All posts by Spruha

बदल…

पर्सनॅलिटी बदलावी लागते. आहार-बिहारात बदल करावा लागतो. काही अप्रिय परिस्थितींचा स्वीकार करावा लागतो….

सोन्याचे सूर..

काल कुमार गंधर्व यांची जयंती होती. मी त्यांच्या गाण्याची प्रचंड मोठी फॅन आहे. एक अबोल हुरहूर लागून र…

घडतं… बिघडतं !

कोणाला तरी कधी काळी दिलेली काही वचनं, आश्वासनं ..प्रॉमिसेसफार अंगावर येतात कधीकधी..कोणाला तरी क…

कळणं…कळून घेणं…

‘पीवी’ज बिग अॅडव्हेंचर’ नावाचा सुंदर चित्रपट पाहिलायत तुम्ही? अतिशय खेळकरपणे संपूर्ण कथा आपल्यासमोर उलगडत जाते. एका प्रसंगात तो त्याच्या गर्लफ्रेंडला, डॉटीला म्हणतो, “माझ्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत. कितीतरी गोष्टी, ज्या तुला कधी कळल्याच नाहीत, आणि अशाही कितीतरी गोष्टी ज्या तू कधी कळूनच घेतल्या नाहीस.” मला फार आवडला हा संवाद. किती सहजपणे किती मोठी गोष्ट बोलून गेलाय पीवी.
आपल्या रोजच्या जगण्यातली गोष्ट खरंतर. रोज भेटणाऱ्या, जवळच्या- लांबच्या माणसांशी वेगवेगळ्या पातळ्यांवर नातं जोडत असतो आपण. त्यावेळेस प्रत्येकासमोर मन मोकळं करायची वेळच येत नाही. तशी गरजही नसते म्हणा. पण हळूहळू वेगवेगळी आवरणं आपल्यावर चढत जातात. परिस्थिती, घटना, व्यक्ती आपल्यावर परिणाम करत राहतात. त्यांच्या सोयीने आपण स्वतःला वाकवत राहतो, बदलत राहतो. गुंतून जातो त्यांच्या विश्वात. त्या गजबजाटात आपण ‘खरे’ कसे आहोत, किंवा ‘होतो’ हे विसरायलाच होतं..
आणि अचानक मग कधीतरी निवांत वेळी ‘आपल्या’ माणसासोबत असताना आपल्या लक्षात येतं, की नको त्या कोलाहलात किती पुसट होऊन गेलंय सगळं. जसे आपण बदललो, तसाच आपल्या सगळ्यात जवळचा वाटणारा माणूसही बदलला. कळलंच नाही इतकं मोठं स्थित्यंतर होत असताना. फार गृहीत धरलं सगळंच… आपली प्रायव्हसी, आपली स्पेस सगळं हातात आलंय, पण समोरचा माणूससुद्धा त्याच वेळेस त्याची प्रायव्हसी, त्याची स्पेस शोधत निसटून गेलाय कुठेतरी. तर कुठे कुठे नेमका याच्या उलट प्रकार. दोघंजण इतके बुडून गेलेले एकमेकांमध्ये की कोणालाच काही धड अस्तित्व नाही. वेगळ्या वाटांची आवड नाही. एकाने दुसऱ्यावर केलेली कुरघोडी संपवून टाकणारी. ‘तुझं सुख तेच माझं सुख’ याचं अतिरेकी टोक. इतकं, की निर्भेळ स्वातंत्र्याचा आनंदच नाही. आणि मग एक मुक्कामावर पोहोचून लक्षात येतो भलताच प्रकार, एकमेकांत इतके आकंठ बुडूनही माणूस कळला नाहीच की आपल्याला!!  पाडगावकरांची फार सुंदर कविता आहे. “छेडणार जर होतो आपण गीत नवे तर, हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर! इतुके आलो जवळ जवळ की ‘जवळपणाचे’ झाले बंधन!”
थोड्या फार फरकाने आपल्या सगळ्यांनाच कधी न कधी हे असं वाटून गेलेलं असतंच. भूमिका बदलतात फक्त. कधी आपण ‘पीवी’ असतो, तर कधी ‘डॉटी’. काही गोष्टी आपल्याला कळल्याच नाहीत, आणि कित्येक गोष्टी ज्या आपण कळूनच घेतल्या नाहीत. वरवर पाहत राहिलो सगळंच. चित्रपटाच्या शेवटी डॉटी पीवीला विचारते, “इतका आटापिटा केलास, आणि आता फिल्म अर्धवट सोडून चाललायस?” पीवी म्हणतो, “मला हे ‘बघायची’ गरज नाही डॉटी; मी हे जगलोय!!” आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या माणसांशी, गोष्टींशी हे ‘असं’ जोडून घेता येईल आपल्याला? वरवरचा चित्रपट बघण्यापेक्षा, त्यात शिरून तो जगता येईल..?? 

– स्पृहा जोशी

‘सहज’तेची किंमत

प्रिशिला सिटेनेइ (तिचे केनियन भाषेतील टोपण नाव गोगो म्हणजे आज्जीबाई). ६५ बर्षे दाई (सुईण) म्हणून काम केलेली प्रिशिला ९० व्या वर्षी प्राथमिक शाळेत जायला लागली. ह्या आधी तिला ही संधीच मिळाली नव्हती. तिच्या वर्गमित्रांपैकी ७ जण तिचीच खापरपतवंडे आहेत. ती गणित, science, english हे शिकतेच आहे पण त्याबरोबरच PT, Dance हयामध्ये सुध्दा उत्साहाने भाग घेते. तिच्या अनुभवीपणामुळे अजून तिच्याकडे बायका शनिवाररविवारी सुईणपणा विषयी सल्ला घ्यायला येतात. वयाच्या नव्वदाव्या वर्षी तिला का वाटलं असेल हे करावंसं? कुठल्याही रेकॉर्डस् मध्ये तिला तिचं नाव नकोय.   तिच्याकडे या सगळ्याची काही साधी सोप्पी कारणं आहेत.  

