All posts by Sagar Kokne

कविता अशीच असते

मी एक कविता लिहिली
आणि फेकून दिली रस्त्यावर…
आता तिचे भवितव्य तीच जाणे !

ती वाऱ्याशी गुजगोष्टी करेल
त्यावर स्वार होऊन तरंगत राहील
तेव्हा कुणीतरी सहज खिडकीपाशी गुणगुणताना
सापडेल त्याला अलगदपणे…

कदाचित मातीत मिसळूनही जाईल
आणि उगवेल एखाद्या रातराणीच्या रूपात
मग कुणीतरी हिची तुलना तिच्याशी करेल
तेव्हा मोहरून जाईल ती…

अगदीच नाही तर मग
पावसात चिंब चिंब होऊन
जलसरींच्या नादाशी एकरूप होईल
बेमालूमपणे एखादे गीत होऊन…

अन हेही जमले नाही तर
ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला
तेथून जाणाऱ्या एखाद्या कवीला झपाटून टाकेल
पण आपले ध्येय साध्य केल्याशिवाय तिला शांती लाभणार नाही…

कविता अशीच असते…कविता अशीच गवसते.

-काव्य सागर

शब्दांवाचून

एक एक कविता माझी विकेन म्हणतो मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणतो मी

या जगण्याला कधी लाभला शब्दांचा आधार ?
शब्द असे भिनतात अंगी की जणू जडे आजार

व्याधी नसते साधी ही जी आपसूक जडलेली
कधी उपाशी शब्दाविन ती मूकपणे अडलेली

तरी रंगुनी शब्दमहाला नवे मांडले काही
कसे नकळता नयनातून या शब्द सांडले काही

भौतिकतेच्या या जगती हे काव्य कशाला पुरे
मी गेल्यावर शब्दाखेरीज काय तळाशी उरे ?

अता न भुलन्याचा शब्दांना केला मी निर्धार
वैद्य म्हणे हा रोग असे अन हाच असे उपचार

पोकळ साऱ्या बाता तरीही टिकेन म्हणतो मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणतो मी

-काव्य सागर

कधी कधी

उधळून मुक्त दाने द्यावी कधी कधी

हिंडून गाव भिक्षा घ्यावी कधी कधी

बहरात या ऋतूच्या, कोमेजलो असा
वाटे समोर तू ही यावी कधी कधी

वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद जन्मता
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी

जे सोडती न आशा, ध्येयास पाहता
अंती तयास लाभे, चावी कधी कधी

ते वाहती फुलांचे, निर्माल्य सागरा
त्यानेहि भावसरिता, प्यावी कधी कधी

-काव्य सागर

ओळख

ते म्हणतात की ओळखतात मला…

ते मला पाहतात, बोलतात माझ्याशी
आणि आपापल्यापरीने मला ओळखून असतात…

जन्मल्या क्षणापासून जे गणित
अधिकाधिक क्लिष्ट होत चालले आहे
ते पूर्ण जाणून घेतल्याविनाच सोडवू पाहतात त्याला…

उद्या मी गेल्यावर म्हणतील
ओळखायचो मी त्याला,
माझ्याबद्दल काही मते मांडून
कमी जास्त अश्रूदेखील ढाळतील…

ते खोटे नसतील म्हणा !
पण प्रत्येकाला उमगलेला मी
माझ्या एकूण अस्तित्वाचा
कितवा अंश असेल हे कुणाला ठावूक ?

ते ठावूक होण्याआधीच
मी मागे ठेवून गेलो असेन
माझी अस्पष्टशी ओळख

खरी ओळख मात्र रहस्याप्रमाणे
कायमची गाडली जाईल…

ती फक्त ‘त्याला’ आणि मलाच ठावूक !

-काव्य सागर

सखे कशाला

सखे कशाला फिरायचे चांदण्यात जग थांबले असावे
तुला पाहण्या अधीरला चंद्रमा ग्रहण लांबले असावे

नभात ज्या तारका पहुडती जळून गेल्या तुझ्या रुपावर
उगा न उल्का अशा विखुरती कुणी नभी भांडले असावे

कशा कुणा ना कधी गवसल्या तुझ्या पदांकीत पायवाटा
नभांगणातून नक्षत्रांचे सडे धरी सांडले असावे

असे नको भासवू प्रिये की तुला तुझी आयुधे न ठावुक
मला न शंका तुला बघोनी कुणी सुखे नांदले असावे

तसे तुझ्या कौतुका लिहाव्या कितीक गझला, कथा किती गे
उधार घेऊन शब्द कविने मनातले मांडले असावे

-काव्य सागर

त्रिवेणी- दारू

तुझी नशा अफाट होती 

या दारूपेक्षा सरसच तू
.
.
.
.
तू विकली जात नाहीस हे किती बरे आहे!

