आभाळ

गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ.
भीती वाटते त्याची कधी कधी.
सारं आसमंतच व्यापून टाकलेलं असतं त्याने.
पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून?
त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच?
फोडून काढलं तर पावसाच्या चाबकाने?
विजेचा तिसरा डोळा भयकारी रागामध्ये
आगीत लपेटून टाकेल आपल्याला..!!
जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणं..
आपल्या हातात एवढंच..
सटवाई सुद्धा त्यालाच फितूर!
त्याच्याच अंगणात आश्रिता सारखी..
त्याच्या डोळ्याला डोळा भिडवायची काय,
मान वर करून पाहण्याची सुध्धा हिंमत नाही..
सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असतं खरंतर..
तिची इच्छा असते,आपला संवाद घडावा आभाळाशी..
पण तीही मुक्याने हे कडू सत्य पचवत राहते..
आतले कढ आताच दाबत राहते..
हळूहळू अंतर वाढतं,वाढतच जातं..
क्रांती करायला लागतं मन
वाढत्या वयानुसार.
आभाळाचं अस्तित्त्वच झुगारून द्यायला लागतं..
धाडस करतं त्याच्या नजरेला नजर देण्याचं,
ताठ मानेने त्याच्या समोर उभं राहण्याचं..
आता हळूहळू आभाळही म्हातारं व्हायला लागतं.
वयानुसार अनुभवाने निवळायला लागतं..
अशीच कधीतरी नजर जेव्हा आभाळावर जाते,
काळेभोर क्रुद्ध ढग निघून गेलेले असतात.
आभाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव असतात.
शांत निरभ्र आभाळ तेव्हा कौतुकाने पाहतं,
काहीतरी आपल्या मनात उगा दाटून येतं.
हात पसरून,वय विसरून आपण मोठे होतो,
थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो..
आभाळाच्या डोळ्यांत तेव्हा आनंदाश्रू दाटून येतात;
सुरकुतलेल्या सृष्टीचे कातर क्षण जागे होतात..!!!

प्राचीन कोकण संस्कृती

काही  दिवसापूर्वी मी आपल्या कोकण संस्कृती वर एक लेख लिहिला होता. त्यात मी रायगड ते केरळ कशी समानता आहे आणि जीवनशैली कशी मिळतीजुळती आहे त्याची चर्चा केली होती. आपली संस्कृती , जेवणाच्या पध्दती ,राहणीमान आणि शारीरिक बांधणी ही समान सूत्रे आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की कोकण म्हणजे फक्त रायगड ते सिंधुदुर्ग एवढच मर्यादित आहे. हे महाराष्ट्रातील कोकण हा केवळ महाराष्ट्र शासनाचा प्रशासकीय विभाग आहे. कोकणाची सीमा ही गुजरातच्या तटापासून ते केरळच्या सीमेपर्यंत आहे. स्कंद पुराणातील सप्तकोकण ही व्याख्या पाहता त्याची मर्यादा खूप मोठी होते. प्राचीन वाङ्‌मयात सप्तकोकण असा उल्लेख असलेला कोकण प्रदेश गुजरात, महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक आणि केरळ अशा राज्यात विभागला गेला आहे. आपले हे सप्तकोकण समान स्नेह धाग्यांनी बांधले गेलेले होते. पण परकीय आक्रमणे आणि पोर्तुगीज, डच यांचा गोमंतकीय भूमीवर राहिलेला दीर्घकाळ अंमल यामुळे कुठेतरी अनुबंध तुटले. पुन्हा एकदा जागरणाची गरज आहे आणि त्यात हा माझा खारीचा वाटा मी उचलतोय. 
गेली अनेक वर्षे अनेक तज्ञ संशोधक प्राचीन कोकणी संस्कृतीवर संशोधन करत आहेत आणि त्याने सिद्ध झालच आहे की ही संस्कृती किती जुनी आहे. सप्तकोकणातील गावांची रचना , घरांची रचना, मंदिर संकुल आणि पंचायतन, बारा – पाच व्यवस्था, शेतीची पद्धती, जेवणखाण यात प्रंचड समानता आहे. अलीकडेच पुण्याच्या  परातत्व विभाग डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन विभागाचे डॉ. अशोक मराठे यांनी मांडलेल संशोधन हेच सिद्ध करतंय. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशा आठ हजार वर्षांपूर्वीची देशातील सर्वांत पुरातन “कोकण संस्कृती’ अस्तित्वात असल्याचा उलगडा त्यांनी केला आहे. २००५ साली  डॉ. अशोक मराठे यांनी या संशोधनाला सुरुवात केली. निधीअभावी हे संशोधन बऱ्याचवेळा रखडले. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी निधीअभावी थांबलेले हे संशोधन अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या संशोधनात कोकण किनारपट्टीपासून आत समुद्रात २-५ किमी अंतरावर एक दगडी भिंत असल्याचे सिद्ध झाले आहे. ही दगडी भिंत श्रीवर्धन ते गोवा अंदाजे २५० किमी लांब आणि ३ मी उंचीची आहे. 
२००५ साली गोव्याच्या काही लोकांची मदत घेऊन मराठे यांनी हे संशोधन सुरू केले. उपगृहाद्वारे किनारपट्टीची पाहणी करण्यात आली तेव्हा त्यांना श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्‍रॉन जेटी, वेळणेश्‍वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण आणि सिंधुदुर्ग या भागात ही भिंत असल्याचे लक्षात आले. ही भिंत ज्या ज्या ठिकाणी सापडली त्यात एकसूत्रता आहे  समान बांधणी आहे. यावरून असा निष्कर्ष काढला जात आहे की त्या काळात वस्ती विरळ असली तरी एकाच कोकणी संस्कृतीचा अंमल कोकणात होता. भिंतीचा नेमका काय उपयोग होता हे जरी अजुन माहिती नसल तरी समुद्रापासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत बांधली गेली असावी. गेली सहा वर्षे जे संशोधन चालू आहे त्यात सर्वात जुना रस्ता जो या भिंतीवरून जातो तो सापडल्याचा दावाही मराठे यांनी केला आहे. या संशोधनात निधीची फार कमतरता आहे. पुरातत्व खात्याने आणि भारत सरकारने यात लक्ष घालून या संशोधनास निधी उपलब्ध करून द्यावा ही अपेक्षा आहे.    
८०००  वर्षापूर्वी प्राचीन कोकणी संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याचे पुरावे विविध संशोधनातून मिळत आहेत. गरज आहे ती विविध तज्ञांच्या मदतीने या संस्कृतीचा अभ्यास करण्याची आणि सत्य जगासमोर मांडण्याची. 
   

