करुन देत आहे…


                          परंपरा: मराठी कथेची…          
उगम: 

मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली? ह्या प्रश्नाचं निश्चित उत्तर आजतागायत देता आलेलं नसलं तरी मराठी कथन परंपरेचा मागोवा घेताना अभ्यासकांना एका निश्चित दिशेने मार्गक्रमण करता आलेलं आहे. अर्थात एखाद्या भाषेची उत्पत्ती आणि एखाद्या भाषेतल्या एका विशेषाची परंपरा या दोन वेगळ्या अभ्यास दिशा होत.
कथन, निवेदन ही माणसाची उपजत प्रवृत्ती असल्याने कथन परंपरा हे कुठल्याही भाषेचे ठळक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. वेगवेगळे घाट लेवून, वेगवेगळे वाङमयप्रकार बनून ही कथन परंपरा फोफावली. कालाबरोबर या वाङमयप्रकारांमधे परिवर्तन होत गेलेलं दिसतं. नवे वाङमयप्रकारही या प्रवासात जन्माला आलेले दिसतात.
मराठी वाङमय इतिहासात प्राचीन, अव्वल इंग्रजी, आधुनिक अशा राजकीयघडामोडींवर आधारित कालखंडांमधून जाताना ही कथन परंपरा जशी अभ्यासली गेली तशीच ती नियतकालिकांच्या प्रसिद्धिकालानुसार करमणूक कालखंड, मनोरंजन कालखंड अशा टप्प्यांतही अभ्यासली गेली आहे.
संस्कृत भाषेचा प्राचीन मराठी भाषेवर चांगलाच प्रभाव राहिलेला आहे. अव्वल इंग्रजी काळात मराठी गद्याला निश्चित स्वरुप प्राप्त झालं असं म्हटलं जातं. मूळ भारतीय साहित्य परंपरा काव्याची. पाश्चात्य परंपरेतील बदलाचा परिणाम सर्वत्र झाला तसा तो वेळोवेळी मराठी साहित्यावरही झालेला दिसतो.
दुसर्‍या महायुध्दात झालेला प्रचंड संहार आणि त्यानंतरची अखिल मानवजातीची विशिष्ट मनोवस्था, त्यामुळे निर्माण झालेली विशिष्ट विचारसरणी ह्याचा निश्चित प्रभाव जागतिक साहित्यावर पडला. भारतीय साहित्यही याला अपवादराहिले नाही.
आदिकालापासूनच मानवाला आपले अनुभव, कल्पना, मनोगत सहजसोप्या रितीने सांगण्यासाठी कथेसारखं सुटसुटीत, लघु व लवचिक असं संपर्क माध्यम उचित असल्याचं जाणवलेलं दिसतं. ही संपर्काची, संप्रेषणाची मौखिक अवस्था होती. देवकथा, नीतिकथा, प्राणिकथा, लोककथा इत्यादी अनेक कथाप्रकारांचा उगम या अवस्थेत झाला. कथा या वाङमयप्रकाराचा आवाका हा या प्राथमिक अवस्थेतच प्रचंड असल्याचं दिसतं. इथेच कथेच्या लोकप्रियतेची बीजं आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात आणि तिच्या अस्तित्वाच्या अबाधिततेचीही कल्पना येते.
मराठी साहित्याची आद्‍य परंपरा ही काव्याची राहिली आहे.
वेदपुराणे, रामायण, महाभारत ही आर्ष महाकाव्ये किंवा आकर ग्रंथ हे आदिकालातलं भारतीय कथनसाहित्य. त्याच्या या स्वरुपावरुनच भारतीयांनी कथेची धर्माचाराशी घातलेली सांगड स्पष्ट होते. भाविकतेने सांगितलेली बोधरुप दृष्टांतवजा कथा ही भारतीय कथेची प्रथमावस्था. ह्या कथा वेदपुराणे आणि आकर ग्रंथ यावर आधारित होत्या. स्वतंत्र नव्हत्या.
मौखिकतेकडून ग्रांथिकतेकडे येणारा भारत हा आद्य देश आहे. भारताने प्राणिकथा, नीतिकथा, अद्भुतकता यांना सर्वप्रथम ग्रंथबद्ध केलं.
भारतीय कथेनं स्वत:चं स्वतंत्र रुप घेतलं ते बौद्धजातके, जैनचूर्णी, पंचतंत्र, कथासरित्सागर, वेताळपंचविशी, सिंहासनबत्तिशी या स्वरुपात. नीतितत्व सांगणं या अवस्थेत महत्वाचं ठरत असलेलं दिसतं.
या पुढच्या अवस्थेत नीतिकथांमधल्या बोध आणि मनोरंजन यातील बोध मागे पडून अद्भुताकडे कल वाढलेला दिसतो.
पारंपारिक अद्भुततेला ललित वाङमयाचा घाट देण्याचा प्रयत्न पुढच्या अवस्थेत झाला. उदा. बाणभट्टाची कादंबरी‘, दंडीचे दशकुमारचरित्र‘.
संस्कृत साहित्य संपन्न होत असताना दुसरीकडे प्रादेशिक भाषाही विस्तार पावू लागलेल्या होत्या.
प्रादेशिक भाषांमधील लोककथा भांडारावरच वेदकाळापासून संस्कृत साहित्य संपन्न होत आलं होतं.
मराठी कथा ग्रंथबद्ध होण्याआधी मौखिक रुपाने लोककथांच्या रुपाने अस्तित्वात होती तेव्हा ह्या लोककथा हे मराठी कथा परंपरेचे उगमस्थान होय.

विविधता
कथा वाङमयाचा लोककथा हा उगमच विविधतेने नटलेला होता. व्रते, सणवार, वारांच्या कहाण्या असा स्त्रियांनी रचलेल्या, पिढ्यानुपिढ्या सांगितलेल्या कथांचा ठेवा यात होता. आजीने नातवंडांना सांगितलेल्या काऊचिऊच्या, भुताखेतांच्या गोष्टी, आटपाटनगराच्या राजाराणींच्या कहाण्या होत्या. संसारी स्त्रियांना बोध देणारे, धार्मिक संस्कार घडवणारे हे वाङमय होते. उदा. पंचकन्यांच्या गोष्टी, हरतालिका, वटसावित्री, वारांच्या कहाण्या, सोळा सोमवारांच्या कहाण्या इत्यादी.
दुसरा प्रकार चावडी, वडाचा पार, बाजारठाणी इथे अशिक्षित बहुजन गावकर्‍यांनी सांगितलेल्या कथांचा. यात चातुर्य, बोध, अद्भुत, साहस यांचा समावेश असे.
अर्धशिक्षित वरच्या समाजासाठी कथाकीर्तने, पुराणे धर्माचाराची शिकवण देण्यासाठी योजलेल्या असत. यातही लोककथांचा समावेश असे.
कहाण्या, गोष्टी सांगणारा धंदेवाईक कथाकार- भाट, कथ्ये हे वेदकाळातल्या सूत परंपरेचे अवशेष पूर्वजांच्या, हयात शूरवीरांच्या पराक्रमांच्या कथा सांगत असत.
याशिवाय वेदकाळापासूनच्या दैवतकथा, सृष्टी-मानव उत्पत्तिकथा, नक्षत्रकथा, प्राणिकथा, दंतकथा, यक्षकिन्नर, राक्षसपर्‍या यांच्या अद्भुतकथाही निर्माण झाल्या.
मराठी कथेची गंगोत्रीच किती समृद्ध होती याची यावरून कल्पना येते. हे वाङमय मौखिक होतं, पिढ्यानुपिढ्या त्यात भर पडत होती, नवे साज त्यावर चढवले जात होते.

लिखित वाङमयाचा उदय
ज्ञात इतिहासाप्रमाणे पहिलं लिखित कथा वाङमय म्हणून महानुभाव संप्रदायातल्या लीळाचरित्रया ग्रंथाला मानलं जातं. महानुभाव गद्य हे मराठी भाषेतलं पहिलं गद्य मानलं जातं. महिंद्र व्यास अर्थात म्हाईंभट्ट यानं आपल्या महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधरस्वामी यांच्या जीवनातील काही प्रसंग- लीला कथा रुपाने सांगितल्या आहेत.
हा मध्ययुगीन कालखंडातला राजकीयदृष्ट्या यादवकाल म्हणून ओळखला जातो. पूर्वार्ध मुकुंदराज, ज्ञानेश्वर यांच्या विवेकसिंधू व ज्ञानेश्वरी अशा प्रसिद्ध पद्य रचनांचा हा काल होय.
पुढे केशव व्यास या महानुभावपंथी लेखकाने दृष्टांत पाठांतपंथाचं तत्वज्ञान विशद करताना चक्रधरांचे अनेक दृष्टांत एकत्र केले. काठियाचा दृष्टांत, आधारिये परसूचा दृष्टांत, जात्यंध आणि हत्ती या छोट्या गोष्टी आपल्या चांगल्याच परिचयाच्या आहेत. हे दृष्टांत रचनेच्या दृष्टीने कथेच्या जवळ जातात. स्वतंत्र कथा लिहिणं हा त्यांचा हेतू नाही.
