पप्पा

मी पप्पांची मधली सुन. मधल्या मुलाला काहि अधिकार नसतात,पर्यायाने सुनेलासुध्दा. तेव्हा पप्पाबद्द्ल लिहीण्याचा अधिकार आहे कि नाही, हे जाणुन न घेता लिहिते. पप्पांना दिलेली ही ओबडधोबड श्रद्धांजली!

आपल्याकडे भरपुर बोलणे हा चांगलेपणाचा निकष आहे, मनाचा निर्मळपणा ह्याला महत्व नसते. माझ्यामते पप्पा मनाने निर्मळ होते, त्यांनी आपले मत कोणावर थोपण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना ते जमले नाही आणि त्यांना ते पटत ही नव्हते. दुसऱ्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर ,ते मौन बाळगत पण कुणाला दुखवत नसत. समोरच्या व्यक्तीचा खरे-खोटेपणा त्यांना कळलाय, हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. लहानपणी एक गोष्ट वाचली होती. एक हुशार माणुस देवळाबाहेरील आंधळ्याला रोज दुध म्हणुन पिठामध्ये पाणी घालुन द्यायचा. त्याला स्वत:च्या हुशारी वर खुप विश्वास होता. त्याला वाटत होते, ह्या आंधळ्याला कुठे माहित आहे दुध कसे असते. कमी पैशात मला मात्र दानाचे पुण्य मिळते आहे. पण तो हे विसरत होता की आंधळ्या माणसाला रंग दिसत नाही,चव कळते, स्पर्श कळतो, स्वर जाणवतो. असो, सुज्ञास सांगणे न लगे.

पप्पा मितभाषि होते, पण उत्तम चित्र काढत. वर्तमानपत्र वाचुन झाले की, त्यातील आवडलेल्या चित्रांचे रेखाटन करत, किंवा वळणदार अक्षरे घोटिवपणे परत परत लिहीत. त्यांना रोजनिशी लिहायची सवय होती. आणि प्रवासवर्णन तर खुपच छान लिहित. त्याच्या प्रवासवर्णनाचे एक छानसे संग्रहण होइल.

ते घरात फार कमी बोलत. म्हणुनच त्यांच्या मित्राने जेव्हा ऑफीसचा त्यांनी नाना पाटेकरला दिलेल्या बाणेदार उत्तरचा किस्सा सांगितल तेव्हा खुप आश्चर्य वाटले. खरे तर ते स्व:तबद्दल कधीच फुशारकीने बोलले नाही, आणि त्याचा हाच स्वभाव जास्त आम्हाला भावत होता.

पप्पानां वाचनाची खुप आवड. रहस्यमय कथा त्याच्या विशेषआवडिच्या. रत्नाकर मतकरींची पुस्तके तर ते बऱ्याच वेळा परत परत वाचत. पप्पाची आणि माझी मैत्री पुस्तकातर्फे होती.म्हणजे असे, ते दिवाळी अंक माझ्यासाठीराखुन ठेवत. खुप आवडलेला मजकुराचे पान मला वाचायला देत. वाचुन झाल्यावर त्याच्याकडे पाहिले की,खुसखुशीत मजकुरासाठी मंद हास्य दिसे. त्यांनी मलादिलेली ६-७ पुस्तके माझ्याजवळ त्याची आठवण म्हणुन सदैव राहतील.

त्यांना नाटक, सिनेमा ह्याची आवड तर होती. पण आश्चर्य म्हणजे अंताक्षरी मध्ये त्यानी एकदा कुणाला न आठवणारे मराठी गाणे सुचवून त्यांच्या उमद्या मनाचे दर्शन आम्हाला दिले होते. आठवणी तर खुप आहेत. पण आत्ता जितक्या दाटीवाटिने मनात आहेत, तितक्या झरझर त्या कागदावर उतरत नाही आहेत.

म्रुत्यु कुणाला चुकला नाही, पण प्रत्येकाच्या मनात भय असते, कि तो कसा येणार . स्व:तला , दुसऱ्या ला त्रास होऊन जाणे कोणाला नको असते. म्हणूनच पप्पा भाग्यवान ठरले. सर्व सामान्यपणे इस्पिताळातील कामकाजाच्या पद्धती प्रमाणे त्यांची जाण्याची वेळ नीट नाही कळवली गेली . पण ते ज्यावेळी गेले तेव्हा मी तिथे होतॆ. पण मला ते इतके शांत वाटत होते, कि ते गेले ह्याबर अजून विश्वास नाही बसत नाही . त्याच्या चेहर्यावरचे शांत भाव आठवून अजून अश्रु थांबत नाहीत देव त्यांच्या आत्म्यांस शांती देवो.

‘सामान्यातले असामान्य’

           काही दिवसांपूर्वी गावात प्रदर्शन भरल होत, आता अस प्रदर्शन भरल आहे म्हंटल्यावर माझ्यासाठी हि  पर्वणीच असते. ( आईच्या मागे लागून हवे तितके पुस्तक विकत घेता येतात.) या पुस्तकांमध्ये सुधा मुर्तींच एक नावाजलेल पुस्तक पण घेतल. ”सामान्यातले असामान्य”………         
         ‘सामान्यातले असामान्य’ हा सुधा मूर्तींचा एक कथा-संग्रह. उमा कुलकर्णी यांनी या कथा-संग्रहाचा अनुवाद केला आहे. उत्तर कर्नाटकच्या संस्कृतीशी त्या पुरेपूर परिचित असल्यामुळे या कथासंग्रहातील अर्क मराठी वाचकांपर्यंत पोचवण त्यांना सहज शक्य झाल आहे.
            मला असलेली  वाचनाची गोडी बघून आणि मी करत असलेला पुस्तकांचा संग्रह बघून माझ्या आईने हे पुस्तक मला माझ्या संग्रहात भर म्हणून वाढदिवसाला भेट म्हणून दिल.
उत्तर कर्नाटकाची संस्कृती आणि वेगळा असा थाट , या प्रदेशाच स्वतःच अस असलेल वेगळ वैशिष्ट्य , त्या संधर्भातील काही व्यक्तींविषयी काही कथा या कथा-संग्रहात आहेत. या कथांबद्दल सुधा मूर्ती सांगतात की “आमच्या गावात माणसं आत एक आणि बाहेर एक असा विचारच करत नाही,वरवर ओबड-धोबड वाटल तरी आमच हे उत्तर कर्नाटक मृदुपणा आणि भावनाशिलतेमध्ये परिपूर्ण आहे .” आणि हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येत कि सुधा मुर्ती अगदी खरं सांगत आहेत.
             या पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या व्यक्ती वरवर बघता अत्यंत सामान्य आहेत. तरीही त्यांच्यामध्ये असामान्य गुण आहेत.या सर्व व्यक्ती मध्यम-निम्नमाध्याम आर्थिक परिस्थितीतल्या असल्यामुळे उत्तर कर्नाटकातील सर्वसामान्य जीवनाचा प्रत्यय आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर येतो.
             या पुस्तकाच्या पहिल्याच कथेत आपल्याला भेटतो ‘बंडल बिंदाप्पा’ दिसायला देखणा असा हा बिंदाप्पा तरुणपणी सिनेमात नट होता अस कोणी सांगितलं, तर नाही म्हणायचं करांच नाही!! सुधा मूर्तींच्या आजीने त्याच्या विषयी केलेली डेफिनेशन विचित्र आहे, ‘ बिंदाप्पा , एकाच चार करणारा माणूस! दोनशेच चारशे करणारा.’ बंडल बिंदाप्पा हा प्रत्येक गोष्ट फुगवून सांगणारा , तोंडातून कधीही नकारात्मक बोलन न निघणारा. पण याच बिंदाप्पाला उत्तर कर्नाटकच्या इतिहासाविषयी खूप आदर आहे. असा हा बिंदाप्पा.
               पुढे ‘ असूया-तीच नाव अनसक्का ‘ हिची कथा आली आहे. अनसक्का म्हणजे गावातला ऑल इंडिया रेदिओ .या अनसक्काच्या तोंडातून कधीच कोणासाठी चांगले शब्द निघाले नाहीत. गावातल्या कुठल्या शुभ-अशुभ कार्यात तिच्या आवाजावरून तिचे अस्तित्व नजरेत येते.पण अशा या अनसक्काचा नवरा मात्र तिच्या एकदम विरुध्द आहे. शांत स्वभावाचा, मृदू , आणि अजिबात धैर्य नसलेला. मनात घर करणारी हि गोष्ट
              पुढची गोष्ट येते ती ‘ नलिनीची ‘ ‘ डब्बावाली नलिनीची’ जीला कामाच्या व्यापामुळे घरी स्वयंपाक करायला वेळ नाही.त्यामुळे तिच्यासाठी गावातल्या कुठल्याही घरातून डब्बा यायचा. गावातल्या एखाद्या कार्यक्रमाला नलिनी जरी गेली नाही तरी तिचा डब्बा ती पाठवून द्यायची. पण तिच्या अशा वागण्याचा गावातल्या लोकांना कधी राग नाही आला.याच दाब्ब्यामुळे पुढे नलिनीचे लग्न कसे जमले,या गोष्टीचे वर्णन छान केले आहे.
              अशाच अनेक चांगल्या कथा या पुस्तकात आल्या आहेत. ‘ अपशकुनी सरसाक्का ‘, ‘ कंडक्टर भीमण्णा’, ‘ विजोड’, ‘ चतुर चामन्ना’, ‘स्वार्थी सावित्री’, ‘ संधिसाधू सीमा’, आणि बर्याच अजून कथा. या सर्वच कथा आपल्याला खिळवून ठेवणाऱ्या आहेत. प्रत्येक कथा वाचताना या सर्व व्यक्ती आपल्या समोर जिवंत उभ्या राहतात. सुधा मूर्तींना या सर्व व्यक्तीसोबत जे अनुभव आले ते वाचताना मन भरून जाते.

