All posts by Raj

सैराट झालं जी

लेख चित्रपटाबद्दल नाही कारण काही लिहायचं शिल्लकच नाही. सुरुवातीपासून ते क्लायम्याक्सपर्यंत सगळं काही…

इन्स्पेक्टर रीबस

एके काळी मला जड साहित्य वाचण्याची आवड होती. तो काफ्कावरचा लेख त्याच काळात लिहिला. हल्ली मला या प्रका…

अली

सहा महिन्यांपूर्वी जर मला कुणी सांगितलं असतं की तू बॉक्सिंगवर लेख लिहिणार आहेस तर मी त्याला वेड्यात …

डिसक्लेमर

हल्ली ब्लॉगचं वट्ट प्रॉडक्शन थांबलेलं आहे. याबद्दल लोकांनी विचारणाही केली, त्याबद्दल अनेक आभार. खरं तर कधी कधी मला हा ब्लॉग लोक अजूनही वाचतात याचंच आश्चर्य वाटतं. काही जुने लेख आता इतके बालीश वाटतात की डिलीट करण्यासाठी हात सारखा शिवशिवत असतो. माझं बहुतेक आयुष्य कॉस्मोपॉलिटन वातावरणात गेलं त्यामुळे शुद्ध मराठीच्या नावाने बोंब. बहुतेक र्‍हस्व दीर्घ अजूनही कळत नाहीत. वीस वर्षे हिंदी-उर्दू बोलणार्‍या मुसलमान शेजार्‍यांबरोबर काढली त्यामुळे मराठीवर हिंदीचा मोठा प्रभाव. अजूनही ‘मदत केली’ की ‘मदत झाली’ हे माझ्या मठ्ठ् डोक्यात शिरत नाही. असं सगळं असूनही लोक वाचतात याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

मराठी माणसाचा स्मरणरंजनाचा गुण माझ्यातही आहे. तो इतक्या पराकोटीला पोचलाय की आता त्याचा कालावधी तीन-चार वर्षांवर आला आहे. म्हणजे तेव्हा कसं विषय डोक्यात आला, लिहून टाकला असं व्हायचं. आता ते शक्य नाही. का? नुसतं सांगण्यापेक्षा उदाहरणे देतो म्हणजे स्पष्ट् होईल.

सध्या दोन-तीन विषय डोक्यात आहेत. पहिला म्हणजे बॉक्सिंग. पूर्वी मला बॉक्सिंगचा तिटकारा होता. रानटी खेळ यापलिकडे याबद्दल माहिती नव्हती. मग ‘रॉकी’चे पाच भाग बघितले, ‘रेजिंग बुल’ बघितला, ‘मिलियन डॉलर बेबी’ बघितला, ‘द फायटर’ बघितला आणि हळूहळू यातले बारकावे लक्षात यायला लागले. बॉक्सिंग म्हणजे फक्त मैदानात जाऊन धपाधप ठोसे हाणायचे असं नसतं, त्यामागे किती खोल स्ट्रॅटेजी असते हे समजलं. सध्या महंमद अलीचं आत्मचरित्र वाचतो आहे कारण तो आता माझा आवडता बॉक्सर झाला आहे. लेख लिहायला हा एक सुरेख विषय आहे. पण हा लेख लिहीला आणि लोकांच्या प्रतिक्रिया भलतीकडेच गेल्या तर वैताग येतो. ‘ह्याला बॉक्सिंग अचानक कसं काय आवडायला लागलं? म्हणजे मसल्सवाले उघडे पुरूष बघायला आवडतात की काय? तरीच पहिल्यापासून संशय होता. म्हणूनच अजून लग्न केलं नाही..इ.इ.’ आता मला ‘गे’ असण्याबद्दल कोणतीही गैरसमजूत नाही. ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे असं मी मानतो. मी ‘गे’ असतो तर जाहीर करण्यातही मला संकोच वाटला नसता.  संमती असेल दोन सज्ञान व्यक्ती काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र सुतावरुन स्वर्ग गाठून कुणाच्याही वैयक्तिक चॉइसबद्दल आपला आपणच निर्णय घेऊन मोकळं होणे हे मला पटत नाही. मला पिझ्झा आवडतो की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. मला अली आणि शकिरा दोघेही आवडतात पण शकिराबद्दल जे आकर्षण वाटतं ते अली किंवा इतर कोणत्याही पुरुषाबद्दल कधीही वाटणे शक्य नाही. आता याहून अधिक स्पष्टीकरण अशक्य आहे. इतकं सांगितल्यावरही लेख लिहीला तर लोकांचा संशय फिटेलच याची ग्यारंटी नाही. (काय दिवस आलेत च्यामायला! एखादा खेळ का आवडतो ह्यावर इतकी डोकेफोड करावी लागतेय. दिमाग का भाजीपाला होरेलाय मामू!! )

पुढचा इषय. एक सुंदर गझल आहे, तिचे निरनिराळे अर्थ लक्षात आले. त्यावर लिहायचं आहे. पण लेख लिहीला तर गझलेत जे आहे तेच माझ्या आयुष्यातही आहे असा समज करुन घेतला तर परत पंचाईत. म्हणजे समजा मी ‘हंगामा है क्यू बरपा’ वर लिहीलं तर याचा अर्थ मी रोज संध्याकाळी खंबा घेऊन बसतो असा कुणी काढला तर त्याला इलाज नाही.

तिसरा विषय. मला हिप-हॉप आणि रॅप विशेषतः ‘गँगस्टर रॅप’ पहिल्यापासून आवडतं. त्यात नुकताच ‘स्ट्रेट आउट ऑफ कॉम्प्टन’ हा चित्रपट बघितला आणि मनापासून आवडला. यावर एक उत्तम लेख होऊ शकेल. अडचण अशी की या प्रकारच्या संगीतात शिव्या अगदी खच्चून भरलेल्या असतात. ती संस्कृतीच तशी आहे. आता लेखात उदाहरण म्हणून एखादं गाणं दिलं आणि त्यातल्या शिव्या आपल्यासाठी आहेत असा समज कुणी करुन घेतला तर काय करायचं?

मला ‘रेव्हनंट’ फारसा आवडला नाही पण असं सांगणारा लेख मी लिहीला तर ज्यांना तो आवडला त्यांच्या मताविषयी कुठलाही अनादर नाही. आवडीनिवडी फार सापेक्ष असतात. निवडणुका झाल्यावर मी या सरकारला एक संधी देऊ या अशा प्रकारचा लेख लिहीला होता याचा अर्थ मी मोदी समर्थक आहे असा नाही. माझी मतेही रोज बदलत असतात. ओबामा सुरुवातीला प्रचंड आवडले, मग स्नोडेन प्रकरण झाल्यावर नावडले, सध्या ७५-२५, म्हणजे ७५ आवडतात. हे असं चालूच राहणार. त्या क्षणाला कोणतंही मत देणारा लेख लिहीला तर त्यामागे दुसरा कोणताही हेतू नसतो.

ब्लॉग लिहिणं मला आवडतं आणि फारसे चांगले लेख नसतानाही इतके लोक वाचतात याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अशा परिस्थितीत अशा सुरेख व्यासपीठाचा वापर कोणत्याही अंतस्थ हेतूसाठी करणे मला मान्य नाही. ब्लॉगवरचे लेख वाचताना त्यामागे केवळ त्या-त्या विषयावर मतप्रदर्शन इतकाच हेतू आहे.

आता इतके फिल्टर टाकल्यावर कोणते विषय उरले? रासायनिक खतांवर लिहावं ‘मोन्साटो’वाले धावून येतील. बालाजी तांब्यांवर लिहीलं तर विज्ञानवादी खवळतील. ‘बकर्‍यांची पैदास आणि निगा’ यावर लिहीलं तर व्हेगन लोक मोर्चा काढतील.

म्हणून काही न लिहिता स्वस्थ बसलो आहे. तुम्हाला एखादा निरुपद्रवी विषय सुचला तर सांगा. 

अंदाज अपना अपना

“गोगो मायबाप, ये भरी हुई पिस्तोल मुझे दे दो. “

संदर्भ लागला का? लागला तर हा लेख आवडू शकेल. लागला नाही तर कळायला जरा कठीण जाईल. काही काही यशस्वी विनोदी कलाकृतींचं एक वैशिष्ट्य असतं. त्यातल्या वाक्यांचे तुकडे कुठेही वापरता येतात. आणि अश्या कलाकृतींचे फ्यान भेटले की मग इतके तुकडे फेकले जातात की त्या कलाकृतींचं अभिवाचनच सुरू होतं. हा अनुभव मी अनेक अमरुंबरोबर घेतला आहे. ‘साइनफेल्ड’ आवडणारा अमरु भेटला तर त्याला/तिला फक्त “सरेनिटी नाऊ! ” इतकी सुरुवात पुरेशी होते. तसंच ‘अंदाज अपना अपना ‘चे संवाद त्याच्या फ्यान लोकांमध्ये अमाप लोकप्रिय आहेत. ‘अंदाज अपना अपना ‘ सध्याच्या काळातील एक ‘कल्ट मूव्ही’ आहे. प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचंही याकडे फारसं लक्ष गेलं नाही. हा चित्रपट लोकप्रिय होण्यात यूट्यूबचा मोठा वाटा आहे. ‘शोले’प्रमाणेच याचे संवादही भयानक लोकप्रिय झाले – फक्त भारतीयांमध्ये नव्हे तर परदेशी लोकांमध्येही. नंतर याच्या संवादाच्या मिम्स निघाल्या. आजही यावर लेख येत राहतात. ‘अंदाज अपना अपना’ का आवडतो याची कारणे दहा पाने भरतील इतकी आहेत.

आतापर्यंत आलेले हिंदी आणि मराठी विनोदी चित्रपट बघितले तर त्यात एक कथानक, त्यातले संघर्ष, अडचणी वगैरे आणि यात होणारे विनोद – बहुतेक विनोद प्रसंगाला अनुसरून. ‘अशी ही बनवाबनवी’मधला “धनंजय माने इथेच राहतात का? ” हा उत्कृष्ट विनोद आहे पण कथानकाचा संदर्भ नसेल तर तो विनोद राहत नाही. ‘अंदाज अपना अपना’ ने या परंपरेला छेद दिला. म्हणजे यात कथानकाला अनुसरून विनोद नाहीत असं नाही, पण तितकेच किंवा जास्त विनोद कथानकावर अवलंबून न राहता स्वतंत्र आहेत. आणि ‘अंदाज अपना अपना’चं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटात न दिसलेला विषय यात विनोदासाठी वापरलेला दिसतो, तो म्हणजे हिंदी चित्रपट. हॉलिवूडमध्ये ‘पॅरडी’, ‘स्पूफ’ या प्रकारातील स्वत:चं विडंबन करणारे चित्रपट भरमसाठ गर्दी खेचतात. ‘ऑस्टीन पॉवर्स’ मालिकेमध्ये ‘गॉडफादर’पासून ‘स्टार वॉर्स’पर्यंत एकाही चित्रपटाला सोडलेलं नाही. नेहमीप्रमाणे इथेही आपल्या दिग्दर्शकांचं कल्पनादारिद्र्य दिसतं. हिंदी चित्रपट हा विनोदाचा कधीही न संपणारा खजिना आहे तरीही आजपर्यंत एकाही दिग्दर्शकाला याचा वापर करावासा वाटला नाही. ‘अंदाज अपना अपना’ने हे केलं आणि यशस्वीपणे केलं.

या चित्रपटात वरवरचं एक कथानक आहे – ते ही तद्दन फिल्मी. एक राजकुमारी वर शोधायला परदेशातून येते, मग दोन हीरो, जुळ्या भावांची कहाणी इ. इ. पण हे चालू असताना राजकुमार संतोषी हिंदी चित्रपटांची मनसोक्त रेवडी उडवत राहतो आणि संगीतापासून मारामारीपर्यंत एकाही विषयाला सोडत नाही. यातली काही गाणी आधीच्या गाण्यांची विडंबनं आहेत. ‘ए लो जी सनम’ ओ. पी. नय्यरच्या शैलीत आहे. ‘दिल करता है’ गाण्यात प्रत्येक कडव्यात आमिर धर्मेंद्र, जितेंद्र, शम्मी कपूर यांच्या नाचण्याच्या शैलीची नक्कल करतो. चित्रपटात दोन प्रकारचे कलाकार आहेत. मेहमूद, केश्तो, परेश रावल, देवेन वर्मा यासारखे कसलेले आणि आमिर, सलमान, रवीना आणि करिष्मा यांच्यासारखे यथातथा, त्यातल्या त्यात आमिर जरा बरा. पण यामुळे चित्रपटाला बाधा येत नाही कारण हा चित्रपट ‘फार्सिकल’च्या अंगाने जाणारा आहे. त्यामुळे हीरो-हिरविणींचा ‘ओव्हर-द-टॉप’ अभिनय सहज खपून जातो.

काही शब्द जात्याच विनोदी असतात, ते ऐकल्यावर आपसूक, काही कारण नसताना हसायला येतं. ‘साइनफेल्ड’च्या प्रेक्षकांना त्यात कोणता शब्द विनोदी आहे यावर बरेचदा केलेली चर्चा आठवत असेल. ‘अंदाज अपना अपना’च्या संवाद लेखकांना याची अचूक जाण आहे आणि त्यामुळे त्यांनी अगदी नेमके हसू येणारे शब्द वापरले आहेत. उदा. “मेरे अंदर बहोत से आयडीयाज है जो बाहर आने के लिये उछल रहे है, फुदक रहे है”. इथे ‘फुदक’च्या ऐवजी इतर कोणताही शब्द वापरला असता तरी वाक्य सपाट झालं असतं. किंवा ‘मुष्टंडो, यहां आओ’! याचप्रमाणे यमक जुळवूनही विनोद केला आहे. ‘होजा, तेजा, होजा’ किंवा ‘पिलो, खेलो’.

सूक्ष्म विनोद. बहुतेक चित्रपटांत (यात हॉलिवूडचेही आले) एखादा विनोद झाला तर दिग्दर्शक तो विनोद ठळकपणे प्रेक्षकांसमोर कसा येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. संतोषी काही वेळा याच्या उलट करतो. ‘अंदाज अपना अपना’मध्ये काही विनोद इतके सूक्ष्म आहेत की क्षणभर तुमचं लक्ष फोनवर गेलं तर विनोद सहज सुटून जाईल. उदा. सुरुवातीला जूही म्हणते, “मै कितनी खुशनसीब हूं जो आपके मजबूत कंधों का सहारा मुझे मिला” आणि बरोबर ‘क्यू’वर आमिर स्वत:च्या खांद्यांकडे ‘सेल्फ कॉन्शस’ होऊन बघतो. किंवा आमिर हाटेलात जातो, तिथे त्याला एक कामगार भेटतो. त्यांच्या दोन मिनिटांच्या संवादात एक सूक्ष्म विनोद आहे. लक्षात आला नसेल तर परत बघा.

‘अंदाज अपना अपना ‘चा विनोद हा एखाद्या दहा हजार फटाक्यांच्या लडीसारखा आहे. कोणत्याही प्रसंगात अनेक प्रकारचे विनोद एकामागून एक येत राहतात. उदा. शेवटी अमर आणि प्रेम गोगोच्या अड्ड्यावर जातात तो प्रसंग. इथे किती विनोद आहेत पहा. प्रत्येक विनोदाच्या जागेवर * अशी खूण केली आहे.