*************************

मला माणसांची किंमत कळते
दारूची तेवढी कळत नाही
.
.
.
.
चष्म्याचा नंबर वाढलाय बहुतेक!

************************

ग्लासात देशी आहे की इंग्लिश
याचा विचार करत नाही मी 
.
.
.
.
जाती-धर्माच्या विरोधातच आहे मी!

*************************

ग्लास अर्धा भरलाय असंही म्हणता येतं
ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं 
.
.
.
.
म्हणा काहीही, हा ग्लास बाटलीचा गुलाम आहे !

**************************

पुन्हा भेटशील तेव्हा जाब विचारेन तुला
तू दिलेल्या दु:खाचा हिशोब लिहून ठेवलाय
.
.
.
.
बियर बारच्या मालकाकडे रेकॉर्ड आहे सगळा!

-काव्य सागर

ओंजळ

त्या ओंजळ भर पाण्याने
अर्घ्य वाहिले असेल पहाटे पहाटे

त्या ओंजळ भर पाण्यातूनच
उगम झाला असेल एखाद्या गंगेचा

त्या ओंजळ भर पाण्यात
भर पडली असेल कुणाच्या आसवांची

त्या ओंजळ भर पाण्यात
आपला चेहरा पाहून लाजलेही असेल कोणी

त्या ओंजळ भर पाण्याने
शमली असेल तहान थकल्या-भागल्याची

त्या ओंजळ भर पाण्याने
झोप उडाली असेल कित्येक वर्षे झोपलेल्यांची

ओंजळ भर का असेना…
पण त्या पाण्याला जीवन ऐसे नाव आहे…

-काव्य सागर

घाव

जे जे हवे होते मला मी तेच होते टाळले

मी नेमके माझ्यातुनी तुजलाच होते गाळले

झाली किती स्मरणे तुझी झाल्या किती जखमा नव्या
नुसताच वारा लागला अन रक्त हे साकाळले

मी शोधले पत्ते तुझे थकवून सारी अंतरे
सांगे निखारा कालचा ज्याने नकाशे जाळले

आले नव्याने बहर हे आला तसा वारा पुन्हा
मी पाहता वळुनी पुन्हा सारेच होते वाळले

फसवून नियतीने दिल्या दु:खासवे मी रंगलो
मी घाव सोसत राहिलो बाकी उगा किंचाळले

-काव्य सागर

काळा चष्मा

या काळ्या चष्म्यामागून
पाहत जाईन तुला…

तुझ्या नजरेस नजर मिळवणे अवघड वाटले
तरी चोरून चोरून पाहीन तुला…

या काळ्या चष्म्याआड दडलेत डोळे
तुझा आदर करणारे…तुझ्यावर प्रेम करणारे…

कधीतरी तुझ्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहणारे वेडे डोळे…
आणि म्हणूनच उघड्या डोळ्यांनी
तुझ्याकडे पाहण्याची हिम्मतच होत नाही…

तू ओळखशील माझ्या डोळ्यांतील अपराधी भाव…
तुला दिलेल्या वचनांची पूर्तता न केल्याने आलेला अपराधीपणा

एव्हाना पर्यंत तू तो ओळखला असशीलच…
पण तरीही तो लपवण्याचा प्रयत्न आहेच…
स्वत:ला फसवत जगण्याचा प्रयत्न आहेच…
मिटल्या डोळ्यांनी हसण्याचा प्रयत्न आहेच…

 -काव्य सागर

कवितेपायी

कुठल्याश्या कवितेपायी 
मी विसरून गेलो तुजला 
हे भास असे प्रतिदिवशी
होतात सखे ग मजला
मी विसरून गेलो आहे
तुजवर रचल्या कविता
पण शब्द शब्द कवितेचे 
मी लिहिले तुझ्याचकरिता
तू सोडून मज जाताना
जी लकेर गाऊन गेली
त्या नाजूक वेलीवरती 
कवितेची फुले उमलली 
हे काय मला मग झाले 
कवितेचे वेडच जडले 
अन शब्द ओंजळीत घेता 
प्रतिबिंब तुझेच पडले 
 
पण कवितेचे दुर्भाग्य
ती सवत तुझी बघ झाली
अन याद तुझी जपताना 
माझ्यातच विलीन झाली 
-काव्य सागर

अणुबॉम्ब

बघेन बघेन आणि
एक अणुबॉम्ब टाकीन म्हणतो…

म्हणजे कसं एका झटक्यात
सारे रान मोकळे
म्हणजे एकदाच या जाचातून
साऱ्यांची सुटका होईल…

हा…तसं त्या असंख्य जीवांच्या
हत्येचे पाप लागेल मला…
पण चालायचेच !…
.
.
.
…घर स्वच्छ ठेवायचे
तर हे व्हायलाच हवे…
जाम उच्छाद मांडलाय
मुंग्यांनी घरात !
काहीतरी करायलाच हवे ना…!