राउळी… मंदिरी…

              देऊळ म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते एक अशी वास्तू जिथे मनाला शांतता मिळेल, त्या शांततेत ईश्वराशी एकरूप होऊन आपण स्वत:शी संवाद साधू शकू, जिथून आल्यानंतर मन अगदी हलकं असेल. मला आठवतंय आमच्या गावी अशीच मंदिरे असायची त्यातलं एक होतं नदीच्या काठावर. लहानसंच मंदिर, शेजारी चिंचेचं मोठ्ठं झाड, आणि मंदिराच्या आवारात त्या सावलीचा गारवा. मंदिराच्या मागच्या बाजूने खाली नदीकडे जाणारी पाउलवाट. 

आयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा….

काय झालंय तुला……?

………

फेसबुक वर असा का स्टेटस अपडेट केलायस?

………

मला आता सोनाली ने मेसेज केला तेव्हां कळलं.

………

काय दुखतंय……..पाठ?

……..

काय??? आता थोडं बर वाटतय?

……..

अरे मग तसं स्टेटस अपडेट कर बाकीच्यांना कसं कळेल?

……..

मला वाटलं तुला आणि काय झालं?

……..

ठीक आहे…… फोन कट.

माझा मुळचा मुंबईचा आणि आत्ता कामासाठी पुण्यात आलेला रूम पार्टनर, रात्री उशिरा घरी आला. आल आल ते एकदम सिरीअस; कुणाला तरी फोन लावला आणि मग वरचा संवाद.

आयला हे फेसबुक म्हणजे लईच काय तरी भारी दिसतंय बाबा….

आत्ता पर्यंत लई लोकांच्याकडन आईक्ल्याल पण हे एवढं भारी असेल असं वाटलं नव्हत.

आता कुणाची तरी पाठ दुखायला लागलीलय हि बातमीसुध्धा फेसबुकमधी झळकत आसेल; आणि त्यामुळ लोकं तुम्हाला काळजीन फोन करत असतील तर आणि काय पाहिजे? हि म्हणजे एकदम राष्ट्रपतीच्या वरताण अगदी व्ही आय पी ट्रीटमेंट झालं कि राव …..आं….?

चला. आत्ताच्या आत्ता मी पण फेसबुक वर माझ पण फेस बुक करून टाकतोच कसं.

नव्हे हे बघा टाकलच. सर्च तर करून बघा……..!!!!

माझं पहिलं व्यंगचित्र: "मॅडम का ढाबा"

आत्ता पर्यंत या सरकारने कित्येकवेळा सामान्य माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. घोटाळ्यांची तर यादीच निघेल. तरिदेखिल निर्लज्जपणे सगळ चालू आहे!  २जी घोटाळा काय नी कॉमनवेल्थ घोटाळा काय, या घोटाळ्यात खाल्लेले पैसे जर चांगल्या कामासाठी वापरले गेले असते तर निश्चितच काहितरी नक्कीच साध्य झालं असतं. इकडे रामदेवबाबा “काळा पैसा आणा, काळा पैसा आणा” म्हणून ओरडत आहेत पण ह्या घोटाळ्यातल्या पैश्याबद्दल कोणीच काही बोलत नाहिये! मान्य की लोक पकडले, कारवाई सुरू आहे, वगैरे वगैरे पण ते पैसे गेले कुठे???