”मालगुडीचा नरभक्षक ………”

        काही दिवसांपूर्वीच ‘ आर.के.नारायण.’ यांच्या चार पुस्तकांच्या संचाबद्दल वृत्तपत्रात जाहिरात वाचली आणि आपल्या संग्रही आर.के.नारायण यांची पुस्तक हवीत म्हणून मग हा संच मागविला. ” द बॅचलर ऑफ आर्टस्”, ” द इंग्लिश टीचर”, ” मालगुडीचा नरभक्षक”, आणि ” महात्म्याच्या प्रतीक्षेत” अशी हि चार पुस्तक.
          आर.के.नारायण यांची मालगुडी डेज हि सिरिअल आणि पुस्तक तसे आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. ” स्वामी अंड फ्रेंड्स ” या पुस्तक पासून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. आर.के. नारायण यांच्या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे हि सगळीच पुस्तक अगदी साधी सरळ, मालगुडी या काल्पनिक गावातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सहज, ओघवत्या शैलीतून आणि मार्मिक विनोदातून वाचकांपुढे मांडणारी आहेत.
         या चार पुस्तकांमधल असच एक पुस्तक म्हणजे ” मालगुडीचा नरभक्षक” . या पुस्तकाचा मराठी अनुवाद सरोज देशपांडे यांनी केलाय.
हि गोष्ट आहे मालगुडीच्या एका नटराज नावाच्या व्यक्तीची ज्याचा प्रिंटींगचा व्यवसाय आहे. पत्नी आणि मुलासोबत राहत असलेल्या आणि सगळ्यांशी मित्रत्वाने वागणाऱ्या या मुल पत्राच्या आयुष्यात जेव्हा वासू नावाचा एक इसम येतो तेव्हा नाटराजचे आयुष्य कसे बदलते याची हि गोष्ट आहे.
         नटराज हा एकदम साधा सरळ आणि हळव्या स्वभावाचा. मुंगीही आपल्या हातून मारता कामा नये अशा कुटुंबात लहानाचा मोठा झालेला.
पुढे त्याला त्याच्या व्यवसायामुळे दोन मित्र भेटतात. जे पेशाने कवी व पत्रकार आहे. नंतर त्याच्या व्यवसायाच्या निमित्यानेच वासू नावाचा एक ट्याक्सीडर्मिस्ट येतो. जो पूर्वी पेशाने पहिलवान होता ( एका मुठीत लोखंडाचे दर पडणारा ! ). शिकारीची भयंकर आवड असणारा आणि प्राण्या-पक्ष्यांना मारून त्यांच्यात पेंढा भरून तो विकून भरपूर पैसे कमावणाऱ्या या वासूचा स्वभाव तापट, रागीट, हेकेखोर, आणि हुकुम्शहसर्खे हुकुम सोडण्याचा आहे.
          पुढे हा वासू नटराजच्या प्रिंटींगप्रेसच्या पोटमाळ्यावर येउन राहायला लागतो ( नटराजने परवानगी दिलीच आहे असे गृहीत धरून!). पुढे वासू नटराजला बळजबरीने मेम्पिच्या जंगलात घेऊन जातो, तेंव्हा तिथे अनोळखी जागी नटराजला एकट्याला सोडून वासू कसा निघून जातो व नटराज परत घरी कसा येतो. हा प्रसंग लेखकाने छान मांडला आहे. नंतर पुढे हळू हळू वासू नटराजचा सर्व पोटमाळा प्राणी-पक्ष्यांच्या पेंढा भरलेल्या अवयवांनी भरून टाकतो. वासूच्या अशा स्वभावामुळे नटराज आणि वासुमध्ये वादावादी होऊन आलेलं वैर आणि अबोल अशी गोष्ट पुढे सरकते. पुढे नटराजच्या कवी मित्राने लिहिलेल्या एकपदी राधा आणि कृष्णाच्या कवितेचे पुस्तक पूर्ण झाल्यावर ते प्रकाशित करण्याच्या समारंभांच्या मोठ्या सोहळ्याची तयारी चालू होते आणि तयारीच्या वेळी नटराजला समजते कि वासू समारंभात आणल्या जाणाऱ्या हत्तीला गोळी घालून मारणार आहे.आणि त्याला विकून पैसे कमावणार आहे.
          नटराज वसुल त्याने हत्तीला मारु नये यासाठी खूप विनंती करतो.पण वासूचे मन वळवण्यात तो अयशस्वी ठरतो.पुढे तो हत्तीला कसे वाचवतो आणि त्यावेळी वासू स्वत:च स्वत:च्या पहिल्वणी शक्तीमुळे कसा मारतो…..अशी हि गोष्ट. साधीच पण वाचताना आपल्याला खिळवून ठेऊन, पुढे काय होईल? याबद्दल आपल्या मनात कुतूहल निर्माण करणारी.
           साधीच असली तरी आर.के.नारायण यांची हि पुस्तके आपल्या संग्रहात असली पाहिजे अशीच आहेत. तुम्हालाही हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.

येऊर पर्वतरांगा.