मध्ययुगीन काळातल्या कथांमधे अद्भुत, चमत्कृती, मनोरंजन, बोध यांचं कमीअधिक प्रमाणातलं मिश्रण आढळतं.
कथेचा आकार किंवा घाट
कहाणी ही लिखित स्वरुपात येताना तिला कलात्मक घाट देण्याचे प्रयत्न झाले आणि कहाणीची गोष्ट बनली. कहाणीत नायक नायिका, त्यांच्या भोवताली घटनांची कालानुक्रमे मांडणी, सुष्ट विरूद्ध दुष्ट असा संघर्ष, धीरोदात्त नायक, रुपगुणसौंदर्याची खाण असलेली नायिका, अचाट,अफाट संकटांची मालिका आणि अखेरीस दुष्टांचे पारिपत्य, सुष्टांचा विजय ही या गोष्टीची प्रमुख अंगे.
गोष्टीत कहाणीची मूलभूत अंगे पण आता घटना कार्यकारणसंबंधाने जुळवलेल्या असं ही एक रुप पुढे आलं. यात निसर्गवर्णने, संवाद भाष्ये होती. अनेक कथांना जोडून साखळीकथा लिहिण्याचे पंचतंत्र किंवा अरेबियन नाईट्ससारखे प्रयोगही झाले.
मौखिक, लिखित आणि त्यानंतरचा टप्पा मुद्रित साहित्याचा होता. मध्ययुगीन कथा मौखिकते कडून लिखित स्वरुपाकडे वळली त्यामुळे तीत बदल झाला पण वाचकांची संख्या मर्यादित असल्यामुळे तिचं मुख्य प्रयोजन कथन- श्रवण असंच राहिलं. त्यामुळे कथा लिखित बनली खरी पण ती वाचनीय न होता श्रवणीयच राहिली. साखळीकथा स्वरुपाच्या या वाङमयातल्या कथा या पात्रांना सांगितलेल्या कथा आहेत. कथन- श्रवण ह्या रुढ कल्पनेतून वाचनीयतेच्या टप्प्याकडे यायला मराठी कथेला बराच अवधी लागला.
नवे वळण: पाश्‍चात्य कथेचा संपर्क
अव्वल इंग्रजी कालखंडात (इ.स.१८०० ते १८८५) मराठी कथेच्या स्वरुपात अमुलाग्र बदल झाला. पद्याचा वारसा, संस्कृत कथेचा वारसा किंवा मराठी लोककथांचा वारसा यांच्या प्रभावाऐवजी पाश्चात्य कथेच्या संपर्काने मराठी कथेने नवे वळण घेतले. स्वतंत्र मराठी कथा निर्माण व्हायला अर्थातच अवधी लागला. अव्वल इंग्रजी काळात मराठी गद्याचा विकास होत होता. भाषांतरित वाङमयाचा आधार घेणं अपरिहार्य होतं. इंग्रजी, पर्शियन आणि संस्कृत ह्या भाषांतून हे वाङमय मराठीत आलं. सरकारी प्रयत्नातून निर्माण झालेलं बाल्यावस्थेतला बोध देणारं वाङमय, ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मप्रसारार्थ लिहिलेलं वाङमय आणि लोकांची स्वतंत्र रचना या तीन दिशांनी या काळातलं वाङमय प्रसूत झालेलं दिसतं. नीतीपाठ असं या साहित्याचं स्वरुप होतं. एका बाजूला सुरस आणि चमत्कारिक साहित्य प्रसवलं जात होतंच.
या काळात रा.ब. मोरोबा कान्होबा विजयकर यांनी लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या ग्रंथाची स्वतंत्र लेखनाचा पहिला प्रयत्न अशी नोंद झालेली आढळते
हरि नारायण आपटे
लोकहितवादींची शतपत्रे आणि त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला यांनी मराठी गद्याला त्याचं स्वत:चं स्वरुप प्राप्त करुन दिलं.
दरम्यानच्या काळात एत्तदेशीय संस्कृती आणि परकीय संस्कृती यांची अपूर्व अशी घुसळण झालेली दिसते. या दोन पराकोटीच्या भिन्न संस्कृती होत्या. जगभर जेत्यांची संस्कृती ही जित्यांवर हावी राहिलेली दिसते. एतद्देशीय संस्कृती विकल झाली खरी पण स्थित्यंतराची अभूतपूर्व प्रक्रिया चालू झाली. भारतीयांच्या परंपरागत दृष्टिकोनाविरुद्ध इंग्रजांचा आधुनिक, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण उभा होता. निबंधमालाकारांनी दोन्ही दृष्टिकोनांची मीमांसा करून एक निश्चित दिशा प्राप्त करुन दिली.
इंग्रजांच्या सुधारणासत्रामधे राजकीय सुधारणा, शैक्षणिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणांवर भर होता आणि आपला पक्का अंमल बसवण्यांचं त्यांचं ध्येय होतं. स्थित्यंतरामधे या सुधारणांना मुख्य स्थान होतं.
पाश्चात्य संस्कृतीची श्रेष्ठता पटून दिपून जाणं, आपल्या संस्कृतीचं प्रतिगामित्व जाणवणं यात म्हणजे अनुकरण आणि स्वदोषदर्शन यात बराच काळ गेला.
या काळात महाराष्ट्रात सुधारकांच्या तीन पिढ्या निर्माण झाल्या. त्यांचे धुरीण पुढीलप्रमाणे होते. पहिली पिढी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, दादोबा, बाबा पद्मनजी, लोकहितवादी अशी होती. दुसर्‍या पिढीत न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, मोडक, पंडित होते आणि तिसर्‍या पिढीत चिपळूणकर, आगरकर, टिळक होते.  
या चिपळूणकर, आगरकर आणि टिळकांच्या काळात महाराष्ट्र पत्रकारिता, समाजसुधारणा आणि राजकारण यांत अग्रेसर राहिल्याचं दिसतं.
मराठी कथेचे जनक ज्याना म्हटलं जातं ते स्फुट गोष्टी लिहिणारे हरि नारायण आपटे यांच्या आयुष्यावर वरील तिन्ही व्यक्तिमत्वांचा प्रभाव तर राहिलाच पण या ना त्या कारणाने प्रत्यक्ष संबंधही आला होता. हे अध्वर्यू, हरिभाऊ ज्या गोविंदराव- काशीबाई कानेटकर दांपत्याकडे वाढले त्या श्री कानेटकरांचा मिल्ल आणि स्पेन्सर प्रणीत स्वतंत्रतावाद, सुधारणावाद यांचा अभ्यास आणि त्याचा त्यांच्यावरचा प्रभाव, हरिभाऊंचं स्वत:चं व्यक्तिमत्व यातून हरिभाऊ आपटे यांचं साहित्य आकाराला आलेलं दिसतं.
१८८६-१९१५ या मनोरंजन- निबंधचंद्रिका व करमणूक कालखंडात अर्वाचीन कथा निर्मितीला खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला. या कथेची सुरवात हरिभाऊ आपट्यांच्या करमणूक मासिकातील स्फुट गोष्टींनी झाला. ही रचना त्यानी केली ती मुख्यत: करमणूक मासिकाच्या संपादकीय भूमिकेवरून वाचकांना शक्य तेवढ्या विविध मजकुराचा पुरवठा करण्यासाठी. कादंबरीलेखनाला त्यानी प्रथम स्थान दिलं. पाडव्याला भेट, थोड्या चुकीचा घोर परिणाम, काळ तर मोठा कठीण आला यांसारख्या सहा दीर्घ कथा, खरी की खोटी, कसे दिवस गेले सारख्या रहस्यकथा; तीन ऐतिहासिक, डिस्पेप्शिया, खाशी तोड सारख्या विनोदी तसंच काही कुमार वाचकांसाठी असाव्या अशा आणि एकूण पंचवीस कथांपैकी बाकीच्या सामाजिक कथा असं विविध कथा वाङमय प्रामुख्याने हरिभाऊंच्या नावावर आढळतं.
पुण्यातील ब्राह्मणी सुशिक्षित वाचक हा त्यावेळचा मोठ्यात मोठा वाचकवर्ग होता. या वर्गातील सामान्य माणसे, त्यांच्या जीवनातील सुखदु:खाचे प्रसंग हा हरिभाऊंच्या कथांचा मुख्य विषय होता. त्यांच्या कथासृष्टीत अत्यंत सुष्ट आणि अत्यंत दुष्ट अशी पात्रांची विभागणी आढळते. नायकनायिका, खलनायक, मदत करणारा भाऊ किंवा मित्र; अडचणी, संकटे, हृदयपरिवर्तने आणि सुखान्त अशी सर्वसाधारण रचनाही आढळते. प्रवचन दोष, पाल्हाळीकता हे दोष आढळतात.