असो, याच विषयावर मी आज पहिलं मोठे व्यंगचित्र काढले आहे. “मॅडम का ढाबा”. साहजिकच यात कोणाला उद्देशुन काढले आहे ते समजले असेलच! 🙂

तर आपले स्वागत हे “मॅडम का ढाबा” मध्ये. आजचे मेन्यू: २जी घोटाळा, CWG घोटाळा, आदर्श आमटी, कलमाडी फ्राय, इत्यादी बरेच काही. आणि हो, सगळे विषय भट्टीत इतके खरपूस भाजले आहेत की चव नक्कीच आवडेल! 😀

या आधी मी बरिच व्यंगचित्र काढली पण अगदी छोटी, टाईमपासवाली, पण हे माझं पहिलं मोठं व्यंगचित्र! तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा! 🙂

दिवस असे कि..

आज एका फ्रेंड चा फोन  आला (मुद्दामहून फ्रेंड, ‘तो’ किंवा ‘ती’ या भानगडीमध्ये मी पडत नाही ).तर मांडायचा मुद्दा असा कि माझ्या फ्रेंड ला सध्याच्या सुट्ट्या जाम बोर होत आहेत.अगदी ‘आता जगण्याचा कंटाळा आलाय’ या वाक्यापर्यंत तो (संदर्भासाठी ‘तो’ :D )आलाय.
आता मला हे कळत नाही, काल-परवा पर्यंत सुट्ट्या नाही म्हणून जगण्याला अर्थ नाही आणि आज सुट्ट्या आहे तरीही जगण्याला अर्थ नाही,हे असा दुट्टपी वागण मनुष्यालाच जमत.खरतर या उमेदीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काहीतरी करून दाखवायला पाहिजे.’लाथ मारीन तिथून पाणी काढीन’ असा आपला बाणा असायला पाहिजे.
कळत कि आता स्पर्धा खूप वाढलीये ,तान-तणाव हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे म्हणून सुट्ट्यांमध्ये पण काहीतरी करायला सांगण हा शुद्ध मूर्खपणा आहे,पण म्हणून काय अवसान गळून बसायचं? मला सांगा सुट्ट्यांमध्ये बरच काही करण्या सारख असत हा मुद्दा लोकांना कळत का नाही? सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे आपल्या छंदाला याच कळत आपल्याला वाव देता येईल त्याला अजून वृधिंगत करता येईल,नाही का? किवा अगदी मनसोक्त भटकता येईल,दऱ्या खोऱ्या अगदी पूर्णपणे पिंजून काढता येईल.भीती याची आहे कि एकदा तरुणाई मधून वजा झालेल्या सुट्ट्या कधी परत नाही मिळणार हे आपण ‘डोस्क्यात’ बसवून घ्यायला पहिजे.मग एकदा पाठीला बाक यायला लागला कि सुट्ट्या ह्या स्वप्नातच कळतात. खर तर सुट्ट्यांच महत्व ह्या शहरीकरणामुळेच कमी झालंय,अरे वर्षभर अगदी उमेदीने काम करण्यासाठी सुट्ट्या तर हव्यातच ना!
आधीच्या सुट्ट्या म्हणजे दिवसभर धिंगाणा! विहिरीवर आंघोळ, म्हशीला धुवायचं, आणि स्वत:सुद्धा रेड्यासारखं डुंबायचं, आजीची नजर चुकवुन तीने आपल्याचसाठी बनवलेला खाऊ चोरुन धुम पळायचं,कधी असंच माळ्यावर पडून रहायचं,….. असे मस्तपैकी दिवस जायचे. दुपारी उन जास्त असेल तर घरची मोठी लोकं बाहेर पडू द्यायची नाहीत, अश्यावेळी मग बाहेर सारवलेल्या अंगणात चटई घालून पत्ते खेळायचे….मजा मजा असायची! आधी बरोबर सुट्ट्या असल्या कि लग्न जुळायची मग सगळा गोतावळ एकत्र येऊन अगदी दंग व्हायचा; दंगा करायचा.
पण आता हे सर स्वप्नवत झालंय.आताच्या सुट्ट्या म्हणजे घरात स्वताला कोंडून घेणे आणि माझ्या त्या फ्रेंड सारखा ‘अघोरी’ विचार करणे अश्या झाल्याय.या ठिकाणी संदीप खरेंची कविता बरोबर सार्थ ठरते. ते म्हणतात ‘कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो,आताश्या मी फक्त रकाने दिवसांचे भरतो’

मान्य आहे परिवर्तन आवश्यक आहे ,तो आयुष्याचा भाग आहे..पण एक गोष्ट मनापासून सांगतो त्यासाठी  सुट्ट्या आणि उमेदिसोबत तडजोड करणे आपल्याला तर बुवा नाही जमणार…छे, नाहीच नाही…

Filed under: इतर…

‘सकाळ’ भारी का ‘पुढारी’?

