अमृता सारखे अमृतसर – ३ ( वाघा बॉरडर )

अमृता सारखे अमृतसर – ३ ( वाघा बॉरडर )

आज आम्ही जाणार होतो अमृतसर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणार्या ” वाघा बोर्डर” ला ! प्रत्यक्ष पाकिस्तान ! आजवर भारतात अनेक ठिकाणी फिरलो परंतु पाकिस्तान बघण्याची ( लांबून का होईनात) संधी मला मिळणार होती ! त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार होतो ! काय माहित परत कधी पहावयास मिळेल! आम्ही तेथे ( तसेच सुवर्ण मंदिरात ) जाण्यासाठी गाडी बुक केली होती ! यात आमच्या गाडी चा चालक “सुख” हा अतिशय मनमौजी तसेच उत्तर प्रकारे गाडी चालवण्यात माहीर असा होता ! वास्तविक तो त्याच्या स्वतःच्या व्यवसायाचा मालक होता .. परंतु माझा मित्र जसजीत च्या नात्यातला असल्याने तो आम्हाला अमृतसर फिरवण्यास आला ! त्याची तवेरा गाडी होती !
मधील प्रसिद्ध असा कुलचा !
अमृतसर मधील गोल्डन टेम्पल . दुर्ग्याना टेम्पल तसेच जालियानवाला बाग बघून आम्ही सगळ्यांनी मनसोक्त शॉपिंग केली.. तेथील प्रसिद्ध अश्या “कुलच्या” वर ताव मारला ! तसेच आता आम्ही बोर्डर कडे निघणार होतो ! जी.टी रोड ( ग्रांड ट्रंक ) आम्हास लागला होता ! अतिशय सुंदर रस्ता आहे .. हा पाहिल्यावर मुंबई पुणा एक्स्प्रेस हायवे चीच आठवण आल्या खेरीज राहत नाही !

वाघ प्रवेशद्वार( पाकिस्तान काही मीटर दूर)
आता हळू हळू फलक दिसू लागले होते वाघा २२किलोमीटर…वाघा १९किलोमीटर… वाघा १२किलोमीटर… आणि मग वाघा चे बोर्ड जाऊन चक्क ” लाहोर २२किलोमीटर” असे बोर्ड लागायला सुरवात झाली ! इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.. अमृतसर पासून वाघाचे जेव्हढे अंतर आहे तेव्हडेच लाहोर पासून वाघा चे आहे ! आता आम्ही भारताच्या शेवटच्या स्टेशन कडे आलो ! ” अटारी ” भारताची शेवटची हद्द ! जिथवर भारताची रेल्वे जाते! गम्मत म्हणजे “वाघा ” रेल्वे स्टेशन हे पाकिस्तानात आहे ! म्हणून भारताची शेवटची हद्द म्हणजे ” अटारी” स्टेशन ( गदर चित्रपट मध्ये देखील अमिषा पटेल याच स्थानकावर सनी देओल ला भेटते ! ) तिथून आम्ही वाघा बोर्डर च्या प्रवेशद्वार पाशी आलो !
प्रत्यक्ष बॉरडरवर !

३ वाजले होते आणि गेट ५ वाजता उघडणार होते॥ मग आम्ही आसपास चा परिसर पहिला.. मला जितके शक्य होईल तितके डोळ्यात साठवून घेत होतो ! तिकडे आम्ही “अमिर्चंद” नावाच्या हॉटेल मालकाच्या हॉटेल मधेय जेवलो.. मी पैसे देत असताना त्याचं कडे १ विलक्षण गोष्ट बघितली ती म्हणजे “पाकिस्तान ची नोट”!
आपल्या नोटे च्या संग्रहात ठेवावी म्हणून मी ती चक्क ५० रुपयांना विकत घेतली ! आता ५ वाजले होते॥
पाकिस्तानी नोट !
माणसांची तुडुंब गर्दीतून आम्ही चालले होतो ! पंजाब पोलीस जागो जागी दिसत होते ! त्यात माझे मित्र जगदीप आणि जसजीत हे मस्ती करत होते.. आणि त्या गर्दीतून वाट काढीत आम्ही वागा बोर्डर च्या प्रवेशद्वार पाशी पोचलो ! तितक्यात तेथे बहुचर्चित ” लाहोर बस” आली आणि गेली ! आता आवर चढू लागलो होतो आणि ..आणि.. मला पाकिस्तान दिसला !
भारतातील गर्दी( डावीकडील) व पाकिस्तानातील गर्दी(उजवीकडे )