हे जमेस धरुनही त्यानंतर बर्‍याच काळाने जन्माला आलेल्या लघुकथेचा पाया त्यानी घातला. डिस्पेप्शिया सारख्या कथांचे स्वरुप आधुनिक लघुकथेशी जवळीक सांगणारे आहे. अरेबियन नाईट्सच्या अद्भूतरम्यतेतून कथेला जीवनोन्मुख बनवण्याचं श्रेय त्यांच्याकडे जाते. हरिभाऊंमुळे मराठी कथा पहिल्यांदाच भोवतालच्या वातावरणाबद्दल बोलायला लागली.      
हरिभाऊनी कथेला रचनेची देणगी दिली. स्वत:चे अनुभव सांगता येतील इतके सामर्थ्य आणि आकार दिला. पूर्वीची बालबोधार्थ नीतिशिकवण जाऊन विशिष्ट सुधारणा, विचारजागृती यांचं भान कथा आता निर्माण करु लागल्या. सोपी आणि ओघवती भाषा ही हरिभाऊंनी कथेला दिलेली आणखी एक देणगी. हरिभाऊंनी एक वाचकवर्ग निर्माण केला. विशेषत: स्त्रियांमधे वाचनाची आवड निर्माण केली.
काशीबाई कानेटकर ह्या मराठीतील पहिल्या कथालेखिका. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांच्या व पतीच्या आग्रहामुळेच त्या शिकल्या आणि घरात यासाठी शिक्षा मिळूनही वाचन, लेखन करुन त्यांचे चांदण्यातील गप्पा आणि शिळोप्याच्या गोष्टी हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले पण हरिभाऊंच्या कथांमधील जीवनाभिमुखता त्यांच्या कथात दिसत नाही. अद्भुतरम्यता व मध्ययुगीन लेखनशैलीचा प्रभावच जाणवतो.
कुटुंबमालाकार सहकारी कृष्ण हे या काळातील आणखी एक महत्वाचे लेखक. करमणुकीचा आश्रय न घेता, काल्पनिकता न आणता समाजाचे चित्र जसे आहे तसे देण्यामुळे, उपदेशकाची भूमिका घेतल्यामुळे आणि त्याच वेळी हरिभाऊंच्या ऐन काळातील सुधारणांची निकड कमी झाल्यामुळे त्या प्रभावी वाटत नाही.
यानंतरचा इ.स.१९१५ ते १९२५ हा काळ का. र. मित्र यांच्या मासिक मनोरंजनाचा. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता हे ब्रीदवाक्य. संपूर्ण सचित्र गोष्ट, पहिला कविता- कथा विशेषांक असे उपक्रम मनोरंजन मासिकाने राबवले. हरिभाऊंनी जन्म देऊन कथेला रांगती केली तिला मनोरंजनाने उभी केली. परभाषीय कथाकल्पनांनी तिला पुष्ट केले, रंगरुप व आकार दिला. वेगळे अस्तित्व असलेला स्वतंत्र्य वामयप्रकार म्हणून कथा मान्यता पावली.
हरिभाऊंच्या काळातील सामाजिक आशयाचा या काळातील प्रवाह नारायण हरि आपटे, आनंदीबाई शिर्के, वा.ना.देशपांडे यांनी पुढे चालू ठेवला. ऐतिहासिक आणि रहस्यकथांचा त्यांचा वारसा ना.ह. आपटे यांनी चालवला. रंजनवादी, कल्पनारम्य, गुंतागुंतीची, रहस्यपूर्ण कथानके यांचा अंतर्भाव असलेला प्रेमकथा हा नवा कथाप्रवाह वि.सी.गुर्जर व गोखले यांनी प्रस्थापित केला. यात सामाजिक आशयाचा प्रवाह मागे पडून प्रणयकथा प्रबळ ठरल्या. मनोरंजनाचे एक संपादक वि.सी. गुर्जर यांच्याकडे या काळातील कथेचे प्रमुखत्व व कथा या वामयप्रकाराला लोकप्रिय करण्याचे श्रेय गेले. सामाजिक चळवळींची धार आता बोथट बनत चालली आणि हरिभाऊंच्या ताकदीचे लेखक निपजले नाहीत.
टिळकयुग समाप्त होऊन राजकारणाचं केंद्र महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे इथले राजकारण, समाजकारण मंदावले आणि साहित्याकडे, त्याच्या स्वरूपाकडे या काळाचे लक्ष वेधले. वाङमयाच्या अंतरंग, बहिरंगाची चिकित्सा सुरू झाली.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा हा काळ. त्यानी स्वतंत्र, नवलपूर्ण कथानके, गीतांच्या मोहक चाली, कोटिबाज विनोद असलेल्या लोकप्रिय नाटकांबरोबर विनोद आणि समीक्षा ही दोन क्षेत्रेही गाजवली. ते मनोरंजनाचे खास लेखक, सल्लागार होते. त्यांचा प्रचंड दबदबा होता. पुढच्या काळातील अनेक लेखकांनी त्याना आपल्या गुरुस्थानी मानलं. साहित्यसम्राट अशी पदवी लाभलेले तात्यासाहेब उर्फ न.चिं. केळकर आणि कोल्हटकर यांनी या काळात कलावादाचा पुरस्कार केला.
वामन मल्हार जोशी या कादंबरीकाराचा नवपुष्पकरंडक हा कथासंग्रह याच काळातला. त्यांची कथा हरिभाऊंच्या कौटुंबिकतेतून बाहेर पडली. वा.म. जोशांचा अभिप्रेत वाचकवर्ग व्युत्पन्न, बुद्धिनिष्ठ, शिक्षणाने अंतर्मुख झालेला होता. त्यांच्या आवडीच्या तत्व-चर्चा, प्रश्न वामंच्या कथेत आले.
शि.म. परांजपे आणि केळकर यांनी राजकीय कथा लिहिल्या. आनंदीबाई शिर्के या काळातल्या प्रधान स्त्रीलेखिका. निव्वळ विनोदी कथा या काळात कॅप्टन गो.गं. लिमये यांनी विकसित केली.
दिवाकर कृष्ण या लेखकाचा उदय ही या काळातल्या कलाहीन, कृत्रिम, उथळ, आत्मप्रत्ययशून्य कथेच्या पसार्‍यातली अत्यंत महत्वाची घटना ठरली. मात्र ही कथा अल्पकाळ राहिली. ही उत्कट अनुभूतीतून निघालेली होती. सामाजिक सुधारणा, उद्बोधन, मनोविनोदन या कुठल्याही तत्कालीन हेतूंसाठी ती अवतरली नाही. श्रवणीय गोष्ट त्यानी वाचनीय लघुकथा केली. पूर्वीची बहिर्मुख कथा त्यांनी अंतर्मुख केली. गोष्ट सांगण्यापेक्षा अनुभव सांगणे महत्वाचे ठरले. नाजूक भावनांचे चित्रण, काव्यात्मकता, वातावरणनिर्मिती, सूचकता, नेमकी भाषा हे त्यांच्या कथांचे विशेष. मृणालिनीचे लावण्य या त्यांच्या एकाच प्रातिनिधिक कथेत एकच एक भावना फुलवणारे वातावरण, अनुरुप प्रसंगाची निवड, नेमकी शब्दयोजना, सूचकता, आवश्यक तेवढ्याच पात्रांची निवड, कथानकाला एकदम हात घालणारी सुरुवात व परिणामकारक शेवट या विशेषांनी त्यांनी कथेत उत्क्रांती केल्याचं लक्षात येतं.
निराशावादी पिंड, करुण रसात भिजलेल्या, एकसुरी, एकरंगी कथा, अतिशय हळव्या, भावनाप्रधान, ध्येयवादी पण दुबळ्या व व्यवहारी जगाला तोंड न देता आल्यामुळे आतल्या आत कुढणार्‍या नायकनायिका हे त्यांच्या कथांचे अन्य महत्वाचे विशेष होते.
१९२६ ते १९४५ हा पुढचा कालखंड यशवंत- किर्लोस्कर या मासिकांचा. हा कालखंड लघुकथेच्या आत्यंतिक भरभराटीचा कालखंड. कथेचा चहुअंगाने विकास होऊन कथेला लोकप्रियता आणि इतर वाङ्मयप्रकारांच्या बरोबरीचेच नाही तर वरचे स्थान मिळाले.
हरिभाऊंचा सुधारणावाद आणि कवि केशवसुतांचा मानवतावाद यांच्याशी जुळणारे गांधीवाद आणि मार्क्सवाद हे दोन प्रवाह या काळात समाजजीवनात येऊन मिळाले. एकिकडे हे दोन ध्येयवाद आणि दुसरीकडे सुबत्‍तेमुळे आलेला सुखवाद आणि कुटुंबसंस्था, विवाहसंस्था, जुनी मूल्ये यांच्यावर घाला घालणारा, स्वैराचाराच्या दिशेने नेणारा व्यक्तिकेंद्रित नवमतवाद अशा दोन प्रवृत्ती या काळात दिसून येतात. सावरकर-केतकर, फडके-खांडेकर, पु.य. देशपांडे-माडखोलकर, अत्रे-वरेरकर हे या काळातील लेखक तत्कालीन राजकीय, सामाजिक चळवळींशी कमीजास्त प्रमाणात संबंधित राहिले त्यामुळे या नव्या जाणिवांचे चित्रण होऊ लागले.