हो नाही करत शेवटी अर्ध्या दिवसासाठी का होईना येऊरला जायचे ठरले. माझ्या घरच्या मागेच येऊर च्या डोंगररांगा आहेत. हा भाग संजय गांधी नॅशनल पार्क ह्या राखीव अभयारण्यात येतो. ह्या डोंगररांगा ओलांडून गेलो तर दुसर्‍या बाजूला बोरीवली येते. सगळ्यांना वेळ कमी असल्यामुळे फक्त अर्धा दिवसातच भटकून यायचे ठरले. त्यात वटपौर्णिमा असल्यामुळे ह्या दिवशी बायकोचे प्रेम उतू जात असते. त्यामुळे सर्वांनाच अर्ध्या दिवसात घरी परत यायची धमकीवाजा सूचना मिळाली होती. त्यामुळे येऊर शिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे जाणे म्हणजे अर्धा वेळ फक्त प्रवासातच जाणार. म्हणून सर्वानुमते हीच जागा ठरली. 
सकाळी सुजीतच्या कार ने सात वाजता घरातून बाहेर पडलो. सोबत एसएलआर कॅमेरा, ट्राइपॉड आणि कॅमेरा भिजू नये म्हणून एक छत्री आणि खायला ३ पार्ले-जी, गुड डे, पाण्याच्या बोटल वगैरे घेऊन निघालो. कार येऊर गावात अगदी आतपर्यंत जाते. रस्ते बांधणी खूपचचांगली होती. वनखात्याच्या किंवा एअरफोर्स च्या अखत्यारीत येत असल्यामुळे कदाचित रस्त्यांची स्थिती उत्तम होती. येऊर गावाच्या टोकाला जिथे पर्यंत रस्ते आहेत आणि कार जाईल तिथे पर्यंत कार ने गेलो. कार पार्क करून तिथेच असलेल्या एकुलत्या एक टपरी वर एक कडक चहा घेऊन अभयारण्याच्या हद्दीत शिरलो. 
गेटवरच एक वनखात्याची चौकी आहे. तिथल्या अधिकार्‍याने फक्त पेपर वाचंताना एक नजर टाकली आणि परत पेपर वाचायला सुरूवात केली. आम्ही आपापले कॅमेरे काढून पुढे सरसावलो. पाऊस पडल्यामुळे झाडे हिरवीगार दिसत होती. पण पूर्णपणे हिरवळ अजुन पसरली नव्हती. जमिनीतून नवीन अंकुर फुटले होते. कदाचित एक दोन आठवड्यात सगळे हिरवाएगार होऊन जाईल पण सध्यातरी फक्त झाडेच आणि झाडांच्या  खाली असलेली झुडुपेच दिसत होती. हिरवळ नुकतेच बारसे धरायला लागत होती. जंगलातून जाणारी पायवाट बर्‍यापैकी होती. पायवाट धरून चालले असता कुठे भरकटण्याची शक्यता नाही. 
हा भाग जंगलमध्ये मोडत असल्यामुळे आणि आधीचा थोडाफार अनुभव असल्यामुळे मी सर्वाना जीन्स आणि फूल शर्ट घालून यायला सांगितले होते. कारण जंगलातले किडे आणि डास भयंकर चावतात असा आधीचा अनुभव होता. आणि त्याची प्रचीती लगेचच आली. जंगलात शिरून १० मिनिटे पण झाली नसतील . टायगर डास आपापले इन्जेक्शन घेऊन तयारीतच होते. अंग पूर्ण झाकले होते तरी सुद्धा हातचे तळवे आणि चेहरा त्यांच्यासाठी पुरेसा होता. ह्या डासांच्या अंगावर वाघा सारखे पट्टे असतात म्हणून कदाचित ह्यांना टायगर डास म्हणत असावेत. 
मध्ये येणारे छोटेमोठे पाणवठे ओलांडत आम्ही एका थोड्या मोठ्या ओढा वजा ओहोळ जवळ आलो. सकाळ पासून पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याला तसा जोर नव्हता. पण तरी गुडघाभर वाहते पाणी होते. थोडा वेळ बसून आराम केला. पार्ले जी गुडडे खाऊन जरा ताजेतवाने झालो. आता पुढे जायचे की परतायचे ह्या विषयावर चर्चा चालू झाली. तो ओढा ओलांडून १५ मिनिटे चालून गेल्यावर एक धबधबा येतो ते माहीत होते.
लहानपणी एकदा असाच सोसायटीची मुले धबधब्यावर गेलो होतो. आम्ही जाऊन आल्यावर जोरदार पावसाची सर आली आणि ओढा पूर्ण भरून जोरदार वाहू लागला होता. त्यामुळे पलीकडच्या काठावरचे लोक तसेच अडकून पडले होते. पोलिसांपर्यंत बातमी पोचल्यावर ते काठ्या घेऊन  आले. एक तर त्याना जंगलात फरफटत यावे लागले होते त्यात संध्याकाळाची वेळ होती त्यांना परतताना अंधरातून जावे लागणार होते. त्यामुळे ज्याला भेटेल त्याला मारत सुटले होते.आम्ही सोबत सोसायटीची मोठी माणसे असल्यामुळे त्यावेळेला त्या तडाख्यातून वाचलो होतो. पण पलीकडच्या काठावर अडकलेले लोक तसेच रात्रभर अडकून पडले होते. झाडाला दोरया बांधूनसुद्धा पाण्याच्या जोर जास्त असल्यामुळे त्याना तो ओढा ओलांडता आला नव्हता. दुसर्या दिवशी पाऊस कमी झाल्यावर ते सगळे सुखरूप बाहेर पडले होत. त्यामुळे तो ओढा ओलांडून जाण्याची भीती होतीच. 
पण सकाळ पासून पाऊस पडला नसल्याने आम्ही रिस्क घेण्याचे ठरवले. कॅमरा बॅगे पॅक करून आम्ही सगळे ओढा ओलांडानारच तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. पण तसा जास्त जोर नव्हता त्यामुळे आम्ही पुढे सरकत राहिलो. पुढे पंधरा मिनिटे चालल्यावर धबधब्या आवाज येऊ लागला. झाडी बाजूला करत डोंगर खाली उतरताच धबधब्याचे नयनरम्य दृष्य दिसून आले. आमच्या आधी अजुन एक ग्रूप आधीच तिथे येऊन ओली पार्टी करत बसले होते. आम्ही सोयीची जागा बसून विसावलो. मग थोडे फोटो क्‍लिक करून पाण्यात पाय सोडून रिलॅक्स झालो. निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला.मुंबईच्या च्या प्रदूषणातून दूर मोकळा श्वास घेतला. कोणाला अचानक ह्या जंगलात आणून सोडले आणि सांगितले की ह्या जंगलच्या बाहेर १.२० करोड लोक रहातात. तर कोणाला विश्वास नाही बसणार एवढी अप्रतिम शांतता….फक्त धबधब्याचा वाहणे आणि पक्षांचा मंजुळ आवाज.
तिथली निसर्गरम्यता आणि मोकळे वातावरण पाहून तिथून निघायला मन करत नव्हते. पण बायकांची आणि त्यांनी धरलेल्या सावित्रीच्या  उपासाची आठवण झाली आणि आम्हा तिथून पाय उचलावे लागले. जेवढा मोकळा श्वास छातीत भरून घेता येईल तेवढा श्वास भरून घेतला.  निसर्गर्सौंदर्य कॅमेरा टिपून घेतले उरलेले डोळ्यात साठवून घेतले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. सुदैवाने ओढ्याचे पाणी तेव्हढेच होते त्यामुळे ओढा ओलांडताना काही अडच आली नाही. 
येताना मात्र वन खात्याच्या चौकी वर पोलिस होते. त्यांनी विचारले की कुठे फोटो काढायला गेला होतात का? आम्ही… हो!! त्यांनी विचारले वनखात्याची परवानगी आहे का? आम्ही म्हटले… नाही…त्याने आम्हाला एक बोर्ड दाखवला …जाताना आम्ही त्या बोर्डाच्या खालुनच गेलो होतो पण कोणीच बोर्ड नाही वाचला. मग त्याने घाबरवयचा प्रयत्न केला..असे करू नका….पेनल्टी भरावी लागेल. मनात म्हटले, आता हा पैसे काढायला लावणार. पण त्याने सांगितले की तुम्ही पहिल्यांदाच आलात म्हणून तुम्हाला सोडून देतोय…पुच्या वेळेला बोरीवली नॅशनल पार्क मधून परवानगी काढून घ्यावी लागेल…. ह्यावेळेला सोडून देतोय.
आम्ही पण मग कशाला मागे वळून पाहतोय…तसेच आभार मानून तिथून सटकलो.

-x-

वृक्षांचे देवत्व

मुले ब्रह्मा त्वचा विष्णू शाखायाम तु शंकर:.
पत्रे-पत्रे तु देवानाम् वृक्ष राज नमोस्तुते.
वृक्षांच्या मुळांमध्ये साक्षात ब्रह्मदेव निवास करतात. वृक्षांची त्वचेत भगवान विष्णु, फांद्यांमध्ये भगवान शंकर निवास करतात. पाना-पानात देवतांचा निवास असणार्‍या वृक्षराजाला मी नमस्कार करतो.
वृक्षांच्या विना मानव जातीच्या अस्तित्वाची कल्पना ही अशक्य आहे, आपल्या प्राचीन ऋषींना हे माहीत होते. वृक्ष पर्यावरणला शुद्ध करतात, घर आणि यज्ञा साठी लाकूड प्रदान करतात, क्षुधा शांत करतात आणि रोगांपासून आपल्याला मुक्त करतात (अशी आख्यायिका आहे -आयुष्यभर अध्ययन करून ही ‘चरकला’ एक ही वनस्पती किंवा वृक्ष सापडला नाही की ज्यात औषधीय गुण नाहीत).
पुराणात वृक्षांचे महत्व सांगताना महर्षि व्यास म्हणतात जो मनुष्य पिंपळ, वट आणि कडू लिंबाचे एक-एक झाड, चिंचेचे दहा, बिल्व आणि आवळ्याचे तीन-तीन आणि आंब्याचे पाच झाडे लावेल तो कधीही नरकात जाणार नाही. गीतेत ही भगवंताने ‘अश्वत्थ सर्व वृक्षाणाम’ वृक्षांमध्ये मी अश्वत्थ (पिंपळ) हा वृक्ष आहे असे म्हटले आहे. वृक्षांची महिमा सांगताना ऋषि म्हणतात एक वृक्ष दहा पुत्रांच्या बरोबर आहे. [(विष्णु धर्मसूत्र (१९/४)].
वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर यांचे निवास तुळशी वर लक्ष्मी आणि विष्णु, सोमलता-चंद्रमा, बिल्व –शंकर, अशोक-इंद्र, आंबा –लक्ष्मी , कदंब- कृष्ण, पलाश-ब्रह्मा आणि गंधर्व, पिंपळ – विष्णु, औदुंबर – रुद्र आणि विष्णु, महुआ –अचल सौभाग्याचे आशीर्वाद देणारा वृक्ष (बंगालच्या अकाल च्या वेळी ज्या गावांत महुआची झाडे होती, तेथील गावकर्यांनी या झाडाच्या वाळलेल्या फुलांपासून बनलेल्या पोळ्या खाऊन आपले रक्षण केले, असे एका लेखात वाचले होते).
शेवटी कवी नीरजची कवितेतील एक अंश –
खेत जले, खलिहान जले, सब पेड जले, सब पात जले.
मेरे गांव में रात न जाने कैसा पानी बरसता था.
हा अनुभव आपण आत्ताच घेतला आहे.