१.ज्या केनियात आजही स्त्री-शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या केनियातल्या सगळ्या मुलींना तिला स्वतःच्या उदाहरणातून हा संदेश द्यायचाय की शाळेत जाऊन शिकलंच पाहिजे. 

२.तिला सगळ्या वनौषधींची माहिती पुढच्या पिढीसाठी संकलित करून ठेवायची आहे. जे लिहिता – वाचता येत नसल्यामुळे इतक्या वर्षांत तिला करता आलं नव्हतं. आपलं ज्ञान असंच वाया जाऊ नये, यासाठी तिची ही सगळी धडपड आहे. 

३.तिला स्वतःला एकदा तरी ‘बायबल’ वाचायचं आहे..!

कुठून आलीये ही असामान्य दृष्टी आणि हे असं धाडस तिच्यामध्ये? काय प्रेरणा असेल या सगळ्यामागे? आपल्या महाराष्ट्राशी याची तुलना करायला गेलं, तर असं वाटतं की आपण किती भाग्यवान आहोत कारण आपण ‘महाराष्ट्रा’सारख्या प्रागतिक राज्यात जन्माला आलो. जिथे प्रबोधनाची परंपरा रुजली. स्त्री- शिक्षणाची चळवळ फोफावली. महात्मा फुले, सावित्रीबाई, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई, आनंदीबाई जोशी, महर्षी कर्वे यांनी आणि अशा कित्येकांनी आपल्या कर्तृत्त्वाने आमच्यासमोर कित्येक दारं खुली करून दिली. परंपरेच्या मुसक्या सैल केल्या. डोळ्यांना स्वप्नं पहायची सवय लावली. आज आम्हाला ‘शिक्षण घेणं’ यासाठी वेगळा विचार करावाच लागत नाही. ते आमच्यासाठी अत्यंत सहज आणि स्वाभाविक बनलंय. ज्योत्स्ना भोळे, कमलाबाई गोखले ह्यांच्यामुळे रंगभूमीवर काम करायला मुलींना मोकळीक मिळाली. केसरबाई केरकर हिराबाई बडोदेकरांमुळे बायका संगीतसाधना करू शकल्या. या सगळ्यांनीच आपापलं कुल- शील जपत कलांनासुद्धा एक साजरं, प्रतिष्ठित रूप मिळवून दिलं.

आज ताठ मानेने आम्ही आमची करीयर्स करू शकतोय ते या साऱ्यांमुळेच. आमचे निर्णय घेऊ शकतोय ते त्यांच्या काळात त्यांनी सोसलेल्या, अंगावर झेललेल्या अनंत अडचणींमुळेच. पण आपल्या पिढीच्या किती जणींना हे माहिती आहे? या सगळ्यांबद्दल कृतज्ञता तर सोडाच, पण यांची नावं सुद्धा पार पुसून टाकलीयेत आपण आपल्या आठवणींतून. प्रीशीला आजींचा संघर्ष आपल्याला आज करावा लागत नाही, कारण या पिढ्याच्या पिढ्यांनी आपलं रक्त आटवलय त्यासाठी. आपण मात्र हा सगळा इतिहास विसरून आपलं मनमानी स्वातंत्र्य गृहीत धरतो आहोत..आणि प्रागतिक विचारांचा आपला महाराष्ट्र दिवसेंदिवस काळाचं चक्र उलटं उलटं फिरवू पाहतो आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचा शोध लागण्याआधीच, ती भीती विरण्याआधीच कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर झालेला हल्ला हा कशाचं द्योतक म्हणायचं?

डॉ. अरुणा ढेरेंनी आपल्या एका लेखात फार सुंदर लिहिलंय.“सनातनी जीवनपद्धती ही काही अविचाराने स्वीकारण्याची गंमत गोष्ट नाही,आणि स्वातंत्र्य हे काही खेळण्यासारखे टाकून देण्याजोगे मूल्य नाही.” आपल्या आसपास चाललेल्या सगळ्या भयावह गोष्टी पाहताना किमान हा विचार, हे स्वातंत्र्य शहाणपणाने टिकवू शकू आपण? नुसत्या पुस्तकी घोकंपट्टी आणि घसघशीत पॅकेजपलीकडे जाऊन प्रीशीला आजीचा तो आत्मविश्वास मिळवू शकू आपण?

– स्पृहा जोशी

‘डूडल डायरी’