अमर आणि प्रेमचे हात वर असतात – गोगो : हँड्स अप – हात खाली* – हँड्स अप – हात परत वर – अमर : उपर ही तो थे* – गोगो :फॉलो मी आणि स्वत: पुढे जातो. अमर, प्रेम मागून येतात* – गोगो अडखळतो – “गोगोजी, आपका घागरा*”, “उठाता हूं*” – आता गेल्यावर अमर आणि प्रेम सगळ्या गुंडांना नमस्ते करतात. *

ही एक झलक आहे, हे असंच चित्रपटभर चालू राहतं. चित्रपटात इतर चित्रपटांचे संदर्भ इतके आहेत की यामुळेच कथानक दुय्यम होतं आणि या चित्रपटाला एक स्वतंत्र अस्तित्व मिळतं. शेवटचा प्रसंग शोलेच्या क्लायमॅक्सचं विडंबन आहे. तिथे हेमामालिनीला बांधलेलं असतं, इथे रवीना आणि करिश्माला. “तुम्हारा नाम क्या है रवीना? ” हा संवाद सरळ ‘शोले’तुन घेतला आहे. आमिर आणि सलमान दोघांच्या चित्रपटांचे संदर्भही येतात, सलमानच्या पहिल्या चित्रपटात त्याचं नाव प्रेम होतं. शिवाय दोघांचं नाव एकत्र हा आणखी एक चित्रपट. ‘वाह-वाह प्रॉडक्शन्स’ हे मेहमूदच्या संस्थेचं नाव होतं. गोगो हा गब्बर, मोगॅम्बो, शाकाल अशा अनेक खलनायकांचं मिश्रण आहे. सुरुवातीच्या ड्रीम सीक्वेन्समध्ये सनीपासुन गोविंदा आणि शाहरुखपर्यंत सगळे येऊन जातात.

इथपर्यंत असतं तर ‘अंदाज अपना अपना’ एक उत्तम चित्रपट ठरला असता. पण शेवटच्या एका प्रसंगात राजकुमार संतोषी जी धमाल करतो त्यामुळे हा चित्रपट ‘अब्सर्ड’च्या पातळीला पोचतो आणि म्हणूनच उत्कृष्ट ठरतो. शेवटी जी मारामारी आहे ती तद्दन फिल्मी आहे, ‘ढिशुम-ढिशुम’ वगैरे आवाजांसकट. हे काही वेळ चालू राहिल्यावर बहुधा संतोषीला कंटाळा येतो. गोगो आणि प्रेम समोरासमोर येतात तेव्हा ते एकमेकांना स्पर्श न करता कुंग-फू च्या स्टाइलमध्ये स्टान्स घेतात आणि हवेत एकमेकांवर वार करतात. नंतर एखाद्या प्रायोगिक नाटकाप्रमाणे ही हवेतील ‘कुंग-फू-नागिन डान्स’ स्टाइल मारामारी चालू राहते. कहर म्हणजे या दरम्यान एक गुंड येतो त्याला प्रेम नेहमीसारखा ठोसा मारतो आणि परत नागिन डान्स सुरू. इथे जणू संतोषी आपल्याला सांगतो आहे की हा चित्रपट गंभीरपणे घ्यायचं अजिबात कारण नाही. इतक्या उच्च दर्जाचा ‘अब्सर्ड’ विनोद मी फक्त माईक मायर्सच्या ‘ऑस्टीन पॉवर्स’ चित्रपटात बघितला आहे.

‘अंदाज अपना अपना’ फसवा चित्रपट आहे. त्याचं रुपडं तद्दन फिल्मी, कमर्शियल आहे पण याचा अर्थ त्यावर मेहनत घेतलेली नाही किंवा त्यात गुणवत्ता नाही असा नाही. राजकुमार संतोषीने आपल्या करियरची सुरुवात गोविंद निहलाणी यांच्याकडे केली. ‘अर्धसत्य’ आणि ‘पार्टी’ यासारख्या जबरदस्त चित्रपटांचा तो सहाय्यक दिग्दर्शक होता. चांगला चित्रपट कोणता याची त्याला पुरेपूर जाण आहे. ‘अंदाज अपना अपना’ काळाच्या पुढे होता, त्यामुळे तत्कालीन प्रेक्षकांना त्याची पारख करणं जमलं नाही. आणि इथेच हा चित्रपट १९९४ मध्ये का लोकप्रिय झाला नाही याची कारणे दिसतात. त्या काळात भारतात इंटरनेट नव्हतं. बहुतेक भारतीय प्रेक्षकांना जगभरातील चित्रपटांची ओळख जवळजवळ नव्हती. १९९४ चा सर्वात हिट चित्रपट होता बडजात्याचा ‘हम आप के है कौन? ‘ इतक्या गुळचट चित्रपटांची सवय असलेल्या प्रेक्षकांना विडंबन, ‘पॅरडी’, ‘स्पूफ’ आणि ‘अब्सर्ड’ विनोद यांनी भरलेला ‘अंदाज अपना अपना’ आवडला नाही यात विशेष ते काय? मग वीस वर्षांनी ‘अंदाज अपना अपना’ लोकप्रिय होण्याचं कारण काय? एक मुख्य कारण – इंटरनेट. भारतीय प्रेक्षक – विशेषत: तरुण पिढीला या काळात जगभरचे असंख्य चित्रपट बघायला मिळाले. दरम्यान ‘सत्या’ ने नवीन हिंदी चित्रपटाची सुरुवात केली. या सर्व खुराकावर तयार झालेल्या प्रेक्षकाला वेगळ्या साच्यातील हा चित्रपट आवडून गेला. तरुण पिढीने चित्रपट डाउनलोड करण्यावरून बरीच टीका होत असते. मात्र गेल्या वीस वर्षात या पिढीच्या अभिरुचीत जो आमुलाग्र बदल होतो आहे त्यात टोरेंटचा मोठा वाटा आहे हे मान्य करायलाच हवं.

—-

१. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा रहिवासी.

टोपीकरावर स्वारी

मराठी ब्लॉग बघितल्यावर अमराठी लोकांची पंचाइत होते. गूगल ट्रान्सलेटचा अनुवाद इतका भयानक असतो की विचारता सोय नाही. म्हणून आता इंग्रजी भाषेत एक ब्लॉग सुरु केला आहे. यात विषय बहुतेक तेच असतील. किंबहुना मराठीतील काही लेखांचा इंग्रजी अनुवाद करण्याचाही विचार चालू आहे. पण हे करत असताना एक गंमत झाली. मराठी लेखाचा जसाच्या तसा अनुवाद बरोबर वाटत नव्हता, म्हणून मग मुख्य मुद्दे ठेवून इंग्रजीत स्वतंत्र लेख लिहायला घेतला तर तो इतका बदलला की माझं मलाच आश्चर्य वाटलं. म्हणजे एखादी गोष्ट आपण कशी सांगतो हे ती कोणत्या भाषेत सांगतो यावरही अवलंबून असतं१,. इंग्रजीत लिहिताना असे मुद्दे सुचले की जे मराठीत लिहिताना कधीही सुचले नाहीत. म्हणजे स्वतःच स्वतःला “हे आधी का नाही सांगितलं” असं विचारायची पाळी आली. तर एकूणात मजा येणार असं दिसतं आहे. याखेरीज इंग्रजीत बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. प्रत्येक चित्रपटाचं नाव ‘कोटात’ घालायची गरज नाही कारण मराठीत इटालिक्स फाँटचं जसं भजं होतं तसं इंग्रजीत होत नाही, तो सुबकच राहतो.

ब्लॉगवरची पहिली पोस्ट ‘द मार्शियन’ या चित्रपटावर आहे. ब्लॉग बघताना, वाचताना काही अडचणी आल्या किंवा काही सूचना असल्या तर प्रतिसादात कळवाव्यात.

ब्लॉगचा दुवा : https://rajksite.wordpress.com/

 —-
१. Does Your Language Shape How You Think? 
२. HOW DOES OUR LANGUAGE SHAPE THE WAY WE THINK? 

सनसनी खेज खबर : मिष्टर ब्लॉगर का पर्दाफाश!!

आमच्या ब्लॉगला बक्षीस मिळाल्याच्या बातमीकडे पाहून ओबामांनी नाक मुरडल्याची बातमी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने न छापल्याने आम्हाला कळली. तसेच बुर्कीना फासो येथील मेंढी-बकरी उत्पादन, नियोजन आणि संवर्धन मंडळाने ब्लॉगचा निषेध केल्याची बातमी आमच्या नजरेतून सुटली नाही. या विरोधी आवाजांचे प्रतिनिधित्व म्हणून आम्ही सैतानाचा वकील होऊन आमचीच मुलाखत घ्यायची ठरवली. इथे आम्ही कोणताही मुलाहिजा न राखता आमच्यावर रोखठोक शब्दात टीका केली.

सैतानाचा वकील : तुमच्या ब्लॉगवर अनेक विषयांवरचे लेख दिसतात. वाट्टेल त्या विषयावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
आम्ही : याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे आमचा जन्म झाला तेव्हा आम्ही सुईणबाईंना “रडून दाखवायला हा काय रोशन तनेजाचा क्लास आहे का? उगीच आम्हाला उलटं-पालटं करण्याच्या भानगडीत पडलात तर याद राखा!” असं सांगून झीट आणली होती. पुढे बालवाडीत प्रवेश घेताना मुख्याध्यापिका बाईंनी दोनचा पाढा म्हणायला सांगितल्यावर आम्ही “पाढ्याचं नंतर बघू, आधी तुमचं बी. एड.चं सर्टिफिकेट दाखवा!” असं बाणेदार उत्तर दिलं होतं. आजही आम्ही इराण प्रश्नावर ओबामांना, युक्रेनवर पुतिनला आणि कोणत्याही विषयावर मोदींना सल्ले देतच असतो. जे गहन प्रश्न अनेक मुत्सद्द्यांना वर्षानुवर्षे वाटाघाटी करूनही सोडवता येत नाहीत ते आम्ही चहाला उकळी यायच्या आत सोडवतो यावरून आमची प्रतिभा लक्षात यावी. आणि यामागचं कारण जिथे आमचा जन्म झाला ते स्थान आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर..

सै. व. : टू लेट
आम्ही : टोमणे मारू नका, आमच्या विचारशृंखलेत व्यत्यय येतो. तर आमचा जन्म सर्व भारताचं भूषण असलेल्या पुण्यनगरीत (इथे एका नटाची आठवण झाल्यास तो अपघात नाही. त्या नटाचा अभिनय आणि पुण्यनगरीची आजची अवस्था दोन्हीही दारुण आहेत.) झाल्यामुळे कोणत्याही विषयावर बोलायचाच नव्हे तर चर्चा करण्याचा, लेख आणि खरमरीत प्रतिसाद लिहिण्याचा अधिकार आम्हाला
जन्मापासूनच मिळालेला आहे.

सै. व. : तुम्ही आत्मकेंद्रित आहात असं काहींचं किंवा बऱ्याच लोकांचं, रादर सगळ्यांचंच मत आहे.
आम्ही : मतांकडे लक्ष द्यायला मी काही राजकारणी नाही (“अहाहा!”, “आई ग्ग!”, “जियो!”, “क्या बात है!”, “तोडलंस मित्रा!”, “फुटलो!”, “टांगा पलटी, घोडे फरार!” इ. इ.).

माझ्या ब्लॉगवर माझे विचार मांडण्याचा मला पूर्ण हक्क आहे. माझ्या मते मला हे स्वातंत्र्य घटनेनेच दिलेलं आहे. माझ्या ब्लॉगवर माझे विचार, माझे छंद, माझ्या आवडीनिवडी, माझी आवडती पुस्तकं, माझे आवडते चित्रपट, मला आवडणारं संगीत, माझे आवडते कलाकार, मला आवडणाऱ्या विचारधारा, माझ्या आवडीचं तत्त्वज्ञान हे सगळं नसेल तर काय शाहीद कपूरची आवडती रेसिपी असणार? बरं, प्रश्न काय होता?

सै. व. : त्याची गरज नाही. उत्तर मिळालं. पण तुमच्या अश्या वागण्यामुळे लोक दुखावले जातात असं वाटत नाही का?
आम्ही : या प्रश्नाचं उत्तर अनेक रीतीने देता येईल. उदा. आंतरजालावरचं एका सुरेख कोट घ्यावं, त्याला सूर्यास्त, समुद्र, जंगल अशा पार्श्वभूमीवर टाकावं. कोट जितकं जास्त मोघम तितकं चांगलं. उदा. हे कोट बघा.

या कोटचं वैशिष्ट्य असं की जगातल्या प्रत्येक माणसाला ‘हे आपल्याला किती फिट्ट बसतंय नै?’ असं वाटत राहतं. आणि इथवर येईस्तोवर प्रश्न काय होता हे विसरून गेलात की नै? असंच दुसरं एक वाक्य म्हणजे ‘तुम्ही खूप सोसलंय आजपर्यंत’.

सै. व. : हल्ली तुमचे लेख वर्तमानपत्रे, मासिके इ. ठिकाणी छापून येत आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
आम्ही : यात काही विशेष आहे असं आम्हाला वाटत नाही. अर्थात असं वाटण्याआधी आम्ही लेखाच्या पन्नास प्रती मागवतो. त्यातली एक फ्रेम करून घरात लावतो, बाकीच्या शेजारीपाजारी वाटतो. लेख पीडीएफपासून ते जेपेगपर्यंत सगळ्या फॉरम्याटमध्ये सेव्ह करून आमच्या सगळ्या कॉन्टॅक्टना पाठवतो, पिंटरेस्टपासून ट्वीटरपर्यंत सगळीकडे शेअर करतो. दोन तासांनी “लेख वाचला का?” म्हणून इ-मेल करतो. एका तासाने ईमेल पाहिली का असं व्हॉट्सअ‍ॅप करतो. त्याला उत्तर नाही आलं तर फोन करतो. किंवा जवळ असेल तर घरी जाऊन येतो. मग लोक आम्हाला टाळू लागतात, आम्हाला पाहून रस्ता बदलतात. मग आम्हाला (तात्पुरती) विरक्ती येते. मग आम्ही (तात्पुरतं) थांबतो.

सै. व. : हे थोडं किंवा फारच अग्रेसिव्ह आहे असं वाटत नाही का?
आम्ही : हे तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगितलं म्हणून तसं वाटतंय. त्याऐवजी ‘असर्टीव्ह माकेटिंग विद प्रोअ‍ॅक्टिव्ह अप्रोच : अ पॅराडाइम शिफ्ट’ असं नाव देऊन, ‘पॉलिसी ड्रिव्हन नेटवर्किंग’, ‘सिनर्जी बेस्ड ऑन एम्पथी’,  अशा शब्दांची पेरणी करून, सरळ रेषेत बसवलेल्या ३२ पैकी २८ दात दाखविणाऱ्या मॉडेल्सच्या चित्रांबरोबर छापलेलं पॅम्फ्लेट तुम्हाला पाठवलं असतं तर हजारो रुपडे भरून झकत प्रवेश घेतला असतात. आम्हीही घेतला. हे ज्ञानकण आम्हाला आयआयपीएमच्या बरुआ सरांनी ‘माकेटिंग : अ वे ऑफ लाईफ’ हा कोर्स शिकवताना दिले. आता आयआयपीएमचं दिवाळं वाजल्यानंतर – आय मीन रिस्ट्रक्चरिंग झाल्यानंतर – ते जगभर फिरत असतात. लास वेगासपासून टोक्योपर्यंत सगळीकडे वाइन पीत ‘सिनर्जी बेस्ड असर्टीव्ह माकेटिंग’ करतानाचे फोटो ते अधनंमधनं टाकत असतात, आम्ही भक्तिभावाने लाइक करतो. पुलंनी म्हटल्याप्रमाणे ‘गुरुशिवाय कोण वाट लावणार?’