मागच्याच आठवड्यात दै. सकाळ मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली कोल्हापुरात खपात सकाळनंबर वन  लगेच दुसरयाच दिवाशी दै. पुढारीने पण इंडियन रिडरशिप सर्वेचा दाखला देत प्रत्त्युत्तर केलं दुपटीहून अधिक वाचकसंख्येने पुढारीच्या निर्विवाद वर्चस्वावर पुन्हा शिक्का मोर्तब
खरं तर या सगळ्याला सुरवात तशी वर्षा-दीड वर्षापासूनच झालीय. मला वाटतंय पुढारीने जेव्हा पासून पुण्यात पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासून या वादाला तोंड फुटत गेलं. कदाचित आपण सगळ्यांनी हे ऑब्सर्व केलच असेल; पुढारीने ज्यावेळी पुणे आवृत्ती चालू केली त्यावेळी त्यांची जाहिरातच काहीशी अशी होती

आता सकाळचं पाहिलं काम पुढारी वाचायचं!!!; पी एम टी च्या अनेक बसेसवर हि जाहीरात त्यावेळी झळकत होती. आता पुढारीने अशी जाहीर कुरापत काढल्यावर सकाळ कसं गप्प बसेल?

त्यांनी मग कोल्हापूर आवृत्तीचे दर बिझनेस पोलीसी च्या नावाखाली कमी केले आणि मग मिडिया वॉर पेटलं; जवळपास आठवडा भर कोल्हापुरात हे धुमशान चालू होतं. पुढारीने विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा मुद्दा हाताशी धरून वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेला आपल्या बाजूने केलं; आणि मग काही वृत्तपत्र विक्रेत्यानी दै. सकाळ वर बहिष्कार टाकला.

दै. सकाळने हि मग माघार न घेता वितरणाची समांतर यंत्रणाच उभी केली. प्रथम नाव न घेता होत असलेल्या टीका नंतर वयक्तिक पातळीवर होऊ लागल्या. याचाच परिपाक म्हणून सकाळ कोल्हापूर आवृत्ती चे संपादक पद दस्तूर खुद्द अभिजीत पवारांकडे आले.

त्यांनी हातात कारभार घेतल्या-घेतल्या कोल्हापूरला विकासाच्या पहाटेची स्वप्न दाखवली. पण अजुनहि कोल्हापूरकर पहाटेची स्वप्न खरी होतात या गोष्टीवरच विश्वास ठेवून त्या विकासाची वाट पहात आहेत.

 

वास्तविक पाहता या वादाचा इतिहास फार जुना; मला वाटतं जेव्हा पासून दै. सकाळ न कोल्हापुरात पाय ठेवला तेव्हांपासून या वादाची ठिणगी पडली असावी, त्याच्या अगोदर दै. पुढारीची आणि त्यांच्या परीवाराचीच (सुज्ञ वाचकांना हा टोमणा निश्चितच समाजाला असावा) कोल्हापुरात मोनोपोली होती; त्याला सकाळने दिलेले आव्हान पुढारीला आवडले नसावे त्यामुळेच पुढारीचा पवारद्वेष आणि पर्यायाने राष्ट्रवादी द्वेष जन्माला आला.

पुढे काय झालं माहित नाही; पण साधारण ८-१० दिवसांनी तो वाद बहुधा थंड झाला. लोकांचे फुकट मनोरंजन करण्यापलीकडे यातून काही साध्य झालं असेल असं काही मला वाटत नाही. पण तब्बल एक-दीड वर्षांनी परत ह्या सध्याच्या बातम्यांनी हेच दाखवून दिले कि वाद जरी वरवर थंड झाला असला तरी आत कुठेतरी अजून ठिणगी धुमसते आहे.

आता पुढारी आणि सकाळ यात तुलना करायचीच झाली तर दोन्ही दैनिक वर्तमान पत्रे आहेत (आता सकाळ ने स्वयं घोषित भविष्य पत्राचा उदय केलाय हा भाग सोडून दया) हा एक मुद्दा सोडला तर साम्य असे काही नाहीच.

सकाळ खरे तर ब्राम्हणी ढंगाचे पुणेरी दैनिक; सौम्य भाषेतून आशयपूर्ण आणि सृजनशील लिखाण बुद्धीजीवी लोकांपर्यंत पोहोचवण्याची परंपरा असलेले; तर पुढारी म्हणजे अस्सल कोल्हापूरी चटपटीत भाषेत लोकांचे मनोरंजन करणारे दैनिक. दोन्ही दैनिकांचा वाचक वर्ग पूर्ण वेगळा पण तरीही त्यांच्या मधील हि इर्षा खरच अनाकलनीय आहे.