पाश्चात्य देशात यावेळी कथा तंत्रयुग अवतरले होते आणि त्याचे अनुकरण होऊन कथेच्या शरीराचा, तंत्राचा अभ्यास सुरु झाला. या काळाचे एक अध्वर्यू ना.सि. फडके यांनी प्रतिभासाधन या ग्रंथातून तो मांडला. कथेचा तांत्रिक विकास, विपुल निर्मिती, बदलता आशय, नव्या जाणिवा इतर वाङमयप्रकारांपेक्षा तिची वाढती लोकप्रियता यामुळे या काळाला लघुकथा कालखंड म्हटले जाते.
मनोरंजन कालखंडाच्या अखेरीस दिवाकर कृष्णांच्या कथेने मराठी कथेला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला पण या कथेचा मागोवा न घेता स्वतंत्रपणे आपापली वाट चोखाळत कथेचा महत्वपूर्ण विकास करण्याचे कार्य फडके आणि खांडेकर या जोडीने या काळात केले.
फडक्यांचा तंत्रविचार आणि त्यांच्या कथांना मिळालेली अमाप लोकप्रियता हा या काळाचा विशेष. प्रेम हा त्यांच्या कथेतला स्थायीभाव. आकर्षक आरंभ, गुंतागुंत, निरगाठ, उकल, कलाटणी या ठराविक साच्यात त्यांच्या कथा बसवलेल्या आहेत. तंत्र हे फडक्यांच्या कथेत हावी होते आणि पात्रे निर्जीव होतात. प्रसंग ओढूनताणून आणलेले वाटतात. केवळ घटकाभर मनोरंजन, आकर्षक शैली, कथानकप्रधानता, बंदिस्त रचना, प्रणयमृदुल संवाद, लालित्यपूर्ण साधी भाषा, माफक विनोद हे फडक्यांच्या कथेचे विशेष. आधीच्या गुर्जरीय कथेची प्रकृती, तिचीच आधिक विकसित व तंत्रशुद्ध आवृत्ती हे तिचे स्वरुप. चमत्कृती, रहस्य साधण्यासाठी अपघात, रहस्ये, योगायोग ही साधने ते वापरतात. भावनांची सखोलता, अनुभवाची उत्कटता, तीव्र संघर्ष यांचा सर्वसाधारणपणे अभव जाणवतो. कलावादी भूमिका स्वीकारल्यामुळे लालित्य हा कलेचा प्राण मानला आणि रंजकतेवर भर दिला. आशयापेक्षा आकार आणि काय सांगावे यापेक्षा कसे सांगावे यांवर भर दिला. पण त्यांच्या तंत्रवादाने आधीच्या भरकटणार्‍या कथेला आखीव कसे बनवायचे हे सांगितले. चमत्कृतीत रमणार्‍या भाषेचा अलंकरणाचा सोस काढून तिच्यात लालित्य, डौल, नेमक्या शब्दात आशय मांडण्याचे सामार्थ्य भाषेला त्यानी दिले.
तत्कालीन सामाजिक प्रवाहांशी, प्रश्नांशी नाते जोडणारी खांडेकरांची कथा ही फडक्यांच्या कथेपेक्षा संपूर्ण भिन्न प्रकारची होती. रुपककथा हा नवा कथाप्रकार त्यानी मराठीत प्रथम आणला. या कालखंडातील लघुकथासृष्टीवर खांडेकरांचे साम्राज्य होते असे मानले जाते.
पूर्ववयातील कल्पनारम्य, शब्दनिष्ठ व समाजविन्मुख अशा कोल्हटकर-गडकरी संप्रदायाचे अती खोल संस्कार एकिकडे, दुसरीकडे हरिभाऊंची जीवनदर्शी दृष्टी व आगरकरांची ध्येयनिष्ठा आणि सभोवतालचे प्रत्यक्ष जीवन या सर्वांतून निर्माण झालेली नवी सामाजिक जाणीव या परस्परविरुद्ध द्विधृवात्मक गोष्टींनी खांडेकरांचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व तयार झालं. वास्तव विषयांचा आविष्कार मात्र ते कल्पनारम्य करतात. चित्रण कल्पनानिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ होते, त्यात अनुभवनिष्ठता व प्रत्ययकारकता येत नाही. कोटिबाजपणा व अलंकारांची आवड आहे पण जीवनविन्मुखता नाही, काव्यात्मकता, लालित्य आहे पण रेखीवपणा, एकात्मकता नाही, विषयाची विविधता, संवादचातुर्य, सजावट आहे पण बांधीवपणा, एकसंधपणा नाही अशा स्वरूपाची खांडेकरांची कथा त्यावेळी फडक्यांच्या कथांच्या लोकप्रियतेवर मात करुन होती असं म्हटलं जातं. त्यानी मनोरंजन कालातील कथेला चांगलेच विकसीत केले.
संपूर्णता देश्य, जगाचा अनुभव उत्कटपणे घेणार्‍या कथाकाराने जिव्हाळ्याच्या पालखीत बसून लिहिलेली कथा असं ज्यांच्या कथेचं वर्णन करण्यात येतं त्या य.गो. जोशांची कथा जातिवंत अनुभवावर आधारित होती. कारागिरीला, कृत्रिमतेला महत्व देणार्‍या फडके-खांडेकरांच्या काळात ती उठून दिसली. पण तंत्राबद्दलचा तिटकारा, सर्वच नव्या गोष्टी वर्ज्य मानणं यामुळे त्यानी आपल्या कथेवर मर्यादा घालून घेतल्या.
अनंत काणेकरांच्या १९३२ नंतरच्या कथा त्यांच्यावर समाजवादी विचारणीचा प्रभाव झाल्यामुळे  पूर्वीच्या अद्भुतरम्यता, विस्कळीतपणा, शब्दांची आतषबाजी हे विशेष जाऊन परिणामकारक झालेल्या आढळतात. मानवि जीवनातील विसंगती, विरोध विदारक पद्धतीने दिव्याखाली अंधेर या संग्रहात येतात.
समाजशास्त्रज्ञ श्री.म. माटे, राजकारण क्षेत्रातले ना.ग. गोरे, नाटककार कादंबरीकार भा.वि. वरेरकर यांनी त्यांच्या निष्ठेबरहुकम सकस कथालेखन या कालात केलेले आढळते.
याच कालखंडात १९३०-३५ मधे प्रादेशिक कथा ही आणखी एक दिशा मराठी कथेला मिळाली. काहीतरी निराळे लिहिण्याची हौस, अस्सल जीवनाशी आलेला संपर्क, ग्रामोद्धाराच्या चळवळीने लोकांचे ग्रामीण जीवनाकडे वेधलेले लक्ष हे घटक या दिशेपाठीमागे होते.
बी. रघुनाथांनी मराठवाड्यातील निजाम कालातली खरीखुरी अस्सल माणसे रंगवली. अर्थ व काम ह्या मूलभूत प्रेरणांचं प्रभावी दर्शन त्यांच्या कथांत दिसते. तंत्राबाबत ते य.गो. प्रमाणेच बंडखोर आहेत. तंत्राची उपेक्षा केल्यामुळे मात्र त्यांची कथा सैल बांधणीची, भाष्यांनी डागाळलेली व निवेदनपर आहे. या प्रांतात त्याना मानाचे स्थान आहे. लक्ष्मणराव सरदेसाई, सुखटणकर ह्या जोडीने गोमंतकीय जीवन उभे केले.      
या कालात लेखिकाही समर्थपणे उभ्या राहिलेल्या दिसतात. शांताबाई नाशिककर, कुमुदिनी रांगणेकर, पिरोज आनंदकर, आनंदीबाई जयवंत, कमलाबाई बंबेवाले, मालतीबाई दांडेकर, रेखीव, सुटसुटीत पण भाषेचा बोजडपणा असणार्‍या कमलाबाई टिळक, पांढरपेश्या जीवनातून कथेला बाहेर काढून कामकरी, कोष्टी, कोळी, मुसलमान, खालच्या व परक्या स्तरांतील लोकांच्या कथा लिहिणार्‍या क्षमा राव, स्त्रीमनातील सूक्ष्म आंदोलने टिपणार्‍या कृष्णाबाई, अतिशय धीट व काहीश्या बंडखोर वृत्तीने लिहिणार्‍या, कळ्यांचे नि:श्वास या त्यावेळी गाजलेल्या कथासंग्रहाच्या लेखिका विभावरी शिरुरकर, गीता साने, सुमती क्षेत्रमाडे या लेखिकांची मालिकाच या कालात निर्माण झाली.