सै. व. : तुम्ही ब्लॉग का लिहिता?

आम्ही : कोट डालने का टाईम आ गया! सब चीज टाईम टू टाईम होनी चाहिये.

सै. व. : हे पहा मिष्टर ब्लॉगर, तुम्ही उत्तर टाळत आहात. आन्सर मी, मिष्टर ब्लॉगर!! व्हाय आय यु रनिंग फ्रॉम द ट्रुथ? द वर्ल्ड इज वेटींग फॉर युअर आन्सर!! यू कॅनॉट हाइड, मिष्टर ब्लॉगर!! आन्सर मी, मिष्टर ब्लॉगर!!
आम्ही : हे अचानक काय झालं तुम्हाला?
सै. व. : सॉरी, मधूनमधून अर्नब अंगात येतो. बरं, शेवटचे काही विचार? थोडक्यात बरं का..
आम्ही : शेवटचे म्हणजे ?? अहो, असं भलतंसलतं बोलू नका. तर आजच्या धकाधकीच्या जीवनात चहू बाजूंनी होणाऱ्या संवेदनांच्या किरमिजी कोंडमाऱ्याला यशस्वीपणे सामोरं जायचं असेल तर त्या संवेदनांच्या जांभळ्या आयामांची परिवर्तने लक्षात घ्यायला हवीत. आणि ही बर्गंडी परिवर्तने कुठे दिसतात? हिरव्या पानावरच्या दवबिंदूत, मग त्या पानाच्या घेतलेल्या २७ फोटोंमध्ये, त्या फोटोंना आलेल्या १६७ लाइक्समध्ये.  तर फोरस्क़्वेअरपासून उबरपर्यंतच्या या आधुनिकतेच्या संक्षेपणाला, विक्षेपणाला, प्रक्षेपणाला आणि नुसत्याच क्षेपणाला मराठी माणूस ग्रहणक्षम, संवेदनक्षम, कार्यक्षम आणि सक्षम आहे का हा आजचा धगधगता, ज्वलंत, ज्वालाग्राही आणि पेटता प्रश्न आहे.

सै. व. : ‘थोडक्यात’ या साध्या शब्दात न कळण्यासारखं काय आहे? असो, धन्यवाद.

—-

आजच्या ‘सकाळ टाइम्स’मध्ये आमची मुलाखत आली आहे.

आणि आजच्या ‘मी मराठी लाइव्ह’मध्ये एक लेख आला आहे.

वरच्या लिंका चालत नसतील तर प्रतिसादात इ-मेल द्यावा, मी पीडीएफ पाठवतो. किंवा पुण्यात असलात तर पत्ता द्या, पोस्टाने पाठवतो. किंवा वाचण्याचा वेळ नसेल तर घरी येऊन वाचून दाखवतो. किंवा घरी वेळ नसेल तर ऑफिसचा पत्ता द्या, तिथे येऊन वाचून दाखवतो. किंवा व्हिडिओ ब्लॉग करतो. किंवा पॉडकास्ट करतो. किंवा स्नॅपचॅटवर पाठवतो.

‘सिनर्जी बेस्ड असर्टीव्ह माकेटिंग’!
‘अपने पैरों पे खडा हो जा, तेजा! हो जा!’

मराठी अस्मितेच्या डुलक्या

परवा ब्लॉगरच्या ड्याशबोर्डवर फेरफटका मारताना ही नोटीस दिसली.

ज्यांना अ‍ॅड्सेन्सबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी : गूगल सुरुवातीला फक्त सर्च इंजिन होतं, त्याचं आज जे महाकाय रूप आहे ते होण्यासाठी त्यांनी टाकलेलं पहिलं यशस्वी पाऊल म्हणजे गूगल अ‍ॅड्सेन्स. याद्वारे आंतरजालावर जाहिराती सर्वप्रथम गूगलने आणल्या. यात आजपर्यंत एकाही भारतीय भाषेचा समावेश नव्हता. मागच्या वर्षी गूगलने यात हिंदीचा समावेश केला. म्हणजे आता जर तुमचा ब्लॉग हिंदीत असेल तर त्यावर तुम्ही गूगलच्या जाहिराती टाकू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला पैसे मिळू शकतात. या निर्णयामागे सुंदर पिचई यांचा सहभाग नक्कीच असणार. आणि याचा अर्थ इतरही भारतीय भाषांना हळूहळू गूगल समाविष्ट करून घेईल असं मानायला जागा आहे.  म्हणजे मराठीलाही ‘अच्छे दिन’ आले, बरोबर? बरोबर? चूक!!

मराठी अस्मिता जागी आहे की दिवसाला दहा तास झोपा काढते आहे याच्याशी गूगलला काहीही देणंघेणं नाही. त्यांना मतलब आहे पैक्याशी. ज्या भारतीय भाषांच्या ब्लॉगवर जास्तीत जास्त वर्दळ दिसेल त्यांना गूगल मान्यता देणार, कारण तिथे त्यांच्या जाहिराती जास्तीत जास्त बघितल्या जाणार. आणि इथेच घोडं दहा किलो पेंड खातं. मराठी ब्लॉग आणि बहुतेक मराठी माणसं यांची फारकत का आहे याचा इथे शोध घेण्याचा प्रयत्न आहे. अर्थात इथे हिंदी भाषिकांची संख्या मराठीपेक्षा बरीच जास्त आहे हा मुद्दा विसरून चालणार नाही पण ती संख्या सारखी असती तरी फारसा फरक पडला नसता.

ब्लॉग हे माध्यम नवीन होतं तेव्हा मराठीत अनेक लोक उत्तम लिखाण करत असत, रोज नवीन लेख वाचायला मिळायचे. नावीन्य संपलं तसे बहुतेक मोहरे गळाले. आजही नवीन लोक ब्लॉगकडे वळत आहेत, मात्र प्रश्न फक्त ब्लॉग सुरू करण्याचा नाही तर तो चालू ठेवण्याचा आहे. ब्लॉग नवीन होते तेव्हा लोकांना व्यक्त होण्यासाठी फारशी व्यासपीठं नव्हती, बहुतेक मराठी सायटी बाल्यावस्थेतच होत्या. हळूहळू सायटी वाढायला लागल्या तशी बहुतेक लोकांची पसंती तिकडे लेख प्रकाशित करण्याला होती. कारणे उघड आहेत. ब्लॉगचा वाचकवर्ग तयार व्हायला वेळ लागतो, सायटींवर वाचकवर्ग तयार असतो. बहुतेक लेखांना भरभरून प्रतिसाद मिळतात, लेखकाला बरं वाटतं.

यातला तोटा असा की तुमची ओळख इथे फारशी महत्त्वाची नसते. म्हणजे असं की तुमचा लेख कितीही चांगला असला तरी एका महिन्याने तो सायटींवर येणाऱ्या लेखांच्या गर्दीत दिसेनासा होतो. एका महिन्याने सायटींवर येणाऱ्या नवीन माणसाला तुमच्या लेखाबद्दल काहीही कल्पना नसते. सध्या अनेक लोकांचे लेख वर्तमानपत्रे किंवा मासिकांमध्येही येतात. तिथेही हीच परिस्थिती आहे. सहा महिने उलटून गेल्यावर वर्तमानपत्रातील तुमचा लेख कोण वाचणार? या कारणासाठी माझी ब्लॉग या माध्यमाला पसंती आहे. इथे तुमची स्वत:ची अशी ओळख निर्माण होते. आजही ब्लॉगवर येणारे नवीन वाचक परत परत येतात आणि जुने लेख वाचून आवडल्याचं सांगतात. काही लोक दोन्ही डगरींवर पाय ठेवतात, म्हणजे लेख सायटींवरही टाकतात आणि ब्लॉगवरही. पण हे काही खरं नाही. इथे ब्लॉगचा उपयोग फक्त एक बॅकअप म्हणून केला जातो. लेख इतरत्र वाचल्यावर तुमच्या ब्लॉगकडे लोक कशाला फिरकतील? साहजिकच ब्लॉगवरची वर्दळ नगण्य आणि गूगलच्या दृष्टीने असे ब्लॉग ‘डॉर्मंट’.

ब्लॉग ही एकांड्या शिलेदाराची मनसब आहे.

माणूस समाजप्रिय आहेच पण मराठी माणूस जरा जास्तच. टिळकांना हे समजलं होतं म्हणूनच गणेशोत्सव इतका लोकप्रिय झाला. चार डोकी जमवून सहलीपासून संमेलनापर्यंत सर्व गोष्टी करणे मराठी माणसाला आत्यंतिक प्रिय. या चौकटीत ब्लॉगलेखन बसत नाही. ब्लॉग ही एकांड्या शिलेदाराची मनसब आहे. इथे मशागतीपासून पेरणीपर्यंत सगळं आपणच करायचं. पीक यायलाही वेळ लागतो. सहा महिने, वर्ष थांबायला वेळ आहे कुणाला? त्यापेक्षा सायटींवर दोन दिवसात शंभर-दोनशे प्रतिसाद येतात. सगळा इन्स्टन्टचा जमाना आहे. ब्लॉग म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि सायटी म्हणजे टी-२०.

याचा अर्थ लोकांनी वर्तमानपत्रात, सायटींवर लिहू नये का? अजिबात नाही, कुणी कुठे लिहावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. ब्लॉग माझं आवडतं माध्यम आहे आणि हिंदीत ते इतकं लोकप्रिय होत असताना मराठीत त्याचं असं भजं का झालं हे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. हिंदीत असलेल्या सगळ्या ब्लॉगांची यादी देत नाही, वानगीदाखल प्रसिद्ध कवी अशोक चक्रधर यांचा ब्लॉग बघा. मराठीत किती लेखकांचे ब्लॉग आहेत यांची यादी केली तर बहुधा दोन-तीन बोटंही पुरावीत. हेच इतर कलाकार, अभिनेते, खेळाडू यांच्या बाबतीत. मराठीतील अभिनेते आणि विशेषकरून अभिनेत्री वर्तमानपत्रात आवडीने लिहितात, पण मग आपली स्वत:ची ओळख म्हणून आपली साईट असावी असं त्यांना का वाटत नाही? इथे नुसता वयाचा मुद्दा पुढे करून चालणार नाही. अशोक चक्रधरही जुन्या पिढीचेच आहेत, ते ट्विटरवरही सक्रिय असतात. त्यांना स्वत:मध्ये हा बदल करणं जमतं, मग मराठी कलाकारांना का जमत नाही?

ट्विटरवरून आठवलं, ब्लॉगप्रमाणेच मराठी माणूस इकडेही फारसा फिरकत नाही. मागे एका मित्राशी चर्चा करताना हा विषय निघाला होता. जगातील बहुतेक प्रसिद्ध बुद्धिबळपटू ट्विटरवर आहेत. कोणतीही स्पर्धा चालू असेल तर त्यावर त्यांची मते ट्विटरवर वाचायला मिळतात. आनंद-कार्लसन जागतिक बुद्धिबळस्पर्धा चालू असताना त्यातील प्रत्येक खेळीवर कास्पारोव्ह, पोलगर भगिनी, अरोनियन, नाकामुरा यांची रनिंग कॉमेंट्री वाचणे म्हणजे जणू ‘गॉडफादर’ बघताना कपोलाने शेजारी बसून समजावून देण्यासारखं आहे. (‘गॉडफादर’च्या स्पेशल डीव्हीडीमध्ये कपोलाची प्रत्येक प्रसंगावर कॉमेंट्री  आहे.) असं असूनही ट्विटरवर एकही मराठी बुद्धिबळपटू नाही. प्रवीण ठिपसे, रघुनंदन गोखले, अनुपमा गोखले, जयंत गोखले कुणीही ट्विटरवर फिरकलेलेही कधी दिसले नाहीत. असं का?

यामागची माझी कारणमीमांसा अशी आहे- हीच बरोबर आहे असं नाही. पटली तर ठीक, नाही तर सोडून द्या. आधी म्हटल्याप्रमाणे मराठी माणूस उत्सवप्रिय आहे. ‘मी एकटा अमुक करेन’ असं म्हणण्यापेक्षा ‘आपण चार जण मिळून हे करू’ असं म्हटलं तर त्याला हुरूप येतो आणि तो चटकन तयार होतो. याचाच पुढचा भाग म्हणजे जिथे संवाद जास्त आणि मोकळा होतो तिथे तो ओढला जातो. ब्लॉग आणि ट्विटर दोन्हीकडे संवादावर मर्यादा आहे, याउलट फेसबुक किंवा सायटींवर मेगाबायटी संवाद होतात. चर्चा करणे हा मराठी माणसाचा आणि एकुणातच भारतीयांचा आवडता छंद आहे. (रोज इतक्या चर्चा होतात यापेक्षा मला लोक प्रत्येक विषयावर इतक्या ठामपणे कसं बोलू शकतात याचं आश्चर्य वाटतं. गर्भपात कायदेशीर आहे की नाही यापेक्षा हाटेलात काय मागवायचं या निर्णयाला जास्त वेळ लागतो.)

तर आहे हे असं आहे. हिंदीत ब्लॉग लोकप्रिय होत आहेत. लवकरच अ‍ॅड्सेन्स इतर भारतीय भाषांमध्येही येईल. आपण मोबाइलऐवजी भ्रमणध्वनी वापरून मराठी भाषेचं संवर्धन कसं करता येईल यावर चर्चा करत राहू. ही टीका नाही तर ब्लॉगसारख्या सुंदर माध्यमाची ताकद आपल्याला ओळखता आली नाही याबद्दलची खंत आहे.
—-
१. अमेरिकेतील रो वि. वेड या गर्भपातावरील प्रसिद्ध केसबद्दल बिल क्लिंटन यांचे मत – “I made them delve deeper, because I thought then, and still believe, that Roe v. Wade is the most difficult of all judicial decisions. Whatever they decided, the Court had to play God.” 

शार्लि एब्दो आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य

पॅरिसमध्ये नुकताच ‘शार्लि एब्दो’ या मासिकाच्या कार्यालयावर अतिरेक्यांनी हल्ला केला. यात मासिकाचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारले गेले. मासिकाने मुसलमान धर्माची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रे प्रकाशित केल्यामुळे हा हल्ला करण्यात आला असा प्राथमिक अंदाज आहे. यावर पहिली प्रतिक्रिया अर्थातच तीव्र निषेधाची आहे आणि असावी. व्यंगचित्रे कोणत्याही प्रकारची असली तरीही त्यावरची ही प्रतिक्रिया निषेधार्हच आहे. यानंतर ज्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या त्या विचार करण्यासारख्या आहेत. त्याचबरोबर अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, त्याच्या सीमा/मर्यादा आहेत का, असाव्यात का यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेला येत आहेत. लेखात या प्रश्नांची ठाम उत्तरे नाहीत, किंबहुना ठाम उत्तरे असू शकत नाहीत. मात्र व्यंगचित्रकारांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कामाला विनाअट पाठिंबा दिला जातो आहे, आणि त्याचबरोबर जर त्यांच्या कामाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न झाला तर तो बरेचदा याचा अर्थ अतिरेक्यांना किंवा हल्ल्याला पाठिंबा असा घेतला जातो आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एक पैलू हा ही आहे की घटनेचा निषेध करतानाच शक्यतो ‘नी-जर्क’ प्रतिक्रिया न देता त्यामागचे इतर पैलू पडताळून बघणे. लेखात हा प्रयत्न केला आहे.