मध्यंतरी ‘काळा घोडा फेस्टिव्हल’ला गेले होते. मला आवडतं अशा ठिकाणी. खूप वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या कल्पना.. सुंदर संमेलन असतं.. तऱ्हेतऱ्हेचे लोक दिसतात.. त्यांच्या गप्पांचे विषय.. त्यांचे कपडे.. मध्येच अतिशय सुंदर अशा शिल्पकृती, पेंटींग्ज, आणि मोकळी हवा! मस्त मजा आली.. आपलं रुटीन बदलावंसं वाटत असेल न, तर मधूनच अशा एखाद्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी.. फार ताजंतवानं वाटायला लागतं. आणि या सगळ्या पलीकडे जाऊन मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे खरेदी!! ती मनसोक्त करता येते..आणि गोष्टी तरी किती वेगवेगळ्या.. साड्या, कुर्ते हे नेहमीचं झालंच, पण छोटे छोटे दिवे, बिलोरी आरसे, कोरीव बांगड्या, छोटेसे बुकमार्क्स, हाताने रंगवलेली कानातली, सुवासिक साबण, वॉल हँगिंग्स कितीतरी गंमतीच्या गोष्टी.. कितीतरी वेळ हे सगळं नुसतं बघण्यातच मजेत  निघून जातो. या वेळेस माझ्या खजिन्यात किती नव्या नव्या गोष्टी आल्या.. ‘मधुबाला’चं चित्र असलेली सुंदर बॅग, एक राखाडी निळं जॅकेट, आदिवासी बायका घालतात तसलं डोरलं, शेरलॉक आणि गँग्ज ऑफ वासेपूर मधल्या फैझलची चित्रं.. मजा नुसती.. आणि या सगळ्या खजिन्यात मला सगळ्यात आवडलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे एक डायरी. ‘डूडल डायरी’.
मस्त आहे ही डायरी.. फिरता फिरता एका स्टॉलवर सहज हाताला लागली. आता खरंतर डायरी सारखी डायरी. तिचं काय एवढं कौतुक.. पण हिची स्पेशालिटी म्हणजे, या डायरीच्या प्रत्येक पानावर एक शब्द दिलाय. अगदी साधासा. म्हणजे उदाहरणार्थ, ‘फ्लॉवर’, ‘लिब्रा’, ‘गार्डन’, ‘शिप’… असं काहीही.. रोजच्या तारखेला एक नवा शब्द. आता आपण काय करायचं, रोज त्या शब्दाबद्दल आपल्या मनात जे काही येतंय, ते नोंदवून ठेवायचं.. हवं तर चित्र काढा, हवं तर कवितेच्या ओळी लिहा, हवं तर त्या शब्दावरून एखादी व्यक्ती आठवली तर तिच्याबद्दल लिहा.   काहीही करा. ती ‘स्पेस’ तुमची. लिहित जायचं, सुसाट सुटायचं! गेले दोन महिने या डूडल डायरीने एक नवा छंद लावलाय मला..
मित्रांनो वरवर वाचताना हे साधंसं वाटेल कदाचित. ‘त्यात काय एवढं’ असंही वाटून जाईल कोणाला.. पण यातली गंमत खरंच खूप जास्त आहे. एक मजेशीर लहानपणाचा अनुभव देते ही डायरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मेंदू भरकटत असतो आपला, एकाच वेळेला हजार ठिकाणी धावत असतो. त्या नाठाळ चोराला कान धरून एकाच शब्दावर थांबायला लावते. पण तोही शहाणा.. त्यातून वाट काढू पाहतो.. आणि मधल्यामध्ये आपल्याला सापडतात एकाच शब्दाशी जोडल्या गेलेल्या कितीतरी डायमेंशन्स.. एकातून दुसरी, दुसरीतून तिसरी कल्पना… आणि मग आपल्यासमोर आपल्याच बालिश चित्रांतून, चार दोन कवितांच्या ओळीतून फुललेला दिसतो रंगीबेरंगी कोलाज.. ओबडधोबड.. पण सुरेख..! गेले काही दिवस मी ही मजा अनुभवते आहे. रोज स्वतःच स्वतःला शाबासकी देते आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे त्या डायरीच्या पानांतून पुन्हा पुन्हा फिरताना खळखळून हसते आहे..   
आजच्या ‘गुड मॉर्निंग’ला तुम्हीही ही सुरुवात नक्की करून पहा.. आणि सांगा मला तुमची ‘डूडल डायरी’ तुम्हाला काय देतेय ते!!

    स्पृहा जोशी.

परस्परांना परिपूर्ण करणारे प्रेम हवे..

प्रेम ही तुम्हाला परिपूर्ण करणारी गोष्ट आहे. कुठलाही माणूस कधीही एकटा-एकटा राहू शकत नाही. एक व्यक्ती म्हणून पूर्ण करणारी गोष्ट म्हणजे प्रेम. प्रत्येकाच्याच आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रेम येत असते. ते काही फक्त मुलगा-मुलगी, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असे आपल्याकडे सर्वसाधारणपणे म्हटले जाते तेवढेच नसते. जवळची मैत्रीण, आई, बहिण, वडील किंवा मित्रसुद्धा यांच्यावरही तुम्ही निरातिशय प्रेम करू शकता. मुळात ती गोष्ट खूप सुंदर आहे. तुम्हाला ती सकारात्मतेकडे नेते. किंबहुना, मी असे म्हणेन की, जे प्रेम तुम्हाला नकारात्मतेकडे नेते ते प्रेमच नव्हे. 

प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे अनेक ठिकाणी साजरा केला जातो. पण मला हा दिवस आपण का सेलिब्रेट करावा हे कधीच समजले नाही. कारण, प्रत्येकच दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचा असतो आणि कुठल्याही दिवशी ते व्यक्त करू शकतो. खरोखरच मनापासून प्रेम करायचे असेल तर तुम्ही ते  वर्षभर करू शकता. अर्थात, ही माझी मते आहेत; पण सध्या असा ठराविक दिवस प्रेमाच्या नावाने सेलिब्रेट करण्याचा ट्रेंड आहे. 