आडदांड पाऊस

आडदांड पाऊस

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने

आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने

खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने

नाही दिले कुणाला थोडे ‘अभय’ परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने

                               – गंगाधर मुटे
————————————————

Filed under: कविता, गझल, मार्ग माझा वेगळा, वाङ्मयशेती Tagged: कविता, गझल, मराठी गझल, शेतकरी गीत, My Gazal, Poems, Poetry

कथा: भूक (१०)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८ आणि भाग ९ इथे वाचा!
…मॅटर्निटी होममधल्या बेडवर पडलेय मी!… सारं कसं शांत वाटतंय… आजूबाजूला नर्स, मेट्रन, डॉक्टरांची हालचाल आहे, बोलणं आहे… मला मात्र सगळं मूक चित्रपटासारखं दिसतंय… डोळे मिटताहेत… ग्लानी येतेय मला… मान वळवून मी बेडच्या उजव्या बाजूला पहातेय… आई बसलीये स्टुलावर… उघडून डोळ्यासमोर धरलेल्या तिच्या पुस्तकावरून तिचा चष्मा दिसतोय… उजव्या गालावर पंजा रेलून ठेवल्यामुळे तिच्या गालावर पडलेल्या वळ्या दिसताहेत… पुस्तकाचं नाव पहाता पहाता माझे डोळे मिटू लागतात… कसा असतो नाही हा अनुभव? आत… पोटात… हालचाल जाणवते… मधेच खच्चदिशी आत बसलेला धक्का… माझ्या बाळाने दिलेला?!… मी खुदकन हसते आणि ’आई ग!’ अशी कण्हते… आतमधे लाथ लागल्याचा त्रास होतो पण नंतर जी सुखद लहर पसरते सगळ्या अंगातून!… “फक्त थोडाच वेळ! थोडाच वेळ थांब आता!” मी स्वत:ला, बाळाला- दोघानाही समजावते आहे… शांत पडून रहायचा प्रयत्न करते आहे… चलबिचल चालूच… आत… वेळ भरत आलीय तसं वाढणारं टेन्शन… ते ही हवहवंसं वाटणारं… इतके दिवस… आणि अजूनही!… नकळत माझा जप सुरू होतो… हरे राम हरे हरे… हरे कृष्ण हरे कृष्ण… कृष्ण कृष्ण…. कृष्ण?… हां!… हां!… कृष्णबाळ… मी पुन्हा हसते… त्या ग्लानीतसुद्धा आईचं वाचन डिस्टर्ब होऊ नये म्हणून हसू आवरते… श्रीकृष्णपुराणातल्या बाळलीला आठवू लागतात… कृष्ण मोठा होतो… होत जातो… आणि… अचानक हा सांब यादव कुठून आला?… आणि हे यादव लोक त्या ऋषीची अशी थट्टा का करताहेत?… सांबाला साडी नेसवून, त्याच्या पोटाशी काहीतरी बांधून त्याला ऋषींच्या पुढे का ढकलताहेत!… आणि हसताहेत!… पुरे पुरे बाळांनो!… थांबत कसे नाहीत हे हसण्याचे आवाज?… बाजूच्या बेडवरच्या कोळणीला भेटायला आलेले लोक निघताहेत वाटतं!… हरे कृष्ण हरे कृष्ण… मला ग्लानी येतेय…

ढकलल्यासारखं होतं आणि मी जागी होते!… पांढरं स्वच्छ सिलींग… त्यात बसवलेल्या न दिसणार्‍या ट्यूबलाईट्स… पांढर्‍या भिंती… मी आजूबाजूला पहातेय… डोळे, डोकं जड झालंय… माझं डोकं मलाच, कुणीतरी उचलून ठेवल्यासारखं, वळवल्यासारखं वाटतंय… लेबररूमपर्यंतचा प्रवास शेवटी करतेच आहे मी!… माझ्या चेहेर्‍यावर हास्य… समाधानाचं- गर्वाचं नव्हे!… आमचे दाढीदिक्षित… त्याना कुणी सांगितलं म्हणे… दोघांनाही मंगळ आहे म्हणे कडक! असला काही चान्स घ्यायचा म्हणजे… मी नाहीच ऐकलं! काय झालं?… दोन महिनेसुद्धा कॅरी करू शकणार नाही म्हणे!… झालं आता! झालं!… भरली घटिका!… सलाईनमधून तो द्राव… सहज डिलीव्हरी होण्यासाठीचं ड्रग… हळू हळू सोडलं की… यांना मात्र फोन करायला सांगितलं पाहिजे! घरी- पुरश्चरण चालू असेल यांचं जोरात!… होऊ दे बाबा… आता एकदा होऊनच जाउदे!…   (क्रमश:)

बटाटा आणि राजमा (रेड बीन्स) एनचिलाडा


साहित्य:

३ ते ४ – बटाटे  –
१ – राजमा / रेड बीन्स कॅन  (१४ औंस)
१/४ कप – किसलेले चीज
१ चमचा  – गरम मसाला/चाट किंवा पावभाजी मसाला –  

८-१२ – टॉरटिया

१ कप – व्हेजीटेबल स्टॉक
१ कप – टॉमटे ज्यूस
१ चमचा – लिंबू रस  

१ चमचा – मीठ 
१ चमचा – तिखट  
२ चमचे – तेल 
१  – चिरलेला कांदा  
२ – लसूण पाकळ्या 
२ चमचे – कॉर्न स्टार्च
१ चमचा – चिरलेली कोथींबीर 
कृती:-
तेल गरम करुन चिरलेला कांदा त्यात परता, बारीक केलेली लसूण, जिरं पावडर आणि  चवीनूसार तिखट घाला.

थोडं परतून व्हेजिटेबल स्टॉक आणि टॉमेटो ज्यूस घाला. पाच मिनिटं मध्यम आचेवर उकळा.

कॉर्न स्टार्च थोड्याशा पाण्यात विरघळवून वरील मिश्रणात घाला. ढवळत रहा. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करा.  थंड होऊ द्या.
बटाटे मायक्रोव्हेवमध्ये उकडून गार झाले की  सालं न काढता बारीक फोडी करा. (सॉस करत असतानाच बटाटे शिजवून घेऊ शकता)
कॅनमधले बीन्स (पाणी काढून टाका. ते वरच्या सॉसमध्ये वापरलं तरी चालेल), बटाट्याच्या फोडी, आणि निम्मं चीज एकत्र करा
मीठ, लिंबू रस, मसाला, कोथींबीर घालून मिश्रण तयार करा
बेकींग ट्रे त तेलाचा हात फिरवा किंवा स्प्रे ने सर्वत्र तेल शिडकवा
प्रत्येक टॉरटिया वर वरिल मिश्रण १ ते २ चमचे घालून एक चमचा सॉस घाला, डोशासारखी गुंडाळी करा
या क्रमाने बेकिंग डिश मध्ये मिश्रण भरलेले सर्व टॉरटिया लावा
वरती उरलेलं सर्व सॉस आणि चीज पसरा
३५० वर ३० ते ३५ मिनिटं बेक करा.
खाताना सावर क्रिम किंवा आणि गॉकोमॉले (Guacamole) वर घालून घ्या. खालील चित्रात चारच टॉरटिया दिसत आहेत कारण मी मोठ्या आकाराचे वापरले आहेत. छोटे घेतले तर ८ – १२  होतात. ट्रे छोटा असेल तर एकावर एक ठेवले तरी चालतात.

वृत्रासुर

वेदांमध्ये कथा आहे. वृत्रासुराने नद्यांना पर्वतांत बंदिस्त केले होते. इंद्राने वज्राच्या प्रहाराने पर्वतांचे हृद्य फोडले आणि नद्यांना मुक्त केले. आज आपण वृत्रासुर प्रमाणेच पुन्हा नद्यांना पर्वतात बंदिस्त करतो आहे. याचा परिणाम आपल्याला भोगावेच लागेल. (इंद्र: अग्नी, वायू आणि जल या तिन्ही प्राकृतिक शक्तींचा स्वामी आहे. प्रकृतीच्या या शक्तीं बरोबर सहयोग करण्यात शहाणपणा असतो. या शक्तींवर विजय मिळविण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशाचा मार्गावर चालणे.)
इंद्राच्या वज्राने, हृद्य फोडले पर्वतांचे.
बंदिस्त नद्या मुक्त केल्या
सकळ प्राणी सुखिया झाला.

पर्वतांत कैद केल्या नद्या, बांधुनी धरणे
‘इंद्राचा’ क्रोध अनावर झाला
सकळ प्राणी दुखिया झाला.

