रक्ताची तहान कुणाला?

याकूब मेमनला फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी कायदेबाजीचे शेवटचे टोक गाठणा-या वकिलवर्गांपैकी एक ज्येष्ट वकील आनंद ग्रोव्हर ह्याचे बहुतेक डोके फिरले असावे. याकूब मेनन फाशी प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोर्टातच ग्रोहरमहाशय उद्गारले, रक्ताची तहान लागलेले हे सगळे उद्या याकूबला फाशी देणार आहेत!’ त्याआधी कोर्ट रूम नंबर 4 मध्ये बसायला जागा नाही हे पाहून दुसरे एक वकील उद्गारले, यहाँ मछली बजार लगा है क्या?’ याकूबची मनःस्थिती ठीक नाही हे समजण्यासारखे आहे. पण त्यांची फाशी पुढे ढकलण्याचा निर्णय कोर्टाकडून मिळवावा म्हणून सगळे वकीली कसब पणाला लावणा-यांचे मन था-यावर राहिले नाही हे उघड आहे. राष्ट्रपतींनी याकूबचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर देशातील शेदोनशे विचारवंतांच्या ह्रदयात एकाएकी माणूसकीचा पाझर फुटला. रिकामटेकड्या पत्रकारांना हाताशी धरून त्यांनी सरकारविरूद्ध रान उठवले. सर्वोच्च न्यायपीठासमोर ह्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना ह्यांनी अकलेचे तारे तोडत स्वतःचे न्यायदान सुरू ठेवले. ज्या वेळी ठोस मुद्दा नसतो त्यावेळी अशा क्लृप्ती योजण्याचा त्यांचा एकच हेतू असतो. याकूबला येनकेन प्रकारेण वाचवण्याची खटपट करणा-यात राम जेठमलानी हे अग्रणी होते. चित्रपटसृष्टीपलीकडील जगाची नीट ओळख नसलेल्या नसरद्दीन शहा, महेश भट, सलमान ह्यांच्यासारखे चित्रपटदिग्दर्शक, कलावंत वगैरे मंडळी याकूब बचाव मोहिमेत सामील झाली. न्यायालयीन कामकाजाचा त्यांचा काडीइतकाच संबंध असल्याने त्यांची दखल घेण्याचे कारण नाही. परमेश्वर त्यांना क्षमा करो. कारण त्यांचा संबंध आला तो हवे तसे कोर्टसीन लिहून देणार-या सुमार कुवतीच्या पटकथा लिहून देणा-या लेखकांशी!
याकूब मेमनचा गुन्हा साधासुधा नाही. गनिमी काव्याच्या तंत्राने भारतभर ठिकठिकाणी बाँबस्फोट घडवून आणून जेवढी जीवित आणि वित्तहानी घडवून आणता येईल तेवढी घडवून आणण्याची योजना पाकिस्तानी हेरसंस्थेने आखली. ह्या योजनेनुसार दाऊदसारख्या फरारी गुन्हेगाराला हाताशी धरून सर्वप्रथम मुंबई शहर उद्धवस्त करण्याचा कट रचण्यात आला. रचलेल्या कटानुसार मुंबई शहरात तासातासाच्या अंतराने अनेक ठिकाणी बाँबस्फोट सुरू झाले. ह्या बाँबस्फोटांमुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी पडझड झाली. पडझडीत असंख्य माणसे जखमी झाली. शहरातली 250 माणसे ठार झाली. जखमी माणसे अजूनही विव्हळत असतील. बाँबमध्ये आरडीएक्ससारखे तीव्र स्फोटक वापरण्यात आले होते. शहरात त्या कटाची काटेकोर अमलबजावणी करण्याचे काम याकूब मेमनच्या कुटुंबियांनी केले हे न्यायालयात पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारे सरकारी वकील उज्ज्वल निकमनी परिश्रमपूर्वक सिद्ध केले. असे असतानाही टाडा कोर्टाच्या न्यायदानात त्रुटी असल्याचे कारण देत क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली. ती फेटाळली गेल्यानंतर फाशी स्थगित ठेवण्याची पुन्हा याचिक दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टालाही मध्यरात्री सुनावणी घेण्यास भाग पाडण्यात आले. पुन्हा रात्री राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यात आला!
एखाद्या शहरात बाँबस्फोटाची मालिका सुरू करून मुंबई शहराचा बहुसंख्य भाग जमीनदोस्त करण्याचा आणि निरपराध नागरिकांचे प्राण घेण्यासाठी करण्यात आलेल्या ह्या गुन्ह्याला तोड नाही. खरे तर, दुस-या महायुद्धानंतर जगाच्या इतिहासात घडलेला अशा प्रकारचा पहिलाच गंभीर गुन्हा! ह्या गुन्ह्याचे गांभीर्य आपल्या विचारवंतांना कळू नये हे आश्चर्यकारक आहे!  कायद्याच्या बाबींवर भाष्य करण्याची आणि कनिष्ठ कोर्टांनी दिलेल्या निर्णयाविरूद्ध अपील  करण्याची संधी सर्वांना दिली जाते. तशी ती याकूबलाही दिली गेली. परंतु तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही.
याकूबचे अपील लढवण्याच्या कामी साह्य करणारे वकीलमहाशय ग्रोहर म्हणतात, त्यांना रक्ताची तहान लागलीय्. म्हणून ते उद्या याकूबला फाशी देणार!  ग्रोव्हरसाहेब, रक्ताची तहान तर पाकिस्तानी हेर संस्थेला लागली होती. हेर संस्थेचे हस्तक म्हणून काम करणा-या सगळ्या देशद्रोह्यांना लागली होती. देशद्रोही दाऊदला रक्ताची तहान लागली नव्हती  काय? टागर मेमनला लागली नव्हती? बाँबस्फोटाच्या कटात सहभागी झालेल्या मेमन कुटुंबियासही लागली नव्हती काय? तरीही न्यायालयाने सारासार विचार केला. मेमन कुटुंबियांतील 3 जणांना दोषमुक्त केले तर अन्य तीन जणांची तुरूंगात रवानगी केली. दोन जण फरार आहेत. याकूब ह्या एकालाच फाशीची शिक्षा देण्यात आली. प्रत्येक आरोपीचा वेगवेगळा विचार करून त्यांच्या गुन्ह्यानुसार त्यांना शिक्षा देण्यात आली हे उघड आहे. अलीकडच्या काळातले न्यायबुद्धीचे हे सर्वात मोठे उदाहरण!  पण मतिभ्रष्ट विचारवंतांना हे कसे लक्षात येणार?
रमेश झवर
www.rameshzawar.com

सर्पदंश -दोन लघुकथा


 महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या अनेक नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे.  महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आज्ञा दिली, यात विचार कसला, ठेचुन टाका त्याला.  सैनिकानी तत्काल त्या नागाला ठेचुन ठार केले.


दुसरी कथा:


महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे.  महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आपल्या मंत्र्याना या बाबत त्यांच्या सल्ला मागितला. 


 पहिला मंत्री: महाराज अधिक विचार न करता ह्या विषारी नागाला ठार मारले पाहिजे, जर हा सुटला तर पुन्हा लोकांना डसेल. याला जिवंत सोडले तर शेजारच्या जंगलातून अनेक नाग या नगरात येऊन प्रजेला डसतील. 


 दुसरा मंत्री: महाराज, आपण नागाची बाजू हि लक्ष्यात ठेवली पाहिजे. नाग हा विषारी असतो,नागाचा दंश प्राण घेणारच. आपण सभ्य मानव आहोत.  ‘खून का बदला  खून‘ हि आपली नीती नाही. आपली प्रजा  असो  वा नाग. दोघांना एक समान न्याय मिळाला पाहिजे. बिना विचार करता त्याचे प्राण घेणे योग्य नाही.  राजाला दुसर्या मंत्रीचे विचार पटले. त्याने  नगरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीचा सल्ला घेण्याचे ठरविले. या समितीत अतिशय बुद्धिमान नाना कलासंपन्न आणि पुरोगामी विचारांचे प्रजाजन होते.


प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीने राजाला सल्ला दिला.  राजा नाग हा विषारी असतो, तो लोकांना डसतो. हा त्याच्या स्वभाव आहे. त्याने त्याच्या स्वभावानुसारच लोकांना डसले आहे. दंश विषारी असल्यामुळे लोक मेले. त्या साठी नाग जवाबदार कसा. त्याला ठेचून मारण्याची शिक्षा देणे हा त्याच्यावर अन्याय आहे.   आमची सिफारीश आहे, नागाचे प्राण घेण्याएवजी त्याला सोन्याच्या पिंजर्यात ठेवले पाहिजे.  दर नागपंचमीला त्याला दुधाचा नेवेद्य दाखविला पाहिजे. असे केल्याने तो कुठेही पळून जाणार नाही.


 राजाला  प्रतिष्ठित नागरिकांच्या  समितीचे विचार पटले. त्याने नागाला जीवदान दिले. एका सोन्याच्या पिंजर्यात नागाला ठेवले. दर नागपंचमीला तो दुधाचा नेवेद्य नागाला दाखवू लागला. एका नागपंचमीला नागाला दुधाचा नेवेद्य दाखवीत असताना तो नाग राजाला डसला. नाग दंशाने राजाची मृत्यू झाली.  


आता प्रश्न आहे, राजाच्या मृत्यूला  कारणीभूत कोण? नाग कि प्रतिष्ठित नागरिकांची समिती. 


स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात, ज्याला याचे उत्तर कळेल, त्याची सर्पदंशाने कधीच मृत्यू होणार नाही.

  

कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावणारा कादंबरीकार

आदर्श, परंपरा, प्रेरणा, मानदंड, निकष, धारणा या सतत बदलणाऱ्या गोष्टी असतात, असायला हव्यात. कारण प्रत्येक नवी पिढी ही आधीच्या पिढीची टीकाकार असते. आधीच्या पिढीने जी काही मांडणी केलेली असते, त्यातील उणिवा शोधणे, त्या मांडणीत नवी भर घालणे, प्रसंगी त्यातील कालबाह्य भाग नाकारून नवी मांडणी करणे ही नव्या पिढीची कामे असतात. एवढेच नव्हे, तर कर्तव्य असते. कुणाही एका व्यक्तीने केलेल्या मूल्यमापनाला मर्यादा असतात. कारण त्या व्यक्तीच्या साहित्याचे काहीच पैलू उलगडले जाऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही साहित्याचे पुन्हापुन्हा मूल्यांकन करणे हे समीक्षकांचे कामच असते. त्यामुळे त्या व्यक्तीचे योगदान नेमकेपणाने जाणून घ्यायला मदत होते. काळाच्या ओघात त्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेले गैरसमज दूर होण्यास मदत होते. आधीच्या समीक्षकांकडून कळत-नकळत झालेला अन्याय दूर करता येतो. मात्र, याबाबतीत मराठी साहित्यातील समीक्षक कमी पडतात, ही वस्तुस्थिती आहे. मराठी समीक्षकांनी साठोत्तरी प्रवाहानंतर फारसे नवे सिद्धान्त मांडलेले नाहीत आणि ज्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांची दखलही घेतलेली नाही. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे, तर प्राध्यापक रा. ग. जाधव यांनी ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ (ecology off literature) हा आधी मांडलेला आपला सिद्धान्त दोनेक वर्षांपूर्वी नव्याने मांडून दाखवला आहे; पण त्याची साधी दखलही मराठी समीक्षकांनी घेतलेली नाही. त्याची जाधव यांनाही पूर्वकल्पना होती, म्हणूनच त्यांनी माझे पुस्तक कोणी वाचणार नाही, असे नि:संदिग्धपणे सांगितले होते.
अशा प्रकारची उदासीनता ही अनभ्यस्ततेतून निर्माण होते. जुन्याच जोखडांना चिकटून राहिल्याने आणि जे आपल्याला पटत नाही, ते सरसकट नाकारायचेच या वृत्तीने मराठी समीक्षा विद्यापीठीय वर्तुळापुरती मर्यादित झाली. तिचा समाजाशी असलेला अनुबंध तुटला; पण त्याचे सोयरसुतक समीक्षकांना आहे, याचे दाखले फारसे सापडताना दिसत नाहीत.
या प्रकारामुळे प्रयोगशीलता, नवे रचनाबंध, नवे दृष्टिकोन यांची उपेक्षा करणे, त्याची दखल न घेणे वा त्यावर अनभ्यस्त पद्धतीने टीका करणे हे प्रकार वाढीला लागलेले दिसतात.
याची अलीकडची दोन महत्त्वाची उदाहरणे म्हणजे विलास सारंग आणि श्याम मनोहर.
 सारंग यांची अकारिक प्रयोगशीलता तर मराठी समीक्षक, लेखक आणि वाचक यांना पेलवलीच नाही. ज्यांनी सारंग यांची पुस्तके प्रकाशित केली, त्या प्रकाशकांना ती कळली असेही नाही. शिवाय, सारंग यांनी आपला शिष्य संप्रदाय जमवला नाही. अशा प्रयोगशील लेखकाकडे नवे लेखक आकर्षित होतात; पण सारंग यांच्या बाबतीत तेही फारसे झालेले दिसत नाही. त्यामुळे सारंग यांच्या साहित्याचे यथोचित मूल्यमापन तर सोडाच; पण ते नीट समजून घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न मराठी समीक्षेकडून पुरेशा प्रमाणात झाला आहे, असे दिसत नाही.
जी उपेक्षा सारंग यांची झाली, तोच प्रकार श्याम मनोहर यांच्या बाबतीत होताना दिसतो आहे.
खरं म्हणजे श्याम मनोहर यांच्या सुरुवातीच्या कथा-कादंबरी-नाटक या वाङ्मय प्रकारातील लेखनाची दखल काही प्रमाणात घेतली गेली आहे, नाही असे नाही; पण मूल्यमापन मात्र काही विशेषणाच्या पलीकडे जाताना दिसत नाही. ‘ब्रेन टीझर कादंबरीकार’, ‘प्रयोगशील कादंबरीकार’, ‘विक्षिप्त कादंबरीकार’ या विशेषणांपलीकडे मनोहर यांच्या कादंबऱ्यांकडे पाहिले जाते आहे, असे जाणवत नाही. ‘शंभर मी’ या कुठलाच नायक नसलेल्या आणि फारसे घटनाप्रसंग नसलेल्या मनोहरांच्या कादंबरीवरील प्रतिक्रिया पाहिल्या तर ते प्रकर्षाने जाणवते.
मनोहर यांच्या अलीकडच्या कादंबऱ्यांची चमत्कारिक वाटणारी नावे (उदा. खूप लोक आहेत, उत्सुकतेने मी झोपलो, खेकसत म्हणणे आय लव्ह यू, शंभर मी) याचीच चर्चा अधिक होते आहे; पण मनोहर या कादंबऱ्यांमधून जे सांगू-मांडू पाहत आहेत, त्याला भिडण्याची तयारी मराठी समीक्षा दाखवताना दिसत नाही. “ही काय कादंबरी आहे का?”, “हा तर चक्रमपणा झाला!”, “तत्त्वज्ञानच झोडायचे आहे, तर मग तसे पुस्तकच लिहावे ना, ते कादंबरीत कशाला घुसडायचे?” असे प्रश्नोपनिषद उभे केले जात आहे. “मनोहर यांना सरळपणे काहीच सांगता येत नाही. ते कायम वळसे घेत काहीतरी दुर्बोध सांगण्याचा प्रयत्न करतात,” हा समज तर मराठी साहित्यात सार्वत्रिक होत चालला आहे. मनोहर हे मराठी कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावू पाहणारे कादंबरीकार आहेत. (हाच प्रकार नाट्यदिग्दर्शक म्हणून पं. सत्यदेव दुबे यांनी केला आहे. फरक एवढाच की, दुबेंनी ते इतरांच्या संहितेच्या बाबतीत केले आहे. मनोहर यांची नाटककार म्हणून ओळख झाली ती दुबेंमुळेच.) कादंबरीच्या अक्षांश- रेखांशमध्ये जे-जे काही करता येणे शक्य आहे, त्याच्या जेवढ्या म्हणून शक्यता आहेत, त्या-त्या पणाला लावून पाहण्याचा प्रयत्न ते त्यांच्या प्रत्येक कादंबरीत करत आले आहेत.
या साऱ्या प्रयोगातून मनोहर यांना काय सांगायचे आहे? मनोहर म्हणतात, “मला कादंबरीची नवी संकल्पनात्मक मांडणी करायची आहे. मी तिची नवी व्याख्या करू पाहतो आहे. बदलती समाजाची सभ्यता आणि ‘मी कोण आहे’ या दोन्ही प्रश्नांना कादंबरीच्या माध्यमातून भिडण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘मी कोण आहे’ हा प्रश्न आपण अध्यात्मात लोटून दिला आहे. त्याला मला कादंबरीत आणून, त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे.”
मराठी कादंबरीकार बौद्धिक प्रश्नांशी झोंबी घेत नाहीत, ही तर वस्तुस्थिती आहे. श्याम मनोहर यांनी जेवढ्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत, तेवढीच नाटकंही लिहिली आहेत. त्यांचे प्रयोगही झालेले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे अभिवाचन, त्यावर आधारित नाट्यप्रयोगही होत आहेत; पण त्यांचे स्वरूप प्रायोगिक असेच आहे. ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे की, ते तरुण लेखक-कलाकार आहेत. नव्यांना रूढ संकेतांना फाटा देणाऱ्या, अब्सर्ड धर्तीच्या आणि प्रसंगी आपल्याला नीट न उमगलेल्या गोष्टींची ओढ अधिक असते. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे; पण त्यांच्याकडून मूल्यमापनाची, समग्र आकलनाची फारशी अपेक्षा ठेवता येत नाही. त्यासाठी अभ्यस्त समीक्षकांचीच गरज असते; पण मराठी समीक्षेचा निदान अलीकडच्या काळातला लौकिक तरी आस्वादक आकलनाच्या पलीकडे फारसा जाताना दिसत नाही. मनोहरांच्या बाबतीत तर तो खूपच जाणवतो. त्यांच्या कादंबऱ्या आस्वादाच्या पातळीवर समजून घ्यायला-द्यायला मराठी समीक्षा कमी पडते आहे. उदा. ‘शंभर मी’ ही कादंबरी पाहू. या कादंबरीत १२५ हून अधिक प्रकरणे आहेत; पण या कादंबरीला कुठलाही नायक नाही. फारसे घटनाप्रसंगही नाहीत. माणसाच्या शंभरहून अधिक प्रवृत्ती त्यांनी एकेका प्रकरणातून मांडल्या आहेत. ही कादंबरी नीट वाचली तर कळते की, या प्रवृत्तीच या कादंबरीच्या नायक आहेत; पण व्यक्तीला नायक मानून त्याला चांगल्या-वाईट प्रवृत्ती चिकटवण्याची मराठी कादंबरीकारांची परंपरा असल्याने मराठी समीक्षकांना या कादंबरीकडे कसे पाहावे, हेच कळेनासे झाले आहे. कमी-अधिक फरकाने मनोहरांच्या सर्वच कादंबऱ्यांबाबत अशीच स्थिती आहे. सामान्य माणूस त्याच्या दैनंदिन जगण्याकडे कसे पाहतो, त्यातील संगती-विसंगती आणि विक्षिप्तपणा आपल्या कादंबऱ्यांमधून मनोहर मांडण्याचा प्रयत्न करतात. माणूस हे किती गुंतागुंतीचे प्रकरण असते, एकाच माणसामध्ये किती प्रकारच्या प्रवृत्ती असतात, त्याचा शोध घेण्याचे काम मनोहर करू पाहतात; पण ही गोष्ट समजून घेण्यात मराठी समीक्षा उणी पडते आहे, असे खेदाने म्हणावे लागते.


मराठी समीक्षकांमध्ये एक (दुष्ट) प्रवृत्ती आहे की, ते काय लिहिले आहे, ते काय प्रतीचे आहे, यापेक्षा काय लिहिले नाही, याचीच जास्त चर्चा करतात. याचा अर्थ असा होतो की, प्रत्यक्षात लेखकाला काय म्हणायचे आहे, हे मराठी समीक्षक फारसे समजून घेताना दिसत नाहीत. त्यात केवळ कथा-कादंबऱ्या-नाटके लिहिणाऱ्या आणि सार्वजनिक सभा-समारंभात न बोलणाऱ्या, फारसे गद्यही न लिहिणाऱ्या मनोहरांसारख्या लेखकाविषयी कसे जाणून घेणार, हाही प्रश्न असतोच; पण आता त्याची सोडवणूक श्याम मनोहर आणि चंद्रकान्त पाटील यांनी केली आहे. मनोहर यांच्या निवडक भाषणांचे व लेखांचे ‘श्याम मनोहर : मौखिक आणि लिखित’ हे सव्वाशे पानी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यामुळे मनोहर केवळ कादंबरीच नाही, तर एकंदर फिक्शनचा कसा विचार करतात हे जाणून घेण्याची मोठीच सोय झाली आहे. या पुस्तकातील ‘फिक्शन हीही ज्ञानशाखा आहे’ या लेखात मनोहर म्हणतात, “माणसाच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. स्वत:चे कल असतात, माणसात कुटुंबाचे असते. माणसात समाजघटकाचे वा जातीचे असते. शैक्षणिकतेवरूनचे, व्यावसायिकतेवरूनचे असते. भाषेचे असते. देशाचे असते. हे सगळे होत माणसाच्या माणूसपणापर्यंत जायचे असते. इतका पल्ला फिक्शनमध्ये घ्यायचा असतो आणि माणूस म्हणजे काय याचा शोध घ्यायचा असतो. त्या माणूसपात्राने त्याचे वर उल्लेखलेले सर्व बाळगत, त्यातील काही दुरुस्त करीत, त्यातील काहींना प्रश्न करीत, काहींचे विनोद करीत, काही लपवत त्या माणूसपात्राने जीवनाचा त्याचा स्वत:चा अर्थ शोधायचा असतो. हे माणसाचे कर्तव्य आहे. माणूस म्हणून हे करत नसेल, तर हे फिक्शनने करायचे असते किंवा फिक्शनने नागरिक वाचकांना त्याची जाणीव करून द्यायची असते.”
या उताऱ्यावरून मनोहरांची फिक्शनमागची नेमकी भूमिका काय आहे, हे सहज समजून घेता येईल.
आता प्रश्न एवढाच आहे की, मनोहर यांचे हे नवे पुस्तक वाचून मराठी समीक्षक त्यांच्या कादंबऱ्यांना नव्याने भिडण्याचे धाडस करतील की नाही? जे करतील, त्यांना हे लक्षात ठेवावे लागेल की, जुन्या हत्यारांनी नव्या लढाया लढता येत नाहीत. जिंकता तर अजिबातच येत नाहीत.   

लोकप्रिय राष्ट्रपती!

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती अब्दुल जे कलाम गेले. पंचमहाभूतांवर विजय मिळवणारा त्यांचा देह पंचमहाभूतात विलीन झाला. भारताचा हा मिसाईल मॅन निघून गेला. भारतीय लोकशाही वृक्षावर फुललेले सुंदर फूल अचानक गळून पडले! त्यांच्या निधनाने देश हळहळला. विसाव्या शतकात तिशीच्या दशकात जन्मलेल्या, वाढलेल्या ह्या रामेश्वरपुत्राच्या डोक्यात ना कधी भोंगळ समाजवादाचे वारे शिरले ना राजकारणाने त्याला मोहात पाडले. साध्या नावाड्याचा मुलगा. शाळेत असताना सकाळी वर्तमानपत्रे विकून वडिलांना मदत करणा-या अब्दुलला लहानपणापासून गणिताची आवड! म्हणून शालेय शिक्षण आटोपताच चेन्नईला तंत्रमहाविद्यालयात एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा घेतला आणि त्याहून उच्च शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतून भारतात परतल्यावर 1958 साली ते इस्रोमध्ये दाखल झाले. बालपणी त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्यांच्यातल्या साहसी वृत्तीनेच त्यांचे स्वप्न साकार केले. म्हणूनच त्यांनी तरूणांना संदेश दिला, “My message, especially to young people is to have courage to think differently, courage to invent, to travel the unexplored path, courage to discover the impossible and to conquer the problems and succeed.”
विशेष म्हणजे ए पी जे कलामनी पाहिलेले स्वप्न आणि देशाने पाहिलेले स्वप्न तंतोतंत जुळत गेले. स्पेस टेक्नालॉजी, अणुसंशोधन आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या संशोधनातली त्यांची मती आणि गति पाहूनच विक्रम साराभाईंनी त्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत निवड केली नसती तरच नवल ठरले असते. साराभाईंची निवड किती सार्थ होती हेच पुढील काळात जेव्हा एका पाठोपाठ एक भारताने अंतराळात उपग्रह सोडले ते दिसून आले. जेव्हा संरक्षण संशोधन संस्थेच्या प्रमुखपदाची जागा रिक्त झाली तेव्हा त्या संस्थेच्या प्रमुखपदासाठी ए पी जे कलाम ह्यांची निवड होणे स्वाभाविक होते. पण हा काळा त्यांच्या आयुष्यात कसोटीचा ठरला! अण्वस्त्रात आणि अवकाश प्रक्षेपणात वापरले जाणारे तंत्र एकच असते. आकाशात उपग्रह पाठवण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते तेच तंत्रज्ञान जमिनीवरून लांब पल्ल्याचे अण्वस्त्र प्रक्षेपित करण्यासाठीही वापरले जाते जगभर दुहेरी तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणा-या ह्या तंत्रज्ञानावर भारताने प्रभुत्व मिळवल्यास बड्या देशांच्या पंक्तीला भारत येऊन बसणार हे सूर्याप्रकाशाइतके स्वच्छ दिसू लागले. म्हणूनच भारताला हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री पुरवण्यावर स्वतः अण्वस्त्रसज्ज असलेल्या अमेरिकेच्या पुढाकाराने बंदी घालण्यात आली. पण ह्या बंदीमुळे शस्त्रास्त्र संशोधन संस्थेचे प्रमुख कलाम आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ हातपाय गाळून स्वस्थ बसले नाही. उलट, त्यांचे संशोधन दुप्पट जोमाने सुरूच राहिले.
रॉकेट जेव्हा पृथ्वीची कक्षा ओलांडते तेव्हा ते अति उष्णतेमुळे जळून जाण्याची भीती असते. ते जळू नये म्हणून आवश्यक असलेले क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी भारताकडे नव्हती. ती देशात विकसित करावी तर त्याला लागणारी साधनसामुग्री नाही. रशिया त्यावेळी भारताच्या मदतीला धावून आला. रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन तर दिलेच; खेरीज शून्याखाली 400 अंश तपमान कसे राखावे ह्याचे क्रायोजेनिक तंत्रज्ञानही भारताला दिले. हे एक तंत्रज्ञान सोडले तर अन्य छोटेमोठे तंत्रज्ञान देशातच विकसित करण्याचा निर्णय संरक्षण संशोधन संस्थेने घेतला. सामान्यतः राज्यकर्ते संरक्षणादि खात्यात चालणा-या संशोधनास बळ देतात. ह्या संदर्भातली वस्तुस्थिती मात्र नेमकी उलट आहे. इथे संशोधकांनी राज्यकर्त्यांना बळ दिले. लांब पल्ल्याची प्रत्क्षेपणास्त्रे आणि पृथ्वीची कक्षा सहज ओलांडू शकेल अशा रॉकेटची निर्मिती ह्या दोन्ही बाबतीत भारताला यश मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची इभ्रत वाढली!
रणाविण स्वातंत्र्य मिळवून देणा-या महात्मा गांधींमुळे भारताचे नाव जगात दुमदुमले तर मिसाईल मॅन म्हणून ए पी जे कलाम ह्यांचे नाव दुमदुमले ते स्वसंरक्षण करण्यासाठी भारताला अग्नीपंख दिले म्हणून!   एके काळी शांततेचे प्रतीक म्हणून आकाशात कबुतरे सोडणा-या शांतिदूत पंडित जवाहरलालजींचे नाव दुमदुमले होते. त्यांचे राजकीय वारस इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी ह्यांचे नाव दुमदुमले ते पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग आणि अग्नी ह्या प्रक्षेपणास्त्रांमुळे! ही प्रक्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी ए पी जे कलाम ह्यांनी जिवाचे रान केले. जगाला शांततेच्या मार्गाने जाण्याचे आवाहन करणा-या भारताची अहिंसा ही दुर्बळाची अहिंसा नसून अण्वस्त्रसज्ज भारताची अहिंसा आहे हे जगाला दिसले ते ए पी जे कलाम ह्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे.
भारतीय राजकारणात काही वेळा इतके मोहक चमत्कार पाहायला मिळाले आहेत की त्यांना जगाच्या इतिहासात तोड नाही! राष्ट्रपतीपदासाठी ए पी जे कलाम ह्याचे नाव सुचवले जाते काय, त्यांच्या निवडीला कोणाचीच हरकत नसणे काय आणि कलाम हे राष्ट्रपतीपदावर विराजमान होतात काय! हा सगळा चमत्कार विसावे शतक संपता संपता नव्या पिढीला पाहायला मिळाला. हे नव्या पिढीच्या देशवासियांचे भाग्यच म्हटले पाहिजे. राष्ट्रपतीपदावर विराजमान झालेली व्यक्ति राज्यकर्त्यांना आवडतेच असे नाही. कलाम मात्र त्याला अपवाद ठरले. क्षुद्र मानापामानाच्या वादात हा तंत्रज्ञानमहर्षी कधी सापडलाच नाही. उलट, राज्यकर्त्यांत ते जेवढे लोकप्रिय झाले तितकेच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिकच ते जनसामान्यातही लोकप्रिय झाले. ख-या अर्थाने ते लोकांचे राष्ट्रपती झाले. खुर्चीच्या मोहाने त्यांची मती कधीच भ्रमित झाली नाही. राष्ट्रपतीपदावर आरूढ झाल्यानंतर त्यांनी रामेश्र्वरवासियांना मुद्दाम राष्ट्रपतीभवनात बोलावले. राष्ट्रभवनास भेट देण्यासाठी ज्या रामेश्र्वरवासियांना त्यांनी निमंत्रण दिले त्यात रामेश्र्वर मंदिराचे मुख्य पुजारी सुब्रह्मण्यम रानडे ह्यांचाही समावेश करण्यास कलाम विसरले नाही. राष्ट्रपतीपदावरून पायउतार होताच त्यांनी विद्यार्थांना उत्तेजन देण्यासाठी भाषणे देण्याचा सर्वतंत्रस्वतंत्र कार्यक्रम आखला. तारूण्याला लाजवणा-या उत्साहाने त्यांनी तो अमलातही आणला! जगभर त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्याख्याने दिली. त्यांनी जे विहित कर्तव्य मानले ते कर्तव्य बजावत असतानाच त्यांना मृत्यू यावा हा विलक्षण नव्वळ योगायोग नाही! नैष्कर्म्य सिद्धीपासून मिळणारे फळ ह्यापेक्षा वेगळे असूच शकत नाही. राष्ट्रपतीपदावर बसवण्यासाठी राजकारण्यांनी भले मुस्लीम व्यक्ती शोधून आणली असेल; पण कलाम ह्यांचा एकच धर्म होता, ज्ञानविज्ञान धर्म! ‘आचारप्रभवो धर्मा म्हणतात तोच हा धर्म!!