ट्रेंड हा प्रत्येक वेळी वेगवेगळा असतो आणि त्या-त्यावेळी तो आपल्याला आकर्षित ही करत असतो; पण माझ्या बाबतीत तसे घडलेही नाही. ओढून ताणून काही तरी करायला हवे, याची गरज वाटली नाही. माझ्या जोडीदाराकडून माझ्या माफक अपेक्षा आहेत. त्याने फार रोमँटिक असावे किंवा वेगवेगळी गिफ्ट आणावीत, असे मला कधीच वाटले नाही. त्याने समजूतदार असावे, आमच्या दोघांमध्ये कुठल्याही विषयांबाबत सुसंवाद असावा, आम्हाला एकमेकांशी कुठल्याही विषयावर बोलता आले पाहिजे. त्याची आणि माझी विचार करण्याची पद्धत वेगळी असेलही. परंतु, तरीही किमान माझा विचार काय आहे, हे त्याने समजून घ्यायला हवे. या समजुतीची व समजूतदारपणाची अपेक्षा मात्र माझी सुरवातीपासून होती. 

कुठलीही टोकाची गोष्ट प्रेमाच्या नावाखाली करावीशी वाटणे म्हणजे प्रेम नव्हेच.तिथे काही तरी चूक होत आहे.वरवरच्याच  भावना आपल्याला जाणवत आहेत का, याचा एकदा अशावेळी विचार केला पाहिजे.अपूर्णत्व देते ते प्रेम नव्हे. तर  पूर्णत्वाकडे घेऊन जाणारे असते ते प्रेम होय. माणूस म्हणून किंवा व्यक्ती म्हणून तुम्हाला अधिक चांगले बनवते, परिपूर्ण बनवते ते प्रेम होय. 

– स्पृहा जोशी

स्वीकार

ओशो रजनीश. भारतातल्या विवादास्पद पण तितक्याच लोकप्रिय अध्यात्मिक गुरुंपैकी एक नाव. त्यांचे सिद्धांत, मूल्यधारणा या गोष्टींवर वाद असतील कदाचित. किंबहुना आहेतच. पण त्यांचे विचार हे अतिशय पारदर्शी आणि स्वतःला शोधत खोल खोल नेणारे आहेत.
   “जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता, ती गोष्टच तुम्हाला दुसऱ्याचा स्वीकार करण्यासाठी योग्य बनवत असते. आणि जेव्हा कोणी त्यांचा स्वीकार करतं, तेव्हाच ते ‘स्वीकारा’तला आनंद शिकत असतात. किती शांतीपूर्ण आहे हे. आणि मग तेही दुसऱ्यांना स्वीकारायला लागतात. जर संपूर्ण मानवता या बिंदूपाशी येऊन पोचली, जिथे प्रत्येकजण तो ‘जसा आहे तसा’ स्वीकारला जाईल, तर जगातली नव्वद टक्के दुःखं अशीच संपून जातील.” 
                                       – ओशो रजनीश.
…. इथेच आधी थांबायला होतं. पहिल्या ओळीवरच. स्वतःचा स्वीकार? म्हणजे काय नेमकं? आपण पूर्णपणे ओळखलेलं असतं स्वतःला? नेमकं काय हवंय स्वतःकडून, समोरच्याकडून ते आपल्याला ठाऊक असतं? कित्येकदा आपण झुली पांघरतो. वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्या रंगाला हरवू देतो. कित्येकदा आपण ‘असं’ काही करतो आहोत हेसुद्धा कळत नाही. ‘कोणासाठी तरी’ म्हणून इच्छा, स्वप्नं दडपली जातात. पण आपल्यासाठी ती सहज गोष्ट असते. निदान त्यावेळेपुरती तरी. आपण त्याला नशीब म्हणतो, प्राक्तन म्हणतो, देवाची इच्छा असंही म्हणतो. पण नेमकं त्यावेळेला आपल्याला ‘ते’ हवं होतं, की नाही याचं प्रांजळ उत्तर आपण नाही देऊ शकत. किंबहुना तसा प्रश्न विचारायलाच कचरतो आपण. कारण सरळ आहे. प्रत्येक पावलावर स्वतःला जे फसवलंय, ते ढळढळीतपणे सामोरं येईल म्हणून. त्याला तोंड द्यायला कचरत असतो आपण म्हणून.
पण मग अशा वेळेस स्वीकार कोणाचा करायचा? आपण जे आहोत, त्याचा? की आपण जे आहोत असं दाखवतो, त्याचा?? हे कळलं तरी पुष्कळ आहे. कारण या पहिल्या पायरीशी न झगडता आपण दुसऱ्या पायरीवर थेट उडी मारली तिथेच सगळा झोल झाला! डायरेक्ट दुसऱ्याचा स्वीकार. पण कसा? कारण तिथे तो बिचाराही याच डायलेमामध्ये अडकलेला असणार. खोटेपणाचा हाच खेळ.. वर्षानुवर्ष. पिढ्यानपिढ्या.. निदा फाझली फार सुंदर लिहून गेलेत.
“किसी कसाईने इक हड्डी छील कर फेंकी
गलीके मोड से दो कुत्ते भोंकते उठे
किसी ने पाँव उठाए
किसी ने दुम पटकी..
न जाने मेरा जी चाहा
अपने सब कपडे उतार कर
किसी चौराहे पर खडा हो जाऊँ
हर एक चीज पर झपटूँ
घडी घडी चिल्लाऊँ
निढाल होके – जहाँ चाहूँ
जिस्म फैला दूँ
हजारो साल की सच्चाइयों को झुठला दूँ….”
हाच तो ओशो म्हणतात तो ‘स्वतःचा’ स्वीकार.. ही ती पहिली पायरी. मग आपण स्वीकारतो ते कोणाला? की खरंतर कोणालाच नाही? या प्रश्नांचं हो/ नाही मध्ये उत्तर नाही. पण ‘जसं आहे तसं’ जगणं आणि जगू देणं याला फार मोठं धाडस लागतं. ‘जीवन अभी यही है’, आणि ‘प्रत्येक पल मरो, ताकी तुम हर क्षण नवीन हो सको’ म्हणणारे ओशो या खरेपणामुळेच एकाच वेळेला नकोसेही वाटतात, आणि हवेसेही!  