‘शार्लि एब्दो’ने सर्व धर्म आणि लोकांची सारख्याच तीव्रतेने खिल्ली उडविली हा मुद्दा सर्व लेखांमधून सांगितला गेला आहे. मात्र बहुतेक लेख एका घटनेचा उल्लेख कटाक्षाने टाळतात. २००९ साली ‘शार्लि एब्दो’ने एका लेखकाला त्याचा लेख ‘अँटी-सेमायटिक’ – ज्यू लोकांच्या विरोधात – आहे म्हणून कामावरून काढून टाकले होते. संपादकांनी आधी लेखाबद्दल माफी मागावी अशी सूचना केली, लेखकाने ती धुडकावून लावल्यावर त्याला नोकरी गमवावी लागली. शिवाय त्याच्यावर ‘हेट स्पीच’चा खटलाही भरण्यात आला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाने ज्याची खिल्ली उडविली होती तो दुसरा-तिसरा कुणी नसून फ्रेंच राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांचा सुपुत्र होता.

वरच्याच मुद्द्याचा आणखी एक पैलू म्हणजे सर्व धर्मांची खिल्ली उडवली आहे मग मुसलमान लोकच डोक्यात राख का घालून घेतात? याला अपवाद आहेत हे आधीच्या परिच्छेदातून दिसलंच. दुसरं म्हणजे समाजातील शक्तिमान गटाची खिल्ली उडवणे आणि दुर्बळ गटाची खिल्ली उडवणे याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. फ्रान्समध्ये मुसलमान लोक ‘इमिग्रंट’ आहेत. फ्रेंच लोकांचा परदेशवासियांबद्दलचा ‘झेनोफोबिया’ सर्वश्रुत आहे. फ्रान्समधील परदेशी लोकांना वर्णभेदासकट अनेक प्रकारचे अन्याय सहन करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत गोऱ्या लोकांनी अल्पसंख्याक लोकांची खिल्ली उडवली तर त्याला वेगळे आयाम प्राप्त होतात. उदा. तीसच्या दशकात ज्यू लोकांची खिल्ली उडवली जात होती तेव्हा इतर लोकांच्या तुलनेत त्याला निश्चितच वेगळे आयाम होते. दुसरं म्हणजे मुसलमान विरुद्ध पाश्चात्त्य जग हा संघर्ष बराच जुना आहे. इराक युद्ध आणि ‘वॉर ऑन टेरर’पासून ते ‘अबू घैरेब’पर्यंत अनेक गोष्टी यात येतात. अशा परिस्थितीत धार्मिक खिल्ली उडवणारे व्यंगचित्र आगीत तेल टाकण्यासारखं होऊ शकतं. हे अतिरेक्यांचं किंवा हल्ल्याचं समर्थन नाही, परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अतिरेकी अल्जिरियाचे होते, फ्रान्सने अल्जिरियावर केलेले अत्याचार सर्वश्रुत आहेत. व्यंगचित्रे हे निमित्त असून यामागे खोल पार्श्वभूमी असण्याची शक्यता अधिक वाटते.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा तसा नाजूक विषय आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा विनोदाचा विषय आपल्या जिव्हाळ्याचा नसतो तेव्हा बहुतेक लोक याला पाठिंबा देतात. इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मन मानेल तसं वागणं यात फरक काय? सटायर याची विकीतील व्याख्या “..in which vices, follies, abuses, and shortcomings are held up to ridicule, ideally with the intent of shaming individuals, corporations, government or society itself, into improvement.” अशी आहे. ‘शार्लि एब्दो’ची व्यंगचित्रे बघितली तर त्यात सटायर फारसं दिसत नाही. किंबहुना विशिष्ट गटाला टारगेट करून मुद्दाम डिवचण्याचा हेतू दिसतो.

‘टबू’ किंवा संवेदनशील विषयांच्या मर्यादा तोडणे हा आधुनिकतेचा पाया मानला जातो पण हे फक्त करायचं म्हणून केलं जातं की यातून काही साध्य होतं? विनोदाचा दर्जा बघितला तर ‘शार्लि एब्दो’ची व्यंगचित्रे सटायर पेक्षा ‘पॉटी ह्यूमर’ ह्या प्रकारात मोडतात. ही काही लोकांना विनोदी वाटू शकतात, विनोदी वाटणे सापेक्ष असतं. पण याला सटायर म्हणायला फारसा आधार वाटत नाही.

वर म्हटल्याप्रमाणे आधुनिकतेमध्ये खिल्ली उडवण्यासाठी कोणताही विषय निषिद्ध नसतो. आणि ‘शार्लि एब्दो’ने कोणतीही सभ्यतेची मर्यादा पाळलेली नाही.  प्रश्न असा येतो यात आणि ट्रोलिंगमध्ये काय फरक आहे? ‘टबू’ तोडणे ही एक आकर्षक गोष्ट बनली आहे. बरेचदा हे आवश्यक असतं पण हे करताना यामागचं हेतू काय याचा सारासारविचार व्हायला हवा. फक्त एखाद्या विशिष्ट गटाला ‘प्रव्होक’ करणे हा एकमेव हेतू असेल तर अशा प्रकाराला विनोद म्हणण्यापेक्षा ट्रोलिंग म्हणणे अधिक योग्य. विनोदाला काही विषय वर्ज्य असावेत की नाही? उत्तर नाही असेल तर बलात्कारावर विनोद चालेल का? उत्तर हो असेल तर बलात्कार झालेल्या व्यक्तीवर तिच्यासमोरच विनोद केला तर चालेल का? ही अतिशयोक्ती वाटेल पण अमेरिकन व्यंगचित्रकार जॉनी रायन याच्या मुलाखतीमधील हा भाग पाहा

When is it ok to start making jokes about something atrocious like 9-11?
Well if it didn’t happen to me, then we can do it right away. [laughs]

इथे त्याने स्वतःला का वगळलं कळलं नाही. असो. जर सभ्यतेच्या सर्व मर्यादा तोडणे हा एकमेव हेतू असेल तर मग याला पाठिंबा देणारे लोक आपल्या रोजच्या जगातही तसं का वागत नाहीत? आजारी असलेल्या माणसाला भेटायला गेल्यावर जर म्हटलं की “येता येता वैकुंठात बुकिंग करून आलो, उगीच नंतर कटकट नको” तर चालेल का? अर्थातच चालणार नाही कारण ही शाब्दिक हिंसा आहे. मग जर आपल्या रोजच्या जगात हे सभ्यतेचे नियम आपण पाळतो तर मग कलेच्या क्षेत्रातही ते का पाळू नयेत?

सर्वात शेवटी एक प्रश्न पडतो. कलेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याची प्रथा जुनी आहे. कम्युनिस्ट राजवटीपासून सध्याच्या ओबामांच्या ड्रोन हल्ल्यांपर्यंत सर्व विषयांवर अनेक व्यंगचित्रकारांनी विचारप्रवर्तक व्यंगचित्रे काढली आहेत. या पार्श्वभूमीवर एखाद्या धर्माबद्दल हिडीस व्यंगचित्रे काढल्याने नेमका कोणता हेतू साध्य होतो? ‘टबू’ तोडण्याचं आत्मिक समाधान मिळत असेल, कदाचित आधुनिक कलेच्या क्षेत्रात एखादा नवा पायंडा पडत असेल पण सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने एखाद्या गटाला मुद्दाम डिवचून नेमका काय फायदा होतो? पाश्चात्त्य जगाने इस्लामिक राष्ट्रांवर अनेक अत्याचार केलेले आहेत, सध्याचे अतिरेकी आपणहून तयार झालेले नाहीत. रेगनपासून बुशपर्यंत सर्वांनी आपापल्या फायद्यासाठी त्यांना जोपासलेलं होतं. हे थांबवण्याची एकमेव आशा म्हणजे परस्परसामंजस्य. आवडो वा न आवडो, मुसलमान लोक आणि राष्ट्रे या जगाचा अविभाज्य भाग आहेत.

जीव गेलेले व्यंगचित्रकार मला इराकमध्ये मरण पावलेल्या अमेरिकन सैनिकांइतकेच दुर्दैवी वाटतात.

—-

१. दुव्यातील व्यंगचित्रे हिडीस, बीभत्स या प्रकारात मोडतात. आपापल्या जबाबदारीवर बघावीत.

हॉलिवूडची गोजिरवाणी मुलं

एके काळी मराठी चित्रपटांमध्ये माहेर, सासर, तुळशीवृंदावन, बांगड्या अश्या ‘कीवर्ड्स’ची चाहूल जरी लागली तरी बाया-बापड्या डोळ्याला पदर लावायला तयार व्हायच्या. विशिष्ट प्रकारच्या आड्यन्सला विशिष्ट गोष्टी दाखवल्या की त्यांच्या भावनांचा ड्याम (म्हणजे धरण, डॅम इट!) वाहायला लागतो. चित्रपट लोकप्रिय होण्यासाठी हे तंत्र अनेक जणांनी वापरलं आहे. काही लोक खुबीने वापरतात, काही ‘बुल इन चायनाशॉप’च्या धर्तीवर. हिंदी चित्रपटातही हे होतं पण तिथली ‘गिमिक्स’ इतकी प्रसिद्ध आहेत की त्याबद्दल परत लिहायची गरज नाही. आणि पॉश दिसत असले तरी हॉलिवूडचे चित्रपटही हेच करतात – त्यांचे भावनिक ‘वीक पॉइंट’ थोडे वेगळे आहेत आणि याबद्दल कुठे लिहून आल्याचं फारसं दिसत नाही.

‘इंडिपेडन्स डे’. जगबुडी आलेली आहे आणि वाचवण्यासाठी जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे दोन निधड्या छातीचे गधडे. आणि ते लढाईला जात असताना निरोप देण्यासाठी दोन गोजिरवाणी पोरं. ही पोरं बहुतेक वेळा सोनेरी केस, निळे डोळे या वर्गात बसतात. (इथे विल स्मिथ आहे त्यामुळे थोडा बदल. शिवाय सर्वात शक्तिशाली देशात आता वर्णद्वेषही राहिलेला नाही हा यामागचा संदेश. इथे दिग्दर्शक दिसतो.) अशा वेळी तो बाप चाललेला असताना ही कारटी हमखास विचारणार, “तुम्ही परत कधी येणार? ” मग लेखक-दिग्दर्शकांच्या वकुबाप्रमाणे बाप एक छोटेखानी भाषण किंवा संदेश देतो. बरेचदा ही मुलं जे काही संकट आलं आहे त्यात सापडतात. अजस्त्र डायनॉसॉर आणि गोजिरवाणं मूल हा कॉन्ट्रास्ट अधिक आकर्षक असतो.

ह्याची उदाहरणं द्यायची म्हटली तर पानं भरतील पण उदाहरणं संपणार नाहीत. एका ‘स्टार-ट्रेक’ चित्रपटात संपूर्ण वेळ एकही मूल दिसलं नाही. तसंही यानावर मुलं कुठून असणार? पण एका प्रसंगात क्लिंगॉनचा हल्ला होतो आणि लगेच बाया-बापड्या आणि लहान मुलं सुरक्षित ठिकाणी जाताना दिसतात. ‘अपोलो-१३’ हा सर्व बाबतीत उल्लेखनीय चित्रपट पण तिथेही यान संकटात सापडलेलं असताना कमांडर जिम लॉवेलच्या तीन लहान मुलांवर नको इतका फोकस करण्याचा मोह रॉन हॉवर्डला आवरता आला नाही. ‘इंटरस्टेलर’मध्ये स्पेशल इफेक्ट्सवर इतकी मेहनत घेतली पण स्क्रिप्टचं काय? इथेही जग वाचवण्यासाठी नायक जाताना त्याच्या मुलीबरोबर परत तोच प्रसंग. मनमोहन देसाईंनी ज्याप्रमाणे ‘लॉस्ट अँड फाउंड’ फॉर्म्युला शेवटपर्यंत सोडला नाही, तसंच हॉलिवूडही गोजिरवाण्या अमेरिकन मुलांचा बाप जग वाचवतो हा फॉर्म्युला सोडायला तयार नाही.

जुरासिक पार्क थोडासा वेगळा आहे. स्पिलबर्गने लहान मुलांवर अनेक चित्रपट केले. ‘इ. टी. ‘ संपूर्णपणे मुलांचाच होता पण त्यात कथा मुलांच्या दृष्टिकोनातून मांडली होती. चित्रपटात बराच वेळ कॅमेरा मुलांच्या नजरेतून बघतो. ‘जुरासिक पार्क’मध्येही मुलं संकटात सापडतात पण या मुलांच्या व्यक्तिरेखा काहीश्या अधिक गहिर्‍या होत्या. त्यांची व्यक्तिमत्त्वं परस्परविरोधी आणि म्हणूनच एकमेकांना पूरक होती. शिवाय डॉ. ग्रँटला मुलांची आवड नसणं आणि त्यातून निर्माण होणारे प्रसंग रोचक होते. ‘जुरासिक पार्क २’मध्ये मात्र स्पिलबर्गने आळशीपणा केला. हा चित्रपट बहुधा त्याचा सर्वात टुकार चित्रपट असावा. टाकायचं म्हणून एका लहान मुलीचं पात्र टाकलेलं, ती नेहमीप्रमाणे चुणचुणीत वगैरे, तीच संकटं आणि त्यातून शेवटी होणारी तशीच सुटका. दिग्दर्शन इतकं गचाळ की स्पिलबर्गच्या नावाखाली त्याच्या आशिष्ट्नने सगळा चित्रपट केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्वांच्या मुळाशी ‘अमेरिकन ड्रीम’ आहे – स्वतःचं घर, चौकोनी कुटुंब, कुत्री-मांजरं वगैरे. थोडक्यात ‘अ वाइफ अ‍ॅड अ फॅमिली अँड अ डॉग अँड अ कॅट’ (चित्रपट कोणता ते ओळखा!) मात्र यात ‘अल्टर्नेटीव्ह फ्यामिली’ येत नाही. बॅड पब्लिसिटी. या ड्रीमवर कोणतंही संकट आलं की अमेरिकन प्रेक्षकाच्या भावनेला हात घालता येतो आणि हॉलिवूडचे पटकथा लेखक याचा पुरेपूर फायदा घेतात.

अर्थातच अपवाद आहेत आणि सन्माननीय आहेत. ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’मधली स्काउट फिंच. लहान मुलीची इतकी सशक्त आणि गहिरी व्यक्तिरेखा क्वचितच बघायला मिळते. याचं श्रेय अर्थातच मूळ कादंबरीची लेखिका हार्पर ली हिला जातं. वर्णद्वेषाचा संघर्ष एका लहान मुलीच्या नजरेतून दाखविणे या कल्पनेवर बेतलेला हा चित्रपट मैलाचा दगड ठरावा. त्याचप्रमाणे मार्जरी किनॅन रोलिंग्जच्या ‘द इयरलिंग’ (मराठी अनुवाद राम पटवर्धन यांचं ‘पाडस’) वर आधारित चित्रपटही उल्लेखनीय आहे. इथेही श्रेय लेखिकेला जातं.