रमेश झवर
www.rameshzawar.com

अखेर चुलत बहीण सापडली.

NASA’s Kepler Mission Discovers Bigger, Older Cousin to Earth. एक बातमी.

“मला एकच प्रश्न पडला आहे की,मुलांचा आणि बाबांचा शोध लागत आहे पण ह्यांना जन्म देणारी ती महान आई कोण बरं असावी.कुणी सांगेल का?”

अखेर नासाच्या पोलिसानी(शास्त्रज्ञानी) चांदण्याचं जंगल पिंजून पृथ्वीच्या चुलत बहीणीला हुडकून काढली.तशी ही पृथ्वीची केपलरताई फार दूर (?) राहत नाही.
“प्रकाश सेकंदाला तीन लाख किलोमिटर वेगाने गेल्यास एक वर्षात तो जेव्हडे किलोमिटर प्रवास करील त्या अंतराला एक लाईट वर्ष म्हणतात.”
असं प्रो.देसाई मला म्हणाले.
300,000*60*60*24*365 किलोमिटर, म्हणजे 9,4,6,0800,000,000 किलोमिटर म्हणजे एक लाईट वर्ष.
(9निखर्व,4खर्व 6दशअब्ज 8दशकोटी किलो मिटर किंवा 6 निखर्व मैल)
अशी 1400 लाईट वर्ष दूर, म्हणजेच 13245 निखर्व 1खर्व 20अब्ज किलोमिटरावर केपलरताई आहे.(चूक भूल द्यावी घ्यावी)
म्हणजेच केपलरताईकडे पोहोचायला 300,000 किलोमिटर एका सेकंदाला ह्या वेगाने जायचं झाल्यास अब्जानी वर्ष लागतील.
केपलरताई पृथ्वीपेक्षा अडीच पट लठ्ठ आहे.(डायबिटीस नसावा.कारण ती तिच्या बाबांच्या भोवती वर्षानुवर्ष प्रदक्षिणा घालून व्यायाम घेत असते.) त्यामुळेच की काय केपलरताई आपल्या सूर्याबाबांच्या भोवती एक प्रदक्षिणा घालायला 380 दिवस घेते(उघडच आहे.) पृथ्वी एका प्रदक्षिणेला 365 दिवस घेते.
पृथ्वीने जर तिला,
“ताई”
म्हणून साद दिली तर ती साद ताईकडे पोहोचायला अब्जानी वर्ष लागतील.
केपलरताईचे बाबा(सूर्य) पृथ्वीच्या बाबापेक्षा करोडो वर्षानी मोठे आहेत.आणि जास्त तेजस्वी आहेत.हे दोन्ही भाऊ करोडो वर्षं असेच तळपत आहेत.

पृथ्वीला जर का तिच्या केपलरताईला आपल्या इकडच्या परिस्थितीचा संदेश द्यायचा झाल्यास ती म्हणेल,
“अगं ताई,इथे मानवाने माझ्यावर अत्याचार करायला सुरवात केली आहे.हा मानवप्राणीच असं करतोय.कारण निसर्गाने त्यालाच अचाट बुद्धी दिली आहे.इतर प्राणी निसर्ग नियमाने रहातात.
एके काळी मी सौन्दर्यवती होते.
माझे लांब केस,सतेज डोळे,निथळ कांती आणि आजुबाजूचं स्वच्छ वातावरण.अशी स्थिती होती.अगदी डोळ्याला द्द्ष्ट लागेल अशी मी होते.
पण आता केस गळलेल्या,काळपटलेल्या, दरिद्री भिकारणी सारखी माझी अवस्था हा मानव करीत सुटला आहे. जंगल तोड,प्रदुषण,पाण्याचं दुर्भिक्ष ही त्याची कारणं आहेत.ह्या मानवाचा स्वतःच्या उत्पतिवर कसलाच संयम नाही.ह्याची नातवंडं,पंतवंडं,खापरपंतवंडं भूक भूक करून नामशेष होणार आहेत, ह्याची त्याला खंत दिसत नाही. अब्जानी वर्षाचा माझा इतिहास असा आहे की असे हे उन्मत्त प्राणी आपल्याच कर्माने नामशेष होतात.”

हे हृदयाला चटका लावणारे आपल्या बहीणीचे उद्नार ऐकून केपलरताई पृथ्वीला म्हणाली,
” माझा इकडचा मानव त्या मानाने फारच वेगळा आहे.इथे कुणी जात,धर्म पाळत नाहीत.त्यामुळे धर्मवाद, जातीवाद,प्रांतवाद असले प्रकारच नाहीत. इथे असलाच तर एकच धर्म आणि तो म्हणजे शेजारधर्म.इकडे युद्ध, लढाया होत नाहीत.प्रश्न निर्माण झाला तर एकमेकासमोर बसून चर्चा करून मार्ग काढतात.इथे पर्यावरणावर फार विचार करतात.म्हणून मी इतकी वर्षं जगले आहे.तुझ्या पेक्षा आम्ही करोडो वर्षांनी मोठे आहोत आणि टिकून राहिलो आहोत.त्याचं हेच कारण आहे.इकडे संयमाने प्रजोत्पत्ती होत असते.
संयम हा इकडच्या मानवात नव्हे तर इकडच्या इतर प्राण्यामधेही आहे.म्हणून निसर्गाच्या इकडच्या संपत्तीचा व्यय होत नाही.इकडचा मानव तुझ्या मानावापेक्षा बुद्धीमत्तेने जास्त प्रगतिशील आहे.एव्हडंच नव्हे तर तो इतर ग्रहावर गुप्तपणे जाऊन माहिती काढून आपल्यात सुधारणा करीत आहे.ह्या बुद्धीवान मानवाने तुझ्या मानवासारखं कसं वागू नये हे पण तो शिकला आहे.
वाईट वाटून घेऊ नकोस.मी तुझी ताई आहे ना? तेव्हा मी तुला प्रेमाने सांगत आहे.तू निसर्गाला सांग की,एखादं असं संकट आण की त्यातून तुझा मानव स्वतःला सुधारेल तरी.
बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून.हे तुझे भाऊ आहेत.म्हणजे माझे चुलत भाऊ आहेत.तसे माझेही भाऊ आहेत.आता नासाचे पोलीस असंच चांदणं पिंजून जसं मला हुडकून काढलं तसं माझे भाऊपण शोधून काढतील.निदान अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. नासाच्या शास्त्रज्ञासारखे बुद्धीवान मानवसुद्धा तुझ्याजवळ आहेतच ना?

चुलत बहीणीतला हा संवाद नासाच्या शास्त्रज्ञानी ऐकला असावा.कारण तिथे जीवन असेल का ह्या शोधात ते रहाणार आहेत.हा संवाद ऐकून त्यांची खात्री होईल असं आपण तुर्तास समजूत करून घेऊ या.
मला एकच प्रश्न पडला आहे की,मुलांचा आणि बाबांचा शोध लागत आहे पण ह्यांना जन्म देणारी ती महान आई कोण बरं असावी.कुणी सांगेल का?
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

अखेर चुलत बहीण सापडली.

NASA’s Kepler Mission Discovers Bigger, Older Cousin to Earth. एक बातमी.

“मला एकच प्रश्न पडला आहे की,मुलांचा आणि बाबांचा शोध लागत आहे पण ह्यांना जन्म देणारी ती महान आई कोण बरं असावी.कुणी सांगेल का?”

अखेर नासाच्या पोलिसानी(शास्त्रज्ञानी) चांदण्याचं जंगल पिंजून पृथ्वीच्या चुलत बहीणीला हुडकून काढली.तशी ही पृथ्वीची केपलरताई फार दूर (?) राहत नाही.
“प्रकाश सेकंदाला तीन लाख किलोमिटर वेगाने गेल्यास एक वर्षात तो जेव्हडे किलोमिटर प्रवास करील त्या अंतराला एक लाईट वर्ष म्हणतात.”
असं प्रो.देसाई मला म्हणाले.
300,000*60*60*24*365 किलोमिटर, म्हणजे 9,4,6,0800,000,000 किलोमिटर म्हणजे एक लाईट वर्ष.
(9निखर्व,4खर्व 6दशअब्ज 8दशकोटी किलो मिटर किंवा 6 निखर्व मैल)
अशी 1400 लाईट वर्ष दूर, म्हणजेच 13245 निखर्व 1खर्व 20अब्ज किलोमिटरावर केपलरताई आहे.(चूक भूल द्यावी घ्यावी)
म्हणजेच केपलरताईकडे पोहोचायला 300,000 किलोमिटर एका सेकंदाला ह्या वेगाने जायचं झाल्यास अब्जानी वर्ष लागतील.
केपलरताई पृथ्वीपेक्षा अडीच पट लठ्ठ आहे.(डायबिटीस नसावा.कारण ती तिच्या बाबांच्या भोवती वर्षानुवर्ष प्रदक्षिणा घालून व्यायाम घेत असते.) त्यामुळेच की काय केपलरताई आपल्या सूर्याबाबांच्या भोवती एक प्रदक्षिणा घालायला 380 दिवस घेते(उघडच आहे.) पृथ्वी एका प्रदक्षिणेला 365 दिवस घेते.
पृथ्वीने जर तिला,
“ताई”
म्हणून साद दिली तर ती साद ताईकडे पोहोचायला अब्जानी वर्ष लागतील.
केपलरताईचे बाबा(सूर्य) पृथ्वीच्या बाबापेक्षा करोडो वर्षानी मोठे आहेत.आणि जास्त तेजस्वी आहेत.हे दोन्ही भाऊ करोडो वर्षं असेच तळपत आहेत.

पृथ्वीला जर का तिच्या केपलरताईला आपल्या इकडच्या परिस्थितीचा संदेश द्यायचा झाल्यास ती म्हणेल,
“अगं ताई,इथे मानवाने माझ्यावर अत्याचार करायला सुरवात केली आहे.हा मानवप्राणीच असं करतोय.कारण निसर्गाने त्यालाच अचाट बुद्धी दिली आहे.इतर प्राणी निसर्ग नियमाने रहातात.
एके काळी मी सौन्दर्यवती होते.
माझे लांब केस,सतेज डोळे,निथळ कांती आणि आजुबाजूचं स्वच्छ वातावरण.अशी स्थिती होती.अगदी डोळ्याला द्द्ष्ट लागेल अशी मी होते.
पण आता केस गळलेल्या,काळपटलेल्या, दरिद्री भिकारणी सारखी माझी अवस्था हा मानव करीत सुटला आहे. जंगल तोड,प्रदुषण,पाण्याचं दुर्भिक्ष ही त्याची कारणं आहेत.ह्या मानवाचा स्वतःच्या उत्पतिवर कसलाच संयम नाही.ह्याची नातवंडं,पंतवंडं,खापरपंतवंडं भूक भूक करून नामशेष होणार आहेत, ह्याची त्याला खंत दिसत नाही. अब्जानी वर्षाचा माझा इतिहास असा आहे की असे हे उन्मत्त प्राणी आपल्याच कर्माने नामशेष होतात.”