– स्पृहा जोशी

शरीराचं ‘म्हणणं’

परवा एक फार दुर्दैवी घटना घडली. सेल्फी घेण्याच्या नादात काही तरुण मुलं बोट उलटून त्यात मृत्युमुखी पडली. फार दुर्दैवी. सगळ्यांसाठी एक अलार्मिंग सिग्नल म्हणावा अशी गोष्ट आहे ही. यानिमित्ताने एका चॅनेलवर झालेल्या चर्चेत मी सहभागी झाले होते. हिरीरीने माझी मतं मांडली. “कुठलीच टेक्नोलॉजी ही वाईट नसते. ‘सेल्फी’च काय, पण कुठल्याही टेक्नोलॉजीचा अतिरेक करणं हे वाईटच. प्रत्येकाने आपल्यापुरती लक्ष्मणरेषा पाळलीच पाहिजे,” हे सगळं अगदी मनापासून आणि ठासून सांगितलं मी.
आज जिममध्ये एक नवा धडा मिळाला. सायकलिंग करता करता मी गाणी ऐकत होते. तेवढ्यात तिथे आमचे परुळेकर सर आले. आणि गोड शब्दात ओरडलेच मला. मला म्हणाले, की  “आपल्या जिममध्ये टी.व्ही. आहे, उत्तम अशी महागडी म्युझिक सिस्टीम आहे. पण मी ती बंद ठेवतो. व्यायाम करताना तुम्हाला म्युझिक कशासाठी लागतं? तुम्ही नुसता केल्यासारखा व्यायाम करता खरा. पण तुम्ही तुमच्या शरीराचं म्हणणं ऐकतच नाही. लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट.. अहो हेसुद्धा एक प्रकारचं मेडीटेशनच आहे. पूर्ण फोकस त्यावर करून पहा. इथे आहात तोवर ही बाहेरची गाणी-बिणी काही काही नको. शंभर टक्के इथे राहून पहा बरं! बघा तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स कुठच्या कुठे असतील.”
हा विचारच केला नव्हता मी कधीच. या अशा पद्धतीने. मला गाणी ऐकायला खूप आवडतात. सतत आसपास ती सुरु लागतात. पण ही आवड कुठेतरी माझा शांतपणाच व्यापून टाकते आहे की काय असं पहिल्यांदाच वाटलं मला.. गाडी चालवताना, इस्त्रीचे कपडे टाकायला जाताना, भाजी चिरताना, फोडणी करताना, पुस्तक वाचताना, लेख लिहिताना .. इतकंच काय, पण अंघोळ करताना, झोपताना.. सगळीकडे सतत.. सतत.. एक आवाज सोबत लागतो. का? आज सरांनी ही गोष्ट दाखवून दिल्यानंतर मला अचानक लख्ख जाणवलं. यामध्ये कोणत्याच एका गोष्टीला पूर्ण न्याय देताच नाही आपण! ना भाजी चिरण्याला, ना पुस्तक वाचण्याला, आणि ना धड गाणं ऐकण्याला. सगळंच अर्धंमुर्ध. कोणत्याही एका गोष्टीवर मन स्थिर करायला किती कष्ट घ्यावे लागतात आपल्याला. मागे एकदा योगाच्या क्लासमध्ये तिथल्या बाईंनी शवासन करताना दिलेल्या ‘शिथीssssssल करा…’ या सूचना आठवल्या. शरीराचा एकेक स्नायू पुसट होत गेल्याची आठवण सरसरून जागी झाली. आणि तो अनुभव गेल्या कित्येक वर्षात आपण घ्यायचेच विसरलोयत, हेही लक्षात आलं.
आणि जाणवून गेली ती कमालीची अस्थिरता. लक्षात आलं, की हे फक्त माझ्यासोबत नाही घडते. माझ्या आसपासच्या सगळ्यांची हीच स्थिती आहे. ‘अचपळ मन माझे नावरे आवरीता!” असंख्य विचारांची भाऊगर्दी.  सतत ‘काहीतरी’ गाठायचं असणं! आणि ते नेमकं ‘काय’ आहे, हे माहितीच नसणं. नातेसंबंध, गुंतागुंत, वाढती टेन्शन्स… आणि हरवून, निसटून चाललेली शांतता. ती नेमकी आपल्याला नको असते, कारण आपल्याला ती मूलभूत प्रश्न पाडते. चुका दाखवते. फटकारते. हे टाळायला ही गोंधळाची पळवाट बरी वाटते. आणि मग आपण ती जगण्याची पद्धत म्हणूनच आपलीशी करतो. स्वीकारून टाकतो.
पण मी मात्र आता बदलायचं ठरवलंय. त्या वेळेला ‘ते’ कामच मनापासून करायचं ठरवलंय. या गोंधळी आव्हानाचा सामना मी करणार आहे. माझी खात्री आहे. ‘लिसन टू युअर बॉडी, लिसन टू युअर हार्ट’ हा परुळेकर सरांचा मंत्र मला नक्की लाभेल..!