जाऊ दे आपल्याला काय करायचाय आपण तरी सकाळ आणि पुढारी दोन्ही पेपर रोज वाचतो तेहि इंटरनेट वर अगदी फुकटात; काय?  

           

आठवणींचा मुखवास

परवा ऑफीसमध्ये आल्यावर थोड्याच वेळात ई-मेल आली. Chocolate @ my Desk  जो कोणीही दक्षिण आफ्रिकेतून परततो तो अशी ई-मेल नक्की करतो. काही मिनिटातच सगळे जण त्याच्या डेस्कवर जमा झालेले दिसले. त्याने आणलेल्या चॉकलेट वर सगळ्यांनी ताव मारला आणि आपल्या कामाला लागले.

दुपारी लंच नंतर आम्ही ७-८ जण शतपावली करण्यासाठी बाहेर पडलो. त्याच दरम्यान पुन्हा त्या चॉकलेट चा विषय निघाला कारण ते चॉकलेट खुपच छान होते. आमच्या पैकी ही काही जणांचा यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौरा झाला होता. तेवढ्यात समीरने आमच्यापैकी एकाने आणलेल्या च्युईंगम चा विषय काढला. समीरच्या मते ते इतके चिवट होते की, “ज्याने कोणीही ते खाल्ले त्याची चिता विजली तर हाड नाही सापडणार पण ते च्युईंगम जशाचा तसे सापडेल”, सगळे जण पोट धरून हसू लागले. इथेच चर्चेला सुरूवात झाली.

मग सगळे जण लहानपणी मिळणा-या “खाऊ” बद्दल बोलु लागले, एक जण म्हणाला लहानपणी एक सुपारी मिळायची ती मी का खायचो तर त्याच्या पाकीटावरील चित्र एका बाजूने पाहिले तर पुरुषाचा चेहरा आणि दुसरी कडून पाहिल तर स्त्रीचा चेहरा दिसायचा.

इतक्यात एकजण म्हणाला, “अरे तु ती “पेप्सी” खायचा का रे ?” तेव्हा ही रंगीत “पेप्सी” आठ आण्याला मिळायची. साधी, दुधाची आणि रंगीत “पेप्सी” खाण्यात खुप खुप मजा यायची. “पेप्सी” वरून विषय मटका कुल्फी कडे वळायला जास्त वेळ लागला नाही. मग मटका कुल्फी, मावा कुल्फी अश्या एक एक बालपणीच्या आठवणींची रांग लागली.

तेवढ्या प्रसाद म्हणाला “अरे ते ’बोर कूट’ खायचा का रे तु?”

“बोर कूट ! म्हणजे काय? भातावर टाकून खातात तेच का?” असे प्रश्न फक्त आणि फक्त “जॉन सवाली” (हे टोपण नाव आहे)च विचारू शकतो. जॉनच्या प्रश्नांची quality  आणि quantity  एवढी भयंकर असते की सीबीआय वाले सुध्धा थोडी दयामाया दाखवत असतील पण जॉन सवालीकडे तसं काही नाही. या प्रश्नावर आम्ही खुप हसलो, त्याला दोघां तिघांनी टपल्या ही दिल्या आणि त्याचा कुळाचा जयजयकार केला. मग त्याला बोर कूट म्हणजे काय ते सांगितले. “अरे भातावर टाकून खातात ते मेतकूट” असे मी म्हणालो.

एक जण सांगु लागला की तो लहानपणी बोर कूट कसा पुडी सगट खायचा आणि मग त्यासाठी वडिलांचा मार बसायचा. तेवढ्यात समीर ने त्याचाही एक कारनामा सांगितला की, तो लहानपणी “लाची” खाण्यासाठी काय करायचा तर इमारत बांधकामातील सळई विकायचा.

मला ही आठवतो अजुन शाळेच्या बाहेर विकत मिळणार “मोहन चा बर्फ गोळा” लाल, काळा, हिरवा रंग टाकून तो बर्फ गोळा मिळायचा. मी नेहमी लाल रंगाचा गोळा घ्यायचो. तो खात खात तोंड रंगवून मी घरी आलो की आई मला लाल तोंड्या माकड म्हणायची.

ह्या बालपणी आठवणी मुळे पुन्हा एकदा लहान व्हावे असे वाटत आहे. मोकळ्या मनाने बर्फ गोळा, बोर कूट, पेप्सी, गटागट खावे असं नेहमी वाटत. त्या वेळी मिळणार हा “खाऊ” खुप अमूल्य वाटायचा. ती मजा काही औरच होती.