प्रकृतीच्या क्रोधामुळे दिवंगत सर्व आत्म्यांना शांती लाभो,हीच श्री चरणी प्रार्थना.

”Friends……….”

                Hello Friends, कसे आहात सगळे? पाऊस काय म्हणतोय तुमच्या कडे ? आज इतक्या दिवसांनंतर काहीतरी लिहायचा मूड आला. म्हणून म्हंटल तुमची चौकशी करू थोडी !  
               काय मस्त वाटतंय आज! बाहेर मस्त पाऊस सुरुय, हवेत गारवा आहे. मस्त गाणे सुरु आहेत आणि सोबत तुमच्याशी गप्पा! वा !आज तो दिन बन गया …. । आज कस happy happy वाटतंय . कारण पण तसच आहे. आणि बहुतेक तुमचपण तसच होत असाव. अरे हो , कारण सांगितलच नाही मी तुम्हाला …… 
               काय झाल कि आज तब्बल एक वर्षानंतर मी माझ्या एका खास मैत्रिणीशी बोलले. आज तिचा वाढदिवस असतो. तस पाहायला गेल तर आम्ही एकाच गावात राहतो. पण बारावीच्या परीक्षेनंतर जश्या सगळ्यांच्या वाट वेगळ्या होतात तश्या आमच्या पण झाल्या. सगळे आपापल्या अभ्यासात busy झाले. त्यामुळे फक्त वाढदिवस असल्यावर एकमेकांना भेटतो किंवा फोन करतो. तर या सुट्ट्यांना वैतागलेली असतानाच आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आला. तुम्हाला सांगते इतक छान वाटल तिच्याशी बोलून . मस्त पुन्हा कॉलेजच्या दिवसांत गेल्यासारखं वाटल! 
             काय मज्जा असतेना मित्र-मैत्रिणींसोबतच्या त्या दिवसांची ! आणि कॉलेज मध्ये तर ग्रुपच असतात वेगवेगळे. मस्त कॉलेज बंक करून कालेज कॅम्पस मध्ये फिरायचं, फ्रेंड्ससोबत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारायच्या, वेळ पडल्यास आपली बाजू मांडण्यासाठी भांडायचं त्यांच्याशी. याच्या त्याच्या टवाळक्या करायच्या.  काही म्हणा पण अशा फालतू गोष्टी आपण फक्त आपल्या मित्र-मैत्रीनिनसोबतच करू शकतो . बरोबर न ? 
               खर पाहिलं तर आता फेसबुक मुळे आपण सगळेच जवळ आलोय. हव तेव्हा गप्पा मारता येतात फेसबुकवर. पण तरी आपल्या फ्रेंड्स सोबत घालवलेल्या दिवसांची मज्जा काही औरच असते. माझ तर जाऊद्यात, मी तर एक वर्षच भेटले नाही माझ्या फ्रेंड्सला,पण असे किती मित्र – मैत्रिणी असतात ज्यांचा कामामुळे किंवा दुसऱ्या गावी राहायला गेल्याने एकमेकांशी संपर्क तुटतो. अशा वेळी फक्त आठवणीच राहतात त्यांच्या जवळ कॉलेजच्या , आपल्या मित्र-मैत्रिणींच्या.……पण आता या अशा फ्रेंड्सला आपण फेसबुकवर भेटतो. आणि अशे आपले जुने फ्रेंड आपल्याला अचानक फेसबुकवर भेटल्याने काय छान वाटत ना ? अगदी बऱ्याचदा तर डोळे भरून येतात. 
           आज माझ्या सगळ्या जुन्या मित्र-मैत्रिणींची खूप आठवण येतेय. तुम्हाला येते का तुमच्या फ्रेंड्सची आठवण? माझ्या सारखा  वेडा आनंद होतो का त्यांना भेटल्यावर ?बागलाणचे शिलेदार:- साल्हेर,सालोटा,मुल्हेर,मोरागड,हरगड,मांगी तुंगी

बागलाणचे शिलेदार 

ते अनुभवलेले क्षण मला आज हि आठवतात. नाशिक मधला ऐतिहासिक बागलाण प्रदेश,पाठीवर १५ किलो वजन घेऊन जवळ जवळ ३८ तासांची चढाई,४ ते ५ डिग्री एवढे कमी तापमान, फुल टू थंडी, सोसाट्याचा वारा सुटलेला, पूर्णतः निर्मनुष्य असा प्रदेश, पूर्ण किल्ल्यावर आम्ही दोघेच, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, सूर्यास्ताला पश्चिमेकडे आलेली केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य,  गुहेमध्ये मुक्काम, गुहेच्या समोर मांडणी केलेले दगड व साथीला हनुमानाची मूर्ती, समोर गंगासागर तलाव, त्यावर चंद्राचे प्रतिबिंब आणी उठलेले पाण्याचे ते मंद तरंग, संपूर्ण आभाळ लखलखत्या तारकांनी व्यापलेले, डाव्या हाताला पहिले तर एकावर एक डोंगररांगा,  उजव्या बाजूस गुजरात बॉर्डर नि जाणाऱ्या एखादं दुसऱ्या गाडीचा लांबवर दिसणारा मिणमिणता प्रकाश. हातात गरमा गरम असे मान्चाऊ सूप. चमच्यात घेतलेले गरम गरम सूप तोंडापर्यंत  येईपर्यंत गार व्हायचे इतका वारा. स्वप्नवत अश्या ठिकाणी मी येऊन पोहोचलो होतो.
ओह, ह्या सुखाची अनुभूती ज्याचे त्यानेच घ्यायला हवी.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील डोंगर रांग म्हणजे भटक्यांच्या दृष्टीने पर्वणीच… साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड,हरगड,मांगी तुंगी, तांबोळया, न्हावी रतनगड असे एकापेक्षा एक असे किल्ले याच भागात असल्याने ट्रेकर्स ची इथे पार चैन असते. एकापेक्षा एक अवघड आणि सरस असे किल्ले चढताना दमछाक तर होतेच पण त्यांचा इतिहास ऐकल्यावर मन वेडे होऊन जाते. 

साल्हेर-सालोटा :
आमच्या स्वप्नातीत ट्रेकची सुरवात झाली ती साल्हेर सालोटा ट्रेक ने. एका शनिवारी पूर्ण दिवस प्रवास करून (पुणे- सटाणा- वाघाम्बे) साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाशी पोहोचलो. साल्हेर हा  महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे. त्याची उंची ५१४१ फूट ( १५६७ मीटर) आहे. सालोटा हा तिसरा उंच किल्ला असून ४९८६ फूट आहे.
साल्हेरचा किल्ला सटाणेच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो.
वाघाम्बे गावातून जाणारा रस्ता हा थोडा अवघड असला तरी कमी वेळात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या वाटेने गेल्यास सालोटा किल्ला पण करता येतो.

 उजवीकडे साल्हेर आणि डावीकडे सालोटा 

सर्व वाट रुळलेल्या असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता कमी आहे. तरीही सामान जास्त असेल तर किंवा सालोटा किल्ल्यावर जाताना सामान घेऊन न जाता साल्हेर सालोटा मधल्या खिंडीमध्ये ठेवून जायचे असेल तर २०० रुपये देऊन गावातून माणूस येऊ शकतो.

सालोटा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा हा दरड पडल्यामुळे जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. कातळ खोदून केलेल्या वाटा जास्त उंचीचा असल्याने सुमारे एक तासात आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. या किल्ल्याचा पूर्वी साठवण करण्यासाठी उपयोग होत असावा. या किल्ल्यावर पाणी नाही. येथून साल्हेर किल्ल्याचे पिर्यामिड सारखे रूप डोळ्यात भरते. 

साल्हेर हा किल्ला कळसूबाई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असून त्यास अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक  पार्श्वभूमी आहे. सालोटा उतरून खिंडीत आल्यावर, येथून आपण चार ते पाच तासात साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी जाऊ शकतो. साल्हेर वर जाण्याच्या मार्गात अनेक गुहा आणि पाण्याची टाकी दिसतात. किल्ल्यावर दोन गुहा असून राहण्यासाठी योग्य आहेत. किल्ल्यावर अनेक पाण्याची टाकी असून गुहेच्या समोरच गंगासागर तलाव आहे. या तलावात कायम पाणी असते. ते पिण्यायोग्य नसले तरी उकळून पिणे चांगले.
या किल्ल्यावरचे सर्वात बघण्यासारखे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच असे परशुराम मंदिर. गुहेपासून ४५ मिनिटे चालून गेल्यावर सर्वात उंच अश्या ह्या किल्ल्यावर छोटी टेकडी दिसते. त्यावर हे मंदिर बांधलेले असून तेथून आजूबाजूच्या परिसराचे दिसणारे विहंगम दृश्य आपले डोळे दिपवून टाकते. थंड गार वारा, महाराष्ट्रातील सर्वात उंच असे मंदिर, तेथून दिसणारा सालोटा, सूर्यास्ताला पश्चिमेकडे येणारी केशरी झळाळी, क्षितिजा मध्ये लुप्त होणारा सूर्य. केवळ अप्रतिम असे अनुभव.