– स्पृहा जोशी 

एकटेपणा…वगैरे

उन्हाळ्याचे दिवस. दिवस उजाडतो, तसा उन्हाचा तडाखा कडक होत चाललेला. घामाच्या धारा नाहीत तरी एक चिकटपणा भरून राहिलेला. अशा वेळेस आढ्याकडे तोंड करून झोपून राहताना किती विचारांची गर्दी मनात. पहिला स्वतःच स्वतःला प्रश्न.. “आपण असे का? बाकी सगळ्यांची आयुष्य भरधाव वेगाने जात असताना, आपल्या आयुष्यात हे असं थांबणं आलंय का? अवेळी? कशामुळे आहे ते? आत्ता याक्षणी मला हे असं थांबायचं नाहीये खरंतर. वेग हवाय.. सगळ्याला वेग हवाय. पण मग हे असं हरवून जाणं का येतंय वाट्याला? का खरंतर वेगाने वाहतायत, असं वाटणारी सगळी आयुष्य अशीच चाललीयेत; त्यांच्या त्यांच्या परीने संथ..?? ज्या मानसिक द्वंद्वातून कारण नसताना मी जातीये, तो कल्लोळ त्यांच्या वाट्याला येत असणारे का?
हो खरंच! श्या! सगळं न च्या मारी या हवेमुळे होतंय.. निरुत्साही करणारी, सगळं शोषून घेणारी हवा. उष्ण. फुत्कार टाकल्यासारखी. ए. सी. वाल्याला बोलावून घ्यायला हवं की काय? कुलिंग होतच नाही नीट. म्हणूनच पुन्हा पुन्हा विचार येत राहतात नको ते. एकटेच आहोत आपण. एकटे. आणि त्याला कोणाचाही काहीही उपाय नाहीये. सगळ्यांची त्यांची त्यांची जगणी आहेत. त्यांची त्यांची म्हणणी आहेत. आपल्याला हवं तेव्हा आपल्यासाठी नाही येऊ शकत ते. आपण जाणार आहोत का त्यांच्या साठी ते बोलावतील तेव्हा? हजर होऊ शकणार आहोत? नाहीच की. मग कशाला वेडगळ अपेक्षा ठेवायची? पण म्हणजे माणसं जोडली, जोडली असं जे वाटत होतं ते फोलच म्हणायचं की काय? उकडतंय.. आता आतून उकडायला लागलंय.. हे असंच वाढत गेलं तर आतला, डोक्यातला मेंदू वितळून जाईल की काय.. ! कोणाला विचारू? फोन करू का??
नको नको.. आपलं फोन करणं आवडलं नाही तर? बरं मग मेसेज.. नकोच पण. कोरडा वाटतो मेसेज. त्यापेक्षा ‘फोन करता येत नाही?’ असं समोरून आलं तर? आणि या सगळ्यातून आपल्याला जे प्रश्न पडलेत ते तितके महत्त्वाचे नाहीचेत, असं वाटलं तर? मग काय करायचं? आपल्या एकटेपणाला किंमत न मिळणं याची टोचणी तर फारच वाईट. उगाच भळभळून येणार, मग त्यात पुन्हा आपले दिवसच्या दिवस जाणार.. नकोच ते..! आपलं एकटेपण आपल्यापाशीच बरं.
कोकीळ ओरडतोय वाटतं खिडकीत.. रोज, अगदी रोज येतो हल्ली. इवलासा काळा पक्षी. खूप साद घालतो. अगदी कर्कश वाटावी इतकी. ये बाई त्याच्याकडे लवकर. भेट तरी एकदाची त्याला. या उन्हाळ्यात निदान कोणाचा तरी जीव थंडावतोय, एवढं कळू दे. तेवढाच विसावा.
बाकी आमच्या उन्हाळ्याला साथ द्यायला आमरस, पन्हं, कलिंगड, कोकम सरबत, ए.सी. इत्यादी आहेतच. एकटेपणा सकट !