हे हृदयाला चटका लावणारे आपल्या बहीणीचे उद्नार ऐकून केपलरताई पृथ्वीला म्हणाली,
” माझा इकडचा मानव त्या मानाने फारच वेगळा आहे.इथे कुणी जात,धर्म पाळत नाहीत.त्यामुळे धर्मवाद, जातीवाद,प्रांतवाद असले प्रकारच नाहीत. इथे असलाच तर एकच धर्म आणि तो म्हणजे शेजारधर्म.इकडे युद्ध, लढाया होत नाहीत.प्रश्न निर्माण झाला तर एकमेकासमोर बसून चर्चा करून मार्ग काढतात.इथे पर्यावरणावर फार विचार करतात.म्हणून मी इतकी वर्षं जगले आहे.तुझ्या पेक्षा आम्ही करोडो वर्षांनी मोठे आहोत आणि टिकून राहिलो आहोत.त्याचं हेच कारण आहे.इकडे संयमाने प्रजोत्पत्ती होत असते.
संयम हा इकडच्या मानवात नव्हे तर इकडच्या इतर प्राण्यामधेही आहे.म्हणून निसर्गाच्या इकडच्या संपत्तीचा व्यय होत नाही.इकडचा मानव तुझ्या मानावापेक्षा बुद्धीमत्तेने जास्त प्रगतिशील आहे.एव्हडंच नव्हे तर तो इतर ग्रहावर गुप्तपणे जाऊन माहिती काढून आपल्यात सुधारणा करीत आहे.ह्या बुद्धीवान मानवाने तुझ्या मानवासारखं कसं वागू नये हे पण तो शिकला आहे.
वाईट वाटून घेऊ नकोस.मी तुझी ताई आहे ना? तेव्हा मी तुला प्रेमाने सांगत आहे.तू निसर्गाला सांग की,एखादं असं संकट आण की त्यातून तुझा मानव स्वतःला सुधारेल तरी.
बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून.हे तुझे भाऊ आहेत.म्हणजे माझे चुलत भाऊ आहेत.तसे माझेही भाऊ आहेत.आता नासाचे पोलीस असंच चांदणं पिंजून जसं मला हुडकून काढलं तसं माझे भाऊपण शोधून काढतील.निदान अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. नासाच्या शास्त्रज्ञासारखे बुद्धीवान मानवसुद्धा तुझ्याजवळ आहेतच ना?

चुलत बहीणीतला हा संवाद नासाच्या शास्त्रज्ञानी ऐकला असावा.कारण तिथे जीवन असेल का ह्या शोधात ते रहाणार आहेत.हा संवाद ऐकून त्यांची खात्री होईल असं आपण तुर्तास समजूत करून घेऊ या.
मला एकच प्रश्न पडला आहे की,मुलांचा आणि बाबांचा शोध लागत आहे पण ह्यांना जन्म देणारी ती महान आई कोण बरं असावी.कुणी सांगेल का?
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

उमजते तुला……

माझ्या भावनांनी गढूळलेल्या
डोळ्यांतले प्रश्न कळतात तुला
उत्तर मात्र देत नाहीस ।।


माझ्या निरोपाच्या आवाजातील
कातरता उमजते तुला
मागे वळून मात्र पहात नाहीस ।।


माझ्या काहुरल्या मनाची
घालमेल समजते तुला
तुझ्या व्यथा मात्र सांगत नाहीस ।।

माझ्या बाहेर न पडलेल्या हाकेची
आर्तता जाणवते तुला
परत न जाण्यासाठी मात्र येत नाहीस ।।

-अनघा 

भेटी लागे जीवा !!