या सर्वाहून वेगळी लहान मुलगी क्वेंतिन टॅरँटिनोच्या ‘किल बिल २’ मध्ये बघायला मिळते. टॅरँटिनोचा चित्रपट असल्याने याला अनेक पदर आहेत आणि याचे एकाहून अधिक अर्थ लावता येतात. टॅरँटिनोने हॉलिवूड आणि जपानी सिनेमांमध्ये नेहमी दिसणारी प्रतीकं वापरलेली आहेत मात्र बरेचदा यांचा वापर नेहमी होतो त्याच्या अगदी उलट केलेला आहे. ‘किल बिल २’मध्ये ‘वेस्टर्न स्फॅगेटी’ चित्रपटांचं संगीत आहे पण इथे मूळ व्यक्तिरेखा स्त्रीपात्र आहे. वेस्टर्न चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांना नगण्य भूमिका असतात, टॅरँटिनोने इथे त्याचा व्यत्यास केला आहे. (चित्रपट सुरू होतो तेव्हाचं संगीत बेथोवनच्या सुप्रसिद्ध पाचव्या सिंफनीवर बेतलेलं आहे, पण त्यातली गंमत काय ते अजून कळलेलं नाही. ) ‘किल बिल २’ मधली लहान मुलीची व्यक्तिरेखा वरवर पाहिलं तर हॉलिवूड चित्रपटाला साजेशीच आहे. आई आणि बाप एकमेकांच्या जिवावर उठलेले असताना मध्ये सापडलेली एक गोंडस मुलगी. पण थोडं लक्षपूर्वक पाहिलं तर या व्यक्तिरेखेचं वेगळेपण लक्षात येतं. ही मुलगी तिच्या वयाला साजेसं न वागता प्रौढांसारखी वागते. जन्मल्यापासून आईला एकदाही बघितलेलं नसतं, तरीही इतक्या वर्षांनी आई दिसल्यावर तिची प्रतिक्रिया अत्यंत सौम्य असते. नंतर बाप मेल्यावर आईबरोबर राहत असताना तिला बाबांची आठवणही येत नाही. तिच्या अ‍ॅक्वेरियममध्ये असलेल्या माश्याला ती मारून टाकते. ही व्यक्तिरेखा विलियम गोल्डींगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाइज’मधल्या मुलांच्या जवळ जाणारी वाटते. आपल्याकडे ‘प्रेमस्वरूप आई’ ही जशी ठोकळेबाज प्रतिमा आहे त्याचप्रमाणे हॉलिवूड चित्रपटात नेहमी दाखवली जाणारी निष्पाप, गोजिरवाणी मुलं तितकीच साचेबद्ध आहेत. या प्रतिमेला छेद देणारं पात्र टॅरॅंटीनोने निर्माण केलं आहे. 

या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि नेहमीच ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ नसलेले अ‍ॅक्शनपट अधिक भावतात. जेम्स बाँडच्या चित्रपटांचा हा एक मोठा ‘प्लस पॉइंट’ म्हणता यावा. कियानु रीव्हजचा ‘स्पीड’, हॅरिसन फोर्डचा ‘फ्युजिटीव्ह’ अशी काही उदाहरणे आहेत. तसंच क्युब्रिक, कपोला, ऑलिव्हर स्टोनसारख्या दिग्दर्शकांनी असे फॉर्म्युले वापरणं कटाक्षाने टाळलं आहे.

सनी डेज

गावसकरचं ‘आयडल्स’ पुस्तक शोधत होतो, कोणत्याही दुकानात दिसलं नाही. शेवटी रस्त्यावर एक जुनी प्रत मिळाली. कुणीतरी कुणाला तरी भेट दिली होती. देणार्‍याचं माहीत नाही पण घेणार्‍याचा टेस्ट क्रिकेटमधला इंटरेस्ट बहुधा संपला असावा. पुस्तकात गावसकरने त्याच्या आयुष्यावर ज्यांनी प्रभाव पाडला त्या क्रिकेटपटूंची ओळख करून दिली आहे. बेदी, चंद्रा, इम्रान खान, कपिल, रिचर्ड्स अशी अनेक नावं यात येतात. महत्त्वाचं म्हणजे त्याकाळचं क्रिकेट कसं होतं याचं एक सुरेख चित्र या वर्णनात दिसतं. पण मग साहजिकच सध्याच्या क्रिकेटशी तुलना होते आणि वाईट वाटतं. त्या काळात क्रिकेटपटूंना फारसे पैसे मिळायचे नाहीत म्हणून बरेच खेळाडू आधी नोकरी पक्की करायचे आणि मग फावल्या वेळात खेळायचे. गावसकर ‘निरलॉन’मध्ये नोकरीला होता, वेंगसरकर बहुधा बँकेत (चूभूद्याघ्या). इरापल्ली प्रसन्ना १९६२ मध्ये वेस्ट इंडीजमध्ये टेस्टसिरीजसाठी गेला पण त्यानंतर तो चार वर्षांनी परत संघात आला कारण त्याच्या वडिलांची अट होती की आधी इंजिनियरींगची डिग्री मिळव. प्रसन्नावरच्या प्रकरणात गावसकर लिहितो, “In those days playing cricket was not as much of a monetary advantage as it is now…Thus, Prasanna’s father was correct in asking young Prasanna to continue with his studies so that his engineering degree would stand him in good stead along with his cricketing ability to get a good job.” पुस्तक १९८३ मध्ये लिहिलं आहे, त्यावेळेपर्यंत परिस्थिती बरीच सुधारली होती. पण त्या काळात क्रिकेटमध्ये पैसा नसण्याचा फायदाही होता. पालक मुलगा पाळण्यात असतानाच सचिन किंवा सुनील व्हायची स्वप्नं बघत नव्हते.

सध्याच्या पिढीबद्दल कौतुक करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत. दोन वर्षाची मुलंही आयप्याड सहज वापरतात वगैरे. पण काही बाबतीत मात्र त्यांच्याबद्दल मनापासून वाईट वाटतं. गावसकर विरुद्ध माल्कम मार्शल हा तोडीस तोड सामना प्रत्यक्ष बघण्याचं सुख त्यांच्या नशिबात नाही. किंवा नंतरची पिढी सचिन विरुद्ध मॅग्रालाही मुकलेली आहे. पण हे काहीच नाही. शाहरुख खानच्या कोलांट्या उड्या आणि प्रिती झिंटाचे ‘हाय-फाईव्ह’, पाटा विकेटवर बोलरची अमानुष कत्तल आणि प्रत्येक शॉटनंतर नाचणार्‍या बाया म्हणजेच क्रिकेट असाच आजच्या पिढीचा समज होतो आहे. इथे पायनॅपल टॉपिंग घातलेली गोल वस्तू म्हणजेच पिझ्झा असं समजणार्‍या बिचार्‍या अमेरिकन बांधवांची आठवण होते. (पिझ्झावर पायनॅपल किंवा आपल्याकडचा इंडियनाइझ्ड मसाला-पिझ्झा. कुठे फेडताल ही पापं?)

पूर्वी टेस्ट क्रिकेट म्हणजे नुसतं मैदानावर जाऊन धावा कुटणे नव्हतं. पाच दिवस चालणार्‍या या सामन्यात दोन कप्तान अनेक स्ट्रॅटेजी लढवीत असत. याशिवाय संघाच्या मुख्य खेळाडूंचं वैयक्तिक पातळीवर चाललेलं युद्ध वेगळंच. गावसकर खेळत होता तेव्हा वेस्ट इंडीजकडे रॉबर्ट्स, मार्शल, गार्नर इ. आणि ऑस्ट्रेलियाकडे लिली आणि थॉमसन असा तोफखाना होता. असं असूनही यांना तोंड देताना गावसकरने कधीही हेल्मेट घातलं नाही. असं का? हे या बोलरना उद्देशून एक ‘पर्सनल स्टेटमेंट’ होतं. मी तुझ्या वेगाला घाबरत नाही असं सांगण्याचा याहून चांगला उपाय कोणता? शिवाय स्वतःच्या तंत्रावर असलेला जबरदस्त आत्मविश्वासही यातून दिसतो. आणि हे सगळं केव्हा तर बाउंसरचे नियम शिथिल असताना. त्या काळात क्रिकेटमध्ये पैसे नव्हते, मॉडेलिंग अस्तित्वात नव्हतं. क्रिकेटला ग्लॅमर होतं पण फक्त ग्लॅमरसाठी क्रिकेटकडे वळणार्‍यांची गर्दी होत नव्हती. ज्याला यात मनापासून रस आहे आणि कशाचीही अपेक्षा न ठेवता मेहनत करण्याची ज्याची तयारी आहे असेच लोक क्रिकेटकडे वळायचे. आता सगळंच बदललं आहे. क्रिकेटपटूंना आयपीएल आणि इतर गोष्टींमधून इतके पैसे मिळतात की टेस्ट क्रिकेटमध्ये कुणाला फारसा रसच उरलेला नाही. आयपीएलमध्ये कितीतरी कमी मेहनत करून पैसे, ग्लॅमर सगळं मिळतं मग पाच दिवस मैदानावर मेहनत कोण करणार? टेस्ट क्रिकेट आजही खेळलं जातं पण खेळताना खेळाडूंचं अर्ध लक्ष दुसरीकडे असतं.क्रिकेट हा एके काळी लोकशाहीला धार्जिणा असा खेळ होता. म्हणजे कसं की बोलर आणि बॅट्समन दोघांना समान संधी होती. टेस्ट क्रिकेटमध्ये बोलर थकेपर्यंत त्याला कितीही ओव्हर टाकता येतात. पर्थ वगैरेसारखी गवताळ विकेट असली तर तो डावपेच लढवू शकतो. पूर्वी हे शक्य होतं म्हणूनच त्या काळी लिलीपासून मार्शलपर्यंत कर्दनकाळ म्हणता येतील असे बोलर झाले.आणि समोर गावसकर किंवा रिचर्ड्ससारखे बॅट्समन असले की अफलातून सामना व्हायचा. मग एक दिवसाचे सामने सुरू झाले. आता बोलरना ८ किंवा दहा ओव्हर मिळायच्या आणि त्यातही प्राधान्य धावा न देण्याला. हे म्हणजे एखाद्या योद्ध्याला एक हात बांधून लढाई करायला लावण्यासारखं आहे. मग टी-२० आलं, इथे तर चार किंवा पाचच्या वर ओव्हर नाहीत. त्यात तो बिचारा बोलर काय करणार? शेवटी आयपील आलं. स्टिअरिंग व्हील बसवलं तरी वळणार नाही असे मुर्दाड पिच, त्यात सगळे नियम बॅट्समनच्या बाजूने आणि वर सिक्सर्सना स्पेशल प्राइझ. मग क्लब लेव्हलचे खेळाडूही पत्ते कुटावेत तश्या धावा कुटायला लागले. (आणि या सर्वात मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी किती हे त्यांचं त्यांनाच माहीत.) यूट्यूबवर कोणत्याही आयपीलचे हायलाइट्स बघा, यात कधीही बोलर्सची कामगिरी दिसणार नाही. सगळीकडे इतक्या बॉलमध्ये इतके रन. खरं तर बोलरऐवजी बोलिंग मशीन ठेवलं तरीही फारसा फरक पडू नये. आयपील आलं आणि क्रिकेटमधल्या बोलरनामक जमातीची तिरडी उठली. आणि याची सवय झाली की मग एके दिवशी उठून लगेच टेस्ट क्रिकेट खेळायला गेलं, तेही परदेशात गवताळ पिचवर की पितळ उघडं पडतं. टी २० चे रिफ्लेक्सेस रुतून बसलेले असतात, विकेट न फेकता पिचवर दिवसभर टिकून राहणं बहुतेकांना जमत नाही. ऑफस्टंपपासून किलोमीटर लांब जाणार्‍या चेंडूलाही बॅट लावायचा मोह आवरत नाही. पाटा विकेटची सवय झालेली असते, पाच आउटस्विंगर आणि सहावा इनस्विंगर यांना तोड देणं जमत नाही. खरं तर इतका त्रास देणारे बोलरही फारसे उरलेले नाहीत. परदेशात आपलं जे पानिपत होतं त्यामागे तंत्राचा अभाव आणि विकेट फेकणं ही कारणे आहेत. सध्याचे बोलर पाहिले की सर्कशीतल्या दात आणि नखं काढलेल्या सिंहाची आठवण होते. बहुतेक वेळा विकेटची साथ नाही, टाकायला जास्त ओव्हर नाहीत, बाऊंसर वगैरेवर कडक नियम – बिचारे करून करून करणार तरी काय? म्हणून लिली, थॉमसन यांच्यासारखे धडकी भरवणारे बोलर आता उरलेच नाहीत आणि नवीन तयार होण्याची शक्यताही नाही. 

विवादास्पद लेख लिहिताना करता येण्यासारखी एक युक्ती म्हणजे टीकाकारांचे मुद्दे आपणच आधी मांडून टाकायचे. या बाबतीत ‘डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट’ खेळायचं झालं तर आजकाल पाच दिवस वाट बघायला वेळ कुणाला आहे? अडीच-तीन तासांच्या वर कोणताही खेळ गेला की प्रेक्षक बेचैन होतात. सुदैवाने बुद्धिबळ अजूनही आपला आब राखून आहे. इथेही नव्याने बुद्धिबळ बघणारे प्रेक्षक ‘प्रत्येक चालीला इतका वेळ का’ म्हणून कंटाळतात. (विश्वविजेतेपद स्पर्धेमध्ये कार्लसन किंवा आनंदने एखादी खेळी करायला वेळ घेतला की तो खेळाडू त्याच्या ‘होम-प्रेप’मधून बाहेर आला हे ओळखता येतं, पण हे ‘फायनर-पॉइंट्स’ आहेत, ते कळण्यासाठी पेशन्स हवा.) बहुतेक टेस्ट क्रिकेट यथावकाश बंद पडेल. आणि टी-२० सुद्धा जास्त वाटायला लागलं तर कदाचित पाच-पाच ओव्हरची मॅच ठेवतील. 

या सर्वात वाईट गोष्ट काय असेल तर ती ही की सगळ्या सिनियर क्रिकेटपटूंचा यात हातभार आहे. ज्या गावसकरने क्रिकेटवरच्या निष्ठेपायी कॅरी पॅकरच्या वर्ल्ड सीरीजमध्ये सामील होण्यास नकार दिला तोच आता आयपीएलची कॉमेंट्री करतो आहे याहून मोठा विरोधाभास कोणता? भारतीय क्रिकेटपटूंचा एक सामाईक गुण म्हणजे ते प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जाताना कधीही दिसत नाहीत. आयपीएल असो, मॅच फिक्सिंग असो किंवा राजकीय कारणासाठी वानखेडे वापरणं असो, सुनीलपासून सचिनपर्यंत सर्व मौन बाळगून असतात. यात अर्थातच फायदा असतो. सध्या रवी शास्त्री आणि गावसकर यांना बीसीसीआयकडून सर्वात जास्त पगार मिळतो आहे. टेस्ट क्रिकेट मरणासन्न आहे आणि सगळेजण आयपीएलची प्रशंसा करण्यात मग्न आहेत.

मग शेवटी ‘अंदाज अपना अपना’ आठवतो, “अरे ठीक ही तो है ना यार, अब इन लोग का अंकल है, इन लोग को कोई टेन्शन नई तो अपने को कायका टेन्शन?” क्रिकेटशी संबंध कधीच संपलेला आहे. ज्यांना रोहितच्या पाटा विकेटवरच्या २६४ बघायच्या आहेत त्यांनी बघाव्यात, आम्ही आपलं विशी आज १.ई४ खेळतो की १.डी४ हे बघतो.