या किल्ल्याच्या दोन्ही वाटांनी जाताना प्रत्येकी ६ दरवाजे लागतात. वाटेत प्रवेशद्वाराजवळ कोरलेले शिलालेख, दगडात कोरलेले गणपती, कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि बुलंदी असे बुरूज अन तटबंदी आपल्याला इतिहासाची साक्ष देतात.
वाघाम्बे गावातून चढाई करून दुसऱ्या दिवशी साल्हेर वाडी गावातून उतरावे. वाघाम्बे गावातून पश्चिमेकडून चढाई असल्याने उन्हाचा त्रास होत नाही. येथे पाहण्यासारखी अनेक स्पॉट असल्याने येथे जास्त वेळ हाताशी ठेवावा.

मुल्हेर आणि मोरागड
येथूनच पुढे मुल्हेर गावी जाऊन पुढच्या दिवशी मुल्हेर आणी मोरागड दोन्ही करता येतात.मुल्हेर गावातील शाळा, देवालय आणि उद्धव महाराज समाधी पाहण्यासारखी आहे.

मुल्हेर हा किल्ला डोलबरी पर्वत रंगांमध्ये असून किल्ल्याची अंदाजे समुद्रसपाटीपासून उंची ४२९०  फूट आहे. मुल्हेर ला जोडूनच मोरागड असून तो मुल्हेर किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. 
साल्हेर वाडी कडून जवळपास ४४ किमी अंतर असून ताहाराबाद पासून २५  किमी अंतर आहे. 
भौगोलिक दृष्ट्या सुरक्षित, आणि सुपीक प्रदेश असल्याने गावातील नागरिक बऱ्यापैकी सधन आहेत.

 मुल्हेर किल्ल्याला लागूनच हरगड असून दोन दिवसात हे तिन्ही किल्ले करणे शक्य आहे.

मुल्हेर गावापासून किल्ल्याच्या पायथा ३ किमी आहे.किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घरापासून सरळ जाणाऱ्या वाटेने २० मिनिटांत मुल्हेर माचीवरील गणेश मंदिरापाशी पोहचतो. या वाटेने गडावर प्रवेश करताना ३ दरवाजे लागतात. ते सर्व ढासळलेल्या अवस्थेत आहेत. वाट साधी व सोपी आहे. या वाटेने गडावर पोहोचण्यास अडीच तास पुरतो.  पहिल्या प्रवेशद्वारासमोरच एका दगडावर मारुती आणि गणपती कोरलेले आहेत. ते पाहून वाट बरोबर असल्याची खात्री होते.
तेथून थोडे पुढे गेल्यास गणेश मंदिर आणि सोमेश्वर मंदिर लागते.गणेश मंदिरासमोर असलेल्या तलावात पडलेले मंदिराचे प्रतिबिंब पाहून डोळे सुखावून जातात. चौदाशे साली किल्ल्यामध्ये गाव वसलेले होते, त्याच्या खुणाही येथे सापडतात.

 सोमेश्वर मंदिर:

‘सोमेश्वर मंदिर’ हे १४०० साली बांधलेले हे मंदिर म्हणजे मुघल-रजपूत स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मोठे मोठे दगड एकमेकात गुंफून हे मंदिर बांधले असल्याचा उल्लेख येथे आढळतो. गाभारा पाताळात असून तेथे जाण्यासाठी भुयारी पायऱ्या आहेत. मंदिरात असलेले पुरुषभर उंचीचा नंदी आणि दगडात कोरलेले कासव आपले लक्ष वेधून घेते.
येथून  गडावर जाण्यास सुमारे तीन तास लागतात. येथून अनेक ‘गुरांच्या वाटा’ फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. वाटेत मोती टाके असून त्याच्या उजवीकडून रस्ता वर जातो. वाटेत अजून एक कातळात कोरलेला मारुती दिसतो.
किल्ल्याला अतिशय भक्कम अशी सात प्रवेशद्वारे असून एका-आड  एक अशी त्यांची रचना आहे. वाटेत दोन  गुहा असून किल्ल्यावर पोहोचल्यावर नऊ पाण्याची टाकी आहेत. मुल्हेर वरून मोरगडा वर जाताना वाटेत राजवाड्याचे भग्न अवशेष आणि भडंगनाथाचे मंदिर लागते.
किल्ल्यावरून विस्तीर्ण अशी पर्वतरांग दृष्टीस पडते. दूरवर पसरलेल्या ह्या डोंगररांगा डोळ्याच्या कक्षेतही येत नाहीत.
मुल्हेरवरून मोरा कडे जाणाऱ्या प्रवेशद्वारात दरड कोसळली असल्याने जायचा मार्ग छोटा बनला आहे.  मुल्हेर आणि मोरागडाच्या खिंडीत अभेद्य अशी तटबंदी असून तेथून  दगडात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला मोरागडावर घेऊन जातात.

मोरागडाचा हा पहिला व अभेद्य दरवाजा आपल्याला इतिहासाची आठवण करून देतो.
पुढे मोरागडावर काही विशेष पाहण्यासारखे नाही. येथून मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, ताम्बोळ्या असे अनेक दुर्गांचे दर्शन होते.

मांगी-तुंगी :
मांगी-तुंगी हे जुळे किल्ले ताहाराबाद पासून हा अंदाजे २५ किमी वर असून येथूनच डोलबारी डोंगररांगा सुरू होतात असा समज आहे. ऐतिहासिक असा बागलाण जिल्हाही येथूनच चालू होतो.
हे किल्ले  गिरिदुर्ग प्रकारातील असून जैन लोकांचे तीर्थ स्थान ही आहे.
मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याचे जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे. दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात. येथून पुढे गुजरात राज्य चालू होते

हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. 
ताहाराबाद पासून मांगी-तुंगी फाट्यापर्यंत आल्यास ( शेअर रिक्षा, १५ रु. प्रती सीट) येथून पुढे मंदिरापर्यंत ट्रस्टच्या गाड्यांची विनामूल्य सेवा आहे.
मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात.  येथे सात मंदिरे असून मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात.तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत.मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.

गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे. दोन्ही गड पाहून यायला पाच ते सहा तास लागतात.तुंगी वर खूप माकडे आहेत. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन तुंगी वर जाऊ नये. ( हे अनुभवातून आलेले शहाणपण आहे)
येथे तीन हजाराहून जास्त पायऱ्या असून थोड्या थोड्या अंतराने विश्रांतीची सोय आहे. पायथ्यापर्यंत येण्यासाठी ट्रस्ट च्या गाड्यांची सोय असून केवळ १५ रुपये आकारले जातात. भिलवड गावातील ट्रस्ट च्या मंदिरात जेवण आणि राहण्याची सोय ( धर्मशाळा) आहेत. जेवण केवळ रु. ४० आणि राहायचे ५० रु. प्रती दिवस इतके नाममात्र आहे.
मांगी डोंगराच्या पश्चिमेस अखंड असा कातळ खोदून १०८ फुटी भव्य आणि भारतातील सगळ्यात मोठी अशी   आदिनाथाची मूर्ती उभारण्याचे काम चालू आहे. यासाठी ट्रस्ट ने राज्य सरकारची परवानगी घेऊन, अखंड असा कातळ शोधण्यासाठी अनेक कष्ट आणि खर्च केलेला आहे. JCB, क्रेन  आणी इतर साहित्य हे अगदी गडाच्या वर नेऊन ठेवले आहे. JCB दिलेल्या कंपनी ने पायथ्याशी तो JCB सगळे पार्ट खोलून सुटा केला आणी वर  नेऊन परत बिल्ड केला. यासाठी JCB कंपनीचे अभियंते जर्मनी वरून येथे आले होते.
( हे लक्षात घेता, साल्हेर वरील परशुराम मंदिर बांधायला,मुल्हेरवरील सात दरवाजे आणि राजवाडा बांधायला ( कोरायला), आणि मोरा गडाचा प्रथम दरवाजा उभ्या कातळात खोदायला कोणते अभियंते कोठून आले असावेत ? )  
मांगी गडावरून तुंगी शिखराचे अतिशय विहंगम असे दृश्य दिसते.
दोन्ही गडांवर असंख्य जैन मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यातला काही कोटिग करून जपलेल्या आहेत. 
येथून आजूबाजूच्या परिसराचे सुरेख दर्शन होते. दूरवर पसरलेल्या आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत निश्चिंतपणे उभ्या ठाकलेल्या पर्वत रांगा. केवळ डोळ्यात साठवून घ्यायचे असे नजारे. त्यांचा डामडौल, रौद्रता, अभेद्यता, नैसर्गिकता केवळ शब्दातीत. 
येथून उतरून तुंगी शिखरावर जाता येते. जवळपास तीन हजाराहून अधिक पायऱ्या चढून आपण येथे पोहोचतो.
पायथ्याशी प्रसादाची आणि पाण्याची सोय असून मंदिरात ट्रस्ट तर्फे जेवणाचीही सोय होते. 
हे सहाही किल्ले व्यवस्थित प्लानिग केले तर चार दिवसात होऊ शकतात. सटाण्यापासून पुणे- मुंबई ला जाणाऱ्या अनेक गाड्या मिळू शकतात. या पूर्ण ट्रेक ला तिकीट भाडे धरूनही रु. १५०० पेक्षा जास्त खर्च येत नाही. 
निसर्गाचे खरे रौद्र रूप अनुभवायचे असेल तर हा खरेच तुफान ट्रेक होऊ शकतो. महाराष्ट्रात असे काही अविस्मरणीय गडकिल्ले आहेत, याबाबत आपण खरेच सुदैवी आहोत. 
————————————————xxxxxx ————————————————