– स्पृहा जोशी

कलाकृतीचे ऋण

एखादी कलाकृती श्रेष्ठ तेव्हा ठरते, जेव्हा तिचा आस्वाद घेतल्यानंतर कित्येक दिवसांनीसुद्धा ती आपला पाठलाग करत राहते. मनाच्या सांदीकोपऱ्यात कुठे तरी जागा शोधून बसून राहते ठाण मांडून. वरवर पाहता आपण आपले सगळे व्यवहार करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सरावाने आपली सगळी कामं होत राहतात. सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण त्या विचारांकडे. पण या सगळ्यातून जेव्हा स्वतःशी थांबायला वेळ मिळतो तेव्हा मात्र त्या कलाकृतीपासून पळून नाही जाऊ शकत आपण. अक्षरशः हाताला धरून आपल्याला त्यातल्या प्रश्नांना सामोरं जायला लावते ती.
सध्या एस. एल. भैरप्पा यांच्या ‘पर्व’ने माझी ही अशी अवस्था केलीये. महाभारताचा महापट आपल्यासमोर मांडणारी ही महाकादंबरी. हा विषयच मनोव्यापारांची गुंतागुंत मांडणारा. पण सगळे धागे सुटे करून एका वेगळ्याच दृष्टीने भैरप्पा आपल्याला पाहायला लावतात, आणि आपण अडकत जातो. बुडत जातो त्या सगळ्या भीषण अशा, कधीही न बदलता येणाऱ्या कथेमध्ये. महाभारतातल्या सगळ्याच पात्रांना ते देव, चमत्कार, शाप वरदान, यांची सालं सोलून रसरशीत माणसं म्हणून रंगवतात आणि आपण हादरतो. त्यावेळची समाजशास्त्रीय परिस्थिती, भूगोल, सांस्कृतिक वातावरण, आहारविहार या चौकटी मोडून काढत काही हजार वर्षांपूर्वीची ती माणसं कधी ‘आजची’ होऊन जातात कळतच नाही. कारण ती आपल्याला भेटतात ती माणसं म्हणून नाहीत, तर कालातीत असलेल्या ‘प्रवृत्ती’ म्हणून.
मला सगळ्यात अंगावर आली ती त्यातली स्त्री-पात्रं. खरीखुरी. स्वतःशी इमान राखणारी. कुंती आणि द्रौपदी. सुभद्रा आणि गांधारी. हिडींबा आणि उत्तरा. सत्यवती आणि गंगा.. या बायकांची म्हणणी इतक्या थेटपणे ऐकताना गाढ अंधारातून अचानक जळजळीत उन्हात आल्यासारखं वाटलं. त्रास होतो उन्हाचा डोळ्याला, सहन होत नाही त्याचा जळजळीतपणा. पण प्रकाशाला दुसरा पर्याय हा ‘अंधार’ कधीच नसतो, शेवटी स्वीकारावंच लागतं आपल्याला ते दाहक वास्तव. तसच काहीसं झालं. त्या बायका कादंबरीत हाडामांसाच्या बनून येतात. कुठेच अतिरेकी उदात्तीकरण नाही, त्यांना संस्कृतीच्या दडपणाखाली ‘हिरोईन’ करणं नाही. भावनांचं नाटकी प्रदर्शन करणं नाही. काही नाही. आहे त्या त्यांच्या इच्छा, वासना, भोग, मोह, आसक्ती आणि जीवाचं अडकून राहणं. शेवटच्या क्षणापर्यंत. शेवटच्या श्वासापर्यंत. दबल्या, दडपल्या गेलेल्या या सगळ्या इच्छांचं अखेरचं स्वरूप आहे विनाश! संपूर्ण विनाश. अप्राप्य असलेलं सुख..
आपल्या आसपास आज बघताना अशा कित्येक द्रौपदी, कुंती, आपल्याला दिसतायत की. पिचलेल्या, हबकलेल्या.. सुख शोधत थकलेल्या.. आणि आसपास घास घ्यायला टपलेली व्यवस्थेची राक्षसी रूपं आहेतच. समूळ विनाशाकडे नेणारी !!
आनंद आणि कुतूहल फक्त एकाच गोष्टीचं. बाईपणाच्या या झळा एका पुरुषाने कल्पनातीत शब्दबद्ध कराव्यात.. भैरप्पांचं हे ऋण कधीही न फिटणारं असंच आहे.

– स्पृहा जोशी.

बर्डमॅन…

मी काही चित्रपट समीक्षक नाही किंवा फार जाणकार अभ्यासू व्यक्ती नाही; पण एक प्रेक्षक म्हणून, गेल्या आठवड्यात पाहिलेल्या एका नितांतसुंदर चित्रपटाविषयी मला तुम्हाला सांगायचंय… बर्डमॅन… विलक्षण… फार विलक्षण सुंदर अनुभव. 
ही एका अभिनेत्याची कथा आहे. “सुपरहीरो‘ म्हणून कीर्तीचा कळस गाठलेला; पण आता उतारवयात प्रसिद्धीच्या झोतापासून दूर फेकला गेलेला एक अभिनेता, जो पुन्हा एकदा स्वतःचा शोध घेऊ पाहतोय, स्वतःला नव्याने सिद्ध करू पाहतोय. आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला तर ही आपलीच गोष्ट वाटेल. करियरमधले चढ-उतार प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. कित्येकदा कामाचा “चॉईस‘ आपल्या हातात राहत नाही. इच्छा असूनही तो ठेवता येत नाही. त्यावेळचे संबंध, आपल्या गरजा, चुकलेली गणितं… कित्येक घटक परिणाम करीत असतात एखादा निर्णय घेताना. मग पुढे जाऊन त्या निर्णयाचे बरे-वाईट परिणाम… तेही ज्याचे त्याला, एकट्यालाच भोगावे लागतात. वाल्या कोळ्याच्या पापाचा वाटा घ्यायला कोणीच पुढे येत नाही. 
प्रसिद्धीची सवय झाल्यानंतर आपल्याच प्रतिमेच्या जंजाळातून बाहेर पडणं अवघड होऊन बसतं अभिनेत्यासाठी. कधी कधी त्याची इच्छा असली, तरी लोक त्याला इतर वेगळ्या रूपात स्वीकारत नाहीत. त्या इमेजमधून बाहेर पडू देत नाहीत. या बालिश लोकप्रियतेच्या माऱ्यामध्ये तो अभिनेता कोंडला जातो. घुसमटत राहतो. त्याचा आतला आवाज सतत ढुशा देत असतो त्याला. पण “त्या आतल्या‘चं ऐकण्याचं स्वातंत्र्य राहतच नाही त्याच्याकडे. काहीतरी “नवं‘ करून दाखवण्याची ऊर्मी मुदलातच मारली जाते आणि उरतात ते फक्त काही किस्से… अफाट लोकप्रियतेचे, अचाट परफॉर्मन्सचे… वर्तमानात त्या आठवणींचा अर्थाअर्थी फायदा तर होत नाहीच; उलट एका विचित्र भोवऱ्यामध्ये गरगरत खेचला गेल्यासारखा तो कलाकार दिसेनासा होतो, संपून जातो! थोरामोठ्यांच्या, देवादिकांच्या भूमिका करणाऱ्या कित्येक श्रेष्ठ कलावंतांच्या वाट्याला हे प्राक्तन येतं. चहूबाजूंनी बहरली असती, अशी कला दडपून टाकली जाते… 