या कालखंडाचे पहिले दशक संपण्याआधीच लघुकथेचे अमाप पीक निघू लागले त्यात कथाकारांची दुसरी पिढीही सामील झाली. रचनाकौशल्य, मानवी स्वभावाचे मर्म जाणण्याची वृत्ती, ताशिव रचना, एकसूत्रीपणा, अनपेक्षित कलाटणी ही वैशिष्ट्ये असलेले दौंडकर-मांजरेकर, खालच्या स्तरांतील लोकांत रमणारे सामंत उर्फ कुमार रघुवीर, शिक्षण क्षेत्रावर कथालेखन करणारे पुनर्वसु, कोकण व मध्य महाराष्ट्राच्या प्रादेशिक जीवनावर लिहिणारे र.वा. दिघे व ग.ल. ठोकळ, विनोदी कथा प्रचंड लोकप्रिय करणारे चिं.वि. जोशी, शामराव ओक आणि प्र.के. अत्रे असे हे लेखक होते.
अशा बहुअंगी, बहुरंगी समृद्धीतही १९४० च्या आसपास एक प्रकारचा तोचतोपणा, कृत्रिमता आली होती. या आकृतीसौंदर्याच्या रिंगणातून बाहेर काढून तिला नवे वळण दिले काव्यात्मकता, सामाजिकता, अंतर्मुखता, सूचकता ल्यालेली सुटसुटीत, दोन पानांतही मावणारी, प्रौढ दृष्टीचे लेणे देणारी, व्यक्तिची दु:खे मांडणारी पण अल्प प्रमाणातली कथा लिहिणार्‍या कुसुमावती देशपांडे आणि विपुल लिहिणारे, कुसुमावतींप्रमाणेच कथानकापेक्षा भाववृत्तीला प्राधान्य देणारे पण वस्तुनिष्ठतेपेक्षा अत्यंत आत्मपर लिहिणारे, हळवेपणा, रोमॅंटिक स्वप्नाळूपणा जपणारे वामन चोरघडे यांनी. दोघांच्या कथांमागे त्यांचे त्यांचे खास व्यक्तिमत्व उभे आहे.
यशवंत-किर्लोस्कर या लघुकथा कालखंडातील ही कथा संख्यावाढ, तिच्याबरोबर गुणविकास, बदललेल्या समाजजीवनामुळे मिळालेले नवे विषय, विषय-आशयाची विविधता, बहिर्मुखता जाऊन अंतर्मुख जीवनदर्शनाचा प्रत्यय, मनकल्पाबरोबर कायाकल्प, विविध प्रकारांमधे सृजन या गुणविशेषांनी विनटलेली आढळते.
सत्यकथा-अभिरुची कालखंड (१९४५-१९६०)
तंत्रविकासाची वाट संपणे, दुसर्‍या महायुद्धामुळे जग, देश यांमधे उलथापालथ आणि नव्या विचारांचे वारे असे घटक जुळून येऊन सत्यकथा, मौज, अभिरुची, समीक्षक या नियतकालिकांद्वारे या कालखंडाचा जन्म झाला. वा.म. जोशांचे टीकालेख, मर्ढेकरांची नव-समिक्षा यातून नव्या लेखकांची पिढी तयार होती. मराठी साहित्यातले दुसरे युगप्रवर्तन १९४५ साली झाले. पहिले हरिभाऊ-केशवसुत काळातले, दुसरे मर्ढेकर-गाडगीळ काळातले.
फडक्यांनी हिरीरीने पुरस्कृत केलेला कलावाद म्हणजे कारागिरीला कला समजण्याची चूक होती. तंत्र हे पूर्वनियोजन ठरले. दुसरीकडे जीवनवादी समीक्षकांनी जीवनाचाच नव्हे तर विशिष्ट जीवनदृष्टीचा पुरस्कार, प्रचार कलेने-साहित्याने करायला हवा असा दृष्टिकोन मांडला. सौंदर्य हेच वाङमयाचे अंतिम मूल्य, सामाजिक आशय हे वाङमय मूल्य नाही असा अलौकिकवाद मर्ढेकरांनी मांडला आणि उर्वरित दोन्ही समीक्षापद्धतीतेचे दोषदिग्दर्शन केले.
याच सुमारास जागतिक पातळीवर आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत आणि हायसेनबर्गचा क्वांटम सिद्धांत याने न्यूटनच्या यांत्रिक जडविश्वाच्या संकल्पनेला धक्का दिला. वैज्ञानिक नियतीवाद हा न्यूटोनियन भौतिकवाद, व्यवहारवाद, आशावाद, प्रगतिवाद, आदर्श समाजरचनेची स्वप्ने या सगळ्यांचा पाया होता. आईन्स्टाईनच्या सिद्धांताने वास्तवाच्या कल्पनाच बदलून टाकल्या. या संशोधनांचा दूरगामी परिणाम विचारवंतांवर झाला. काळाची जाणिव मनुष्याच्या मनात आहे, बाह्यविश्वाचा अफाट पसारा माणसाच्या तर्कशक्ति व इंद्रिये यांच्या आकलनापलिकडचा आहे हे या सिद्धांतांचे सांगणे होते. सिग्मंड फ्रॉईडच्या सुप्तमनाच्या सिद्धांताने अंतर्विश्वाचे नवे दर्शन घडवले. बर्गसां या फ्रेंच तत्वज्ञाने संपूर्ण काल (भूत-वर्तमान-भविष्य) हा एका वर्तमान क्षणात सामावलेला असतो, लेखकाने क्षणोक्षणि बदलणार्‍या या विचाराची लय अविष्कृत केली पाहिजे असे म्हणणे मांडले.
या संशोधानांनी लेखकाची धारणा, साहित्याचे स्वरुप अमुलाग्र बदलले. सरळ आखलेल्या मार्गाने जाणारे कथानक आता मंदगतीने, वक्राकार व वर्तुळात फिरु लागले. मराठीत प्रथाम गाडगीळ व मग कमल देसाई यांनी याचा वापर केला. कालकल्पनेचा सर्वात अधिक परिणाम भाषेवर होतो. आता भाषेची जडणघडण विस्कटून टाकली. बाह्य घटनांपेक्षा मानसिक घटनांना महत्व येऊन काळ व पैस यांची नवी जाणीव व्यक्त होऊ लागली. फ्रॉईडच्या संशोधनाचं सार हे की अन्नक्षुधा, कामक्षुधेसारख्या मूलप्रवृत्ती या खोल रुजलेल्या असतात. सामाजिक बंधने, संस्कार यांनी त्या काही काल दडपल्या जातील पण त्या सतत माणसाला, समाजजीवनाला पोखरत रहातात. आंद्रे ब्रेतांचा अतिवास्त्ववाद, क्रोशेचा अविष्कारवाद दुसर्‍या महायुद्धात बेचिराख झालेली मानवी मूल्ये या सगळ्यातून मानवी जीवनाची निरर्थकता, हेतूशून्यता सांगणारे वाङमय निर्माण होऊ लागले. मराठीत मर्ढेकर, गाडगीळ, मुक्तिबोध यांच्या लेखनातून या जाणिवांचे प्रथम पडसाद दिसले. गाडगीळ, भावे, गोखले, माडगूळकर हे नवकथाकार या काळाचे शिलेदार होते. पण नव्या जाणिवांचा प्रकर्ष गाडगीळांच्या लेखनात जाणवला. जाणीवपूर्वक, बेडरपणे नवेनवे प्रयोग करून त्यानी कथेच्या रंगरुपाची कल्पनाच बदलून टाकली. भावे, गोखले या नवकथाकारांचा सांधा जुन्या कथेशी जुळतो. धक्का देणारा आशय आणि त्याचा तिरपा आविष्कार हे गाडगीळांचे वैशिष्ट्य. नव्या जाणीवांतून घेतलेल्या नव्या अनुभवांसाठी गाडगीळांनी प्रत्येक अनुभवाला विशिष्ट, स्वाभाविकपणे अपरिहार्य व सुसंवादी अशी अविष्कारपद्धती निवडली. शहरातील सुशिक्षित माणसांच्या मर्यादित परिघात मर्यादित गाडगीळांची कथा या माणसांच्या जीवनाचा एकही कोपरा आपल्या नजरेतून सोडत नाही. भाषाशैलीचा अभाव, आशयनिष्ठा ही गाडगीळांच्या लेखनसाधनेची मूलभूत अंगे. भावानुभावाशी इमान राखताना ते कशाच्याही- भाषेच्याही आहारी जात नाहीत ही त्यांची महत्वाची साधना होय.