“खाने बाद कुच मीठा हो जाये” हे आजकाल खुप कानावर पडत आहे. मात्र त्यादिवशी त्याची आम्हाला काहीच गरज पडली नाही कारण या आठवणींचा गोडवा पुरेसा होता.

माहितीपर संकेतस्थळे भाग – १७

तुमचा ब्लॉग लोकप्रिय करा

मित्रांनो  २००८ साली माझ्या माहितीपर संकेतस्थळे भाग – ७ (भारतीय ब्लॉग नोंदणी)या लेखात आपण भारतातील काही लोकप्रिय ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांबद्दल जाणून घेतल होत. यात मराठी ब्लॉग्ज नेट, ब्लॉगवाणी, ब्लॉगस्ट्रीट इंडीया, इंडिया ब्लॉग्ज १.०, देसी ब्लॉग्, कामत ब्लॉग पोर्टल अशा संकेतस्थळांचा समावेश होता. आज आपण काही नवीन मराठी ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांबद्दल जाणून घेऊ. 

  1. मराठी ब्लॉग्ज जगत – मराठी ब्लोग्सची डिरेक्टरी    – या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद होण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ तुमचे पूर्ण नाव, तुमच्या ब्लॉगचा यु आर एल आणि फीड लिंक द्यावी लागेल. तुमच्या ब्लॉगच्या ओळखचिन्हाचा विजेट कोड तयार असल्यास इथे देता येईल. 
  2. मराठी मंडळी  या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. आपणास मराठी ब्लॉगर्स चर्चासत्रावर जाऊन सदस्यत्व घ्याव लागेल नंतरच आपला ब्लॉग याठीकाणी जोडला जाईल.
  3. मराठी सूची मराठी सूची या या डिरेक्टरीवर तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. एकदा सभासद झाल्यावर तुम्हाला तुमच्या ईमेल पत्यावर activation लिंक मिळेल आणि तुमचा पासवर्ड पण मिळेल. एकदा तुम्ही लॉगईन झालात की तुमच्या ब्लॉगमधील लेख येथे प्रकाशित करू शकता.
  4. मराठी कॉर्नर –  मराठी कॉर्नर  या डिरेक्टरीवरसुध्दा तुमचा ब्लॉग जोडण्यासाठी सभासद व्हाव लागेल. तुम्ही या संकेतस्थळावर एका किंवा अधिक ब्लॉग जोडू शकता. 

 या सर्व मराठी ब्लॉग डिरेक्टरी संकेतस्थळांचे विजेट उपलब्ध आहेत ते कॉपी करून तुमच्या ब्लॉगवर तुम्हाला पेस्ट करावे लागतील. असे केल्याने तुमचा ब्लॉग लवकर जोडला जाईल.

अभिमन्युवध – भाग ८

दिवस मावळला. सैन्ये शिबिरात परतलीं. त्यानंतर संशप्तकांकडून कॄष्ण व अर्जुन परत आले असे महाभारत म्हणते. पांडव शिबिरात सामसूम व शोक पाहून काय झाले ते अर्जुनाने विचारले व मग नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यु मारला गेल्याचे अर्जुनाला सांगितले. त्याने अर्जुनाला सांगितलेली हकिगत व आधीच्या लेखात दिलेली हकीगत यात किरकोळ विसंगति दिसते. युद्धाच्या सुरवातीला पांडववीरानी संयुक्तपणे द्रोणावर हल्ला केल्याचे व तो द्रोणाने परतवून लावल्याचे युधिष्ठिर सांगत नाही. तो म्हणाला, ’मला पकडण्याचा द्रोणाने शर्थीचा प्रयत्न केला आणि त्याचाच प्रतिकार आम्हाला जड पडत होता मग सैन्याचा मुख्य चक्रव्यूह कोण तोडणार हा प्रष्न होता. नाइलाजाने ते काम अभिमन्यूवर सोपवावे लागले कारण त्यालाच ते माहीत होते. त्याने व्यूह तोडल्यावर त्याच वाटेने त्याच्या पाठोपाठ जाऊन त्याचे रक्षण करण्याचे आमचे सर्व प्रयत्न जयद्रथामुळे विफल झाले आणि अभिमन्यु एकटाच व्यूहात सापडला. मग द्रोण, कृप, अश्व्त्थामा, कर्ण, बृहत्बल व कृतवर्मा यांनी त्याला घेरले आणि अखेर दु:शासनपुत्राकडून तो मारला गेला.’
अर्जुन संशप्तकांकडे अडकलेला असो वा माझ्या शंकेप्रमाणे शिबिरातच असो, पण एक दिवस तो नसताना त्याचा पुत्र मारला गेला. अर्जुनाने, जणू, जयद्रथाला या अनर्थाला जबाबदार धरून, ’उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर अग्निकाष्टे भक्षण करीन’ अशी घोर प्रतिज्ञा अचानक केली. प्रत्यक्षात अभिमन्यूला घेरणार्‍या सहाही वीरांना सोडून (त्यातील बृहत्बलाला अभिमन्यूनेच मारले होते.) जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने कां केली हे एक जरासे कूट आहे. आपले हरदास-पुराणिक म्हणत कीं अर्जुन आणि कृष्ण रणात अभिमन्युचा शोध घेत फिरत होते व मरणासन्न अभिमन्यूने त्याना सर्व हकीगत स्वत:च सांगितली. रणात पडलेल्या अभिमन्यूला जयद्रथाने लाथ मारली हे अभिमन्यूकडून ऐकून चिडून अर्जुनाने त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. महाभारतात असें काही मुळीच नाही. थोडा विचार केल्यावर अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा मला असा खुलासा सुचतो कीं कौरववीरांनी अनेकांनी मिळून एकट्या पडलेल्या अभिमन्युचा वध केला तर आतां त्या सर्वांना अर्जुनाचे हे एक निर्वाणीचे आव्हान होते कीं ‘मी जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे, ती माझ्या एकट्याच्या बळावरच विसंबून. अभिमन्यु एकटाच होता त्याला तुम्ही सर्वानी मिळून मारलेत, आता तुमच्यात बळ असेल तर सर्वांनी मिळून जयद्रथाला एकट्या माझ्यापासून वांचवा!’ पुत्राच्या मृत्यूमुळे त्याला अनिवार शोक झाला असणारच तेव्हा आता एक तर कौरववीरांचा नक्षा उतरवणे किंवा स्वत: मरून जाणेच श्रेयस्कर असे त्याला वाटणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. दुसर्‍या दिवशी काय घडले याचा विस्तृत परामर्ष मी पूर्वीच जयद्रथवध प्रकरणात घेतला आहे. तो वाचकानी अवश्य पुन्हा नजरेखालून घालावा. अनेकांनी मिळून केलेला अभिमन्यूचा वध कौरवपक्षाला फार महाग पडला व दिवस अखेर पांडवपक्षाची अंतिम विजयाकडे वाटचाल सुरू झाली एवढेच म्हणून हा विषय पुरा करतों.