खरेच काही म्हणजे काहीच फरक नव्हता इथल्या आणि तिथल्या भूमीत माणसे सारखी त्यांचा दिसणे .. कपडे रस्ते मोटारी पोशाख सगळे काही सारखे ! फक्त मनात दुरावा ! आणि अश्या वातावरणात आम्ही पोचलो ! जवळ जवळ १०ते २० हजार माणसे वाघा बोर्डर ला आली असतील भारताच्या बाजूने .. तर पाकिस्तान च्या बाजूला १०० -१५० माणसेच दिसत होती ! संध्याकाळच्या परेडला तिथे फारसा उत्साह दिसत नव्हता ! तसेच आता देशभक्ती पर गाणी सुउरू झाली होती दोन्ही बाजूला !
प्रत्यक्ष पाकिस्तान!
भारत झिंदाबाद .. पाकिस्तान झिंदाबाद असे एकमेकांच्या बाजूचे लोक ओरडत होते ! खरेच माझे लक्ष्य होते कि वाघा पलीकडे जास्तीत जास्त पाकिस्तान डोळ्यात सामावून घ्यावा !
तीठेय ४५ अंश तापमान होते अश्या गर्मीत ६:३० ला परेड सुरु झाली ! परेड मधेय सेनेचे जवान हे कसरती करत ..! तसेच तेथील गेट जोर जोरात आपटत असत ! आणि नंतर हेच सगळे काही पाकिस्तान च्या बाजूने देखील होत असे ! मला एका गोष्ट्चे कुतूहल वाटले पाकिस्तान आज पर्यंत एकही लढाई जिंकला नाही मग ते देशभक्ती पर गीत कसे म्हणत असतील!

प्रत्यक्ष पाकिस्तान!
हा खोडकर विचार मनात आणत बाजूला नजर फिरली आता भारताचा एक सैनिक पाकिस्तानात गेला आणि पाकिस्तानचा एक भारतात आला त्याने दोन्ही झेन्द्याना प्रणाम केला आणि एकमेकांनी झेंडा खाली काढला ! अश्या प्रकारे हा कार्यक्रम संपला ! अश्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला !
भारतात आपले स्वागत आहे !

परत येताना आम्ही जी।टी. रोड वरून अतिशय सुसाट वेगाने येत होतो॥ आमचा चालक सुख हा आपले गाडी चालवण्याचे कौशल्य आम्हास दाखवत होता ! जाता जाता मी तिथून पाकिस्तानातून भारतात आणलेला एक दगड या सहलीची आठवण म्हणून घेतला !गाडीत बसून विचार करत होतो की फक्त एका दिवसात पार पडलेली आमची हि सहल अतिशय यशस्वी झाली तसेच आता दुसर्या दिवशी हिमाचल प्रदेश मला खुणावत होते 🙂 🙂
हिमाचल कि ओर !
वाघा बोर्डर विषयी
१) भारताचा एक शिवाई पाकिस्तानात जातो तसेच तिकडचा इकडे येतो !

२) वाघा बोर्डर ला तिकीट नाही
३) ६:३० ला कार्यक्रम सुरु होतो !
४) शिवीगाळ ( पाकिस्तान बद्दल) करण्यास मना आहे !
५) १४ ऑगस्ट ला आपल्याला ( भारतातील लोकांना ) एका ठराविक अंतरा पर्यंत ( बहुदा कस्टम ची चौकी) पाकिस्तानात जाता येते !
६) आता तर उच्च हुद्द्या वरील दोन्ही कडेचे अधिकारी बिनदिक्कत कधीही बोर्डर पार ये-जा करतात !
७) २६-११ च्या नंतर निर्माण झालेल्या कटू संबंध नंतरही दोन्ही देशांची आयात निर्यात “वाघा ” बोर्डर वरून सुरु आहे ( मी आणलेला दगड ! )
८) वाघा बोडेर हि बरतात असली तरी स्टेशन हे पाकिस्तानात आहे !
९) वाघा बोर्डर वर भारताची सीमा १८०अन्श आहे ( पहा गुगल अर्थ किवा पंजाब चा नकाशा )
१० ) जी टी रोड ची हद्द वाघा ला संपते ( भारत ) आणि वाघा ( पाकिस्तान पासून) चालू होते ते पुढे लाहोर पर्यंत!
११) वाघा बोर्डर ला च भारताचे शेवटचे पोस्ट ऑफीस आहे ( अटारी पोस्ट ऑफीस )

"बाळा हळूच रे!"