२७ फेब्रुवारी २०१५ 
सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिस ला जायला निघालो होतो. सोसायटीच्या पार्किंग मधून बुलेट बाहेर काढली. बायको आणि माझा तीन वर्षाचा मुलगा घराला कुलूप करून मागून येत होते. तेवढ्यात  चिपळ्या व टाळेचा आवाज ऐकू आला सोबत ‘ वासुदेव आला….वासुदेव आला ‘ चे गाणे ऐकू आले. विरुद्ध बाजूच्या दोन बिल्डिंग सोडून एक वासुदेव टाळ वाजवत आमच्या सोसायटी कडेच येत होता….. डोक्यावर गोल त्रिकोणी मोरपिसांची टोपी, गळ्यात विविध माळा, अंगात वारकऱ्यांचा पोशाख…..सफेद सदरा आणि धोतर, अंगावर केशरी वस्त्र, सफेद दाढी, अबीर आणि गुलाल चा टिक्का, कमरेला एक कापडी पोटली, हातात टाळ आणि चिपळ्या…….मी मुलाला आवाज देऊन लवकर खाली उतरायला सांगितले. मनात विचार आला की आजच्या पिढीला वासुदेव थोडा तरी माहित आहे…पुढच्या पिढी पर्यंत तो विस्मरणात जाईल. मुलगा खाली आल्यावर त्याला म्हटले, ‘हे बघ वासुदेव, नमस्कार कर त्यांना’  माझ्या मुलाने वासुदेवाचे कपडे आणि एकंदरीत पोशाख बघून थोडा घाबरूनच नमस्कार केला. माझ्या मुलाकडे बघून वासुदेव रस्ता ओलांडून माझ्या जवळ आले.
माऊली माऊली करत त्यांनी कमरेच्या पोटलीतून अंगारा काढला माझ्या कपाळाला लावला आणि मुलाच्या कपाळाला लावला आणि त्याला तोंडातल्या तोंडात पुटपुटत न मागता आशीर्वाद दिला. मी पण आपसूक खिशात हात घातला आणि वर हातात आलेली दहाची नोट माझ्या मुलाच्या हातात दिली. त्याला बोललो, ‘ बाबांच्या हातात हे पैसे दे ‘. वासुदेवांनी सुद्धा ते पैसे हातात न घेता…झोळी पुढे घेऊन त्यात पैसे घेतले. आपला प्रेमळ हात त्यांनी मुलाच्या डोक्यावर फिरवला. तो पर्यंत मी बुलेट चालू केली होती. वासुदेवांनी मागून येणाऱ्या माझ्या बायकोकडे बघितले आणि एकदा मुलाकडे बघितले आणि म्हणाले, ‘अर्ध्या मार्गावर परत जाऊन आलेला मुलगा आहे तुमचा….खूप पुण्यात्मा आहे तो…’ 
त्यांचे ते वाक्य ऐकून मी आणि माझी बायको तिथेच थबकलो. दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि वासुदेवांकडे बघितले. पुढचे १५ मिनिटे फक्त वासुदेव बोलत होते आणि आम्ही फक्त हो…हो करत त्यांच्या बोलण्याला होकार देत होतो. ते पुढे काय काय म्हणाले जेणेकरून आम्ही सकाळच्या ऑफिसला जाण्याच्या घाईत असून सुद्धा १५ मिनिटे तिथेच उभे राहिलो. ते सांगण्यासाठी आधी आदल्या दिवशी काय घडले होते ते जरा सांगतो.
पूर्वार्ध
२६ फेब्रुवारी २०१५ 
आदल्या दिवशी संध्याकाळी, माझ्या मुलाला आणायला आई बाबांच्या घरी गेलो होतो. संध्याकाळी टीव्ही वर ‘जय मल्हार’ लागले होते. त्यात देवाचे वेगवेगळे चमत्कार दाखवत होते. जाहिरातीच्या मध्यंतरात वडिलांनी वाहिनी बदलली. एका मराठी वाहिनीवर श्री स्वामी समर्थांचा चित्रपट लागला होता. आमच्या घरात माझ्यासकट सगळेच स्वामींचे भक्त असल्याने तो चित्रपट बघू लागले.  त्यात एक दृश्य असे होते की एका गरीब स्त्रीला पंढरपूरच्या विठ्ठलाची आस लागली असते आणि परिस्थिती मुळे तिला वारीला जाता येत नसते. तरी ती कसेबसे करून स्वामी पर्यंत पोहोचते. स्वामी तिच्या मनातले ओळखून तिला विठ्ठलाचे दर्शन घडविण अशी ग्वाही देतात पण तिला त्यावर विश्वास बसत नसतो. ती आपल्या मुलीला त्यांच्या हवाली करून स्वामींच्या नकळत पंढरपूरचा रस्ता धरते. स्वामींना ते समजल्यावर राग येतो आणि ते रागारागाने उठून चालायला लागतात. इकडे ती स्त्री दमून एका दगडावर बसते आणि डोळे बंद करून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लागते. डोळे उघडते तेव्हा स्वामी समोरच्या दगडावर मांडी घालून बसलेले असतात आणि तिथेच तिला स्वामींचे आणि विठ्ठलाचे दर्शन होते. स्वामी तिची इच्छा पूर्ण करतात आणि त्या आनंदाने तिथे ती भजन  गाणे करते. असा काहीसा सीन होता….
गाण्यानंतर जाहिरातीचा ब्रेक येतो…
तेव्हा मी उपहासात्मक हसून आईला म्हणालो. स्वामी आणि माउली सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात पण आपली पंढरपूरला जायची इच्छा कधी पूर्ण करणार काय माहित? काही वर्षापूर्वी वेळ होता इच्छा होती पण पैसे नव्हते आता पैसे आहेत…स्वत: गाडी बुक करून जायची ऐपत आहे तरी वेळ नाही…आणि योगही जुळून येत नाही…गेल्या काही वर्षात किमान ५ वेळा तरी पंढरपूर…अक्कलकोट ला जायचे ठरवले आहे पण काही ना काही कारणामुळे ते बारगळले आहे. आई आमची टिपिकल देवभक्त …ती म्हणाली, ‘ अरे आपला अजून योग आला नाही. जेव्हा येईल तेव्हा अचानक जाणे होईल आणि आपले दर्शनही होईल. अगदीच नाही जमले तर निदान स्वामी तरी येऊन दर्शन देतील. ‘ मी हसलो….अगं असे काही होत नाही…असले चमत्कार फक्त चित्रपटात होतात प्रत्यक्षात नाही. लहान बहिणीने पण मला होकार मिळवला …’ हो ना!! देव आपल्याबरोबर असे चमत्कार नाही कधी करत’ …..मी हसून तिथून निघालो.
रात्री बायको जेवणावरून, मुलाला लवकर जेवण्यासाठी ओरडत होती…’नालायका…कधी पटापट जेवायला शिकणार आहेस’ …माझा मुलगा नुकताच पूर्ण वाक्य बोलायला शिकत होता त्यामुळे जे काही वाक्य आम्ही बोलतो त्याची तो पुनरावृत्ती करत असतो. आम्ही त्याला ..गधड्या, नालायका, बेअक्कल वगैरे असे खोट्या रागाने बोललो की तेच शब्द तो आम्हाला परत बोलत असे. बायको त्याला गधड्या बोलली की तो पण ‘गधड्या मम्मा’ असे बोलतो. त्यामुळे मी बायकोला ओरडलो की तू त्याला शिव्या देऊ नकोस…नाहीतर तो पण तेचं शब्द शिकणार. त्याआधी तिने विचारले होते की कालचा भात खूप शिल्लक आहे त्याला तोच देऊ की नवीन घालू. मी म्हटले ‘त्याच्या साठी शिळा भात नको देऊस तो मी खाईन त्याला ताजा भात घाल’
 २७ फेब्रुवारी २०१५
वासुदेवांनी मागून येणाऱ्या माझ्या बायकोकडे बघितले आणि एकदा मुलाकडे बघितले आणि म्हणाले, ‘अर्ध्या मार्गावर परत जाऊन आलेला मुलगा आहे तुमचा….खूप पुण्यात्मा आहे तो…त्याला कधी शिव्या घालू नका ….त्याला कधी उष्ट जेवण घालू नका…..त्याला कधी शिळे पाके जेवायला घालू नका (ह्या वाक्यावर माझ्या बायकोने रात्रीचा प्रसंग आठवून माझ्या कडे बघितले). 
वासुदेवाचे पहिले वाक्य ऐकल्यावरच मी थबकलो होतो की तुमचा मुलगा अर्ध्या मार्गावरून परत आलाय…..माझी बायको सहा महिन्याची गरोदर असताना तिला रस्ता क्रॉस करताना बसने उडवले होते, हवेत उंच उडून १० फुट लांब रस्त्यावर पडली होती. त्यात तिला मल्टीपल फ्रॅक्चर झाले होते आणि जवळपास खूप वेळ बेशुध्दच होती. लीलावती हॉस्पिटल मध्ये तिला आयसीसीयु मध्ये भरती करून जवळपास दीड दिवस झाले होते तरी बाळाने पोटात काहीच हालचाल केली नव्हती. डॉक्टर आणि आम्ही सगळेच चिंतीत होतो. जवळपास अपघात झाल्यापासून दीड दिवसानंतर त्याने पहिली हालचाल केली तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला. (त्या वेळेचा पूर्ण वृतांत इथे वाचू शकता).
मी विचार केला की वासुदेवाला कोणी सांगितले असेल हि गोष्ट…त्यांच्या कडे बघून तर वाटत नव्हते की त्यांनी माझे ब्लॉग वाचला असेल…किंवा माझ्या जवळपासच्या नात्यातील कोणी त्यांना सांगितली असेल.
त्यांचे ते वाक्य पूर्ण होते न होते तोपर्यंत त्यांनी पुढे सांगायला सुरवात केली. त्यांची काही वाक्ये आणि त्यावर माझे मनातले विचार कंसात मांडले आहेत. त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक वाक्यामुळे आम्ही नवरा बायको हादरत होतो आणि एकेक धक्के पचवत पुढचे वाक्य ऐकत होतो.
तुम्ही सुद्धा दोन तीन मोठ्या जिवावरच्या संकटातून वाचला आहात ( माझे जवळपास ५ अपघात झाले आहेत. त्यातले दोन मोठे होते.)
पण तुम्ही किरकोळ दुखापतीतून सुखरूप बाहेर पडला आहात. काही दुखापती आहेत अजून पण त्या सहन करण्याइतपत आहेत (प्रत्येक अपघात काही न काही मुका मार हातापायांवर देऊन गेला आहे (आणि जवळपास प्रत्येकी  १५ दिवसाच्या सिक लिव्ह खावून गेला आहे) .पण तो सहन करण्याइतपत आहे.)
तुमच्या घरातल्या सगळ्यांनाचं ही पीडा आहे. (आमच्या घरात माझे वडील, मी, बायको ह्यांची मिळून जवळपास नऊ अपघात झाले आहेत.) 
पण तुमच्या मागे तुमच्या गुरूंचा आशीर्वाद आहे आणि माऊलींची कृपा आहे त्यामुळे तुम्ही सर्व निभावून नेले आहे. तुम्ही गुरु कडून दीक्षा घेतली आहे त्यामुळे तुम्हाला येणारे धोके परतवण्याची ताकत येते. तुम्ही गुरु घेतला आहे ना??? मी होकारार्थी मान हलवली. (मी जवळपास पंधरा वर्षाचा असताना माझ्या आईने, आमच्या घरातल्या सगळ्यांना पंढरपूरच्या गुरु अण्णा महाराज ह्यांच्याकडून दीक्षा घ्यायला लावली होती.)
तुम्ही खूप जिद्दी आणि हट्टी आहात..सहसा रागवत नाही पण एकदा जिद्दीला पेटलात की ऐकत नाही. (मी मनातल्या मनात हसलो…हट्टी, जिद्दी वगैरे जास्त नाही पण एकदा जिद्दीला लागलो की मग ऐकत  नाही)
म्हणूनच तुम्ही कोणाचे न ऐकता सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे. (ह्या वाक्यावर मात्र मी आणि बायको हैराण होऊन एकमेकांकडे बघितले) 
तुम्ही जात पात वगैरे काही मानत नाही…माणुसकी हीच तुमची जात आणि हाच तुमचा धर्म  (बायको आणि माझी जात वेगवेगळी होती त्यामुळे लग्नाला विरोध होता आणि आम्ही दोघेही जातपात मानत नव्हतो त्यामुळे घरातल्यांच्या विरोधात आम्ही लग्न केले होते.)
भूत, भविष्य, अंधश्रद्धा तुम्ही मानत नाही…भविष्य कधी ऐकत नाही…बघत नाही… (आम्ही दोघेही मानत नाही आणि लग्नाआधी एकमेकांच्या पत्रिकाही बघितल्या नव्हत्या. फक्त स्वभाव जुळले आणि लग्न केले.)
बुलेट वर हात ठेवून…हि तुमची दुसरी गाडी असावी….तुमची पहिली गाडी तुम्हाला जास्त लाभदायक नव्हती..ही बुलेट तुम्हाला चांगली आहे आणि तुम्हाला सूट सुद्धा होत आहे…आता तुम्हाला काही धोका नाही…(माझी जुनी पल्सर बाजूलाच सोसायटीच्या कंपाउंड मध्ये धूळ खात पडली होती. तिच्यावर ३ अपघात झाले असल्यामुळे घरातल्यांनी ती वापरायला बंदी घातली होती म्हणूनच मला नाईलाजाने दुसरी गाडी घ्यावी लागली. दुसरी गाडी घ्यायची तर बुलेटच घ्यायची हे ठरवून घेतली होती.)
तुम्हाला दुसरे भावंड पण आहे आणि तुम्ही मोठे आहात आणि घरातल्यांची सगळी जवाबदारी तुम्ही चांगल्या रितीने पूर्ण करत आहात.. तुम्हाला एक लहान भावंड आहे ना? (त्यांचा म्हणण्याचा उद्देश मला लहान भाऊ आहे का विचारायचे होते…आणि मला एक लहान बहिण आहे..मी त्यांना मला एक बहिण आहे म्हणून सांगितले. हा एकच अंदाज त्यांचा चुकला होता.)
मग बायकोकडे बघून त्याने सांगितले, तुम्हाला शारीरिक त्रास खूप आहेत. तुमचे पाठीचे दुखणे तुम्हाला अर्ध्या तासाहून जास्त बसायला देत नाही तरी तुम्ही कुटुंबासाठी एवढ्या लांब प्रवास करून कमावण्यासाठी जाता. (गरोदर असताना बायकोच्या अपघातामध्ये तिच्या तीन बरगडी फ्रॅक्चर झाल्या होत्या. त्या कधी बऱ्या झाल्याच नाहीत. नंतर गेल्या वर्षी परत रिक्षा अपघातात तिच्या त्याच बरगड्या दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे एका जाग्यावर अर्ध्या तास पेक्षा जास्त बसणे तिला त्रासदायक होते. त्यात दोन तासाचा बस, ट्रेन, बस असा प्रवास करणे तिला खूप त्रासदायक होते फक्त घरखर्चाला हातभार म्हणून ती कामाला जाते. आम्ही  दोघांनी वासुदेवांच्या बोलण्याला फक्त मान डोलावली.)
हा तुमचा दोष नाही…तुमच्या घराण्याचा त्रास आहे…तुमचा घराचा पिराबलेम (problem) ठीक करा मग तुमचे सगळे मार्गी लागेल. (मी फक्त हो म्हटले…ह्याच्यावर उत्तर देण्यासारखे काही नव्हते)
तुमचे सासरची माणसे खूप चांगली आहेत तुम्हाला खूप मानतात आणि तुम्हाला खूप जीव लावतात आणि तुम्हाला सारखे घरी बोलवत असतात. पण तुम्ही जात नाही… तुम्ही लांबूनच सगळ्यांना प्रेम देता. (बायकोने कोना मारून खुणेने सांगितले…बघ बघ!! अश्या अर्थाने… सासरची मंडळी खरच चांगली आहेत आणि काही न काही कारणावरून घरी बोलावत असतात. पण मी सहसा जात नाही वर्षातून एकदा किंवा दोनदाच जातो. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ हा मंत्र मी आधी पासून पाळत आलो आहे.)
तुमचा पोरगा खूप हुशार होणार आहे..विद्वान होणार आहे…एवढ्या मोठ्या संकटाला परवतून तो स्वत:चा आणि त्याच्या आईचा जीव वाचवून आलाय. त्याला कधी दुखवू नका…मारू नका..रागावू नका…त्याच्या बापाने आणि आजाने जे काम आयुष्यात केले नाही ते तो करणार आहे…कधी कोणाची नोकरी करणार नाही….तो लोकांना नोकऱ्या देईल (आम्ही दोघे एकमेकांकडे बघून हसलो ह्या भविष्यावर विश्वास कसा ठेवायचा? पण पोटच्या पोराच्या बाबतीत चांगले सांगितले आहे म्हणून आनंदाने आम्ही ती गोष्ट मनातल्या मनात मान्य केली. आमच्या दोन्ही कुटुंबातले लोक हि गोष्ट मानतात कि एवढ्या मोठ्या अपघातातून मुलाने आपला आणि आपल्या आईशीचा जीव वाचवला आहे. नाहीतर एवढ्या मोठ्या अपघातातून वाचणे जवळपास अशक्यच होते. असो!!)
मी त्यांना म्हणालो, ‘बाबा ते सर्व ठीक आहे…आम्हाला माऊलीचे दर्शन कधी होणार ते सांगा…खूप वर्षे झाली जाऊन.’
वासुदेव म्हणाले, ‘ माऊली जो पर्यंत बोलावत नाही तो पर्यंत दर्शन कसे होणार रे बाबा…तुम्ही स्वत: गाडी करून जायचे म्हटले..पैसा खर्च करून जायला तय्यार असला तरी तुम्हाला बोलावणे आल्याशिवाय दर्शनाचा योग कसा येणार???…माउलीच्या मनात आले तर तुम्हाला एक पैका खर्च न करता सुद्धा बोलावणे येईल आणि त्रास न होता दर्शन होईल. (मला आदल्या रात्रीचा माझा आणि आईचा संवाद आठवला). 
‘अगदीच कामधंद्या मुळे नाही तुम्हाला जमले तरी कशाला काळजी करता…तुमची भक्ती बघून आणि मनातले भाव बघून काय माहित….माऊलीच तुम्हाला दर्शन द्यायला कोणत्यान कोणत्या रुपात समोर येईल…तुम्हाला फक्त ओळखता आले पाहिजे…’ 
त्यांच्या ह्या वाक्यावर मात्र मी जाम दचकलो. इतका वेळ त्यांचे सगळे बोलणे त्यांची नजर टाळून ऐकत होतो. कारण लहानपणी ऐकले होते की भविष्य सांगणारे डोळ्यात डोळे घालून मनातले ओळखून अचूक भविष्य सांगतात.  पण त्यांचे शेवटचे वाक्य ऐकले  ” माऊलीच तुम्हाला दर्शन द्यायला कोणत्यान कोणत्या रुपात समोर येईल…तुम्हाला फक्त ओळखता आले पाहिजे…” आणि मी त्यांच्या नजरेत नजर घालून बघितले. त्यांच्या रुपात तर कोणी आले नाही ना?…ह्याचा शोध घेण्यासाठी…आमची नजरानजर होताच त्यांच्या डोळ्यांची बुबुळे थरथरली. गालावर पसरलेल्या सफेद दाढी मिशी मधून एक हास्य उमलले. आपल्या मुलाने मनात इच्छिलेली एखादी गोष्ट अचूक त्याच्या समोर आणून ठेवल्यावर आपल्या मुलाच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघून माऊलीच्या डोळ्यात जशी एक चमक येऊन गालावर एक जसे वैशिष्ट्यपूर्ण हास्य येते ना….तसेच  काहीसे हास्य मला त्यांच्या त्या दाढी मिशी मध्ये दिसले…मी एवढा वेडा तर नक्कीच नव्हतो की त्यांना विचारू की…. बाबा तुम्ही कोण आहात? ते कोणीही असतील वासुदेव असतील, स्वामी असतील, माऊली असतील किंवा कदाचित कोणीही नसतील. पण त्यांच्या डोळ्यातील चमक आणि त्यांचे ते अर्धवट स्मित हास्य कदाचित मला जे काही पाहिजे होते ते देऊन गेले……कदाचित न मागताच खूप काही देऊन गेले….मला आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला आणि त्या चित्रपटातील दगडावर बसलेले स्वामी आठवले आणि कालपासूनचा आतापर्यंतचा सगळा प्रसंग सेकंदाहून कमी वेळात झर्रकन डोळ्यासमोरून गेला आणि मी काहीसा गोंधळल्यासारखे झालो.
मी परत त्यांच्या नजरेत पहिले….काही सापडते का ते बघायला? पण तेच हास्य आणि तीच चमक दिसली. ह्यावेळेला त्यांनी फक्त डोळे उघडझाप करून होकारार्थी हलकीशी मान हलवली….अंगावर एक सर्रकन काटा मारून गेला…हृदयात एक हवीहवीशी हलकीशी कळ येऊन गेली….. त्याचा अर्थ काय असावा ह्याचा विचार मी अजूनही करतोय……मी तुझ्या मनातले ओळखले आहे की……. तुझ्या मनात जे चालले आहे ते योग्य आहे की……. तू ज्याला शोधतोयस तो मीच आहे की……दुसरेच काहीतरी….
पण त्यादिवशी पूर्ण दिवसभर एक वेगळीच मन:शांती अनुभवली…बर्फाची लादी डोक्यावर ठेवावी तसा थंड झालो होतो…सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारखा…मला स्वामी भेटले होते कि विठूराय भेटले होते…माहित नाही पण एक मन:शांती भेटली होती.
खिशात परत गेलेला हात मी थांबवला…सगळे आनंद पैशात मोजण्याची लागलेली सवयीवर मलाच चीड आली…बाबांना म्हटले …चला बाबा येतो आता!! बायको त्यांना म्हणाली, ” बाबा ! एखाद्या शनिवारी जेवायला घरी या” त्यांनी हसत माझ्या मुलाकडे बघून हात वर करून आशीर्वाद दिला आणि त्याला म्हणाले ” सुखी राहा बाळा!!!  येईन मी परत नक्की येईन !!!”
आम्ही बाळाला आई कडे सोडले आणि आम्ही ऑफिसला निघून गेलो. दोघेही मिळालेल्या झटक्यांनी जवळपास फ्रीज होऊन गेलो होतो. बस स्टॉप वर आल्यावर मी बायकोला विचारले, काय ग! त्यांनी सांगितलेले किती पटले? बायको म्हणाली जवळपास ९५% टक्के तरी त्यांनी बरोबर सांगितले’. आईला जेव्हा फोन करून हि गोष्ट सांगितली तेव्हा तर ती आनंदाने नाचायलाच लागली सगळ्यांना सांगत सुटली होती….दादा चे नशीब चांगले वगैरे वगैरे….
एक व्यक्ती ज्यांना आम्ही कधी आयुष्यात भेटलो नाही…ती व्यक्ती एका सकाळी अचानक समोर येते आणि आमचे भूत, भविष्य आणि वर्तमान जवळपास अचूकरित्या सांगते आणि खास करून अश्या वेळी येते जेव्हा आम्ही असे चमत्कार आत्ताच्या जमान्यात होत नाही असे उपहासाने म्हणत असतो….. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय असावा ? ह्याचा उलगडा अजूनही झाला नाही आणि होऊ सुद्धा नये…एक मन सांगते की तू अंधश्रद्धे कडे झुकतोय त्याच वेळेला त्यांच्या डोळ्याची चमक आणि दाढी मधले ते हास्य आठवते आणि मन काही निर्णयाप्रत येतच नाही….मग मी तो विचार असाच सोडून देतो….काही गोष्टीचे निर्णय झालेच नाही पाहिजेत आणि काही कोडी आयुष्यात उलगडल्याच नाही पाहिजेत.
आज आषाढी एकादशी निमित्त तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोरून गेला. अजून दर्शनाचा योग तर काही आला नाहीये पण त्या आशेवरच आहे. हा ब्लॉग लिहिताना वासुदेवांचा फोटो ब्लॉग वर लावत असताना माझा साडे तीन वर्षाचा मुलगा बाजूला आला आणि ओरडून म्हणाला…”डॅड्डा !!…हे आपल्याला सकाळी सकाळी भेटले होते ना…मला टिक्का लावला होता ना..!! मी हसून म्हणालो…”हो रे बाळा!!..तुझ्यामुळेच तर आम्हाला ते भेटले होते…” तो पण खूप काही समजले तसे मान डोलावून निघून गेला..
माऊली खरंच हो !!! भेटी लागे जीवा !! 

विवेकवाद हीच खरी नैतिकता!