भारताची गुप्तचर यंत्रणा

भारताची गुप्तचर यंत्रणेचा दर्जा फारच ढासळत चालला आहे. हे पुन्हा एकदा सरकारने भारतीयांना दाखवून दिले आहे. भारतावर जे अतिरेक्यांनी हल्ये केले,बॉम्बस्पोट घडवून आणले किंवा यात सहभागी असलेले फरार  दहशतवादी याची यादी भारत सरकारने शेजारच्या राष्ट्राला सदर केली.या यादीत समाविष्ट असलेला वझुर कमर खान हा दहशतवादी मुंबईतच गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे याची भारतीय गुप्तचर यंत्रणेला व सरकारला माहिती नाही.यावरून हे लक्षात येतेकी भारतीय गुप्तचर यंत्रणा किती सुस्त झाली.आहे.वझुर कमर हा सन २००३ मध्ये मुलुंड येथे झालेल्या रेल्वे बॉम्बस्पोटातील आरोपी आहे. त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
हा प्रकार जेव्हा मिडीयाने उघडकीस  आणला. तेव्हा सरकारला जग आली. या वर भारताचे गृहमंत्री यांचे वक्तव्य आणखी चीड आणण्या सारखे आहे ते पत्रकारांना म्हणतात कि मी ही यादी बनवलेली नाही फक्त एकच नाव चुकले आहे, बाकीचे ४९ नावे बरोबर आहे. जेव्हा हि यादी तयार केली असेल तेव्हा ती किती तरी वरिष्ठ अनुभवी अधिकाऱ्यांच्या नजरे खालून गेली असेल.कित्येक वेळा प्रत्येकाचे नावावर चर्चा झाली असेल.आपण आपल्या घराची महिन्याची साधी किराणा यादी तयार करताना घरातील प्रत्येकाचे मत घेतो.नंतर ठरवतो. 
दरवर्षी देशाच्या एकूण उत्पनातील फार मोठा भाग हा देश्याच्या सुरक्षे साठी खर्च केला जातो इतक्या मोठ्या खर्चाचे फलित जर हे असेल तर त्याचा उपयोग काय? 
तसे पाहीलेतर कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा ही फार मजबूत असायला हवी. त्यामुळे देशात काय चालले या  संबंधी राज्य कर्त्याला माहिती मिळत आसते.श्री शिवाजी महारांजाच्या काळात बहार्जी नाईक सारखे अनेक गुप्तहेर होते म्हणून महारांज शत्रूवर मात करू शकले.शत्रूच्या प्रत्येक हालचालीची खडान्खडा माहिती हे गुप्त हेर महाराजांना देत असत त्यामुळे महाराजांच्या प्रत्येक योजना यशस्वी झाल्या.त्यामुळे आजही अश्या बहार्जी नाईकांची गरज आहे.