वाचन आणि मनन

दिवाळीबरोबर मराठी लेखांचा पाऊस हे समीकरण दिवसेंदिवस अधिक पक्कं होतं आहे. हे बरं की वाईट हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले लेख वाचायला मिळू शकतात हे बरं, अशा लेखांची संख्या मात्र फारच कमी असते हे वाईट. शिवाय यासाठी किमान चार महिने अनेक लोकांची ‘क्रिएटीव्ह एनर्जी’ पणाला लागते हे ही आहेच. असं झाल्यानंतर जर अंक वाचनीय असेल तर ही एनर्जी सार्थकी लागली असं म्हणता येतं पण बरेचदा हे होत नाही. मी छापील दिवाळी अंक विकत घेणं सोडून दिलं आहे, यामागे दोन-तीन कारणं आहेत. खरं सांगायचं तर दिवाळी अंकांची अनुक्रमणिका बघितली तर प्रत्येक अंकात फार-फार तर दोन किंवा तीन लेख वाचनीय असतात. त्यातही नेहमीचेच यशस्वी लेखक आणि त्यांचे राखीव कुरणातील यशस्वी विषय यांचा मनसोक्त कंटाळा आलेला आहे. त्यांच्यासाठी सगळा अंक विकत घेणं सोयीचं वाटत नाही. शिवाय हल्ली अंकांच्या किमती बघता त्याच किमतीत पुस्तकं सहज घेता येऊ शकतात त्यामुळे साहजिकच पुस्तकाला कधीही प्राधान्य. या पार्श्वभूमीवर जालीय दिवाळी अंकांची परंपरा स्वागतार्ह आहे. ही सगळ्या मासिकांनी राबविली तर फारच सुंदर पण त्यासाठी त्यांचं ‘बिझनेस मॉडेल’ बदलणं गरजेचं आहे आणि त्याला वेळ लागेल. आंतरजाल उपलब्ध असणारे लोक तुलनेने कमी आहेत हे एक महत्त्वाचं कारण. असा वाचकवर्ग उपलब्ध असेल तर ‘द गार्डीयन’सारखं वर्तमानपत्र संपूर्णपणे आंतरजालीय आवृत्ती काढण्याचं धाडस करू शकतं. आपल्याकडे कदाचित पन्नास-शंभर वर्षात असं होऊ शकेल. किंवा दिवाळीनंतर एक-दोन महिन्यांनी अंक आंतरजालावर उपलब्ध केले तरी ते जास्त लोकांपर्यंत पोचू शकतील. (शिवाय यातून मिळणारा ‘अ‍ॅड रेव्हेन्यु’ छापील अंकांच्या विक्रीच्या तुलनेत किती होतो हे बघणेही रोचक ठरावे.)

सध्या प्रसिद्ध होणारी माहिती आणि तिचं वाचन यांचा ताळमेळ बसवायचा असेल तर काही उपाय गरजेचे ठरतात. हे प्रातिनिधिक नाहीत, प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. सर्वात आधी प्रवासवर्णनांवर काट. जे लोक पहिल्यांदा परदेशी जातात त्यांच्यासाठी हा अनुभव नक्कीच रोचक असतो पण आता जगातल्या कोणत्याही ठिकाणी कुणी गेलं, त्यांनी तिथले कितीही दिलखेचक फोटो काढले, तिथे त्यांना कितीही मनमिळावू लोक भेटले (पॉलकाका, लिंडाआजी वगैरे), त्यांनी त्यांचं कितीही मनापासून आदरातिथ्य केलं (सेरामावशीचं आवडतं पायनॅपलचं लोणचं इ.) तरी त्यात स्वारस्य वाटणं या जन्मात शक्य नाही. नंतर माहितीपर लेखांवर काट, अपवाद अर्थातच जी माहिती त्या वेळेस रोचक असेल तिच्यावरचे लेख. तिसर्‍या शतकातील नृत्यकलेवर लेख असेल तर तो कितीही चांगला असला तरी सध्या माझ्या कामाचा (आणि/किंवा इंटरेस्टचा) नाही त्यामुळे त्याला पास. त्याऐवजी ‘आणीबाणी’वर काहीही असलं तरी त्याला प्राधान्य कारण सध्या मला त्या विषयात रस आहे. हे करणं गरजेचं ठरतं कारण असं केलं नाही तर विकीवर आणि इतरत्र जन्मभर पडीक राहण्याइतकी माहितीआहे. मराठीत येणारे बहुतेक माहितीपर लेख फक्त माहिती देतात. (आणि बरेचदा एका लेखात इतकी माहिती देतात की वाचताना धाप लागते.) हे कंटाळवाणं होतं. नुसती माहिती विकीवरही आहे, लेखकाने ती माहिती कशी मांडली आहे आणि त्या माहितीचं कसं विश्लेषण केलं आहे हे अधिक महत्त्वाचं आणि इथे बहुतेक मराठी लेख कमी पडतात. असा लेख लिहिण्यासाठी वाचन लागतंच पण त्याचबरोबर मननही आवश्यक असतं. बरेचदा लेखक नुसती पुस्तकांची जंत्री आणि त्यात काय आहे अशी त्रोटक माहिती देतात. ‘लोकसत्ता’ किंवा ‘सकाळ’मध्येही असे लेख दिसतात. अशा लेखांमधून फारसं काही हातात पडत नाही. काही लेखक चांगले असतात, विषयही रोचक असतो पण ते शैलीमध्ये कमी पडतात. लेख वाचल्यावर लेखकाने लेख लिहिल्यानंतर परत वाचून बघितला होता की नाही अशी शंका येते.

इथे अनेक मुद्दे आहेत. एक म्हणजे मराठी भाषा. क्लिष्ट संकल्पना समजावून सांगण्यासाठी मराठीत सुटसुटीत शब्द नाहीत, आहेत ते शब्द वापरले तर लेख बोजड होतो. त्यात एक एक पॅरेग्राफ लांबीची वाक्ये असतील तर लेख वाचणं अशक्य होतं. कुरूंदकर किंवा दुर्गा भागवत यांचं लेखन पाहिलं तर त्यात बोजड शब्द फार क्वचित आढळतात, उलट क्लिष्ट संकल्पनाही स्वच्छ शब्दांत सहजपणे ते सांगतात. लेख लिहिल्यानंतर तो शक्य तितक्या त्रयस्थ नजरेतून वाचून त्यातून नेमका काय अर्थ निघतो आहे हे बघणं गरजेचं आहे. बरेचदा लेखक ज्या कल्पनांवर एक-एक स्वतंत्र पुस्तक निघू शकेल अशा कल्पना एका वाक्यात बसवायचा प्रयत्न करतात. साहजिकच परिणाम बोजड होतो. क्लिष्ट संकल्पना असेल तर एक तर ती सुटसुटीत शब्दांत सांगता यायला हवी आणि ज्या वाचकाचा तिच्याशी अजिबात परिचय नाही त्यालाही ती कळायला हवी. मुख्य म्हणजे वाचकाला शून्य पार्श्वभूमी आहे असं गृहीत धरूनच लेख लिहायला हवा. मग कल्पना स्पष्ट करण्यासाठी उपमा किंवा तत्सम संकल्पना वापरायला हव्यात. इथे परत मननाचा मुद्दा येतो. एखाद्या संकल्पनेवर बरंच वाचन आहे पण त्यावर विचार केलेला नसेल तर जे पुस्तकात वाचलं तेच लेखात परत ‘रिपीट’ होतं पण त्यापुढे जाता येत नाही. ती कल्पना सोप्या शब्दांत समजावून सांगता येत नाही. जे कृष्णमूर्ती एकदा म्हटले होते, “फ्रॉइड असं म्हणतो, मार्क्स तसं म्हणतो, युंग असं म्हणतो हे सगळं ठीक आहे, पण तू काय म्हणतोस?” आपण जितकं वाचलं आहे ते सगळं वाचकापर्यंत पोचायलाच हवं असं नाही. क्लिष्ट आणि अपरिचित कल्पनांवर पाच-पाच पानी लांब लेख वाचताना वाचकाला शीण येतो. एका लेखात दहा कल्पना कोंबण्यापेक्षा एक-दोन मध्यवर्ती कल्पना सुटसुटीतपणे, विस्तार करून सांगितल्या तर वाचकाच्या पदरात अधिक पडतं. मग त्याला रस वाटला तर तो त्यावर अधिक माहिती मिळवेलच. बरेचदा लेखक पार आफ्रिकेतून माणूस कसा उत्क्रांत झाला इथपासून सुरुवात करतात आणि लेख असतो आंतरजालाचं आधुनिकीकरण यासारख्या एखाद्या विषयावर. यावर खगोलशास्त्रज्ञ शॉन कॅरल याने एक ब्लॉग पोस्ट लिहिलं होतं. एखादी कल्पना कशी मांडावी किंवा मांडू नये.

क्ष ही ती कल्पना असेल तर सर्वात सोपा मार्ग. ‘क्ष’. फक्त ती कल्पना मांडा.

याहून थोडा अवघड प्रकार म्हणजे – ‘क्ष’. ही कल्पना खरंच क्ष आहे.

आणखी गुंतागुंतीचा प्रकार. ‘क्ष ही कल्पना अ, ब किंवा क सारखी वाटू शकते पण ते इथे अपेक्षित नाही. इथे अपेक्षित आहे – क्ष.’

मराठी लेखांसाठी याहूनही गुंतागुंतीचा प्रकार असतो. ‘कोट्यवधी वर्षांपूर्वी आफ्रिकेतून माणूस बाहेर पडला..उत्क्रांती..आगीचा शोध..संस्कृती..शेती..इजिप्शियन संस्कृती..पूर्व-पश्चिम व्यापार..कोलंबस..अमेरिका..अमेरिकन राज्यक्रांती..वसाहतवाद आणि त्याचे व्यामिश्र परिणाम..तंत्रज्ञानाचा विस्फोट.. धकाधकीचं आयुष्य..सोशल मिडिया..आणि मग मध्यवर्ती कल्पना – क्ष. त्याचबरोबर इतर दहा कल्पना अ, ब, क, ड. या सर्व गर्दीत मूळ मुद्दा काय, लेखकाला नेमकं काय म्हणायचंय हे कुठेतरी हरवून जातं. बरेचदा किती लिहिलं यापेक्षा किती कापलं यावर लेखाचा दर्जा अवलंबून असतो.

मराठी वर्तमानपत्रातील बहुतेक लेख (कुरुंदकरांसारखे माननीय अपवाद अर्थातच आहेत) आणि ‘गार्डीयन’ किंवा ‘न्यूयॉर्कर’मधले लेख यात हा एक महत्त्वाचा फरक दिसतो. अर्थात याचा अर्थ तिकडचे सगळेच लेख चांगले असतात असा नाही, पण चांगल्या लेखांचं प्रमाण तिकडे जास्त आहे. त्या लेखांमध्ये लेखकाचं वाचन जास्त दिसत नाही, मनन मात्र भरपूर असतं. आपल्याकडे बहुतेक वेळा उलटं दिसतं. लेखकाचं वाचन आणि मनन किती आहे हे ओळखणं अवघड नसतं. वाचन अधिक असेल तर लेखक स्वतःच ते दाखवायला उत्सुक असतो. लेखात पुस्तकातले विचार किती आणि लेखकाचे स्वतःचे विचार किती हे दोन्ही अनुक्रमे वाचन आणि मनन यांचे निदर्शक आहेत. आपल्याकडे काही गैरसमजही आहेत. उदा. चित्रपटाचं परीक्षण किंवा रसग्रहण म्हणजे सगळी कथा सांगणे. मागे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने एका जगप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या तितक्याच गाजलेल्या चित्रपटावर लिहिलं होतं. लेख उत्सुकतेने वाचायला घेतला. उत्सुकता अशासाठी की ती त्या क्षेत्रात असल्याने अभिनय, दिग्दर्शन इत्यादींवर तिचे विचार रोचक ठरावेत. वाचल्यानंतर मात्र निराशा झाली कारण तिने फक्त चित्रपटाची कथा सांगितली होती. कथा सांगण्यात काही गैर नाही पण तिच्याबरोबर तुमचे विचार असणं गरजेचं आहे.

आता हे सगळं ‘प्रिचिंग’ थाटाचं वाटू शकतं. किंवा हे सांगणारा तू कोण टिकोजीराव असा प्रश्न मनात येणंही साहजिक आहे. (तसंही मराठी ब्लॉगलेखनाला कुणीही ‘शिरियसली’ घेतच नाही. लेख जोपर्यंत छापून येत नाही तोपर्यंत तुम्ही लेखक नव्हे अशी समजूत पक्की आहे.) यावर उत्तर असं की हे विचार काही फार क्रांतिकारी आहेत असं नाही. किंबहुना कुणालाही सुचावेत असेच आहेत. लेख लिहून झाल्यावर त्याचा नेमका काय अर्थ लागतो आहे हे बघणे आणि तो अर्थ बरोबर नसेल किंवा वाचल्यावर गोंधळ होत असेल तर त्यात सुधारणा/संपादन करणे यासारखी साधी-सरळ गोष्ट नसावी. असं असतानाही नियमितपणे स्तंभलेखन करणारे लेखक/संपादकही जेव्हा या चुका करताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटतं. शिवाय आपल्याकडे लेखांवर सकारात्मक टीका करण्याची पद्धत फारशी प्रचलित नाही. त्याऐवजी ‘आणखी येऊ देत’ सारखे प्रतिसाद अधिक लोकप्रिय त्यामुळे ही लेखनपरंपरा चालूच राहते.

शेवटी या सर्व कल्पनांचा परिपाक एखादा समाज किती प्रगल्भ आहे यात होतो. इथे सरसकटीकरण अपेक्षित नाही. मराठीतील सगळंच लेखन या प्रकारात मोडतं असंही नाही. या चुका जर एखाद्या नुकत्याच ब्लॉग सुरू केलेल्या लेखकाने केल्या तर त्यात आश्चर्य नाही पण जेव्हा मान्यवरांच्या लेखणीतून आलेलं लेखन या प्रकारात मोडतं तेव्हा त्यावर विचार करावा असं वाटतं.

—-

१. मराठी ब्लॉगलेखन ही दुखरी नस आहे. मराठी ब्लॉगर्स ही जमात नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. सध्या नियमितपणे चांगलं लिहीणार्‍या मराठी ब्लॉगांची संख्या भारतातील वाघांच्या संख्येच्या तुलनेत शंभरपट कमी आहे. खरं तर आपलं लेखन चिरंतन टिकवण्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा मार्ग नाही. पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखावरही जेव्हा प्रतिसाद येतात त्यावरून हे दिसतं. एखाद्या लेखकाचं सगळं लिखाण सर्वात सोईस्कररीत्या लगेच उपलब्ध होण्यासाठी ब्लॉग हा उत्तम उपाय आहे.

कुंपण

झोपताना काही लोकांना एक ‘कंफर्टेबल पोझिशन’ सापडेपर्यंत झोप येत नाही. आणि ही सापडली की क्षणभर स्वर्गसुखाचा आभास होतो. झोपण्याची स्थिती शोधणं सोपं आहे, पण ‘डावे की उजवे’, ‘सोशलिस्ट की कम्युनिस्ट’,’आरडी की रहमान’, ‘लता की आशा’, ‘अ‍ॅपल की विंडोज की लिनक्स’ असे प्रश्न सतत समोर असताना ‘कंफर्टेबल पोझिशन’ कठीण असतंच, शिवाय गोची अशी की एकदा तुम्ही एक पोझिशन घेतली की सतत तिच्या बचावार्थ तयारीत राहावं लागतं. एकदा तुमची पोझिशन कळली की विरोधक प्रत्येक मुद्द्याचा कीस काढून ती कशी चूक आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. मग एकदा एका पोझिशनला आपलं म्हटलं की तुमचा इगो त्याबरोबर जोडला जातो त्यामुळे प्रत्येक वेळी तिच्या विरुद्ध मुद्दा आला की थेट तुमच्या इगोलाच धक्का पोचतो आणि लोक आक्रमक होतात.