हा लेख महाराष्ट्र टाइम्स मधेही प्रकाशित झाला होता. या किल्ल्यांबद्दल अजून यथासांग माहिती आपण खालील दुव्यांवरून मिळवू शकता.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग १ – साल्हेर सालोटा   
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ – मुल्हेर, उद्धव महाराज समाधी 
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ – मुल्हेर -मोरागड 

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ४ – मांगी- तुंगीजी


सागर शिवदे 
sagarshivade07@gmail.com

9975713494

पोटोबा …। .

नवीन पाककृती  आपणासाठी . 


१ )   उंबर – (श्रावणी शुक्रवार स्पेशल)


२ )  घरगुती फालुदा 


३ ) क्रिमी पम्पकिन रेड पेपर सूप.
वरील पाककृतीची   संपुर्ण  माहिती वाचा…खालील लिंकवर टिचकी देऊन . 
http://mnbasarkar.blogspot.com/p/blog-page_5852.html

कथा: भूक (९)

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७ आणि भाग ८ इथे वाचा!
आईऽऽ आईऽऽ हे बघ काय?ऽऽ अगं आई हा माझा हात- कुठे… कुठे जायचंय आपल्याला? अगं आधी कोयता झालेला माझा हात- अं? आत्ता? पण- पण मला अजून तसं काहीच- अगं दीड एक महिना आहे अजून! तू अशी काय- थांब! थांब जरा!… मला आईला काही सांगायचंय! अगं थांब!… तुला आठवतंय आई?… मी आठ नऊ वर्षाची होते… मी किती वेळा तुला सांगायचे, ’मला आत्ताच्या आत्ता घेऊन चल!’ पहिल्या वेळी तू घाबरलीस… मलाच ओरडलीस, ’हे कुणी शिकवलं तुला?’ अगं मला खरंच तेव्हा वाटायचं की मला बाळ- मला खोदून खोदून सगळं विचारलंस… मी तुला कितपत काय सांगितलं कुणास ठाऊक! पुन्हा मी तुला ’घेऊन चल’ म्हणाले की तू ’हूं… हूं…’ करत नेहेमीसारखं पुस्तकात डोकं खुपसून बसायचीस… मी जास्तच केलं तर तू रागवायचीस… एवढा राग यायचा तुला? तुझं वाचन डिस्टर्ब केल्याचा? मी चिडून पुस्तकावरचं नावच तेवढं वाचायचे!… लांबून!… पुस्तकाला हात लावायची छाती कुठे होती?… चांगलं लक्षात आहे माझ्या, पुस्तकावरचं नाव… ’शिक्षण आणि समाजकारण’…
तुम्ही कुणी नसताना एकदा… आपल्या बिल्डिंगमधला तो… खरखरीत दाढीचा माणूस… आणि त्यानंतर मला नेहेमीच… तसं वाटायला लागलं… कुठेही पुन्हा तो दिसला की मला धडकीच भरायची… त्या दिवशी जेमतेम त्याला ढकलून मी बाहेर पळाले… पुन्हा जेव्हा जेव्हा घरी एकटी रहायचे तेव्हा माझं काय व्हायचं- जाऊ दे… पण मग मल सारखं वाटायचं… मला बाळ होणार- तसलं… तसलं काही त्यानं केल्यामुळे बाळ होत नाही हे माझं मलाच कळलं पण फार उशीरा… त्यामुळे मी किती वर्षं तशीच सैरभैर… पुस्तक संपवून, हाताचा अंगठा आणि तर्जनीने चष्मा वर करून डोळे मिटून डुलक्या काढणार्‍या तुझ्याकडे मी नुसती पहात रहायचे!… तुला उठवून काही सांगितलं तर तू काय करशील!.. त्यापेक्षा सगळं आतच ठेवलेलं बरं!… खोल कप्प्यात!… आणि.. आणि आज तू एवढी घाई करतेयस! मला घेऊन जायची!… हॉस्पिटलमधे!!… आई, एक मिनीट!… मला त्या… त्या प्रसंगानंतर लग्नच करावसं वाटत नव्हतं!… मी टाळाटाळ करायचे आणि स्थळांकडे दाखवायला मला तू जबरदस्ती घेऊन जायचीस नं!… त्याची… त्याची आठवण होतेय मला… आता… तू अशी मला नेतेयस नं! तेव्हा…
मला लग्न करावसं वाटत नव्हतं पण… पण बाळ व्हावसं मात्र वाटायचं!… अगदी हवहवसं- म्हणजे ते… बाळ होणार आहे असे भास व्हायचे मला म्हणून म्हणत नाही मी!… मला कळतच नाही!… त्या एका प्रसंगाने… मला लग्न करू नयेसं वाटायचं पण बाळ होऊ नये असं मात्र कधीच- आणि लग्न झाल्याशिवाय माझ्या लेखी बाळ होणं… आई… आई… एक सेकंद प्लीज… आई, मी होण्याच्या वेळी तुला कसं वाटत होतं गं? काय वाटत होतं? डोहाळे कसले होते? नॉशिया कसला होता?… शहाळ्याचं पाणी पीत होतीस का ग तू?… आणि…
 (क्रमश:)   

उदारमतवादी समीक्षकाच्या गुजगोष्टी

LOKSATTA, Published: Sunday, June 23, 2013

प्रा. रा. ग. जाधव हे साठच्या दशकातले एक मान्यवर समीक्षक. दहा वर्षे एस.टी.त कारकुनी, दहा वर्षे प्राध्यापकी आणि वीस वर्षे मराठी विश्वकोशात मानव्य विद्यांचा प्रमुख संपादक, अशी रा.गं.ची व्यावसायिक कारकीर्द. त्यांनी थोडंफार कवितालेखनही केलं आहे, अलीकडे ललित लेखनही केलं आहे. पण त्यांची मुख्य ओळख आहे ती समीक्षक म्हणूनच. मराठी साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रात त्यांचा अतिशय आदरपूर्वक आणि कौतुकाने उल्लेख केला जातो. त्या रा. गं.च्या निवडक लेखाचे हे पुस्तक, ‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’. त्याचे शीर्षक पुरेसे बोलके आणि सूचक आहे. रा. ग. हे वृत्तीने समीक्षक आहेत आणि स्वभावाने निरागस. त्यामुळे त्यांच्या लेखनात आणि जगण्यात एक अलवार हळुवारपण असते. याचा अर्थ असा नव्हे की, त्यात ठामपणा नसतो. तो तर असतोच. पण सर्जनशील साहित्याविषयी एका मर्यादेनंतर फार ठाम विधानं करता येत नाहीत, याची स्पष्ट जाणीव असते. आणि रा. ग. पुस्तकाला एक सेंद्रिय कलाकृती मानतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. वय वर्षे ऐंशीच्या सांजपर्वात त्यांची लेखणी धीम्या गतीने चालूच आहे, नव्हे ती नवा काहीतरी विचार मांडू पाहते आहे, याची चुणूक त्यांनी ‘इकॉलॉजी ऑफ लिटरेचर’ ही संकल्पना मांडून दाखवली आहे. त्याची मराठी साहित्यविश्व कितपत दखल घेईल माहीत नाही. रा. गं.नाही त्याची खात्री नाहीच. माझे पुस्तक कोणी वाचणार नाही, असे त्यांनाही वाटते. असो.