अलीकडच्या काही वर्षांत वर्तमानपत्रांच्या खपाचे आकडे वाढत असले, तरी साप्ताहिकं, मासिकं, पाक्षिकं, त्रैमासिकं यांची संख्या मात्र दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. महाराष्ट्रातल्या नियतकालिकांची अवस्था तर अजूनच बिकट झाली आहे. बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पोस्ट खात्याचा सर्वाधिक फटका या नियतकालिकांना बसत आहे. केवळ वेळेवर अंक न पोहोचण्यामुळे अनेक नियतकालिकं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा दुर्धर परिस्थितीत ‘आजचा सुधारक’ या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या आणि ‘विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक’ असा लौकिक असलेल्या मासिकानं रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करावं, ही खचितच कौतुकास्पद गोष्ट आहे; पण याची फारशी दखल महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांकडून घेतली जाण्याची शक्यता नाही. आज सर्वच क्षेत्रातला विवेक हरवत चालला असताना, ‘आजचा सुधारक’सारख्या गंभीर मासिकाची दखल घेतली जाणं, हे स्वाभाविकच म्हणायला हवं. अर्थात, त्याची फिकीर या मासिकाच्या संपादक मंडळालाही नाही. ते आपले काम इमानेइतबारे करत आहेत.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक दि. य. देशपांडे यांनी ‘आजचा सुधारक’ हे मासिक एप्रिल- १९९०मध्ये सुरू केलं. सुरुवातीला त्याचं नाव ‘नवा सुधारक’ असं होतं. गोपाळ गणेश आगरकर यांच्या ‘सुधारक’ या साप्ताहिकापासून प्रेरणा घेऊन हे मासिक सुरू करण्यात आलं. (पाच-सहा वर्षांपूर्वी र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचंही पुनर्प्रकाशन सांगलीहून डॉ. प्रदीप पाटील यांनी सुरू केलं आहे.) डिसेंबर-१९९० पासून त्याचं नाव ‘आजचा सुधारक’ असं करण्यात आलं. आगरकरांच्या ‘सुधारक’चा समकालीन नवा अवतार असलेल्या या मासिकात विवेकवादी तत्त्वज्ञानाचा सर्व बाजूंनी चर्चा-ऊहापोह केला जाईल, असं देशपांडे यांनी पहिल्या संपादकीयात म्हटलं होतं, तर एप्रिल- १९९८मध्ये संपादक म्हणून निवृत्ती स्वीकारताना त्यांनी लिहिलं होतं, “मासिकाचं स्वरूप विवेकवादी आहे. केवळ विवेकवादाला वाहिलेलं दुसरं मासिक महाराष्ट्रात नाही, असं मला वाटतं. मासिकाने आपलं वैशिष्ट्य टिकवून ठेवावं. त्याचा कटाक्ष श्रद्धेचा उच्छेद, विचार आणि जीवन यात विवेकावर भर देणं, जीवनाच्या विविध क्षेत्रांत समंजसपणा, विवेकीपणा अंगी बाणेल असे प्रयत्न करणं, यावर असावा. लोक पूर्ण इहवादी होतील, अशी आशा करणं भाबडेपणाचं होईल; पण तरीही विवेकवाद जितका वाढेल, तितका वाढविण्याचा प्रयत्न करावा… मासिकाचं धोरण व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि समतावादी राहिलं आहे. सर्व मानव समान आहेत, त्यात स्त्रियांचाही समावेश आहे, तसेच त्यांचा विज्ञानावर भर असावा. वैज्ञानिक दृष्टी अंगी बाणेल, असा प्रयत्न करावा. विज्ञानाच्या विकृतीपासून सावध राहावं.”
त्याच धोरणानुसार, या मासिकाची आजपर्यंतची वाटचाल राहिली आहे. गेल्या २५ वर्षांत या मासिकानं कितीतरी विषय हाताळले. नागरीकरण, शेती, शिक्षण अशा अनेक विषयांवर विशेषांक काढले. नुकतीच http://aajachasudharak.in या नावानं बेवसाइटही सुरू केली आहे. त्यावर अंकातील लेख स्वतंत्रपणे आणि संपूर्ण अंक पीडीएफ स्वरूपात वाचता येतो; पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, या मासिकाची वर्गणीदारसंख्या २५ वर्षांनंतरही हजाराचा आकडा आेलांडू शकलेली नाही; पण केवळ वर्गणीदारांची संख्या वाढण्यासाठी अंकाचा दर्जा खाली आणण्याची वा त्यात रंजकता आणण्याची क्लृप्ती वापरण्याची गरज कधी संस्थापक, संपादकांना वाटली नाही आणि त्यानंतरच्या संपादकांनाही. त्यावरून या मासिकाचे आजवरचे सर्वच संपादक अल्पसंतुष्ट आहेत किंवा मिजासखोर आहेत, असं काहींना वाटू शकतं आणि ती खरीच गोष्ट आहे. गंभीरपणे काम करणाऱ्यांना, विवेकवादाला प्रमाण मानणाऱ्यांना आपल्या पाठीमागे फार लोक येणार नाहीत, असं वाटलं तर फारसं आश्चर्य नाही. आज तसं घडणं हे महदाश्चर्य ठरू शकतं. याचा अर्थ पूर्वी महाराष्ट्राची परिस्थती फार चांगली होती असं नाही. १९व्या-२०व्या शतकातही विवेकवादाचा-उदारमतवादाचा वारसा अंगिकारण्याची जीगिषा बाळगणाऱ्यांची संख्या कमीच होती; पण तेव्हा त्याची चाड असणारा छोटा का होईना, एक वर्ग अस्तित्वात होता. आता तर तो पूर्णपणे नाहीसा झाला असावा, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. समाजाच्या कुठल्याच समूहात, गटात, वर्गात, पंथात विवेकवाद शाबूत आहे, असं म्हणण्याची सोय राहिलेली नाही. २००४ साली ‘आजचा सुधारक’चा १५वा वर्धापन दिन साजरा झाला. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांना बोलावलं होतं. त्या वेळी ते म्हणाले होते, “आजचा सुधारक हे नियतकालिक वाचेपर्यंत विवेक आणि विवेकवादाशी आपला काहीही संबंध नव्हता. विवेकवादाने जगणं आज अशक्य नाही; परंतु कठीण मात्र झालं आहे.”

तेंडुलकरांच्या म्हणण्याला आता दहा वर्षे झाली आहेत. परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. सर्वसामान्य जनतेकडून विवेकवादाची फारशी अपेक्षा करता येत नाही; पण महाराष्ट्रातील सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाजाकडून तरी थोड्याफार विवेकवादाची अपेक्षा करायला फारशी अडचण पडू नये; पण महाराष्ट्रातील हा वर्ग आजघडीला सामाजिक नीतिमत्तेच्या दृष्टीनं इतका बेबंद आणि संकुचित झाला आहे की, ज्याचं नाव ते. सामाजिक नीतिमत्ता हा विषय परंपरा, आदर्श आणि प्रेरणा यांच्यावर अवलंबून असतो, असं त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात. ते पुढे लिहितात की, समाजहितासाठी स्वत:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावणं म्हणजेच सामाजिक नीतिमत्ता होय. सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाज ज्याला म्हणता येईल, तो समाज हा नेहमी मध्यमवर्गच असतो आणि हाच वर्ग समाजाचं पुढारपण करत असतो; पण महाराष्ट्रातील मध्यमवर्गाचे गेल्या २५ वर्षांतले प्राधान्यक्रम या गतीनं आणि रीतीनं बदलत गेले आहेत, त्यावरून या वर्गाला समाजहिताची किती चाड आहे, याचा आलेख सहजपणे दिसून येतो. उदारीकरणानंतर या वर्गाची ज्या झपाट्यानं वाढ झाली, ती स्तिमित करणारी आहे. ठोकरता येईल तेवढा समाज ठोकरायचा, करता येतील तेवढ्या खटपटी करायच्या आणि आेरबाडता येईल तेवढा पैसा आेरबाडायचा, एवढीच महत्त्वाकांक्षा या वर्गाला लागलेली दिसते. आपल्या पलीकडे समाज आहे, जग आहे, याची जाणीवच हा वर्ग विसरून गेला आहे.
उदारीकरणाचा सर्वाधिक उपभोक्ता हाच मध्यमवर्ग होता, आहे आणि आज केवळ त्याच्याच इच्छा-आकांक्षांना महत्त्व आलं आहे. सरकारपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांना याच वर्गाला खुश करायचं आहे. असा सगळा ‘तुझ्या गळा-माझ्या गळा…’ छाप पद्धतीचा कारभार सुरू असताना ‘आजचा सुधारक’, ‘साप्ताहिक साधना’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’ अशा नियतकालिकांची आेळख कितीजणांना असणार? किती लोकांना ही नियतकालिकं वाचायची असोशी असणार? पण हेही तितकंच खरं की, ही नियतकालिकं केवळ खप वाढवण्यासाठी सुरू झालेली नाहीत, नव्हती. ‘आजचा सुधारक’ तर देणग्याही स्वीकारत नाही आणि जाहिरातीही आणि तरीही ते गेली २५ वर्षे अव्याहृत चालू आहे. ज्यांना विवेकवादाच्या मार्गानं जाण्याची इच्छा आहे, त्यांनीच या मासिकाच्या वाट्याला जावं. आजघडीला विवेकवाद हिच खरी नैतिकता आहे. ज्यांना स्वत:ला आरशात पाहायचं असेल आणि आपल्या आजूबाजूंच्या चारजणांना आरसा दाखवावासा वाटत असेल, त्यांनी ‘आजचा सुधारक’सारखी जड मासिकं प्रयत्नपूर्वक वाचायला हवीत. हे मासिक वाचताना झोप येते, असा एक आरोप काही वाचनदुष्ट लोक करतात; पण आता तर सर्वांचीच झोप हराम होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी ‘आजचा सुधारक’ खडबडून जागं करण्याचंही काम करू शकतो.  

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो

 दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’.  त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो.  मी अंतर्जालावर  लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात  शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही  मला उमगलेले सत्य  मी माझ्या मित्राला सांगितले…..
 
काहीतरी भव्य दिव्य केले तर नामरूपी कीर्ति युगानुयुगे जिवंत राहते. श्रीरामांपासून ते गांधीजी पर्यंतच्या महान विभूतींची त्यांच्या कार्यांमुळे त्यांची नामरूपी कीर्ति अजूनही जिवंत आहे.  आता निम्नवर्गीय परिवारात जन्मलेला, अभ्यासात बेताचा, बामुश्किले सरकारी कारकून झालेल्या माझ्या सारख्याला आयुष्यात आपण काही भव्य-दिव्य करू असे कधीच वाटले नाही. बाबा आमटे इत्यादी लोकांसारखी  समाजसेवा करण्याची इच्छाशक्ती ही नव्हती.  सारांश काही भव्य-दिव्य करणे मला शक्य नव्हते.
 
समाजात दुष्ट लोकांनाही प्रतिष्ठा मिळते. श्रीरामा बरोबर रावण ही अमर झाला आणि गांधी सोबत गोडसे ही. तुकाराम महाराजांनी म्हंटले आहेच   पुत्र व्हावा ऐसा गुंडा. त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. आता माझ्या सारख्या सिंगल हड्डीच्या व्यक्तीकडून गुंडगिरी ही करणे शक्य नव्हते. शिवाय भित्रेपणाचे बाळकडूच मध्यम वर्गीय मराठी माणसाला जन्मापासून पाजले जातेच. ह्या मार्गावर जाणे ही शक्य नव्हते.
 
आता मेल्यानंतर कीर्तिरूपे उरणे शक्यच  नव्हते. डॉक्टर, इंजिनीअर, इत्यादींचे नावे ही काही काळापर्यंत लोकांच्या लक्ष्यात राहतात. पण ज्या वेळी अभ्यास करायचा होता, केला नाही. ती वेळ केंव्हाच  निघून गेली होती. आता संसारात राहत असताना  थोडेफार समाज कार्य केले किंवा त्याचा दिखावा केला तर कमीत-कमी जिवंत असताना तरी आपले नाव काही लोकांच्या लक्ष्यात राहते. पण इथे ही लोचा झाला. एक तर सरकारी नौकरी आणि ती ही स्टेनोग्राफर,पीए आणि पीएस. येस येस करण्यात ३३ वर्षे निघून गेली. त्यात ही १८ वर्षे पंतप्रधान कार्यालयात.  सकाळी सातला घरून निघाल्यावर रात्री ९-११च्या दरम्यान घरी पोहचणे. गली-मोहल्ला आणि मंडळाचे दिखाऊ समाज कार्य तर सोडा घरची सर्वकामे सौ.च्या डोक्यावर टाकावी लागली. सद्य परिस्थिती अशी आहे गली-मोहल्यात ही मला माझ्या सौ.च्या नावाने किंवा मुलाच्या नावाने ओळखतात.आता एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे लेखकू बनणे. लेखक बनण्यासाठी काही भव्य-दिव्य करावे लागत नाही, मेहनत आणि अभ्यास ही करावा लागत नाही. फक्त मनातील कल्पना कागदावर उतरव्याच्या असतात.  वयाच्या पंचविसित लेखक बनण्याचा एक प्रयत्न केला होता. काही हिंदी/मराठी कविता, काही प्रतिष्ठित मासिकांमध्ये पाठविल्या होत्या. पण कोणीही तय छापल्या नहीं किंवा परत ही पाठविल्या नाही. फक्त पोष्ट्खात्याची  शंभर एक रुपयांची कमाई झाली.  अखेर थकून-भागून कवी/ लेखक बनण्याचा नाद सोडून दिल्या.  आपले काही नाव होऊ शकत नाही, हे सत्य स्वीकार केले.
 
पण म्हणतातन एक मार्ग बंद झाला कि दुसरा उघडतोच. असेच पंचवीस वर्षे निघून गेले. २०१० मध्ये घरात इंटरनेट लावला. कदाचित् माझ्या सारख्या लोकांच्या मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच इंटरनेटचा जन्म झाला असावा.  या वेळेपर्यंत माझ्या मनात आपण मराठी आहोत, याचा स्वाभिमान ही जागृत झाला होता. इंटरनेटवर मी पाहिलेली पहिलीच साईट मराठीसृष्टी ही होती. या साईटमध्ये चक्क ‘आपल्यातला सुप्त लेखक जागवा’ असे आव्हान होते. आंधळा एक डोळा मागतो इथेतर दोन दोन डोळे ते ही मुफ्त में. प्रथम विश्वास झाला नाही,   भीत-भीत पहिला लेख गुगल देवाच्या मदतीने टंकून टाकला.  आश्चर्य म्हणजे पहिला टाकलेला लेख दुसर्याच दिवशी साईटवर दिसला. मग काय, मनातील दडलेली अमर होण्याची/ प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा जागृत झाली. स्वत:चा ब्लॉग ही स्वतच्या नावानेच बनविला. जे जे मनात आले आणि टंकू लागलो. अंतर्जालावर भाषेची, व्याकरणाची, कसला ही विचार कारण्याची आवश्यकता भासली नाही. काही चूक असेल तर वाचणारे लगेच प्रतिसाद देऊन ती चूक दुरुस्त करतातच. चिंता करण्याची गरजच भासली नाही. काही महिन्यातच मराठीच्या इतर उदा. मिसळपाव, ऐसीअक्षरे, आणि नुकतेच ग्लोबल मराठी बाबत कळले. डोळेबंद करून आपला लेख सर्व ठिकाणी टाकू लागलो. अश्यारितीने मी ही अंतर्जालावर लिहिणाऱ्या हजारोंच्या संख्येत असलेल्या लेखकांच्या श्रेणीत समाविष्ट झालो. इंटरनेटवर लेखांची चोरी ही होते.  माझे काही लेख  ही  चोरी झाले. खंर म्हणाल, तर चोरी झाल्याचे कळल्यावर मला दुख होण्याच्या जागी कुठेतरी आनंदच झाला (बन्दे में कुछ दम है असे वाटले).
 