यावर उपाय काय? उपाय म्हटलं तर सोपा आहे पण सुरुवातीला स्वीकारायला कठीण जाऊ शकतो. पण जर स्वीकारला तर सवय झाल्यावर हे सगळे वाद व्यर्थ वाटायला लागतात आणि लोक यात इतका वेळ का घालवतात असा प्रश्न पडतो. उपाय आहे – कुंपणावर बसणे. गेल्या अनेक वर्षांत प्रत्येक राजकीय पक्षाने जे गोंधळ घातले आहेत ते पाहून हा उपाय सुचला. याचा अर्थ असा – कोणत्याही पक्षाला, विचारसरणीला, व्यक्तीला पूर्ण (आणि आंधळं) समर्थन न देता त्या-त्या परिस्थितीत योग्य वाटेल तो विचार करून तात्पुरतं समर्थन देणे. काही लोकांना हे पटणार नाही – विशेषतः तत्त्वाला पक्के वगैरे असतात त्यांना. पण थोडा विचार केला तर असं लक्षात येतं की यात तात्पुरता संधीसाधूपणा वाटला तरी दीर्घकालीन तत्त्वनिष्ठपणा असू शकतो.

हे फार अ‍ॅबस्ट्रॅक्ट झालं, उदाहरणे दिली तर सोपं होईल. नुकतंच राजू भारतन यांचं ‘अ जर्नी डाउन मेलडी लेन’ हे पुस्तक वाचलं. हिंदी चित्रपट संगीतातील प्रमुख व्यक्तींवर त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन आहे. गेली अनेक दशके पत्रकार म्हणून काम करताना भारतन यांनी ओ पी नय्यरपासून आरडीपर्यंत सगळ्यांच्या सहवासात काम केलं आहे. अनेक वेळा गाणं तयार होत असताना ते हजर होते, या सर्वांची त्यांना जवळून ओळख आहे. त्यामुळे हे लेख वाचताना आपल्या दिवाळी अंकात नेहमी येणारे स्तुतिपर लेख खर्‍या परिस्थितीपासून किती दूर आहेत याचा प्रत्यय येतो.

मराठी माणसाचे काही ‘सॉफ्ट कॉर्नर’ आहेत. काही नावांचा उच्चार जरी केला तरी ‘डोळ्यात टचकन पाणी’ वगैरे येतं. लता, आशा, सचिन ही यातली काही नावं. या नावांचं कर्तृत्व मोठं आहे हे कुणी सांगायची गरज नाही, पण ते कर्तृत्व साजरं करताना मराठी माणूस स्वतःला इतका झोकून देतो की ती व्यक्ती माणूस आहे याचाच विसर पडतो. आपल्याकडचे नेहमीचेच यशस्वी गोड मुलाखतकार आणि त्यांनी घेतलेल्या अतिगोड मुलाखती बघितल्या तर असं लक्षात येतं की मराठी भाषेत या कलाकारांचं परखडपणे मूल्यमापन फारसं झालेलंच नाही. प्रत्येक मुलाखतीत भरपूर नॉस्टाल्जिया, मोठ्या नावांच्या आठवणी याशिवाय फारसं काही नसतं, झालंच तर आशाताईंच्या आवडत्या पाककृती वगैरे. हे ‘गुण गाईन आवडी’ एका मर्यादेपर्यंत ठीक असतं पण नंतर असह्य व्हायला लागतं. याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपला आवडता कलाकार त्याच्या कारकीर्दीत माणूस म्हणून वागला हे त्याच्या भक्तांना पटायला तयार नसतं. भारतन यांनी इंग्रजीत परखडपणे लिहिलं तरी ‘चंदेरी’साठी जेव्हा त्यांनी मंगेशकरांवर लिहिलं तेव्हा ते स्तुतिपर होतं कारण मराठी वाचकांना हेच आवडतं असं त्यांना सांगण्यात आलं. मग ‘ऐ मेरे वतन के लोगों’ आधी आशा आणि लता दोघी गाणार होत्या पण नंतर सरकारी हस्तक्षेप आणि लताबाईंचा आग्रह यामुळे आशाला डावलण्यात आलं किंवा ‘बिनाका गीतमाले’त आपलं गाणं यावं (किंवा फिल्मफेअर पुरस्कार मिळावा) यासाठी तेव्हाच्या संगीतकारांनी किती राजकारणं केली यासारख्या गोष्टी बाहेर येत नाहीत किंवा आल्या तरी त्यांची चर्चा होत नाही. हे फक्त आवडत्या कलाकारांच्या बाबतीतच होतं असं नाही. दर वर्षी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनी अनेक गौरवपर लेख येतात पण १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये चव्हाणांसकट सर्व नेते मान खाली घालून गप्प होते हे कुठेही लिहिलं जात नाही. त्यासाठी कुलदीप नय्यर यांचं ‘बियाँड द लाइन्स’ वाचावं लागतं. महाराष्ट्रात सिंहाची छाती असणारे नेते दिल्लीत गरीब गोगलगाय होतात हे बोलून दाखवलेलं कुणालाही आवडत नाही.

मराठी माणसाला नोस्टाल्जिया आवडतो हे अर्धसत्य आहे. याबरोबरच त्याला ‘सिलेक्टिव्ह अम्निशिया’चाही रोग आहे असं वाटतं. गेली एक्-दोन वर्षे मी सातत्याने आणीबाणीविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. यात कुलदीप नय्यर, नानी पालखीवाला यासारख्या लोकांनी उत्तम नोंदी ठेवल्या आहेत. मात्र मराठी भाषेत या विषयावर अत्यंत तुटपुंजी माहिती मिळते. आपली वर्तमानपत्रे, मासिके दर २६ जानेवारीला तेच ते चर्वितचर्वण करतात पण १९७५ साली याच प्रजासत्ताकाची काय परिस्थिती होती हे कुणालाही आठवत नाही. सामान्य लोकांच्या आठवणीतूनही हा भाग विसरला गेला आहे असं वाटतं. मुक्तपीठात ६३ साली खांसाहेबांचा षड्ज कसा लागला होता हे आठवतं पण ७५ मध्ये कशी मुस्कटदाबी झाली याची कुणालाही आठवण काढावीशी वाटत नाही.

हे थोडं विषयांतर झालं पण मुद्दा हा की कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीकडे शक्यतो पूर्वग्रहरहित नजरेनं बघितलं तर गोष्टी बर्‍याच सोप्या होतात. मग नेहरू वाइट असं म्हणण्यापेक्षा त्यांनी आयआयटीपासून इस्रोपर्यंत अनेक सुधारणा केल्या पण परराष्ट्र धोरण आणि विशेषतः काश्मीर आणि चीन प्रश्नांची अत्यंत बेजबाबदारपणे हाताळणी केली असं म्हणायला सोपं जातं. किंवा ताजं उदाहरण म्हणजे मोदी यांची अमेरिका यात्रा. हे शक्तीप्रदर्शन आहे हे उघड आहे, कार्यक्रमात ‘स्टार वॉर्स’सारखे कोट्स भोंगळ वाटतात हे खरं आहे पण याला दुसरी बाजूही आहे. (ओबामा साधा बर्गर खातानाही ‘अमेरिका यंव, अमेरिका त्यंव’ करतात, थोडं आपल्या पंतप्रधानांनी ‘शायनिंग’ केलं तर काय बिघडलं?) आंतरराष्ट्रीय बाजारात आपली पत गेल्या चार महिन्यात वाढली आहे. शेवटी तत्त्व वगैरे बोलायला कितीही छान असली तरी आर्थिक पत सर्वात प्रभावी आहे हे कटू असलं तरी सत्य आहे. मोदी विरोधकांची एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे विरोधासाठी विरोध. मोदींच्या १०० दिवसांच्या कारकीर्दीवर प्रखर टीका करायला अजिबात हरकत नाही पण मग तेच नियम गेल्या दहा वर्षांच्या मनमोहन सिंगांच्या कारकीर्दीलाही लावावेत. कट्टर डावे कधीही काँग्रेसवर अशी टीका करताना दिसत नाहीत – ‘कोलगेट’पासून वध्रापर्यंत कोणत्याही विषयावर. मोदी आले म्हणजे कॉर्पोरेटचं राज्य येईल असं म्हणणारे स्वतः कॉर्पोरेट जगापासून किती लांब असतात? आयफोन किंवा सामसुंग यांच्या फॅक्टरीमधील कामगारांना दिल्या जाणार्‍या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ किती लोक या उत्पादनांवर बहिष्कार घालतात? किंवा ओबामांच्या परराष्ट्र धोरणावर किती लोक टीका करतात? सगळेच लोक सोयीचं असेल तेव्हा आपल्या तत्त्वांना मुरड घालत असतात.

व्यक्तिशः मलातरी आतापर्यंत मोदींच्या विरोधात जावं असा एकही निर्णय दिसलेला नाही. मोदींची शैली ‘ऑटोक्रॅटीक’ आहे असं म्हणणार्‍यांना सोनिया गांधींची शैली लोकशाहीधार्जिणी वाटते का? (कॉग्रेस समर्थकांनी लोकशाहीविषयी बोलावं याहून मोठा विनोद नसेल.) इतिहास अभ्यासक्रमात बदल ही बाब गंभीर आहे हे मान्य पण इथे एक विनोदी मुद्दा असा की योग्य इतिहास शिकवूनही मोदी समर्थक इतिहासाचे तारे तोडतच असतात त्यामुळे पाठ्यपुस्तकात जे शिकवलं जातं त्यावर लोक कितपत अवलंबून राहतात हा प्रश्नच आहे. (सुशिक्षित लोकही ‘क्लायमेट चेंज’ नाकारतात तेव्हाही हेच दिसतं.) मोदी यांच्या जागी राहुल किंवा केजरीवाल असते तर काय झालं असतं याची कल्पना करा. स्वच्छ रस्ते, स्वच्छ नद्या याला कुणाचाही विरोध असेल असं वाटत नाही.

कुंपणावर बसण्याचा हा फायदा असतो – मोदींमुळे प्रगती झाली तर त्यांची स्तुती करायला जड जात नाही. आणि उद्या त्यांनी रथयात्रा काढली तर निषेध करणारा लेख लिहायलाही अवघड जाणार नाही. माझ्या मते सर्वात चांगली गोष्ट ही की सर्व विरोधाला न जुमानता मनमोहन सिंगांनी मंगळयानाला हिरवा कंदील दाखवला आणि मोदी यांनी पाठिंबा दिला. इस्रोसारख्या संस्था हे आपलं खरं यश आहे.

—-

१. “When I went to meet Y. B. Chavan and Jagjivan Ram at their homes on 26 June, I found intelligence officials noting down their car registration numbers and names of people coming to visit them. Chavan was afraid to meet me and Jagjivan Ram, who met me for a minute, looked nervous.” Beyond the Lines, pp. 226.

रहमानचा सोनाटा

‘रॉकस्टार’नंतर रहमानने विशेष म्हणावं असं काही दिलं नव्हतं – ‘हायवे’ ठीकठाक. त्यामुळे बी रंगन यांचा रहमानवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करणारा लेख वाचून आनंद झाला. लेख होता शंकर यांच्या ‘आय’ या चित्रपटाच्या संगीतावर. रहमानचा नवीन चित्रपट आला की सगळी गाणी ऐकावी लागतात. याचं कारण असं की रहमान सहसा कोणत्याही गाण्यात पाटी टाकत नाही त्यामुळे एखादा ‘जेम’ निसटून जायला नको. दुसरं म्हणजे पहिल्यांदा गाणं ऐकताना हमखास ‘हे काय आहे?’ अशी प्रतिक्रिया असते. गाणं काही दिवस ऐकल्याशिवाय पर्याय नसतो. नंतर गाणं आवडलं तर यात आधी विचित्र काय वाटत होतं ते कळत नाही. लेखात रंगन म्हणतात की ही गाणी अनुभवावीत, कुठे कोणतं वाद्य वापरलं आहे वगैरे कीस काढू नये. याबद्दल असहमत आहे. किंबहुना रंगन यांनी रसग्रहण करायला हवं होतं असं वाटतं. तर गाणी ऐकली, अजूनही ऐकतो आहे. त्यातलं जे पहिलं गाणं आवडलं त्यावर लेख आहे. हे गाणं ऐकताना रहमानच्या बर्‍याच गमती कळल्याच, शिवाय सर्वांना रहमान आवडावा अशी अपेक्षा किती चूक आहे हे ही लक्षात आलं.

पुढे जाण्याआधी काही इशारे. गाणं आहे तमिळ भाषेत आणि ते त्याच भाषेत ऐकायला हवं. याचं हिंदी डबिंग होणार आहे की नाही कल्पना नाही पण ‘रोजा’सारखे अपवाद वगळले तर रहमानच्या तमिळ गाण्यांचं हिंदी रूपांतर इतकं टुकार असतं की सांगायची सोय नाही. चाली तमिळ गाण्यावर केलेल्या, तिथे हिंदी शब्द (ते ही कैच्याकै) टाकले तर चाल आणि शब्द यांचा ताळमेळ जुळत नाही (‘टेलेफोन धून में हसने वाली’ आठवा). दुसरं असं की इथे गाण्याची आत्यंतिक चिकित्सा केली आहे. ‘इतका इचार कशापायी भौ? गाणं ऐकायचं आणि सोडून द्यायचं’ अशी विचारधारा असेल तर लेख न वाचलेलाच बरा. इतक्या खोलात जायची सवय जुनी आहे. लोक पिच्चर बघताना हीरो-हिरविणींच्या त्वांडाकडं बघत असतात, आम्ही क्यामेरा अ‍ॅंगल, फोकस, कंटिन्यूइटी बघत असतो.

‘ऐला ऐला’ हे गाणं पहिल्यांदा ऐकल्यावर काहीचं कळलं नाही. नेहमीप्रमाणे अंतरा, मुखडा कशाचाही पत्ता नव्हता. रहमानच्या गाण्यांचा अनुभव असा की काही वेळा ऐकल्यावर एखादी लकेर अचानक आठवते आणि रुतून बसते. मग ते गाणं आवडायला लागतं. ‘ऐला ऐला’ आवडलं तरीही हे काय चाललंय याचा पत्ता लागत नव्हता. अंतरा-मुखडा नाही पण मग मनात येईल तशा रॅंडम ओळी टाकल्यात का? याचं उत्तर सापडत नव्हतं. गाणं पुरतं मनात बसल्यावर अचानक कुलूप उघडावं तसा साक्षात्कार झाला आणि रहमानभाईंना मनातल्या मनात दंडवत घातला.