गाडगीळ, भावे, गोखले, माडगुळकर

पु.भा. भावे यांनी आपली कथा नव्या कथेच्या नव्या मर्यादांनी जखडली जाण्याचे टाळले. कथानकाचा बडेजाव पण तरीही समर्थ कथानक. आंतरिक घटनांना महत्व देताना बाह्य घटनांचे महत्व ओळखणे, साचेबंद वाटावी अशी घट्ट बंदिस्त रचना, कलाटणीचा वापर, दुर्बोधता टाळण्यावरचा सहज कटाक्ष, वास्तवाचे सुंदर, कुरुप असे सर्वांगीण दर्शन त्यांच्या कथेत दिसते. जीवनाविषयीच्या उदंड उत्साहाने त्यांचे कथाविश्व व्यापक बनते. आत्मनिष्ठेतून येणारी प्रत्ययकारी भाष्ये, उत्कट भावनेतून निर्माण झालेली भाषाशैली, अनुभवांचई तीव्रता, भेदक दृष्टी हे त्यांचे विशेष. प्रेमभावनेच्या पहिल्या अस्फुट आविष्कारापासून ते तिच्या उद्दाम वासनेच्या स्वरुपापर्यंत तिच्या सर्व अवस्था भावे रंगवतात. जगाकडे पहाण्याची वास्तववादी दृष्टी एकिकडे आणि मूळ पिंड भावनाशील ध्येयवादाचा यात त्यांच्या कलाकृतींतील माणसेही विसंवादी व्यक्तित्व धारण करतात. आशयानुसारी तंत्राची सिद्धी त्याना लाभलेली दिसते. भाषासिद्धी हे एक महत्वाचे सामर्थ्य आणि एका दृष्टीने वैगुण्यही म्हणता येते.
अरविंद गोखले यांच्या कथेची प्रकृती सौम्य, संयत आहे, अलिप्तता त्यांच्या लेखनाचा महत्वाचा विशेष त्यामुळे त्याना भाष्यांची गरज पडत नाही, पात्रांशी तन्मयता साधता येते. विशिष्ट भाषाशैली नाही हेच त्यांच्या कथांचे सामर्थ्य बनते. त्यांच्या कथेतील विषयांची, पात्रांची, अनुभवाच्या क्षेत्रांची व पातळ्यांची, अविष्कार पद्धतीची विविधता, व्यापकता ही विस्मय वाटावा अशी आहे. याचे कारण त्यांचे परमनप्रवेशाचे सामर्थ्य व त्याला आवश्यक कल्पकता. गोखले सामान्य घटनांकडे अनपेक्षित दृष्टिकोनातून पहातात व पात्रांवर नवा प्रकाश टाकतात. ते एक कुशल निवेदक आहेत. पण वाचक त्यांची कथा वाचून बैचेन होत नाही. गोखले अलिप्ततेने समरसून लिहितात पण तळमळून, कळवळून लिहित नाहीत. त्यांनी निर्माण केलेली अंतर्मुखता गाडगीळांच्या कथेच्या प्रतिक्रियेप्रमाणे अस्वस्थतेच्या पातळीवर जात नाहीत.
व्यंकटेश माडगूळकरांची कथा वरिल सर्व कथाकारांपेक्षा वेगळी आहे. ती केवळ प्रादेशिकतेच्या, ग्रामीणतेच्या लेबलाखाली येत नाही. पूर्वसुरींची सुधारकी तळमळ, रोमॅंटिक दृष्टी, बाहेरुन केलेले वर्णन या प्रादेशिक, ग्रामीण लिखाणात नाही. माडगूळकर ग्रामीण जीवनाकडे ग्रामीणांच्या दृष्टीतून पहातात म्हणून त्यांची कथा अस्सल ग्रामीण ठरते. परिघ लहान असला तरी तो विलक्षण संपन्न आहे, वैचित्र्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आहे. सर्व प्रकारच्या दु:खांचा संपूर्ण स्वीकार करणारी पात्रे प्रचंड सोशिक ठरतात आणि माडगूळकर अलिप्तपणे त्यांचं कथन करतात. विलक्षण तोल, सहजपणा, अकृत्रिमतेमुळे वास्तवतेच्या चित्रणाला वेगळी गुणवत्ता, दर्जेदारपणा प्राप्त होतो. निवेदनशैली, भाषा सहज, अकृत्रिमपणे येतात.
अनुभवनिष्ठा, आशय-घाटाचे अभिन्नत्व, प्रतिमा ही नवकथेची परिभाषा, स्थूलगोचर वास्तवापेक्षा मानसिक जाणीव नेणिवेतील वास्तवाला प्रमुख स्थान ही नवकथेची वैशिष्ट्ये सांगता येतील.
पाचवे नवकथाकार म्हणून उल्लेख झालेले सुरवातीला तत्वचिंतनात्मक, अंतर्मुख, गद्य शैली असलेले व नंतर अत्यंत सूक्ष्म, तरल काव्यमय भावविश्व नाजूक हाताने, सूचकतेने चितारणारे शांताराम, गाडगीळांच्या परंपरेतील सदानंद रेगे व ज्ञानेश्वर नाडकर्णी, केवळ बाह्यतंत्र उचलणार्‍या नवकथेविरुद्ध जुन्या नव्यातला समन्वय साधणारे दि.बा. मोकाशी, वसुंधरा पटवर्धन, श्री.ज. जोशी, माडगूळकरांच्या कथेशी नाते सांगणारे द.मा. मिरासदार, शंकर पाटील, उद्धव शेळके आणि जुन्याच कथेचा आश्रय घेऊन वेगळा आशय, चमकदार, ढंगदार शैलीतली कथा सांगणारे अ.शं. अग्निहोत्री, अच्युत बर्वे, महादेवशास्त्री जोशी हे अन्य नवकथागामी लेखक.
कमल देसाई आणि जी.ए. कुळकर्णी यांचा अपवाद सोडल्यास आद्य नवकथाकारांना मागे टाकणारा एकही लेखक त्यांच्या मागून येणार्‍यांत झाला नाही.
मनोविश्लेषण, संज्ञाप्रवाही चित्रण, घाटाचे नवे प्रयोग, क्षणचित्रण, भावचित्रण या नवकथेतील रुढ गोष्टींपेक्षा एखाद्या लहानशा अनुभूतीतील सूक्ष्म नानापदरी गुंता उकलणार्‍या ऐसपैस, पल्लेदार आणि विपुल कथा लिहिणार्‍या वसुंधरा पटवर्धन, त्याउलट सुटसुटीत, किरकोळ बांध्याची, चिमुकल्या आकाराची कथा लिहिणार्‍या, त्यात रचनांचे अनेक प्रयोग करणार्‍या सरिता पदकी, स्त्रीजीवनातील व्यथा काव्यात्मक, भावोत्कट शैलीत मांडणार्‍या इंदिरा संत, विविधता, सूक्ष्म मनो आणि सामाजिक विश्लेषण करणार्‍या स्नेहलता दसनूरकर, रंजक, तंत्रनिष्ठ कमला फडके, लोकवाङमयाचा अभ्यास असलेल्या सरोजिनी बाबर, कवयित्रीचा पिंड असलेल्या, शांता शेळके, शिरीष पै, योगिनी जोगळेकर या कालखंडातील लेखिका.
सत्यकथा-अभिरुची कालखंडात १९६० नंतरच्या कथा नवीन प्रवृत्ती घेऊन आली. वाङमय हे साधन नसून जीवनाचे ते एक माध्यम, साध्य, केवळ सद्यजीवन नव्हे तर संपूर्ण मानवी अस्तित्व जाणण्याची धडपड, तळमळ या वाङमयातून दिसते. वस्तूचे खरे तत्व कठिण आहे. माणसाचे ज्ञान फक्त इंद्रियानुभवापुरते असं सांगणारा नवअनुभववाद, अस्तित्व आद्य, सत्व नंतर, मानवी अस्तित्वाची अर्थशून्यता, हेतुशून्यता यांची तीव्र जाणीव मांडणारा अस्तित्ववाद आणि प्रस्थापितांचा विरोध व सामाजिक मूल्यांचा अव्हेर या मूल्यांखाली त्याची निर्मिती झालेली दिसते.