“बाळा हळूच रे!”
      सध्या हाच घोष सगळीकडे ऐकू येतोय! आपल्याला आपल्या लहानपणी जे हाल सोसावे लागले ते आपल्या मुलांना सोसावे लागू नयेत ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते. त्यात वावगं काहीच नाही, पण ही काळजी घेतांना आपलं मूल किती पंगू आणि परावलंबी होतंय हे त्यांच्या कधी लक्षात येणार?
निमित्त होतं एका लग्नाचं. मी जवळच्याच नात्यातल्या एका लग्नाला गेलो होतो. माझे दोन-चार वर्षांपूर्वी लग्न झालेले भाऊ-बहिणही लग्नाला आले होते. प्रत्येकाच्या कड्यावर किमान एक तरी कॅलेंडर होतं. घरचंच लग्न म्हटल्यावर दोन-चार दिवस आधीच सगळे आलेले होते. सगळे भाऊ-बहिण आपल्या इथल्याच मातीत वाढून गेलेले, एकत्र खेळलेले, गुढगे फोडून घेतलेले, मनसोक्त मातीत लोळलेले! पण त्यांचं पिल्लू कडेवरुन खाली उतरलं रे उतरलं की,”बाळा तिकडे मातीत नको जाऊस! तुझ्या पायाला माती लागेल! छी: छी: असते माती!”
       अरे! माती छी: छी: कधीपासून झाली? ज्या मातीत तुम्ही लहानाचे मोठे झालात ती माती छी: छी:? तुम्ही, किंबहुना आपण सगळे लहानपणी मातीत, चिखलात जो धुडगूस घालायचो तो विसरलात? मातीला विसरलात? तेव्हा आपले आईवडिल बघायचेही नाहीत की मुलं काय करताहेत आणि कुठे खेळताहेत? अंगाला माती लागल्याशिवाय मोठं होता येतं? आम्ही तरी नाही झालो. तुम्हाला असं कसं वाटतं की मातीशिवाय तुम्ही मोठं होऊ शकता! शक्यच नाही!
      मुलांना जपणं हा वेगळा विषय आहे आणि अति जपणूक हा वेगळा विषय आहे. आज तुम्ही मुलांना मातीपासून दूर ठेवत आहात आणि जर उद्या मुलं मातीला विसरलीत, नव्हे ती विसरतीलच, तर तो दोष त्यांचा नाही, तुमचा आहे! खडे बोचल्याशिवाय त्यांना बोचणं म्हणजे काय हे कळणारही नाही. अशी कचकड्याची खेळणी उद्या जगाच्या बाजारात किती टिकाव धरू शकतील? त्यांचा पायाच कमकुवत राहतोय! एक गोष्ट नक्की की तुम्ही तुमच्या मुलांना जगातल्या सर्वोत्तम सुखसुविधा देऊ शकता, पण त्यांचं स्वत:चं असं आकाश? ते तर त्यांनाच निर्माण करावं लागणार आहे ना? की ते बापाच्या खिशातून पैसे घेतले आणि आणलं विकत इतकं सोपं आहे? तुम्ही आज ज्या ठिकाणी पोचला आहात तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही अपार मेहनत केली आहे, प्रचंड कष्ट केलेले आहेत, पण याचा अर्थ तुमच्या मुलांना तुम्ही सगळं काही रेडीमेड द्यावं असा मुळीच होतं नाही. बोचू द्या ना त्यांनाही एखादा काटा, एखादा दगड! फुलं फक्त तोडण्यासाठी नसतात हेही दाखवा त्यांना जमल्यास! झाडावर फूल येण्याची प्रक्रिया कशी घडते हेही कळूदेत त्यांना! त्यासाठी आधी तुम्ही निसर्गात जायला हवं! पण तिथेही माती आहेच ना! छी: छी:! मग कसं जाणार तुम्ही? निसर्गात जायचं म्हणजे तुमची कशी एक वन-डे ट्रीप असते. स्वत:च्या, मित्राच्या कारने किंवा एखादी भाड्याची गाडी करुन जवळपासच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जायचं, मस्त धिंगाणा घालायचा, भरपूर फोटो काढायचे आणि घरी आल्यावर किंवा जमल्यास तिथूनच फेसबुकवर अपलोड करायचे! झालं तुमचं निसर्गदर्शन!
कुठल्या एकत्र यायच्या ठिकाणीही, जसं लग्नात, सगळ्या ताया, वहिन्या आपापल्या मुलांना कड्यावर गॅसबत्तीसारखं घेऊन फिरणार! “काय करू रे तो/ती ऐकतच नाही ना!” त्या लहान पोरांचंही सारखं आपलं “अ‍ॅ अ‍ॅ अ‍ॅ” चालूच! त्यांचंही काही चुकत नाही! तुम्ही जर त्यांना माणसंच दाखवली नाहीत तर अशा ठिकाणी ती बावरणारच! त्यांना आंजारुन-गोंजारुन, वेळप्रसंगी रागावून तुम्ही मोकळं खेळायला लावू शकत नाही? आजच्या नव्वद टक्के आयांना आपल्या मुलांना रागवणं आवडत नाही! त्या स्वत: तर रागवत नाहीतच पण कुणी रागावलं की आधीच यांना राग येतो! आधीच ते एकटं मूल असल्याने लाडाने वेडं करुन ठेवलेलं असतं, आणि वरुन तुम्हीची त्याचे फालतू लाड करा हे यजमानांना सांगणं! तो बिचारा यजमान आधीच आपल्याकडच्या कार्याने वैतागून गेलेला असतो, त्यात आणखी ही भर! बरं ही उपद्यापी कार्टी बरोब्बर घरातलं किमती सामान हेरतात आणि त्याची नासधूस सुरु करतात! बरं त्यांना रागावलं की त्यांच्या आधीच त्यांच्या आया घर डोक्यावर घेतात. एखादं पोरगं चुकुन रडलंच तर कसा प्रलय झाल्यासारखी भीती त्याच्या आईबापांना वाटते, ते तरी रडल्याशिवाय मोठे झालेले असतात का? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा किती वेळा धडपडलोय, पडलोय आणि म्हणून जगात अजूनही टिकून आहोत!
       मुलांना मोकळं खेळू द्या! पडू द्या! मातीत लोळू द्या! आणि महत्वाचं म्हणजे ते या समाजाचेही भाग आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवायलाच हवं! त्याकरता तुम्ही जरा सोशल व्हा! त्यांना सांगा, तू हरलास तर मी तुझ्या पाठीशी आहे, पण मी तुला रेडीमेड काहीच देणार नाही! लढ बाप्पू लढ!
    बाय द वे, तुम्हाला काय वाटतं?
    –चित्रे आंतरजालावरुन साभार