रहमानच्या संगीताला इंग्रजीत एक चपखल शब्द आहे – eclectic. याचा अर्थ सर्व प्रकारच्या कल्पना, स्रोत यामधून जे जे उत्तम ते निवडून घेणे. रहमानच्या संगीतात रेगे-हिपहॉपपासून ऑपेरापर्यंत सगळं काही सापडतं आणि म्हणूनच बर्‍याच भारतीयांना तो विशेष आवडत नाही. लता-रफी यांनी मुखडा गायचा, मग एक-दोन कडवी लताची, मध्ये अ‍ॅरेंजरनी बांधलेल्या संगीतांचे (बरेचदा सुरेख) तुकडे, एक-दोन रफीची की गाणं संपलं अशी हिंदी गाण्याविषयीची कल्पना असेल तर अशा लोकांना रहमान आवडणं सात जन्मात शक्य नाही. बरेचदा लोक म्हणतात ‘रोजाचा रहमान आता राहिला नाही’. गोष्ट खरी आहे पण इथे अपेक्षा अशी आहे की रहमानने रोजासारखंच संगीत देत राहायला हवं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत एकदा स्वतःची स्टाइल सापडली की तिला शेवटापर्यंत न सोडणे ही लोकप्रिय परंपरा आहे आणि अनेक दिग्गजांनी ती पाळली आहे – शंकर-जयकिशन म्हणजे ऑर्केस्ट्रा, ओपी म्हणजे ठेका. रहमानकडून तीच अपेक्षा करणे हा त्याच्यातल्या कलाकारावर अन्याय आहे.

आता थोडा इतिहासाचा धडा. चौदाव्या शतकात इटलीमध्ये रेनेसान्स आल्यानंतर युरोपमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती झाली. या प्रगतीचे ठराविक टप्पे होते. अठराव्या शतकाच्या मध्यात संगीतामध्ये ‘सोनाटा‘ या प्रकाराचा उदय झाला. सोनाटा प्रकाराची वैशिष्ट्ये अशी – सुरुवात एका सुरावटीने होते, हिला A म्हणूयात. ही संपली की वेगळी सुरावट येते, ही B. बहुतेक वेळा या संगीतामध्ये या दोन सुरावटींचा प्रवास असतो. कधी एक आनंदी स्वरांमध्ये असेल तर दुसरी दु:खी. बेथोवनच्या सुप्रसिद्ध पाचव्या सिंफनीत या दोन प्रकारच्या सुरावटी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. याचे अनेक प्रकारचे अर्थ लावता येतात. सुरुवातीला A आणि B येतात त्याला एक्स्पोझिशन म्हणतात – म्हणजे या सुरावटींची आपल्याला ओळख करून देणे. नंतरचा भाग डेव्हलपमेंट. इथे दोन सुरावटींचं स्वरूप बदलतं, त्या A′ आणि B′ होतात. शेवटच्या भागात A आणि B परत येतात, त्यांचं स्वरूप मात्र बदललेलं असू शकतं. याखेरीज ‘कोडा’ (C) नावाची एक महत्त्वाची सुरावट यात असते. डेव्हलपमेंट सुरू होण्याआधी एक्सपोझिशन जिथे संपतं तिथे हा कोडा येतो. कोडाचं वैशिष्ट्य असं की तिथे संगीत थांबतं. त्या ‘पॉझ’नंतर वेगळ्या सुरावटीचं संगीत सुरू होतं.

हे सगळं पुराण लावण्याचं कारण रहमानने ‘ऐला ऐला’ गाणं सोनाटा फॉर्मवर बेतलं आहे. नेहमीप्रमाणे गायक-गायिका सुप्रसिद्ध नाहीत. गायिका आहे कॅनडाची नताली दी लूचिओ आणि गायक आदित्य राव. आता हे गाणं सोनाटा फॉर्ममध्ये कसं बसतं बघूयात. एक सोयीचा भाग असा की रहमानने A, B, C तिन्ही सुरावटींसाठी गायक आणि गायिका आलटून पालटून वापरले आहेत त्यामुळे A कुठे संपते आणि B कुठे सुरू होते ते कळायला सोपं आहे.

गाणं सुरू होतं – A नतालीच्या आवाजात, मग B आदित्यच्या आवाजात आणि शेवटी कोडा C नतालीच्या आवाजात. कोडानंतर क्षणभर गाणं थांबतं. नंतर परत A नतालीच्या आवाजात आणि मग रहमानने कोरसमध्ये एक-दोन हिंदी ओळी वापरल्या आहेत. मग आदित्य येतो, पण इथे परत आधीची सुरावट B न वापरता त्यात बदल केला आहे B’. B’ ओळखायची सोपी युक्ती म्हणजे यात ‘हेय्या-होय्या’ अशा लकेरी आहेत. दोन B’ मध्ये परत नताली येते आणि शेवटी रहमानने परत गंमत केली आहे. अगदी सुरुवातीला जी B सुरावट आदित्यने म्हटली होती ती आता नताली म्हणते आणि कोडा C, जो सुरुवातीला नतालीच्या आवाजात होता तो आता आदित्यच्या आवाजात आहे. पण इथेही अगदी शेवटी कोडा संपताना परत नताली येते, आदित्य थांबतो आणि कोडा गाण्यासकट नतालीच्या आवाजात पूर्ण होतो. कोडा खास ऑपेरेटीक शैलीत वापरला आहे, यावरूनच सोनाटा शैलीविषयी क्लू मिळाला. तर असा हा रहमानचा सोनाटा.

रहमानच्या संगीताविषयी समीक्षक राजू भारतन म्हणतात, “..Rahman created his own scoring revolution…Saddening as such a development might have been to the old order, it is imperative for such a pre-set listenership to take a less snobbish peek at Rahman’s musical output and discern how his tunes have been as catchy, in their own way, as anything that C. Ramchandra or Shankar-Jaikishan fashioned in their salad days.”

—-

१. मराठी साहित्य जागतिक पातळीवर न पोचण्यात मराठी भाषेत हवं ते व्यक्त करता येणार्‍या शब्दांच्या कमतरतेचा वाटा किती? चर्चा करा.

२. वाक्यात उपयोग करा : कीस काढणे.

फर्गसन आणि धगधगता वर्णद्वेष

मागच्या आठवड्यात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील मिझुरी राज्यातील फर्गसन शहरात माइक ब्राऊन या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्यात तो मरण पावला. शवविच्छेदनातून कमीत कमी सहा गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालं, सर्व गोळ्या शरीराच्या वरच्या भागात होत्या, एक डोक्यात. गोळ्या झाडतेवेळी माईक कोणताही प्रतिकार करत नव्हता. या घटनेनंतर गेला आठवडाभर फर्गसनमध्ये आंदोलने चालू आहेत. याला उत्तर म्हणून पोलिसांनी आपला बेगुमान कारभार चालूच ठेवला आहे. वार्ताहरांना विनाकारण अटक करणे, जमावावर (यात स्त्रिया आणि लहान मुलेही आहेत) कोणतीही पूर्वसूचना न देता अश्रुधुराचा वापर करणे, विनाशस्त्र जमावाचा मुकाबला करण्यासाठी युद्धात वापरल्या जाणार्‍या रणगाडे, मशीनगन्स इ.सामग्रीं रस्त्यावर आणणे. माईकच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तो दुकानातून सिगारेटची पाकिटे चोरत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला – अर्थातच याचा आणि त्याला गोळ्या घालण्याचा काहीही संबंध नव्हता पण हे चारित्र्यहनन अजूनही चालू आहे. फर्गसनची परिस्थिती सध्या इतक्या टोकाला पोचली आहे की अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेने त्यांचे निरीक्षक तिथे पाठवले आहेत.

वरवर पाहता ही घटना अमेरिकेचा अंतर्गत मामला वाटू शकते पण याची पाळेमुळे बरीच खोल आहेत आणि त्यात अनेक पदर आहेत. साठच्या दशकात वर्णद्वेष कागदोपत्री जरी नाहीसा झाला असला तरी अमेरिकेत अनेक ठिकाणी तो आजही जिवंत आहे. अफ्रिकन अमेरिकन, चिनी-जपानी-भारतीय लोकांना अनेकदा याचा निरनिराळ्या स्वरूपात अनुभव येतो. बहुतेक वेळा आशियाई लोक आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरावर असल्याने वर्णद्वेषाची झळ कृष्णवर्णीय लोकांइतकी नसते मात्र गेल्या दशकात मुसलमान नागरिकांना विनाकारण त्रास दिला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. (किंवा दुसर्‍या महायुद्धादरम्यान जपानी-अमेरिकन नागरिकांना देशद्रोही म्हणून वेगळं ठेवण्यात आलं होतं.)

या घटनेचा एक मुख्य पैलू आहे – मिडिया. सुरुवातीला कोणत्याही च्यानेल किंवा वर्तमानपत्रात या घटनेचा उल्लेखही नव्हता. बातम्या यायला ट्विटवरवरून सुरुवात झाली. फर्गसनमधल्या लोकांनी आणि पत्रकारांनी तिथे काय घडतं आहे याचे फोटो आणि बातम्या द्यायला सुरुवात केली. ट्विटरवर फर्गसनने जोर पकडल्यानंतर मिडियाचं इकडे लक्ष गेलं. यात अर्थातच फक्त ट्विटर नाही तर फेसबुकचा समावेश होता पण दोन्हीमध्ये एक फार महत्त्वाचा फरक आहे. ट्विटरवर तुम्हाला काय दिसतं हे तुम्ही ठरवता, फेसबुकवर तुम्हाला काय दिसतं हे फेसबुक ठरवतं. जर तुम्ही मोदींना पाठिंबा देणार्‍या पोस्ट ‘लाइक’ करत गेलात तर लवकरच तुमची टाइमलाइन मोदींना समर्थन करणार्‍या पोस्टनी भरून जाईल, मोदींवर टीका करणार्‍या पोस्ट फेसबुक तुम्हाला दाखवणे बंद करेल. या कारणामुळे फेसबुकवर तुम्हाला निष्पक्ष बातम्या कधीच मिळत नाहीत. सध्या फर्गसनमध्ये ‘सिव्हिल वॉर’ची परिस्थिती आहे. वार्ताहरांना बातम्या देण्यापासून प्रतिबंध केला जात आहे, अटक केली जात आहे. याचा सर्वोच्च बिंदू कदाचित ९० वर्षाच्या होलोकॉस्ट सर्व्हायव्हर हेडी इपस्टीन हिला अटक करण्यात आली तेव्हा झाला. अपराध – पोलिसांवर टीका केली.

९० वर्षाच्या होलोकॉस्ट सर्व्हायव्हर हेडी इपस्टीन हिला अटक

आता इथे एक मुद्दा येतो. दंगली जगभर होतात, अराजकता प्रत्येक देशात असते. (भले आपल्या स्तंभलेखकांना पाश्चात्त्य देश स्वर्ग वाटोत!) मग फर्गसनवर इतका वेळ आणि शक्ती खर्च करण्याचं कारण काय? (आपल्याकडे काय कमी अडचणी आहेत का?) लेख लिहिण्याआधी हा प्रश्न मी स्वतःला विचारला. याचं उत्तर अनेक पदरी आहे. पहिलं – अमेरिकेबद्दल इथल्या आणि तिथल्या अनेक भारतीयांचे गैरसमज आहेत. आपले ष्टार स्तंभलेखक जेव्हा जागतिक राजकारणावर ‘इयत्ता ९ वी’च्या पातळीचे लेख लिहितात तेव्हा हे दिसतं.  इथल्यांचं एक वेळ समजू शकतो, तिथे वर्षानुवर्षे राहूनही परिस्थितीचं आकलन कसं होत नाही देवजाणे. हे गैरसमज अनेक प्रकारे दिसतात – उदा. देवयानी प्रकरण. अमेरिकेवर टीका केलेली अनेकांना आवडत नाही. बरेचदा यावर प्रतिक्रिया म्हणून उच्चविद्याविभूषित लोकही माता-भगिनी स्मरण करताना दिसतात. लक्षात घ्या, अमेरिकेवर टीका तिथे इतके भारतीय आहेत म्हणून होत नाही, अमेरिकेच्या वागणुकीमुळे होते आहे. ज्या दिवशी अमेरिका सर्व जग आपल्या पिताश्रींना कूळकायद्यानुसार मिळालेलं आहे अश्या आविर्भावात वागणं थांबवेल त्या दिवशी टीकाही बंद होईल.

फर्गसनमध्ये जे होतं आहे ते वर्षानुवर्षे अमेरिकेत होत आलं आहे. याच्या मुळाशी वर्णद्वेष आहे. खरंतर दीडशे वर्षं ‘Indians and dogs not allowed’ सहन केल्यावर प्रत्येक भारतीय वर्णद्वेषाचा कट्टर विरोधी असायला हवा पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. बरेचसे भारतीय फ्लोरिडातील गोर्‍यांना लाज वाटेल इतके वर्णद्वेषी असतात. मुक्तपीठात काळ्या कातडीवर विनोद छापताना सकाळच्या संपादकांना काहीही वाटत नाही. तिकडे खाजगीत निग्रो लोकांना ‘काळूराम’ किंवा तत्सम नावांनी संबोधण्यात येतं. (भारतात आंतरराष्ट्रीय परिषद असेल तर बाहेरून येणार्‍या भारतीय आणि पाश्चात्त्य लोकांना वेगळी वागणूक मिळते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. रजिस्ट्रेशन करताना पैसे युरोमध्ये घ्यायचे, पण सगळीकडे प्राधान्य मात्र गोर्‍या कातडीला. ‘इंडियन इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स’मध्ये जर ही परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी विचारायला नको. भारतात कुठेही गोरी कातडी, निळे डोळे असलेल्या परदेशी पर्यटकांचं जे गळेपडू आदरातिथ्य केलं जातं तिथे हे दिसतं.) आणि आज काही परदेशस्थ भारतीयांनी फर्गसनमधील कृष्णवर्णीयांवर टीका केल्याचंही वाचलं.

ब्लॉगचे अनेक वाचक अमेरिकेत आहेत, इथल्यांपैकी काही कदाचित जाणार असतील. कुणी, कुठे राहावं हा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र एकदा राहायचं नक्की केल्यावर आपण कोणत्या समाजात राहत आहोत, त्याचा इतिहास काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. ग्रीन कार्ड आणि अमेरिकन ड्रीम म्हणजे आयुष्याची परमावधी नव्हे, तिथेही अडचणी आहेत. इथल्यापेक्षा वेगळ्या आहेत इतकंच. शाळा-कॉलेजात इतिहास अनावश्यक वाटायचा, मात्र निवडणूकीआधी मोदी समर्थकांनी इतिहासाचे जे तारे तोडले ते पाहून इतिहास सर्वांना ‘कंपल्सरी’ करायला हवा असं वाटायला लागलं. आधी इतर विषयांवर झालं तसंच या विषयावरही अमेरिकेतील भारतीय मौन बाळगून असतात. खरं तर ‘सिव्हिल राइट्स’ हा स्नोडेन किंवा एनएसएपेक्षा बराच ‘सेफ’ विषय आहे. याचा अर्थ प्रत्येक विषयावर रस्त्यावर येऊन आंदोलनच करायला हवं असं नाही पण किमान चर्चा झाली तर बरं. ती होत असेल तर चांगलंच आहे.

अमेरिकचं दिवसेंदिवस ‘पोलिस स्टेट’मध्ये रुपांतर होत चाललं आहे. इराक वगैरेमध्ये लोकशाहीची चिंता करण्याऐवजी आपल्या घराची दुरुस्ती केली तर सर्वांसाठीच फायद्याचं ठरेल.

डावीकडे : फर्गसनमधील नागरिकावर पोलीस शस्त्रे रोखताना. उजवीकडे : स्पॅनिश चित्रकार गोया याने १८१४ साली काढलेलं चित्र. यात फ्रेंच सैनिक स्पॅनिश क्रांतिकारकांवर गोळ्या झाडताना दिसतात. चित्राची क्ष-किरणांनी तपासणी केल्यावर सैनिकांच्या बंदुकी रंगवण्याआधी गोयाने कॅनव्हासवर खोल ओरखडे मारल्याचं आढळून आलं.