जी ए कुळकर्णी, श्री दा पानवलकर

संपूर्ण जीवनाचे महावस्त्र, महाकाव्य विणणारे, जीवनविषयक दृष्टी कथेच्या केंद्रस्थानी असणारे, एकिकडे तीव्रपणे नियतीबद्धतेची भावना, योगायोगी जीवन, मानवी अस्तित्वमात्रता मानणारे तर दुसरीकडे उद्दाम वासना, सतत जळत ठेवणार्‍या तीव्र भावना, त्यांची माणसावरची अटळ सत्ता, रक्ताच्या नात्याचे क्रूर पाश, त्यामुळे येणारी अगतिकता, संवेदनानिष्ठ प्रतिमांच्या माध्यमातून मांडणारे जी.ए. कुळकर्णी यांचं महत्वाचं स्थान आहे. रक्तचंदन नंतर प्रतिकात्मक मिथकथांचा अपरिहार्य मार्ग त्यानी निवडला. नवअनुभववादाची छटा, निवेदनाच्या बुडाशी असलेल्या चैतन्याचा शोध, संज्ञाप्रवाही लेखनपद्धती, कथेचा सरळसोट नव्हे तर चक्राकार प्रवास, अत्यंत व्यक्तिकेंद्री अनुभव ही वैशिष्ट्ये असलेल्या कमल देसाई, अनुभवाची जात, तो घेण्याची पद्धत, त्याची हाताळणी, त्यासाठी वापरलेली भाषा, त्यातून होणारा व्यक्तित्वबोध हे तोपर्यंतच्या कथेपेक्षा सर्वस्वी भिन्न विशेष असलेली कथा लिहिणारे दिलिप चित्रे, जे निकराच्या आत्मभानाने अस्तित्वशोध घेतात. स्त्री-पुरुष संबंधाला ते नीतिनिरपेक्ष संकेतातीत स्थान देतात. अर्थाची अनेक वलये निर्माण करणारी आशयघन भाषा हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य.

लेखिकांमध्ये विजया राजाध्यक्ष, तारा वनारसे तर पुरुष लेखकांमध्ये शरश्चंद्र चिरमुले, विजय तेंडुलकर, चिं.त्र्यं. खानोलकर, ए.वि. जोशी, विद्याधर पुंडलीक, श्री.दा. पानवलकर, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, सिनिक, जातेगांवकर, डांगे, सारंग, श्री.वि. कुलकर्णी हे वैशिष्ट्यपूर्ण कथाकार या कालखंडात आढळतात. गौरी देशपांडे, सानिया, उर्मिला सिरुर, पद्मजा फाटक इत्यादी नव्या लेखिका या कालात लिहित्या झाल्या.
जीवनाची अर्थशून्यता, वैफल्य, एकाकीपणाची तीव्र भावना, निराशेचा गडद काळा रंग, व्यक्तिकेंद्री व असामाजिक वृत्ती व त्यामुळे समाजातील सर्वच श्रद्धास्थाने नष्ट करण्याची प्रवृत्ती, समाजविन्मुख अतिव्यक्तिवादीपणा, जीवनाचे वास्तव चित्रण करण्याच्या हेतूने कुरुप, ओंगळ, अश्लील, बीभत्स गोष्टींवर भर देण्याची वृत्ती हे या काळातील या नवसाहित्याचे सर्वसाधारण वैशिष्ट्य नजरेस भरते.
चित्रे, सारंग, बागुल, गौरी देशपांडे, कमल देसाई

अस्मितादर्श कालखंड (१९६५ नंतर)
एकीकडे अस्तित्ववाद, नवअनुभववाद यांच्या प्रभावाने निर्माण झालेले अतिव्यक्तिवादी, निराशावादी साहित्य तर दुसरीकडे समष्टीवादी, सामाजिक बांधिलकीने, नवसमाज निर्मीतीच्या इर्षेने पेटलेल्या साहित्याची मुहूर्तमेढ रोवली जात होती. प्रस्थापित समाज, त्याच्या परंपरा, रुढी, साहित्य, नियतकालिके या सर्वांविरुद्ध उभा ठाकलेला, नव्या दमाचा, विक्षुब्ध, विद्रोही तरुण दलित लेखकवर्ग अग्रभागी उभा राहून बंडाचा झेंडा फडकवू लागला. त्याची नियतकालिके, मेळावे, साहित्यिक चळवळ याने कविता, कथा, कादंबरी या सर्वच आघाड्यांवर धामधूम उडवून दिली. आंबेडकरांच्या दलित मुक्ती आंदोलनापासून प्रेरणा घेऊन दलित साहित्याचे नवे पर्व सुरु झाले. नव्या जाणिवा व नव्या प्रवृत्तींना वाचा देणार्‍या गंगाधर पानतावणे संपादित, प्रगति विचार संपदेने काढलेल्‍या अस्मितादर्श ह्या त्रैमासिकाचा वाटा मोठा राहिला.
दलित कथेचा पहिला उद्रेक म्हणजे पासष्ट साली अवतरलेली बाबुराव बागूलांची कथा. त्याआधी लोकविलक्षण गोष्टी, अद्भुताचे आकर्षण असणारे, रोमांचवादी आण्णाभाऊ साठे, अधिक वास्तवपूर्ण, कलात्मक, प्रत्ययपूर्ण, जोमदार भाषा असलेले शंकरराव खरात, दलिताभिमुख, दलितांची व्यथांची जाणिव ठेऊन, त्वेषाने, बंडखोरपणे कथा लिहिणारे बंधुमाधव इ. पहिल्या पिढीतले दलित लेखक गणले जातात.  
एक नवा मुक्काम, परिवर्तन, नवे क्रांतिकारी वळण बाबुराव बागूलांनी दलितांच्या नव्या जाणिवा, नवी मूल्ये यांच्या प्रत्ययाद्वारे दिले. विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेली, सहेतुकपणे, सुजाणपणे लिहिलेली, दलित-शोषितांचे विदारक, भीषण अनुभव चित्रित करणारी, विलक्षण समर्थ अशा या कथेने दलित सहित्यात नवे युग सुरू केले. पूर्वसुरी आणि बागूल यांच्यातला फरक अनुभवाच्या जातीचा, अनुभव घेण्याच्या पद्धतीचा, भावनेच्या तीव्रतेचा आणि त्याच बरोबर बागुलांच्या नव्या जाणिवांचा व नव्या भूमिकेचाही आहे. विद्रोही दलित कथेचे जनक बागुल यांचा विद्रोह हा आंशिक नसून सर्वांगीण विद्रोह आहे. सच्च्या, दमदार, लोकविलक्षण अनुभवांमुळे बागुलांची कथा एखाद्या प्रत्ययकारी चित्रपटासारखी सळसळत मनाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारी दर्जेदार कथा असल्याचे दिसते.
सुशिक्षित दलितांवर लिहिणारे, नवी स्वप्ने व जुनी स्त्ये यांमधला संघर्ष चितारणारे, काव्यात्म वृत्ती बरोबरच विचार विच्छेदनशक्तीही असलेले योगेंद्र मेश्राम, मेश्रांमांप्रमाणेच बागुलांचा वारसा मिरवणारे, बागुलांची विद्रोही भूमिका स्वीकारणारे, अस्पृश्य दलितांची व्यथा मांडणारे, मूळ कथाकाराचा पिंड असलेले योगिराज वाघमारे, मूळ पिंडच विनोदी लेखकाचा असलेले, विनोद, व्यंग, उपरोध, उपहास असलेली कथा लिहिणारे वामन होवाळ मुंबईच्या अंडरवर्ल्डचे कुरुप, निर्दय वास्तव प्रभावीपणे चितारणारे तसंच स्वजातीयांच्या दोषांचेही तितक्याच कठोर वस्तुनिष्ठपणे करणारे केशव मेश्राम, नागरी, ग्रामीण दोन्ही अनुभव सारख्याच ताकदीने साकारणारे, लेखनात सूक्ष्मता, वेधकता, वातावरण निर्मितीचे सामर्थ्य असलेले अमिताभ, अधिक सकस, सरस, तपशीलात अधिक संपन्न, प्रयोगशील, कलात्मक गहिरे अनुभव व प्रबुद्ध दृष्टिकोन लाभलेली बहुगुणात्मक, बहुछटात्मक अनुभवव्यूह लाभलेली कथा लिहिणारे अर्जुन डांगळे हे महत्वाचे लेखक या कालखंडात येतात. त्याशिवाय भास्कर चंदनशिव, माधव कोंडविलकर, जगदीश कदम, शंकरराव सुरडकर, महादेव मोरे, भिमराव शिरोळे असे अन्य उल्लेखनीय कथालेखकही दृष्टिस पडतात.
प्रत्यक्षपणे अनुभवलेले जातिवंत, अस्सल लिखाण, नव्या जाणिवेने प्रेरित होऊन- केवळ आत्मानंद, अर्थार्जन, लोकमान्यता यासाठी नव्हे- केलेले लेखन ही दलित लेखनाची वैशिष्ट्ये तर स्वस्थितीबद्दलचे दु:ख, प्रचलित समाज बदलून नवसमाज, नवी मूल्ये स्थापण्याची ईर्षा हे दोन पैलू इथे प्रकट होतात. दलित जीवनाला अखंडपणे ग्रासणार्‍या मूलभूत गरजांबाबत दैना, अखंड दारिद्र्य, वतनदारीची गुलामगिरी, स्त्रियांची बेअब्रू, अस्पृश्यतेमुळे सुशिक्षितांचा अपमान, अवहेलना या भोवती ही कथा फिरताना दिसते. मराठी कथाक्षेत्र व्यापक करणे, कथेला नवा आयाम देणे, आजवरच्या उपेक्षितांचे अंतरंग उलगडणे, प्रस्थापित मूल्यांवर प्रहार करणे आणि त्याद्वारे समाजाची सद्सद्विवेकबुद्धी जागृत करणे ही दलित कथेची कामगिरी म्हणता येईल.