कोट्या नु कोटी

नव्यानेच केल्यात वाटा म्हणाले
जुन्याला आता द्या फाटा म्हणाले

घड्याळात नाहीत काटे तरीही
वेळेस काढू काटा म्हणाले

कुणाचे कुणाशी पटेना तरीही
बळानेच वाटू पाटा म्हणाले

न मलई न लोणी आहे फक्त पाणी
तरी फार झालाय घाटा म्हणाले

नको चळवळी अन् नको ते उठाव
ब-या वाटती याच लाटा म्हणाले

ही कुलुपे नि किल्ल्या ती भिंती नि दारे
चौकी तरी पास थाटा म्हणाले

असे शब्द भारी तरीही सुचेना
करप्टेड आहे डाटा म्हणाले

कुठे चालले एवढ्या दूर लोक?
घरातील संपलाय आटा म्हणाले

अन्याय माझे कोट्या नु कोटी
आता पाय याचेच चाटा म्हणाले

खूप दिवसानंतर..

माझं जीवन एक बेट आहे,विशाल सागरात एकटच उभ असलेलं…दुराग्रही माझ मन वरवर थोड खट्याळ आहे,पण आतून अंतर्मुख असलेलं…आठवणी आहेत ‘शर’ समान,सफेद दगडांवर दिसून येणारी रेषा जशी नाहीशी होते अगदी तश्याच गुडूप झालेल्या…’आशा’ आहेत सुर्योदयासारख्या,जणू रोज नवीन आलोक घेऊन मार्गस्थ झालेल्या…

ह्या बेटावर खाचखळगे पुष्कळ ,आणि मित्र म्हणून फक्त संथ गतीने धावणारा वेळ.
मी फक्त समोर जातोय…पण हाच ‘वेळ’ कदाचित कट्टर शत्रू असावा,जो हे बेट सोडून खुल्या समुद्रामध्ये मला बुडी मारण्यास अटकाव करतोय..

मग मी मागे फिरतो ,पाहतो सभोवतालचा काळोख…रिकामा आणि गडद होत जाणारा…

मग अचानक डोळ्यांसमोरून तरळत जातात त्या गोड….गुलाबी…विविधरंगी…आनंदी आठवणी..
आणि मग अचानक उर येतो दाटून आणि डोळ्यात साठते क्षारयुक्त पाणी…

थांबा,मला….मला एक किरण दिसतेय ….
क्षितिजावर बहुदा तोच ‘आशेचा’ तांबूस गोळा उगवतोय….

छे..आता नक्कीच नाही…आता ह्या बेटावरून जाणे नाही…
कारण तोच सहस्त्ररश्मी मला खुणावतोय…..
तो दिवस पुन्हा येईल ….
‘आशा’ सोडू नको…..

Filed under: इंद्रधनुष्य…, मंतरलेले दिवस…

फुसका हरभजन

५६ षटकं ४ निर्धाव २१८ धावा १ बळी…

लॉर्ड्स कसोटी मध्ये हे समीकरण आहे, नुकत्याच ४०० बळी पुर्ण करणाऱ्या तसेच भारताच्या सर्वात अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग चे.

मी हरभजन सिंगचा खुप मोठा टीकाकार आहे. स्पष्ट सांगायचे तर मला तो मला एक साधारण दर्ज्याचा फिरकी गोलंदाज वाटतो.

१९९८ मध्ये करियरला सुरुवातीला संशयास्पद अ‍ॅक्शन मुळे तो संघा बाहेर गेला. ब-याच अडचणीतून बाहेर येते जखमी अनिल कुंबळेच्या जागी ऑस्ट्रेलिया विरुध्द संघात आला. २००० साली झालेल्या या मालिकेत तो हिरो ठरला त्याने एकूण ३२ बळी घेतले आणि स्टीव्ह वॉच्या बलाढ्य संघाला पराभुत करण्यात भारताला यश आलं.

त्या मालिकेत केलेली त्याने गोलंदाजी आणि लॉर्ड्स कसोटी मध्ये केलेली गोलंदाजी या मध्ये मला काहीच बदल जाणवला नाही. हरभजन एक अत्यंत मर्यादित गोलंदाज आहे, त्याची गोलंदाजी मध्ये काहीच विविधता मला दिसत नाही. एकच प्रकारचा टप्पा, गती आणि वळण. ही कसोटी जेव्हा सुरु झाली तेव्हा संघात सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे, सगळ्यात जास्त बळी घेतलेल्या, त्यात इंग्लंडचे फलंदाज फिरकी समोर कमकुवत. अशा जमेच्या बाजु असतांनाही त्याचे प्रदर्शन हे असे.

हरभजन फक्त आणि फक्त ऑफ स्पिन टाकतो, ज्या वेळी त्याला जास्त बाऊन्स मिळतो त्यावेळी त्याला विकेट मिळते.