प्रस्तुत पुस्तक मात्र रा. गं.च्या इतर पुस्तकांपेक्षा बरेचसे वेगळे आहे. यात साहित्यविषयक लेख आहेत, पण हे रूढार्थाने समीक्षेचे पुस्तक नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर या गुजगोष्टी आहेत. मुख्य म्हणजे त्या सांजपर्वातील आहेत. म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे गमतीने(च) म्हटले जाते. पण रा. गं.बाबत ते गमतीने म्हणण्याचीही सोय नाही. कारण ते म्हणतात, ”सांजपर्व माणसाला मीविषयी बोलायला प्रवृत्त करते, खरे तर संधीच देते. पूर्वी हिरीरीने मांडलेल्या विचारांना परिपक्व सहिष्णुता देते. स्वत:कडे व स्वत:च्या सर्व पूर्ण संचिताकडे हळुवार तटस्थपणे पाहण्याची दृष्टी देते. सांजपर्वाच्या छायेत म्हणून संकीर्णतेचे रंगरूप ल्यालेल्या गुजगोष्टी सुचू लागतात.”


थोडक्यात सांजपर्व हे स्वत:कडेच नव्याने पाहायला लावणारे, स्वत:चा शोध घ्यायला लावणारे वय असते. त्यात रा. ग. समीक्षक. त्यामुळे ते स्वत:कडेही समीक्षकाच्याच नजरेतून पाहतात, आणि स्वत:ला अजिबात झुकते माप देत नाहीत.  ‘उदारमतवादी समीक्षक’ अशी रा. गं.ची मराठी साहित्यविश्वात ओळख असली तरी ते स्वत:बाबत मात्र तितकेसे उदार नाहीत, असे दिसते. यातले काही लेख इतर लेखकांविषयीही लिहिलेले आहेत. त्यांना आदरांजली म्हणून किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. त्या सर्वामध्ये मननीयता आणि सात्त्विक स्वीकारशीलता आहे. हळुवार परिपक्वता या पुस्तकातील सर्वच लेखांमधून जाणवते.


या पुस्तकात एकंदर अठ्ठावीस लेख असून ते चार भागांत विभागले आहेत. पहिल्या विभागातील नऊ लेख हे स्वत:विषयी आहेत. त्यातून रा. गं.च्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू जाणून घेता येतील. एरवी कमालीचे संकोची, भिडस्त असणाऱ्या रा. गं.नी या विभागात स्वत:च्या मनीचे काही गुज सांगितले आहे. पण तरीही ते लिहितात, ‘काही जण मला आत्मचरित्र लिहायचा आग्रह करतात. आत्मचरित्र म्हणजे सत्याचे प्रयोग. आहे का धाडस? मग कशाला लिहा? त्या वाटेनं मी जाणार नाही. आत्मप्रौढी करण्यासाठी आत्मचरित्र लिहू नये.’


‘सध्या थोर लेखकांची अनुपस्थिती आहे, आव्हानात्मक साहित्यकृतीही निर्माण होत नाहीत, प्रयोगशीलताही कमीच दिसते. या अंधाऱ्या पोकळीत समीक्षेचे अभ्यासकच प्रकाशाचे दीप उजळतील, असे मला वाटते.’ असा विश्वास रा. ग. दाखवतात. ‘दलित लेखकांनी गांधीजींचं ‘माय एक्स्परिमेंट विथ ट्रथ’ वाचावं..मराठीखेरीज अन्य भारतीय भाषांतील दलित वाङ्मयात आयडियॉलॉजी कमी आणि वाङ्मय अधिक आहे. आपल्याकडे उलट आहे.’, ‘मनमोहन आणि ग्रेस यांच्या कवितेत फँटसी आणि इमॅजिनेशनचा संगम आहे’, ‘प्रत्यक्ष जगण्याच्या परीक्षेत बहुतेक लोक नापासाच! कारण जगातील सर्वात अप्रिय सत्य हे ‘मी’विषयीच असते’ असे काही चांगले तुकडे वा ओळी या पुस्तकातील लेखांत सापडतात. आणि त्या आपल्याला थोडय़ाशा चमकावून जातात. रा. गं.नी त्या फार साधेपणाने सांगितल्या आहेत, पण त्या तशा नाहीत.


दुसऱ्या विभागात साहित्यसंस्कृती, भाषा, साहित्य संमेलनाचे औचित्य, साहित्यातील बाप, लेखक-वाचक यांच्यातील अंतर, परिभाषा, सार्वजनिक ग्रंथालय, प्रादेशिक साहित्य या विषयांवरील एकंदर नऊ लेख आहेत. तिसऱ्या विभागातील ‘बन्सीधर, तू आता कुठे रे जाशील?’ आणि ‘अद्भुताचे ब्रह्मांड’ हे दोन्ही लेख, एकंदर जीवनाविषयी रा. गं.ना काय वाटतं, याविषयी आहेत. मात्र जीवनाकडे पाहण्याची रा. गं.ची या दोन्ही लेखांतील दृष्टी ही समीक्षकाची नसून ललित लेखकाची आहे. चौथ्या विभागातील आठही लेख तसे पाहिले तर समीक्षकीय दृष्टीचे, पण टिपणवजा आहेत. त्यातून फारसं काही नवीन हाती लागत नाही. पण तरीही काही निरीक्षणे, मुद्दे जाणून घेता येतातच. ‘श्यामची आई’, ‘स्वामी’, ‘कोसला’ या तीन कादंबऱ्या, नारायण सुर्वे, जी. ए. कुलकर्णी, वसंत आबाजी डहाके यांच्यावरील लेख हे प्रासंगिक असले तरी त्यातून रा. ग. ‘कसं पाहतात?’ हे जाणून घेता येतं. पण या लेखांची लांबी-रुंदी छोटी असल्याने त्यातून त्यांनी फार मोठा व्यूह मांडलेला नाही. ‘आधुनिक मराठी विनोद-परंपरा’हा शेवटचा लेख मराठीतील विनोदी लेखनाचा धावता आढावा घेणारा आहे. 


दोनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ कोकणी लेखक रवींद्र केळेकर यांचे ‘ओथांबे’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. (ओथांबे म्हणजे ओथंबून आलेले दवबिंदू) केळेकर यांचे विविध विषयांवरील विचार त्यात एकत्र केले आहेत. रा. गं.चे हे पुस्तक काही तसे नाही. ‘माझे चिंतन’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने प्रकाशित झाले आहे, त्यातून त्यांच्या विचारांचा गाभा चांगल्या प्रकारे समजावून घेता येतो. त्या तुलनेत प्रस्तुत पुस्तकात चिंतन फारसं नाही, पण मननीयता आणि एकंदरच जगणं, मराठी साहित्य याविषयीची स्वीकारशीलता आहे.

 
यातील सर्वच लेख हे आठ-दहा पानांचेच आहेत. शिवाय हे समीक्षक रा. गं.नी गप्पा माराव्या तसं लिहिलेलं 
पुस्तक आहे, हेही वैशिष्टय़च की! त्यामुळे त्यात समीक्षकीय परिभाषा फारशी नाही. अनौपचारिक शैली, साधीसोपी भाषा आणि काहीशी काव्यमय लय, ही काही यातील लेखांची वैशिष्टय़े आहेत. ‘खेळीमेळी’, ‘वासंतिक पर्व’ हे रा. गं.चे दोन ललित लेखसंग्रह अनुक्रमे २००८ व २००९ साली प्रकाशित झाले. त्यानंतरचा हा तिसरा. शिवाय सांजपर्वातला. त्यामुळे यातलं मार्दव व लालित्य मनमोकळं आणि दिलखुलास म्हणावं असं आहे. 


एका परीने हे बहुधा रा. गं.चं शेवटचं पुस्तक असण्याची दाट शक्यता आहे. कारण उरलंसुरलं असं या पुस्तकाचं पुस्तक आहे. वय वर्षे ऐंशीमध्येही रा. गं.ना नव्या पुस्तकाचं अप्रूप वाटतं. त्याचा पहिला पहिला नवाकोरा वास सुखावतो. गेली ४०-५० पन्नास वर्षे सातत्याने, निरलस वृत्तीने लेखन करणाऱ्या एका उदारमतवादी समीक्षकाच्या या पुस्तकाचं वाचकांनाही अप्रूप वाटावं आणि त्याच्या वाचनानं तेही सुखावेत. कारण गेली पन्नासहून अधिक वर्षे केवळ मराठी साहित्याचं चिंतन-मनन करणयात घालवलेल्या एका व्रतस्थ समीक्षकाचं हे लेखन आहे. जगाकडे, जीवनाकडे आणि मराठी साहित्याकडे सतत कुतूहलाने पाहात राहिल्याने रा. गं.कडे चार वेगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत..आणि त्या या पुस्तकात उतरल्या आहेत. त्यातून निदान काही जणांना तरी काही नव्याने सापडू शकेल.


‘संध्यासमयीच्या गुजगोष्टी’ – प्रा. रा. ग. जाधव, 

साधना प्रकाशन, पुणे, 
पृष्ठे – १७२, मूल्य – १२५ रुपये.