या सगळ्याचं जळजळीत; पण तितकंच वास्तवदर्शी चित्रण आहे “बर्डमॅन‘मध्ये. असं म्हणतात, की यशाच्या शिखरावर एकदा पोहोचलं, की खाली उतरण्यासाठी मार्ग नसतो. असते ती फक्त खोल दरी… किंवा अथांग आकाश. झोकून दोन्हीकडे देता येतं. काही माणसांची झेप अवकाशापल्याड जाते आणि बहुतांशी माणसं मात्र पर्याय नसल्यासारखी “दरी‘ निवडतात. पण त्या एकटेपणातला आनंद एकदा आवडायला लागला, की त्यापेक्षा स्वतंत्र आणि सामर्थ्यवान करणारं दुसरं काहीही नसतं. कारण त्यावेळेला तुम्ही स्वतःलाच आवडू लागलेले असता! हा स्व-शोधाचा प्रवास अत्यंत तरल होऊन “बर्डमॅन‘ मांडतो. आणि आपणसुद्धा तरंगत तो अनुभव घेत राहतो. 
A film is – or should be – more like music than like friction. It should be a progression of moods and feelings. The theme, what‘s behind the emotion, the meaning, all that comes later. – Stanley Kubriek. हा अनुभव देता देता “बर्डमॅन‘ केवळ एका अभिनेत्याची गोष्ट राहत नाही; तर स्वतःला शोधणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाची गोष्ट होते. पुंगीवाल्याच्या बासरीसारखी आपला माग काढत आपल्याला दूर दूर घेऊन जाते…!


– स्पृहा जोशी

‘कोsहम्’चा शोध..

मनात येणारे अनेक प्रश्न. पॉझिटिव्ह..निगेटिव्ह, अनेक वाटांनी जाणारे. ‘कोsहम्’ चा हा शोध वयाच्या कोणत्याही पायरीवर न चुकणारा. 
आपण जगत असतो ते कोणासाठी? नेमकं काय घडतं-तुटतं आपल्या आत? स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणारा सगळ्यात जेन्युइन माणूस का खंगत जातो एका एका क्षणाला? 
‘आपले’ म्हणून जे कोणी असतात त्यांच्या जगण्याची त्यांची एक बाजू. त्याला त्यांची त्यांची परिमाणं. ते बघत असतात त्यांना जेवढे दिसतं 
तेवढंच. मग हे ‘त्यांच्यासाठी’ म्हणून जे काही लादलं जातं ते झेपणार कसं? ते निभावून पार कसं जायचं? या तगमगीत ना त्यांच्यापर्यंत पोहचता येतं ना स्वतःच्या आत पुरेपूर उतरता येतं. मग काहीतरी ‘सापडायचा’ अट्टाहास का करत राहतो आपण?
कोणत्या गोष्टींशी नाळ जोडलेली असते नेमकी? बालपण, सभोवताल, आई-बाबा, खाणंपिणं? पुस्तकं, गाणं, अंगाई, कविता? देवळं, प्रसाद, उत्सव, निसर्ग, शाळा? मित्र, शिक्षक, गोधडी, आजीच्या आजोबांच्या गोष्टी, पत्रं? जुन्या जागा ? हा drive असतोच मागे धरून ठेवणारा.
तरीसुद्धा कुठल्यातरी अनामिक फरफटीत आपण होऊन उडी घेतली जाते. आपोआप कुणी न सांगता. काही न ठरवता. आपण फक्त सरकल्यासारखं करतो. लोकलच्या गर्दीत शरीर नुसतं ठेवून दिल्यावर आपण आपोआप जसे कुठल्यातरी स्टेशनावर उतरतो, तसेच ढकलत जाऊन कुठे तरी जाऊन पोचतो आपण.
इथेच यायचं होतं का? माहीत नाही? मुळात कुठेही जायचं होतं का? माहीत नाही? ते मला माहीत नाही. पण समोरच्याला? त्या चौथ्याला, पलीकडे एक्यांशिव्याला, पासष्ट हजार पंचाहत्तराव्याला, लाख.. कोटी.. अगणित गर्दीला?? त्यांना माहीत्येय हे? आणि जर कुणालाच माहीत नसेल तर कसं चाललंय मग हे सगळं? वेगळ्या वेगळ्या दिशेने काहीच माहीत नसताना चालणारी ही माणसं…आपटत कशी नाहीत एकमेकांवर, कुठली गती म्हणायची ही?? माहीत नाही!!
असं म्हणतात, काही माणसं जात्याच संवेदनशील असतात. ती खूप विचार करतात, हे विचार मावत नाहीच कुठेच. आणि वेड लागतं म्हणे त्याना. हो.. लागत असणारंच. वेड लागत असणारंच. कारण या गतीत थांबायला, थबकायला स्कोपच नाहीये. ही वेडी माणसं म्हणजे तीच, आपटणारी माणसं असावीत… वेग सहन न होणारी. वेग न झेपणारी… पण मग म्हणजे ‘इथेच यायचं होतं’ हे त्यांना कळत असेल का त्या पॉइंटला?? माहीत नाही… हां, बहुतेक आपल्याला ‘कुठेच जायचं नाही’ हे कळून चुकत असावं.
तेवढं कळलं तरी वेडाचं सार्थक व्हायचं. नाहीतरी त्या निरर्थक शहाणपणानं कुणाचं भलं झालंय? माहीत नाही !!

– स्पृहा जोशी 
(Some thoughts after reading ‘सेतू‘ by ‘आशा बगे‘)