हरभजन त्याच्या जास्तीत जास्त कसोटी अनिल कुंबळे सोबत खेळला, तो नेहमीच म्हणतो की मला त्याचा फायदा झाला मात्र तो दिसून येत नाही. कारण अनिल कुंबळे ची एक विशेषता होती ती म्हणजे तो त्याच्या चुकांतून तो शिकायचा आणि पुन्हा ती चुक होणार नाही याची काळजी घ्यायचा मात्र असे हरभजन करतांना दिसत नाही. पहिल्या ऑस्ट्रेलिया मालिकेत केलेली कामगिरीच्या जवळपास ही कामगिरी त्याला परत नाही करता आली.

१९९८ च्या जवळपास ऑफस्पिनर “दुसरा” टाकण्याचा शोध सकलेन मुश्ताक ने लावला, त्याच बरोबर त्याने तो उत्कृष्ट कसा टाकायचा हेही जगाला दाखवले. हरभजन, मुरलीधरन ने ही कला शिकली. पण सकलेन, मुरलीधरन जेव्हा दुसरा टाकायचे तेव्हा फलंदाजाला ते ड्राईव्ह करायला भाग पाडायचे. त्या मुळे ऑफस्पिनर समजुन फलंदाज चुकायचे आणि बाद व्हायचे. पण जेव्हा हरभजन सिंग दुसरा टाकतो तो खुपच आखूड टप्प्याने टाकतो त्या मुळे फलंदाजाला बराच वेळ मिळतो आणि मागे जाऊन तो आराम कट किंवा पुलचा फटका मारू शकतो. काळ बदलला आणि मेंडीस, आर. अश्विन सारखे स्पिनर आले आणि कॅरम बॉल चा उगम झाला, हरभजन ला हे सुद्धा जमत नाही.

हरभजनची एक मर्यादा जी सर्व देशाच्या फलंदाजांना माहिती आहे ती म्हणजे  पहिल्या काही षटकात हरभजनला विकेट मिळाली तर तो चांगली गोलंदाजी करतो पण तसे नाही झाले तर तो फलंदाजाला हवी तशी गोलंदाजी करतो. त्याचा मारा स्वेर्य होतो आणि रन काढणे अत्यंत सोपे होते. दुसरे एक म्हणजे त्याच्यावर हल्ला केला की ही हरभजन दिशाहीन गोलंदाजी करतो.

२००९ च्या टी-२० वर्ल्डकप मध्ये भारत अपयशी ठरला होता, इग्लंड विरुद्ध सामना भारताने ३ धावाने गमावला आणि खापर फलंदाजी वर फूटले. पण कमी पडलेल्या धावा सर्वांना दिसत होत्या मात्र हरभजन ने दिलेल्या १० वाईड कोण्याच्याच लक्षात नाही. हरभजनचा फास्ट बॉल हा लेग स्पंम्प च्या बाहेर जातो. इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर हे त्याला कळाले पाहिजे आणि हा बॉल टाकणे टाळल पाहिजे, मात्र आज ही तो ही चुक करतो.

माझ्या मते आता वेळ आली आहे, हरभजन ला जुन्या कामगिरी पेक्षा सद्य कामगिरीच्या जोरावर संघात ठेवावे. नवीन स्पिनरला संधी द्यावी. 

"सुख दुखतंय…!!!”

निवांत बसण्याच्या एखाद्या क्षणी मन उगाचच काहीतरी विचार करत राहतं. इच्छाही नसते खरंतर. पण त्या विचारांच्या स्पीडशी आपण मॅच नाही करू शकत स्वतःला.. फरफटत जात राहतो. एक वेगळंच युद्ध चालत राहतं आपलं. कुठल्या कुठल्या आठवणी सगळं सावरलेलं आवरलेलं उस्कटून विस्कटून टाकत दात विचकटत आपल्याभोवती पिंगा घालत राहतात..
आजच का व्हावं असं? बरं चाललंय की सगळं. घरी-दारी, शेजारी- पाजारी सगळं उत्तम आहे. हसरं घर आहे, जिवाचे जिवलग आहेत, मायेची माणसं आहेत… तरीसुद्धा ही टोचणी कशाची? अपूर्णतेची ही जाणीव का म्हणून? चला.. बास झालं.. एका वेळी ठरवून एकाच गोष्टीवर विचार करायचा… सतरा भुंगे एकत्र नकोत.. पण नाही.. माझा हट्टीपणा मनात आलाय की काय आज?? मी सांगितलेलं काहीच ऐकत नाहीये ते.. मी वेड्यासारखी हताश होतेय त्याचा हा चमत्कारिक अट्टाहास बघून…
काय बरं सांगत होते मी… पाहिलं, हे असं करतंय मन… आता इथे तर लगेच कुठे भलतीकडेच… किंवा गायबच अचानक… एखाद्या थंड शिखरावर वगैरे बसतंय जाऊन… ढोंगी… आगाऊ… आत्ता मी रडवेली झाले न, की मग त्याचा जीव भांड्यात पडेल… काय करणार आपण तरी.. स्वभाव असतो एकेकाचा..
स्वभाव??? कोणाचा स्वभाव?? मनाचा??? माझ्या मनाचा?? म्हणजे माझाच न?? नाही पण.. मी कुठे असं वागते? मला नाही आवडत कोणाला उगीचच रडवायला!! मग कोणाचा स्वभाव आहे हा?? आणि तो माझ्या मनाचा कसा झाला?? कुठून आला तो त्याच्यापाशी? म्हणजे माझं मन मला न सांगता असं एकटच फिरायला जातं?? भरकटत भरकटत भलभलत्या माणसांना भेटतं; आणि मग त्यांचे स्वभाव घेऊन येतं??
एक एक एक मिनिट.. मला नक्की वाईट कशाचं वाटत होतं?? पुन्हा विसरले मी… मळभ आलं होतं म्हणून?… हं.. आठवतंय थोडं थोडं.. गळ्यापर्यंत काहीतरी आलंय, श्वास अडकेल की काय असं वाटतंय.. आपलं सगळं चुकतंय.. वागणं चुकतंय.. दिसणं चुकतंय, हसणं चुकतंय, बसणं चुकतंय.. कदाचित, कदाचित ‘असणंच’ चुकतंय.. पुन्हा एक उसासा!!! एक अश्रू सुद्धा.. आतून खराखुरा उमाळा येतोय… काय करावं?? कधी कधी स्वतःच स्वतःची समजूत नाही काढू शकत.. पुरे नाही पडू शकत आपण..
तेवढ्यात बाजूचा फोन वाजतो.. ओळखीचं एखादं नाव स्क्रीन वर फ्लॅश होतं.. रडता रडता आपल्याच नकळत हसतो आपण.. तो एकच आवाज ऐकून इतका वेळ भयभय करणारं येडपट मन शांत होतं एकदम.. मळभ दूर जातं जातं…आणि पाऊस कोसळायला लागतो, झिम्माड… आपले उमाळे, उसासे समजून घेत फोनवरचा तो आवाज गालातल्या गालात हसतो हलकेच…आणि हळुवारपणे म्हणतो…”काही नाही…तुला सुख दुखतंय…!!!