-काव्य सागर

अश्वमेध यज्ञाचा घोडा

अश्वमेध यज्ञाचा घोडा
धावतो आहे…
गेली कित्येक वर्षे
वेड्यासारखा धावतोच आहे…
आणि आता वेगही वाढलाय त्याचा…
वाऱ्याशी स्पर्धा करत
सुसाट सुटलाय तो…
आता त्याला कसलीच पर्वा नाहीये…
वेग…वेग हवाय फक्त त्याला…
त्याला सोडणारा मात्र
कधीच काळाच्या पडद्याआड गेला…
पण या घोड्याला
त्याचा थांगपत्ताच नाही…
आणि त्याला हवे असलेले गाव
तर कित्येक कोस दूर राहिले आहे…
तो तरीही धावतोच आहे…
आता मागे वळून पहिले
तरी पाय मात्र मागे वळत नाहीत…
त्यांना सवय लागलीय
पुढेच जाण्याची…
वेळीच थांबले असते तर बरे झाले असते…

-काव्य सागर

प्रतिभा

अंतरंगात खोलवर कुठेतरी दडलेली
आणि वेळोवेळी मला छळणारी…ती प्रतिभा कुठे गेली ?

अंधारात चाचपडताना आशेचा किरण बनून
माझ्या रोमरोमी जळणारी…ती प्रतिभा कुठे गेली ?

कधी वसंत कधी शिशिर बनणारी
कधी आपुलेच रंग उधळणारी

आपल्याच धुंदीत जगणारी
सावलीहून अधिक साथ देणारी

कधी जगण्याचे साधन होणारी
कधी श्वासांची जागा घेणारी

दु:खात अधिकच उफाळून येणारी
आणि सुखात भरभरून देणारी

…एका अपघाताने का प्रतिभा नाहीशी होते ?
मी जिवंत आहे म्हणजे ती ही आहेच…!
प्रतिभा अशी मरणार थोडीच…
कदाचित मी गेल्यावरही असेल ती इथेच
माझ्या आठवणींची शिदोरी बनून…

-काव्य सागर

ती…

अजून ही मला खरं वाटत नाही
ती नाहीये हे मनास पटत नाही

आता काल-परवा पर्यंत ती होती
माझ्या अवती-भवती दरवळत
एखाद्या उमळत्या कळीप्रमाणे
मनात भिनलेली कळत-नकळत

ती होतीच तितकी सुंदर
कानात अजूनही आहेत तिचे बोल
तिची साथ म्हणजे जणू इंद्रधनू
प्रत्येक रंग त्याचा होता अनमोल

तिच हसणं तिच असणं
हे किती सुखद असायचं
गोजिर्‍या गाली तिच्या
फूलपाखरू हसायचं

तिचे श्वास हेच माझे आयुष्य
तिच्याविना मी कुठे जगत होतो
सुखाच्या सागरी निजावं तिने
हेच देवाकडे मागणं मागत होतो

पण ती खरंच एक कळी होती
कळीच आयुष्य ते केवढं
मूठभर पाणी हाती घेऊन
ती उघडल्यावर राहील तेवढं

चिमुकल्या हातांनी जन्मभराच्या
आठवणी देऊन गेली आहे
प्राण माझे ही घेऊन गेली
शरीर फक्त ठेऊन गेली आहे

– काव्य सागर

मी शेंगा खाल्ल्या नाही

मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले टाकली नाही
मी शिक्षा करतील म्हणुनी, ती कधी उचलली नाही

भवताली दंगा चाले, तो शांतपणे बघताना,
कुणी हसता-खिदळताना, कुणी गाणी ही म्हणताना
मी निवांत वाचत बसलो, भूगोलाचे पुस्तक जेव्हा,
मज चिडवायाला देखील, पण कुणी डिवचले नाही

बेशिस्त वर्ग हा आहे, एकाहून वरचढ येथे
येताच परीक्षा जवळी, चोरुनी फाडती पाने
पण खिशात माझ्या कुठली, कॉपी वा चिट्ठी नाही
मी वळून पाहिले नाही, वा पाहू दिले नाही

धुतले न अजून मजला, मी खोडी न केली काही
निकालावर सजून दिसते, बाबांची लांबशी सही
मी मनात नाही भ्यालो, मी कुणास नाही भ्यालो
मी घरात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

-काव्य सागर