आजकाल तर दर आठवड्यात एक लेख/ कविता लिहिण्याचा संकल्प केलेला आहे. पाककृतीपासून ते न कळणाऱ्या गंभीर प्रश्नांवर ही लिहायला सुरुवात केली आहे. काहीही लिहिले तरी निदान ५००-१००० लोक वेगवेगळ्या मराठी साईटस् वर वाचतीलच. (मराठी लिहिलेली अधिकांश छापील पुस्तके ३०० लोक ही वाचत नाही).  एक मात्र खंर, निदान जेवढे दिवस आपण अंतर्जालावर लिहित आहोत, तेवढे दिवस तरी काही लोकांना आपले नाव लक्ष्यात राहील. निदान सध्यातरी कीर्तिरूपे उरण्याची दुधाची तहान ताकावर तरी भागते आहे. (असे निदान माला तरी वाटते).  तरीही प्रतिष्ठित लेखक समाज कधीतरी आपली ही दखल घेऊल अशी आशा आहे.   

इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा!


भारत देश खरोखरच महान आहे. क्रिकेट भ्रष्टाचारातून पुढे आलेल्या ललित मोदीस मदत केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्यांनी राजिनामा दिल्याखेरीज संसदेत कामकाज चालू न देण्याचा निर्धार काँग्रेसने केला. त्यामुळे तीन दिवस झाले तरी कोणतेही कामकाज न होता अधिवेशन स्थगित करण्याची पाळी लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजनांवर आली. स्मृतीला फारसा ताण न देता असे म्हणता येईल की अशीच पाळी पंधराव्या लोकसभेत काँग्रेसप्रणित आघाडीचे सरकार सत्तेवर असताना भाजपाने वारंवार आणली होती. पहिल्या लोकसभेपासून पंधराव्या लोकसभेतपर्यंत संसदेत झालेल्या कामकाजाची आणि न झालेल्या  कामकाजाची आकडेवारी तपासून पाहिल्यास झालेल्या कामकाजाचा विक्रम पाचव्या लोकसभेत झाला तर बारगळलेल्या कामकाजाचा विक्रम पंधराव्या लोकसभेत झाला.  पाचव्या लोकसभेत 482 ठराव संमत झाले तर पंधराव्या लोकसभेत 72 ठराव संमत होऊ शकले नाहीत.  ते आपोआपच बाद झाले. आता सोळाव्या लोकसभेचे पहिले वर्ष नुकतेच पुरे झाले असून दुसरे वर्ष सुरू झाले आहे. अर्थसंकल्प आणि काही योजना वगळता निवडणुकीत घोषित केलेला अजेंडा पुढे रेटण्यात मोदी सरकारला फारसे यश आले नाही. 
ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकणावरून संसदेत गतिरोध सुरू झाला तो भ्रष्टाराचा मुद्दा बिल्कूल नवा नाही. 1948 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या वर्षात जीप खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचारालाचलुचपतीचे प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर दर वर्षी भ्रष्टाचाराची नवी नवी प्रकरणे पुढे येत राहिली. भ्रष्टाचाराचे आक्राळविक्राळ रूपही समोर आले. उच्चपदस्थांची आर्थिक गुन्ह्यांची कितीतरी प्रकरणे लोकसभेत उपस्थित झाली. लोकसभेतल्या चर्चेमुळे  अनेक मंत्र्यांना राजिनामा द्यावे लागले. चौकशी करण्याचे सरकारने मान्य केल्यामुळे अनेकांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. ती ती प्रकरणे लोकसभेपुरते तरी संपली तरी भ्रष्टाचाराची नवी नवी प्रकरणे उपस्थित होण्याची परंपरा अखंड सुरू आहे. ती खंडित झाली नसली तरी तुरूंगवास मात्र फारच कमी जणांना भोगावा लागला. ह्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास कारवाई चुकवण्यासाठी फरार झालेल्या ललित मोदीला मदत करणा-या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ह्यांना राजीनामा द्यावा लागणार का? संसदीय राजकारणाच्या पटलावर सुरू असलेल्या बुद्धिबळातले मोहरे कसे सरकतील हा तूर्तास यक्षप्रश्न आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजचा राजीनामा मागण्यामागे काँग्रेसला इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा हा महाभारतातला न्याय अभिप्रेत आहे. काँग्रेसला सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यावर शरसंधान करण्यात काँग्रेसला खरे स्वारस्य आहे. मैं खाऊंगा नहीं, न तो खाने देऊंगा अशी डिंग मारणा-या मोदींची जिरवता आल्यास मुदतीपूर्वी त्यांचे सरकार पाडण्याची संधी मिळू शकेल असे काँग्रेसला वाटते. अर्थात अशी संधी वाटते तितकी सोपी नाही. मनी लाँडरिंगसारख्या गुन्ह्यात सापडलेल्या ललित मोदीला मदत करणा-या मंत्री सुषमा स्वराज ह्यांची हकालपट्टी करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा ठपका नैतिकतेच्या गप्पा मारणा-या नरेंद्र मोदींवर काँग्रेसला ठेवता येणार आहे!  
परंतु सूडाच्या भावनेने पेटलेल्या काँग्रेससला एका गोष्टीचा विसर पडला. सुषमा स्वराज ह्यांच्या जोडीला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि व्यापम् घोटाऴ्यास जबाबदार असलेले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ह्यांचाही राजिनामा मागून काँग्रेस मोकळी झाली. त्यामुळे खुद्द काँग्रेसची पंचाईत होणारच आहे. वसुंधरा राजे आणि शिवराजसिंह चौहान ह्या दोघांचे राजीनामे हे त्या त्या राज्याच्या अखत्यारीतले विषय आहेत. त्यांच्या राजिनाम्याशी संसदेचा साक्षात् संबंध नाही. पण मोदी सरकारविरूद्ध सूड उगवण्याच्या खुमखुमीने काँग्रेसला स्वस्थ बसू दिले नाही. राज्याच्या अखत्यारीतला विषय आणि केंद्रातल्या अखत्यारीतला विषय ह्यात गल्लत झाली आहे हेही काँग्रेस नेत्यांच्या लक्षात राहिले नाही.
वास्तविक ललित मोदी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे ह्यांचे आर्थिक संबंध हा विषय मोदी सरकारला बेजार करण्यास पुरेसा आहे. वसुंधराराजे जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा ललित मोदींची राजस्थानच्या राजकारणातली वट इतकी वाढली की राजस्थानच्या राजकीय वर्तुळात ललित मोदी सुपर चीफ मिनिस्टर  म्हणून ओळखले गेले. वसुंधराराजेंचे चिरंजीव दुष्यंत सिंग ह्यांच्याबरोबर ललित मोदींचे आर्थिक व्यवहार राजरोस सुरू होते. आर्थिक गैरव्यवहाराचे धडे मोदींनी क्रिकेट कंट्रोल बोर्डात घेतले. शशी थरूरच्या कंपन्यांना आयपीएलच्या फ्रँचायसीपासून दूर ठेवण्याच्या कारवाया मोदींनी केल्या. अंबानी आणि अदाणी ह्या दोघांना फ्रँचायसी मिळावून देण्यासाठी फ्रँचायसी वाटपाच्या नियमात फेरफार केले. क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या गव्हर्निंग कौन्सिलला डावलून व्यवहार करण्याचे उद्योग त्यांनी नेटाने पार पाडले. ह्या उद्योगातून मिळवलेला पैसा परदेशात पाठवून तेथे नवे नवे धंदे सुरू केले. त्यातूनच त्यांचे श्रीनिवासनशी वितुष्ट आले. शेवटी श्रीनिवासननीच क्रिकेट बोर्डातून त्याचा काटा काढला.
अशा ह्या गुणसंपन्न ललित मोदीला मदत करण्याची रदबदली वसुंधराराजे ह्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ह्यांच्याकडे केली. ललित मोदीच्या बाजूने लढवण्यात येणा-या खटल्यात सुषमा स्वराजच्या कन्या बासुंरी स्वराज ह्यांचेही वकीलपत्र दाखल करम्यात आले होते. वकील कन्येखातर सुषमा स्वराजना ललित मोदीसाठी ब्रिटिश सरकारमध्ये शब्द टाकावा लागला असेल काय? वस्तुस्थिती काहीही असली तरी ललित मोदीमुळे नरेंद्र मोदी सरकार अडचणीत सापडले आहे.
मोदी सरकारची अब्रू वाचवण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शहांवर वसुंधराराजे आणि सुषमा स्वराज आणि शिवराजसिंह चौहान ह्यांच्या पाठीशी उभे राहणे भाग पडले. सुषमा स्वराजचा बळी देण्याची तयारी दाखवली तरच केंद्र सरकारची आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदींची अब्रू वाचणार आहे. नरेंद्र मोदी  राष्ट्रीय राजकारणात आले तेव्हा सुषमा स्वराज मोदींना विरोध करून बसल्या होत्या. ह्या भाजपातील अतंर्गत राजकारणाच्या ह्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराजना  मोदींनी राजीनामा देण्यास सांगितल्यास त्यांच्यावर डूख धरल्याचे चित्र दिसेल. राजकीय दृष्ट्या हे चित्र मोदींना बरेच अडचणींचे ठरू शकते. संसद चालू न देण्याची काँग्रेसची भूमिका एका अर्थाने पंतप्रधान मोदींवरच दबाव आहे. नेहरू-गांधींची नावे घेणे सोपे असले तरी त्यांचे अनुकरण करण्याचा प्रसंगात ते टिकतील का आता तर मोदी कसे वागतात हे दिसणार आहे. मोदी ह्या दबावापुढे किती टिकतात ते पाहायचे!
रमेश झवर
www.rameshzawar.com

सुगंध लावलेला हातरूमाल

“तुम्ही माझ्या मनातलं बोललात”असंच काहीसं तिला म्हणायचं असणार.

मंदाकीनीच्या मुलीचं,शरदीनीचं,लग्न होऊन पंधराएक दिवस झाले असतील.आता मंदाकीनी एकटीच असते.तिचा एकटेपणा थोडा कमी करावा ह्या इराद्याने मी गेल्या आठवड्यात तिच्या घरी गेलो होतो.
“एखाद्या सर्व साधारण वस्तूकडे पाहून आपल्या स्मृती जागृत होतात.त्याप्रमाणे माझ्या नवर्‍याचा हातरूमाल पाहून आठवणी आल्या.माझ्या स्मृती जागृत झाल्याच आणि माझ्या नजरे समोर आम्हा दोघांच्या सुखी जीवनाचा जणू चलचित्रपटच चालू झाल्याचं मला भासलं.आणि ह्या स्मृतीसुद्धा दहा वर्षापूर्वी मला सोडून गेलेल्या त्याचं स्मरण देत राहिल्या.दहा वर्ष होऊन गेली तरी त्या स्मृती आज जेव्हड्या माझ्या मनाला कवटाळून आहेत तेव्हड्या तो असताना होत्या.कदाचित त्यापेक्षांही जास्त घट्ट कवटाळून आहेत.”
असे उद्बार मला गेल्या गेल्या मंदाकीनेने बोलून दाखवले.मी तिचा दुःखाचा ओघ जेव्हडा कमी होईल तेव्हडा तिला तो ओघ जायला द्यावा अशा विचाराने मी तिचं म्हणणं शांतपणे ऐकत होतो.
मला मंदाकीनी पुढे म्हणाली,
“त्याला शेवटचा निरोप देऊन झाल्यावर ती रात्र मला खूपच भयानक होती.पण सकाळी उठल्यावर जेव्हा मी माझ्या बेडरूममधे गेले आणि उशीची कव्हरं बदलावीत म्हणून तो झोपायचा ती त्याच्या मानेखालची उशी प्रथम उचल्यावर त्या खाली,नेहमीच्या त्याच्या सवयीप्रमाणे ,नीट घडी करून ठेवलेला त्याचा तो हातरूमाल मला दिसला तो मी उचलल्यावर, त्याला अतिशय आवडणार्‍या सेंटचा, वास माझ्या नाकात गेल्यावर त्याची पुन्हा ताजी आठवण मला त्रास देऊ लागली होती.
आदला दिवस आम्ही खूप मजेत घालवला होता.ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने बागेत सुंदर गुलाबाची फूलं उमलली होती.ती आम्ही खूडली,आमच्या बेडरूम मधल्या फ्लॉवर पॉटमधे नीट मांडून ठेवण्यासाठी.
ती शेवटचीच खूडणी असावी.तळ्यावर जाण्याचा हट्ट करीत असलेल्या आमच्या मुलीला घेऊन आम्ही तिघंही थोडा वेळ स्कुटरवर बसून तळ्यावर गेलो होतो.थोडसं गेल्यावर रुमाल विसरला म्हणून त्याने स्कुटर परत फिरवून घरी येऊन रुमाल खिशात कोंबत आला आणि आम्हाला घेऊन गेला.ती तळ्यावर जाण्याची खेपसुद्धा आमची शेवटचीच ठरली.आणि त्या रुमालाला लावलेला तो शेवटचा सुगंध होता.
तो रुमाल मी उचलल्यावर माझ्या नाकाजवळ आणला.माझ्या नवर्‍याचं,शरदचं,आजुबाजूला नसणं मला जाणवलं. त्या रुमालावरच्या सेंटचा वास घेत मी हवं तेव्हडं मला रडून घेतलं.एव्हडं मी इतरांसमोर रडू शकले नव्हते.माझी मुलगी,तेव्हड्यातच,माझ्या पायाशी घुटमळू लागली.माझ्या अंगावर हाताने थोपटत मला समजूत घालूलागली. माझी ही सुंदर मुलगी,हेच आता माझ्या यापुढच्या जगण्याचं निमीत्त झालं आहे.ह्या मुलीकडे पाहूनच मला माझे हे अश्रू पुढील आयुष्यात पुसण्याची हिम्मत येऊ घालतील अशी मला मनाशी समजूत करून घ्यावी लागली होती.
माझ्या नवर्‍याचं,शरदचं,हृदय कमकुवत झालं होतं.परंतु,औषध घेत राहिल्यास तो म्हातारा होईपर्यंत जगू शकतो असं त्यावेळी आम्हाला डॉक्टर म्हणाले होते.ज्यावेळी त्याला मोठा हार्टऍटॅक आला त्यावेळी तो केवळ एकेचाळीस वर्षाचा होता.ते आमचं रमणीय कोकणातलं घर त्यावेळी मला खायला यायचं.
शरद शिवाय आता दिवस हळू हळू पुढे ढकलले जात होते.एक सारखं माझ्याबरोबर हसायला,मी जेवण करीत असताना माझ्याजवळ येउन एखादा जोक वाचून दाखवायला,रात्री मला लवकर झोप यावी म्हणून माझ्या डोक्यावर हळूवारपणे थोपटायला तो आता नव्हता.जेव्हा त्याच्या आठवणी येऊन फारच कठीण जायचं त्यावेळीमी बेडरूम मधून बाहेर येऊन हॉल मधल्या सोफ्यावर अंग टेकायची.त्या रुमालात तोंड खपसून घेऊन माझं दुःख आणि माझी विफलता मनात आणून ओक्साबोक्षी रडून रात्र घालवायची.असं करूनच मी माझ्या त्या अर्ध्या अंगाशी जवळात जवळ कवटाळण्यासाठी प्रयत्न करायची.
एक दिवशी मोठं वादळ येऊन गेलं.आम्ही,मी आणि माझी मुलगी शरदीनी, बाजारात खरेदी करण्यासाठी गेलो होतो.उशीरा आलो आणि तसेच झोपी गेलो.
दुसर्‍या दिवशी सकाळीच मी आमच्या बागेतल्या एका कोपर्‍यात,जिथे मी नेहमी प्राणायम आणि योगासने करते, त्या जागी गेले होते.थोड्यावेळा पुरतीच गेले होते.शरदीनी अजून उठायची होती. आदल्या दिवशी तो शरदचा रुमाल मी बागेतच विसरून आत आले होते.वादळी वार्‍याने तो त्या जागेवरून उडून एका गुलाबाच्या ताटव्यावर लटकत असलेला मी पाहिला.
पावसाने तो रुमाल भिजून गेला होता आणि वाळला होता.मी चटकन जाऊन त्याला झाडावरून काढून घेतला.त्याच्यावरचा तो सेंटचा वास,जो माझ्या मनाशी मुकाबला करायचा,तो जवळ जवळ गेला होता.
शरदला जाऊन आता बरीच वर्षं होऊन गेली होती.शरदीनी आता बरीच मोठी झाली होती.सुंदर दिसत होती.
“अगदीच काही अर्ध्यावर तिला सोडली नव्हती.हो ना रे शरद?”
असा प्रश्न मी शरद्ला तो ज्या वेळी माझ्या स्वप्नात येतो त्या वेळी विचारत असते.
नवरा गेलेल्या एका बाईला मी ऐकल्याचं आठवतं,
“मी माझ्या नवर्‍यावर प्रेम करायची!”
असं कसं बोललं जातं की त्या प्रेमाबद्दल कुणी भुतकाळात झालेली ही गोष्ट आहे असं संबोधतं.?जर का ते प्रेम भुतकाळातलं असेल तर,आपल्या स्मृतीला कुठून ताकद येते की,ती स्मृती आपल्याला वाटणार्‍या सुख-दु:खाचं समर्थन करू शकते.
मी जोपर्यंत जीवंत असेन तोपर्यंत शरदची आठवण माझ्या मनात कायम असणार.माझ्याकडे रोखून पहाणारी त्याची नजर माझ्या नातवाच्या नजरेतून दाखवली जाईल.शरदीनीच्या होणार्‍या सर्व मुलांमधे त्याचं अस्तित्व टिकून असणार.माझ्या नवर्‍याचं निधन,आम्हा सर्वांवर एक परिणाम करून गेलं हे निश्चित.परंतु,त्याचं जगणंत्यापेक्षा जास्त परिणाम करून गेलं आहे.आमच्या पैकी जो कुणी जीवंत असेल तोपर्य़ंत तो आठवला जाईल,त्याच्यावर प्रेमही केलं जाईल.
आणि कधी कधी एखाद्या उबदार उन्हाळ्यातल्या दिवशी,मला आमच्या बागेत स्वच्छ हवेत आणि सूर्य प्रकाशात, त्या सेंटचा मुग्ध करणारा सुवास आठवण करून देतो आणि शरदच्या रुमालात मी पुन्हा एकदा माझं नाक खूपसते.
तो जरी चीरनिद्रेत आहे हे मला जरी ठाऊक असलं तरी,त्याचं ते खळखळून हसणं कुठून तरी कानावर येतं,आणि तो माझी वाट पहात आहे असं भासत असतं.”