आता एकाच उपाय भ्रष्टाचार कमी करण्याचा "कायदेशीर लाचखोरी"

“आज जन्माच्या दाखल्या काढण्या पासून मृत्युच्या दाखला मिळवे पर्यंत प्रत्येक ठिकाणी लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत.हि कीड एवढी फोफावली आहे कि, याला आळा घालायचा असेल तर लाच देण्याची प्रकिया कायदेशीर करायला हवी” असे मत श्री एन. आर. नारायणमूर्ती माजी अध्यक्ष इन्फोसीस यांचे आहे यांच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. समाजात आज सर्वीकडे भ्रष्टाचार आहे. व्यवहाराच्या प्रत्येक प्रकियेत लाचेचे एक महत्वाचे स्थान आहे. या शिवाय व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होत नाही .शासकीय कार्यालये तर याचे माहेर आहे.
जर कायद्याने जर लाच देणे घेणे बंधन कारक झाले तर विचार करा सर्व सरकारी कार्यालयात कामे होण्याचे प्रमाण वाढेल. प्रत्येक कर्मचारी शिपाया पासून तर साहेबापर्यंत काम करताना  दिसेल कारण त्यांना हे माहित असेल कि आपण जे काम करतो आहे यात होणार्या कामायेत साहेबा सोबत आपला पण हिस्सा आहे आणि ते, ते काम इमानदारीने मन लावून करतील.प्रत्येक सरकारी योजनेचे उदिष्ट १०० टक्के पूर्ण होईल. व सरकार कडून आलेला निधी परत जाणार नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी पण खुश होतील. 
मी तर म्हणतोय सरकारने या साठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे यात प्रयेक कामाच्या लाचेचे दर ठरवावे. त्याचा एक जी आर काढून सर्वाना कळवावा किंवा वर्तमान पत्रात जाहीर करावे. प्रत्येक सरकारी कार्यालयात अधिकार्याच्या पाटी खाली त्याच्या अधिकारातील कामाचे दर लिहावेत. जेणे करून जनतेला माहित होईल. भारतामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे “लोकांनी,लोकांसाठी लोकांच्या वतीने चालविलेले राज्य” आता असे म्हणावे लागते कि काही लोकांनी,काही लोकांसाठी लाचेच्या वतीने चालविलेले राज्य. या अश्या राज्यात जो व्यक्ती लाच घेत नाही किवा घेऊ देत नाही त्यास त्याचे इतर साथीदार त्रास देतात. जर लाचखोरी जर कायदेशीर झाली तर लाच घेण्यार्या व्यक्तीला जनाची नाही तर मनाची लाज वाटेल.