मराठी कथेत याच सुमारास विज्ञानकथा, गूढकथा, भयकथा, खूनकथा, हेरकथा लिहिणारे दर्जेदार लेखनही झाले. प्रत्ययकारी विज्ञानकथा लिहिणारे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, विज्ञानावर आधारित शास्त्रीय कथा, मनोवैज्ञानिक कथा, अतींद्रियवादी भयकथा लिहिणारे नारायण धारप, गूढकथा लिहिणारे रत्नाकर मतकरी हे या प्रांतातले मानकरी आहेत.
१९७५ नंतर दोन नवे विषय मराठी कथाकार राबवू लागल्याचे दिसते. भोवतालच्या अस्वस्थ, भ्रष्ट, तणावपूर्ण परिस्थितीचा सातत्याने, कसोशीने पाठपुरावा करणारे लेखन आणि १९७५ ते १९८५ हे स्त्रीदशक असल्याने स्त्री हा विषय मध्यवर्ती असलेले लेखन.     
वृत्तपत्रीय जगात वावरणारे, जुनी मध्ययुगीन व सरंजामी संस्कृती आणि नवी झपाटयाने आलेली औद्योगिक, व्यापारी संस्कृती यांतील संघर्ष, ताणतणाव आपल्या तीव्र सामाजिक जाणिंवाद्वारे मांडणारे ह.मो. मराठे, वास्तववादी, माणुसकी अजून जिवंत आहे असे सांगणारे राजकीय व सामाजिक घटना, प्रतिघटनांचे चित्रण करणारे अरुण साधू, जुन्या मिथ्सचा आधार घेऊन नवा आशय भरणारे, त्याला आवश्यक गूढ, अगम्य वातावरण समर्थपणे उभं करणारे भारत सासणे, अस्तित्वाचा शोध घेणार्‍या एका अतिसंवेदनाशील हळव्या मनाच्या नव्या जाणिवा व्यक्त करणारे, आपला अनुभव काव्यात्मकतेने, अल्पाक्षर शैलीत, समर्थपणे मांडणारे, त्याकाळी अनोखे, आगळेवेगळे वाटणारे लेखन करणारे वसंत आबाजी डहाके, मागील कालखंडात सुरुवात करुन मार्गक्रमणा करणारे चिं.त्र्यं. खानोलकर हे या कालातील महत्वाचे लेखक आहेत.
पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांचा, तेही कथालेखन करणार्‍यांचा वर्ग अधिक व आघाडीवरचा दिसतो. यांत खास स्वतंत्र जात, दर्जा, काहीशी सिनिक मनोवृत्ती, धीट अभिव्यक्ती, लग्नसंस्था, नवरा, विवाहनिष्ठा, इ. बद्दलची तुच्छता तरी स्त्रीपुरुष संबंधाच्या अपरिहार्यतेची जाणीव, मुक्तीसाठी झगडा व खोल वेदनेचा सूर असे विशेष असलेल्या गौरी देशपांडे, अस्तित्ववादाची दाट छाया असलेली, तीव्र वेदनादायी, प्रयोगशील कथा लिहिणार्‍या सानिया, लेखनाचा झपाटा, अभ्यासू वृत्तीमुळे प्रगल्भता, स्त्रीमन, स्त्री समस्या यांभोवती विणलेली अतिशय नीटस, रेखीव, वेधक अशी कथा लिहिणार्‍या सुनीती आफळे, फॅंटसी- कल्पित कथा हा महत्वाचा विशेष असलेल्या, स्त्रीबद्दलच्या मिथकथांचे लघुरुप साकारणार्‍या रोहिणी कुलकर्णी, स्त्रीच्या अस्मितेची जपणूक करणार्‍या मानी पण अट्टाहासी, कर्कश्श नसलेल्या स्त्रिया चितारणार्‍या, एकूणच माणसामाणसातले संबंध, गुंतवणूक हळूवारपणे, अलगद हातांनी, समजूतदारपणे उलगडत, शोध घेत रहाणार्‍या आशा बगे, स्त्रीमनाचे दु:ख अधिक तीव्र, बोलके, अधिक धारदारपणे मांडणार्‍या अंबिका सरकार, अमेरिकेत जाऊन रहाणार्‍या भारतीयांचे विषय मांडणार्‍या अजिता काळे यांच्याबरोबर वसुधा पाटील, निर्मला देशपांडे आदी लेखिकाही लिहिताना दिसतात. स्त्रियांचे आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य, विवाहादी संस्थांना नकार, मातृत्व स्त्रीच्या मर्जीवर, स्त्रीपुरुष समानता हे ठळक लेखनविशेष जाणवतात.
कथेच्या उगमापासून आजपर्यंत दैवतकथा, प्राणिकथा, परीकथा, नीतिकथा, कहाणी, गोष्ट, लघुकथा, नवकथा असा मराठी कथेचा सर्वसाधारण प्रवास जाणवतो. रुपककथा, दीर्घकथा, लघुत्तमकथा असे उपप्रकार निर्माण झाले. फडक्यांच्या बंदिस्त कथेपासून जीएंच्या भरघोस महाकाव्यात्मक कथेपर्यंत कथेची बहुविध रुपे कथा या माध्यमाचा लवचिकपणा हा विशेष अधोरेखीत करते तरीही हा वाङमयप्रकार अवघड असल्याचे निदर्शनाला येते.
कथेने काव्य, कादंबरी, लघुनिबंध, एकांकिका या वाङमयप्रकारांवर आक्रमण केलेले दिसले तरी तिचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित आहे, अनुभवाची एकात्मकता, एकजिनसीपणा, एकविधता, एक संस्कारकत्व असलेली पृथगात्मकता कायम आहे. 
अव्वल इंग्रजी कालाच्या अखेरीस कथा व कादंबरी आपापले आकार धारण करत असताना कथेने विकसित होत जाऊन प्रकरणात्मक दीर्घकथेचे रुप घेतले, कादंबरीला वाट दाखवली. आपली पृथगात्मता शोधत कादंबरीशी फारकत घेतलेली तदनंतरची कथा जीवनदर्शनासाठी कादंबरीशी स्पर्धा करत पुन्हा दीर्घकथेच्या रुपात अवतरली. अनेक पात्री, अनेक केंद्री, अनुभवाची घनता, व्यामिश्रता, अनेकसंदर्भसूचनाशक्ती व समृद्धता यामुळे या कथांना कथेचे माध्यम अपुरे पडेल की काय असे वाटते. जीए, कमल देसाई, पुंडलीक, जयंत लागू, प्रभाकर मयेकर, रत्नाकर पटवर्धन यांच्या दीर्घकथा, या प्रकाराचे महत्व अधोरेखित करतात.
तर्कपूर्व स्थितीत, आपल्या संवेदनेद्वारे आदिमानवाने आपल्या अस्तित्वशोधासाठी निर्माण केलेल्या मिथकथा आणि नंतरच्या निखळ संवेदनांद्वारा अस्तित्वशोध घेणार्‍या नवकथेचे नाते असलेले दिसते. मिथकथेचे सामर्थ्य नवकथेला प्राप्त झालेले दिसते, नव्या मिथ्स शोधण्याकडे तिचा कल दिसतो.
समाजाचे विडंबन, उपहास करण्यासाठी पंचतंत्र, हितोपदेश काळापासून कथेने फॅंटसीचा आधार घेतला. नवकथाकाल आणि नंतरच्या काळातही समाज, मानवी अस्तित्व विडंबन करणारी कथा पुन्हा फॅंटसीचाच आश्रय घेताना दिसते. उदा. जीएंच्या रुपककथा, कमल देसाई, चित्रे, डांगे, सारंग यांच्या कथा.
मराठी कथावाङमयाच्या परंपरेत कथा या वाङमयप्रकाराच्या सर्व संभाव्य शक्तींना राबवण्याची ईर्षा मराठी कथेने धरल्याचे आढळते. लघुकथा या वाङमयप्रकारावर प्रस्थापितांकडून प्रहार होऊनही ही ईर्षा कायम रहाल्याचे दिसते. जागतिक कथेशी तुल्यबल व्हावे इतकी समर्थता मराठी कथेत असल्याचे ही परंपरा सांगत असल्याचं यावरुन दिसतं.
एकीकडे भाषेच्याच र्‍हासाबद्दल उलटसुलट चर्चा होते आहे आणि दुसर्‍या बाजूने वैशिष्ट्यपूर्ण सृजनही होताना दिसते आहे या मंथनातून मराठी कथा निश्चितच अधिक समृद्ध व्हावी, अधिक विकास पावावी…
(संपूर्ण संदर्भ: मराठी कथा: उगम आणि विकास, लेखिका: इंदुमती शेवडे, सोमैया पब्लिकेशन प्रा. लि., १९७३, १९८२)  
 ….. संकलन: विनायक पंडित