मंदाकीनीचं हे सर्व ऐकून माझे डोळे ओले झाले.मला तिला एका वाक्यात, मला काय वाटतं ते, सांगायचं होतं. म्हणून मी तिला म्हणालो,
“हे बघ मंदाकीनी, हे तुझं ऐकून झाल्यावर माझा एका गोष्टीवरचा विश्वास द्दढ झाला आहे की,प्रेम हे मृत्युपेक्षा ताकदवान असतं आणि प्रेमाची मृत्युवर नेहमीच कुरघोडी होत असते.”

मंदाकीनीच्या चेहर्‍यावरून मला जाणवलं की,”तुम्ही माझ्या मनातलं बोललात”असंच काहीसं तिला म्हणायचं असणार.

श्रीकृष्ण सामंत( सॅन होझे कॅलिफोरनीया)

सुगंध लावलेला हातरूमाल

“तुम्ही माझ्या मनातलं बोललात”असंच काहीसं तिला म्हणायचं असणार.

मंदाकीनीच्या मुलीचं,शरदीनीचं,लग्न होऊन पंधराएक दिवस झाले असतील.आता मंदाकीनी एकटीच असते.तिचा एकटेपणा थोडा कमी करावा ह्या इराद्याने मी गेल्या आठवड्यात तिच्या घरी गेलो होतो.
“एखाद्या सर्व साधारण वस्तूकडे पाहून आपल्या स्मृती जागृत होतात.त्याप्रमाणे माझ्या नवर्‍याचा हातरूमाल पाहून आठवणी आल्या.माझ्या स्मृती जागृत झाल्याच आणि माझ्या नजरे समोर आम्हा दोघांच्या सुखी जीवनाचा जणू चलचित्रपटच चालू झाल्याचं मला भासलं.आणि ह्या स्मृतीसुद्धा दहा वर्षापूर्वी मला सोडून गेलेल्या त्याचं स्मरण देत राहिल्या.दहा वर्ष होऊन गेली तरी त्या स्मृती आज जेव्हड्या माझ्या मनाला कवटाळून आहेत तेव्हड्या तो असताना होत्या.कदाचित त्यापेक्षांही जास्त घट्ट कवटाळून आहेत.”
असे उद्बार मला गेल्या गेल्या मंदाकीनेने बोलून दाखवले.मी तिचा दुःखाचा ओघ जेव्हडा कमी होईल तेव्हडा तिला तो ओघ जायला द्यावा अशा विचाराने मी तिचं म्हणणं शांतपणे ऐकत होतो.
मला मंदाकीनी पुढे म्हणाली,
“त्याला शेवटचा निरोप देऊन झाल्यावर ती रात्र मला खूपच भयानक होती.पण सकाळी उठल्यावर जेव्हा मी माझ्या बेडरूममधे गेले आणि उशीची कव्हरं बदलावीत म्हणून तो झोपायचा ती त्याच्या मानेखालची उशी प्रथम उचल्यावर त्या खाली,नेहमीच्या त्याच्या सवयीप्रमाणे ,नीट घडी करून ठेवलेला त्याचा तो हातरूमाल मला दिसला तो मी उचलल्यावर, त्याला अतिशय आवडणार्‍या सेंटचा, वास माझ्या नाकात गेल्यावर त्याची पुन्हा ताजी आठवण मला त्रास देऊ लागली होती.
आदला दिवस आम्ही खूप मजेत घालवला होता.ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने बागेत सुंदर गुलाबाची फूलं उमलली होती.ती आम्ही खूडली,आमच्या बेडरूम मधल्या फ्लॉवर पॉटमधे नीट मांडून ठेवण्यासाठी.
ती शेवटचीच खूडणी असावी.तळ्यावर जाण्याचा हट्ट करीत असलेल्या आमच्या मुलीला घेऊन आम्ही तिघंही थोडा वेळ स्कुटरवर बसून तळ्यावर गेलो होतो.थोडसं गेल्यावर रुमाल विसरला म्हणून त्याने स्कुटर परत फिरवून घरी येऊन रुमाल खिशात कोंबत आला आणि आम्हाला घेऊन गेला.ती तळ्यावर जाण्याची खेपसुद्धा आमची शेवटचीच ठरली.आणि त्या रुमालाला लावलेला तो शेवटचा सुगंध होता.
तो रुमाल मी उचलल्यावर माझ्या नाकाजवळ आणला.माझ्या नवर्‍याचं,शरदचं,आजुबाजूला नसणं मला जाणवलं. त्या रुमालावरच्या सेंटचा वास घेत मी हवं तेव्हडं मला रडून घेतलं.एव्हडं मी इतरांसमोर रडू शकले नव्हते.माझी मुलगी,तेव्हड्यातच,माझ्या पायाशी घुटमळू लागली.माझ्या अंगावर हाताने थोपटत मला समजूत घालूलागली. माझी ही सुंदर मुलगी,हेच आता माझ्या यापुढच्या जगण्याचं निमीत्त झालं आहे.ह्या मुलीकडे पाहूनच मला माझे हे अश्रू पुढील आयुष्यात पुसण्याची हिम्मत येऊ घालतील अशी मला मनाशी समजूत करून घ्यावी लागली होती.
माझ्या नवर्‍याचं,शरदचं,हृदय कमकुवत झालं होतं.परंतु,औषध घेत राहिल्यास तो म्हातारा होईपर्यंत जगू शकतो असं त्यावेळी आम्हाला डॉक्टर म्हणाले होते.ज्यावेळी त्याला मोठा हार्टऍटॅक आला त्यावेळी तो केवळ एकेचाळीस वर्षाचा होता.ते आमचं रमणीय कोकणातलं घर त्यावेळी मला खायला यायचं.
शरद शिवाय आता दिवस हळू हळू पुढे ढकलले जात होते.एक सारखं माझ्याबरोबर हसायला,मी जेवण करीत असताना माझ्याजवळ येउन एखादा जोक वाचून दाखवायला,रात्री मला लवकर झोप यावी म्हणून माझ्या डोक्यावर हळूवारपणे थोपटायला तो आता नव्हता.जेव्हा त्याच्या आठवणी येऊन फारच कठीण जायचं त्यावेळीमी बेडरूम मधून बाहेर येऊन हॉल मधल्या सोफ्यावर अंग टेकायची.त्या रुमालात तोंड खपसून घेऊन माझं दुःख आणि माझी विफलता मनात आणून ओक्साबोक्षी रडून रात्र घालवायची.असं करूनच मी माझ्या त्या अर्ध्या अंगाशी जवळात जवळ कवटाळण्यासाठी प्रयत्न करायची.
एक दिवशी मोठं वादळ येऊन गेलं.आम्ही,मी आणि माझी मुलगी शरदीनी, बाजारात खरेदी करण्यासाठी गेलो होतो.उशीरा आलो आणि तसेच झोपी गेलो.
दुसर्‍या दिवशी सकाळीच मी आमच्या बागेतल्या एका कोपर्‍यात,जिथे मी नेहमी प्राणायम आणि योगासने करते, त्या जागी गेले होते.थोड्यावेळा पुरतीच गेले होते.शरदीनी अजून उठायची होती. आदल्या दिवशी तो शरदचा रुमाल मी बागेतच विसरून आत आले होते.वादळी वार्‍याने तो त्या जागेवरून उडून एका गुलाबाच्या ताटव्यावर लटकत असलेला मी पाहिला.
पावसाने तो रुमाल भिजून गेला होता आणि वाळला होता.मी चटकन जाऊन त्याला झाडावरून काढून घेतला.त्याच्यावरचा तो सेंटचा वास,जो माझ्या मनाशी मुकाबला करायचा,तो जवळ जवळ गेला होता.
शरदला जाऊन आता बरीच वर्षं होऊन गेली होती.शरदीनी आता बरीच मोठी झाली होती.सुंदर दिसत होती.
“अगदीच काही अर्ध्यावर तिला सोडली नव्हती.हो ना रे शरद?”
असा प्रश्न मी शरद्ला तो ज्या वेळी माझ्या स्वप्नात येतो त्या वेळी विचारत असते.
नवरा गेलेल्या एका बाईला मी ऐकल्याचं आठवतं,
“मी माझ्या नवर्‍यावर प्रेम करायची!”
असं कसं बोललं जातं की त्या प्रेमाबद्दल कुणी भुतकाळात झालेली ही गोष्ट आहे असं संबोधतं.?जर का ते प्रेम भुतकाळातलं असेल तर,आपल्या स्मृतीला कुठून ताकद येते की,ती स्मृती आपल्याला वाटणार्‍या सुख-दु:खाचं समर्थन करू शकते.
मी जोपर्यंत जीवंत असेन तोपर्यंत शरदची आठवण माझ्या मनात कायम असणार.माझ्याकडे रोखून पहाणारी त्याची नजर माझ्या नातवाच्या नजरेतून दाखवली जाईल.शरदीनीच्या होणार्‍या सर्व मुलांमधे त्याचं अस्तित्व टिकून असणार.माझ्या नवर्‍याचं निधन,आम्हा सर्वांवर एक परिणाम करून गेलं हे निश्चित.परंतु,त्याचं जगणंत्यापेक्षा जास्त परिणाम करून गेलं आहे.आमच्या पैकी जो कुणी जीवंत असेल तोपर्य़ंत तो आठवला जाईल,त्याच्यावर प्रेमही केलं जाईल.
आणि कधी कधी एखाद्या उबदार उन्हाळ्यातल्या दिवशी,मला आमच्या बागेत स्वच्छ हवेत आणि सूर्य प्रकाशात, त्या सेंटचा मुग्ध करणारा सुवास आठवण करून देतो आणि शरदच्या रुमालात मी पुन्हा एकदा माझं नाक खूपसते.
तो जरी चीरनिद्रेत आहे हे मला जरी ठाऊक असलं तरी,त्याचं ते खळखळून हसणं कुठून तरी कानावर येतं,आणि तो माझी वाट पहात आहे असं भासत असतं.”

मंदाकीनीचं हे सर्व ऐकून माझे डोळे ओले झाले.मला तिला एका वाक्यात, मला काय वाटतं ते, सांगायचं होतं. म्हणून मी तिला म्हणालो,
“हे बघ मंदाकीनी, हे तुझं ऐकून झाल्यावर माझा एका गोष्टीवरचा विश्वास द्दढ झाला आहे की,प्रेम हे मृत्युपेक्षा ताकदवान असतं आणि प्रेमाची मृत्युवर नेहमीच कुरघोडी होत असते.”

मंदाकीनीच्या चेहर्‍यावरून मला जाणवलं की,”तुम्ही माझ्या मनातलं बोललात”असंच काहीसं तिला म्हणायचं असणार.

श्रीकृष्ण सामंत( सॅन होझे कॅलिफोरनीया)