कवितेपायी

कुठल्याश्या कवितेपायी 
मी विसरून गेलो तुजला 
हे भास असे प्रतिदिवशी
होतात सखे ग मजला
मी विसरून गेलो आहे
तुजवर रचल्या कविता
पण शब्द शब्द कवितेचे 
मी लिहिले तुझ्याचकरिता
तू सोडून मज जाताना
जी लकेर गाऊन गेली
त्या नाजूक वेलीवरती 
कवितेची फुले उमलली 
हे काय मला मग झाले 
कवितेचे वेडच जडले 
अन शब्द ओंजळीत घेता 
प्रतिबिंब तुझेच पडले 
 
पण कवितेचे दुर्भाग्य
ती सवत तुझी बघ झाली
अन याद तुझी जपताना 
माझ्यातच विलीन झाली 
-काव्य सागर

महाभारताबद्दल काही गैरसमजुती – भाग ५

नरो वा कुंजरो वा।
हे आपण बाळपणापासून ऐकत आलो. असे खोटे वाक्य बोलल्यामुळे चार बोटे अधांतरी चालणारा युधिष्ठिराचा रथ पंक्चर होऊन जमिनीवर टेकला अशीहि हरदासी कथा आपण ऐकत आलो. पण महाभारतात असे वाक्यच नाही!
हा उलगडा मलाहि हल्लीच वाचलेल्या श्री. जातेगांवकर यांच्या एका पुस्तकावरून झाला.
भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला व चौथ्या दिवशी जयद्रथवध झाल्यावर पांचव्या दिवशी द्रोण फार त्वेषाने युद्ध करू लागला व त्या दिवशी पांडव व पांचाल यांचा विध्वंस त्याने आरंभला. तो कोणालाच, अर्जुनाला देखील आवरेना. कृष्णाने अखेर पांडवांना सावध केले कीं असेच युद्ध चालले तर दिवस अखेर तुम्ही पूर्ण नष्ट व्हाल. तेव्हां काहीहि करून याला युद्धत्याग करण्यास उद्युक्त केले पाहिजे. कृष्ण व भीमाने एक कुटिल बेत ठरवला. भीमाने प्रथम एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि द्रोणापाशी जाऊन ’अश्वत्थामा हत:’ असे पुन्हापुन्हा त्याला म्हणाला! आपला पुत्र मारला गेला यावर द्रोणाचा विश्वासच बसेना पण पुन्हापुन्हा ऐकल्यावर खात्री करून घेण्यासाठी तो युधिष्ठिरापाशी आला. असे होईल याची कल्पना असल्यामुळे कृष्ण व भीम यानी युधिष्ठिराला विनवले होते कीं ‘तूं होय म्हण!’ भीमाने त्याला सांगितले कीं मी अश्वत्थामा हत्ती खरोखरीच मारला आहे. असत्य बोलण्यास युधिष्ठिर सहजीं तयार होणेच शक्य नाही याची कृष्ण व भीमाला भीति होती. पण हत्ती कां होईना, अश्वत्थामा मारला गेला आहे या आधारावर युधिष्ठिराने मनाशी तडजोड केली आणि द्रोणाने जेव्हां विचारले कीं ’किं अश्वत्थामा हत:? ’, तेव्हा जबाब दिला ’हत:, कुंजर:’ ! जबाब देताना कुंजर: हा शब्द हळू व तोंड चुकवून उच्चारला जेणेकरून तो द्रोणाला ऐकू जाऊ नये!
द्रोणाला युधिष्ठिराचा ’हत:’ एवढाच शब्द ऐकू गेला व त्याचे मनोधैर्य खचले. काही काळाने त्याने धनुष्य खाली ठेवले आणि मग त्याचा वध झाला. कृष्ण-भीमाचा हेतू साध्य झाला पण खोटे बोलल्याचा डाग युधिष्ठिराला लागला नाहीं! कारण ‘हत:, कुंजर:’ हे सत्यच होते! त्याने ‘नरो वा कुंजरो वा’ म्हटले असते तर ते मात्र असत्य भाषण ठरले असते कारण युधिष्ठिराला नर अश्वत्थामा मारला गेलेला नाहीं हे पक्के ठाऊक होते! कृष्ण आणि भीम खरे हुशार म्हटले पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते त्यांनी युधिष्ठिराकडून बरोबर वदवून घेतले! आपण मात्र अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत असतो! पण तो गैरसमजच!

मुक्तांगण meet:एक सुंदर अनुभव

कधी कधी आपण आयुष्यात इतके गर्क होऊन जातो कि आपल्याला आजूबाजूचं भान राहत नाही. आपण आपल्याच जगात असतो…आपल्याच धुंदीत म्हणा हवं तर …


जगताना तोच एकसुरी चष्मा चढवतो आणि त्यातून जे दिसेल तेच बरोबर बाकी सब झूट अशी आपली मानसिकता बनते.प्रत्येक गोष्टीला आपण हेच मापदंड लावतो आणि ती चांगली कि वाईट ते ठरवतो.
कधीतरी अशा गोष्टी घडतात कि तो  चष्मा आपल्या डोळ्यावरून निघतो आणि जगाचा एक नवा चेहरा ,एक नवा पैलू समोर येतो.नाण्याला हि बाजूसुद्धा आहे तर हे पटतं..असंच काहीसं माझासोबत झालं


गेल्या रविवारी म्हणजे १० जुलैला मी आणि माझा मित्र समीर , आम्ही दोघांनी  मुक्तांगणची monthly followup  meet  attend  केली.. तिथे जे विचारधन आणि अनुभव ऐकाला  मिळाले ते खूपच परिणामकारक  होतं .

Meet  होती ठाण्याला I .P .H मध्ये.
Meet  बद्दल सांगण्याआधी इथे जायचा योग कसा जुळला ते सांगतो . 


व्यसन आणि माझा तसा संबंध नाही.Facebook वर माझी आणि श्री.माधव कोल्हटकर यांची भेट झाली.
ते सध्या मुक्तांगण मध्ये counselor  म्हणून काम करतात..
त्यांनी मला विचारलं कि जमेल का यायला monthly meet ला?
रविवार असल्याने वेळेचा काही प्रोब्लेम नव्हता पण एकूण अशा मिटींग्सना मी कधी गेलो नव्हतो.त्यामुळे तिथे काय होईल हे माहित नव्हतं.
पण अनुभवात वाढ होईल या एकमेव हेतूने मी जायचा निर्णय घेतला..
सकाळी उठल्या उठल्या समीरला फोन लावला ,म्हटलं येणार का ? मुक्तांगणची meet  आहे I.P.H मध्ये.
त्यालाही आवड असल्यामुळे तोही तयार झाला .
मी निघालो बदलापूरवरून.मनात अनेक विचार होते…जाऊ की नको जाऊ…पावसामुळे गाड्यांचे प्रोब्लेम होते..एक ना अनेक कटकटी ..पण म्हणलं जायचंच…झालं.पोचलो तिथे.conference hall  मध्ये बसलो..एक पंधरा -वीस मिनिटात मिटिंग सुरु झाली…मिटिंग चालू करण्या आधी प्रार्थना झाली … अत्यंत positive आणि हृदयाला भिडणारी!तिथून meet ला सुरवात झाली. माधव बोलत होते.

        
   व्यसन म्हणजे काय ,माणूस व्यसनाधीन कसा होत जातो,तो कसा त्यात गुरफटतो तसेच व्यसनातून बाहेर पडलेल्या पीडितांना घरच्यांच्या मदतीची कशी गरज असते,मुक्तांगणमध्ये नक्की काय केलं जातं या सर्व गोष्टी ते शेअर करत होते. 


मुक्तांगण मध्ये admit करताना “हि ब्याद घरात नको” 
अशी भावना ठेऊन admit करू नका  , हे ते सतत सांगत होते…जे सांगत होते ,शेअर करत होते ते अत्यंत पोटतिडकीने करत आहेत हे दिसत होतं…


           हळूहळू वातावरणात एक मोकळेपणा आला आणि मग खऱ्या अर्थाने संवादाला सुरवात झाली.सुरवातीला आम्ही फक्त ऐकत होतो…नंतर बरेच जणं आपली मतं.अनुभव शेअर करू लागले..

           तिथे प्रत्येकाचा अनुभव ऐकताना एक वेगळं feeling येत होतं.जे “सोबर” होते त्यांनी ‘पिडीत असताना व्यसनामुळे त्यांच्या आयुष्यात कसं नुकसान झालं इथपासून ते आज व्यसनमुक्त कसे आहेत’ इथपर्यंत अत्यंत मोकळेपणाने कथन केलं..मी आणि समीर आम्ही सुद्धा काही मुद्द्यांवर बोललो..तिथे सर्वात लहान आम्हीच होतो तरी मचं बोलणं,आमची मतं तितक्याच मोकळेपणाने ऐकली गेली. कुठेही “तुम्हाला काय माहिती ,तुम्हाला काय अनुभव” असे “typical” प्रश्न कुठेही कोणीही विचारले नाही..

हि वैचारिक देवाणघेवाण उत्तरोत्तर रंगत गेली.

या Meet मध्ये प्रवेश करताना मी negativity घेऊन आलेलो..आलो तेव्हा  व्यसन आणि व्यसनाधीन पिडीत यांच्याबद्दल अनेक पूर्वग्रहदुषित मतं होती ..
मिटिंग संपून बाहेर आलो तेव्हा हि धूळ आतच झटकून दिली.
बाहेर आल्यावर बुद्धीला ,विचारांना एक नवा आयाम मिळाला.


चर्चा करताना जी तत्व मांडण्यात आली ती सर्वसमावेषक होती.
मिटिंग संपायची वेळ आली.माधव यांनी स्वताचा अनुभव कथन केला.त्यांचा स्वानुभव ऐकला आणि हा माणूस पहिल्या वाक्यापासून इतका पोटतिडकीने कसं बोलतोय याचा उलगडा झाला.श्री माधव हे स्वतः एकेकाळी ADDICT होते हे ऐकल्यावर विश्वास बसला नाही.खरच HATS OFF ..


शेवटी मिटिंग संपली आणि मी व समीर भरल्या मनाने बाहेर पडलो.
बाहेर पडताना एक वेगळं समाधान होतं..मनातले गैरसमज दूर झाल्याचं आणि हा चांगला योग जुळल्याचं.!
—-निनाद रमेश पेठकर 


 मुक्तांगण website


मुक्तांगण:Facebook Page

आवाहन

आपल्याजवळ शास्त्रीय गायक भार्गवराम आचरेकर यांच्याबद्दल माहिती असल्यास कृपया संपर्क साधा. मी त्यांच्या जीवनावर लेख लिहू इच्छितो तसेच विकिपीडीयावर त्यांच्या लेखाचा विस्तार होणे आवश्यक आहे. जर कोणाला काही माहिती असल्यास कृपया द्यावी तसेच विकिपीडियावरील लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करावी. लिंक दिलेली आहे.