हे नातं! असं कसं?

इंजिनिअरिंग स्टुडंट आणि त्यांना शिकवणारे शिक्षक यांच्यात जे नातं असतं ते कधीच कोठेही बोललं गेलं नाही, कोठे सांगितलं गेलं नाही. कोणी विचारलच नाही म्हणा ना! पण तरिही आज मी सांगणारच आहे! 😀  एक असं नातं जे बहुदा माझ्यासारख्या सर्व गुणी इंजिनिअरिंग स्टुडंट्सनी त्यांच्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये कधीतरी नक्कीच अनुभवलं असेल. जर तसे नसेल तर तुम्ही एक तर “पुस्तकी किडे” आहात किंवा अगदिच “गुणी बाळ” आहात!

तर मग अशाच एका गुणी शिक्षकाचा मला आलेला “सॉलिड” अनुभव मी आज शेअर करणार आहे. अगदी ताजा-ताजा आहे. परवाच external oral चा सोहळा पार पडला. 😀 अगदी उत्साहात आम्ही सर्वजण सहभागी झालो होतो. मान्यवर externals देखिल उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांच्या चेहर्‍यावर सुडाचे स्मितहास्य किती सुरेख दिसत होते हे शब्दात मांडणे थोडे कठिणच! सोहळा भारतिय प्रमाण वेळेनुसार वेळेत सुरू झाला.  काहींना lot ऑफ marks मिळत होते तर काहिंना shot! सहाजिकच, या सोहळ्यास मी ही नचुकता सहभागी झालो होतो, तसे आग्रहाचे निमंत्रणच मिळाले होते त्यामुळे जावेच लागले. 😀

तसं म्हणाल तर मी स्वभावाने एकदम साधा,सरळ आणि गुणी मुलगा. काय माहित बहुतेक देव अशाच सोज्वळ मुलांना छळत असेल! 😀 आधिच्या २ oral exams (तोंडी परिक्षा :D) व्यवस्थित पार पडल्या होत्या. अगदी गरम पावावर लोणी वितळावं तसा मी प्रत्येक प्रश्नाला वितळून जवळ जवळ संपलोच होतो! 😀 (लक्षपूर्वक वाचलत ना उदाहरण? लोणी म्हणालो मी स्वतःला! 😀 ) आता राहिलेली शेवटची oral देण्याचा अगदीच मुडच नव्हता! कारण ३ पैकी २ तर आधीच उडाल्या आहेत! आता ही पण अशिच असणार. आणि माझा अंदाजही बरोबर ठरला पण किंबहुना सगळ्यात मोठा shot! माझ्यानावे आधिच लिहून ठेवला होता. मला याची जराशी चाहूल लागली होती पण माझा “sixth sense” नेहमी दगा देतो (स्पेशली हिरवळीच्या बाबतीत :D) म्हणून यावेळीही मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले पण लेकाचा यावेळी मात्र खरा निघाला.

तर सादर आहे कहाणी माझी आणि माझ्या प्रिय मास्तरांच्या “सोज्वळ” नात्याची! 😀
तसा मी गुणी बाळ असल्याने सदैव शिक्षकांच्या नजरेत असायचो. लेक्चर बंक करणे हा गुन्हा नसून एक कला आहे ह्यावर माझी नित्तांत श्रद्धा! . पण तरिही शिक्षकांबद्दल अनादर मात्र कधिही नाही. तरिपण जेव्हा ह्या नात्याला जर वेगळे वळण मिळाले तर ते किती महागात पडते याची प्रचिती जेव्हा एक्सटर्नल “You are not supposed to be a part of this oral. Leave this hall and you can go!” असे खणखणीत म्हणतो तेव्हा येते! 😀

तर झालेलं असं की; कॉलेजमध्ये सगळ्यात टारगट म्हणून आमचा ग्रुप ओळखला जातो (तितकाच स्कॉलर आहे हे मात्र कोणी सांगत नाही! चालायचच! जगाची रितच आहे ती! :p 😉 ) आणि मी त्या ग्रुपचा सभासद. त्यामुळे HOD पासून शिपायापर्यंत सगळ्यांशी ओळख. (फरक एवढाच की शिक्षक लोक जरा टाप दाखवतात आणि तितकेच प्रेम, आदर शिपाई लोक देतात.) तर अशाच एका नव्याने रुजू झालेल्या शिक्षकाचे माझ्याशी बिनसले. वास्तविक मी वर्गात शांत असतो (हे सिरियसली बोलतोय! 🙂 ) पण तरिही बॅकबेंचर म्हणून की काय पण मला त्या गृहस्थाने किमान ४ ते ५ वेळा अपमानित केले. नुकतेच BE पास झालेले. म्हणजे माझ्याहून १-२ वर्षांनी मोठे पण शेवटी “शिक्षक” आहेत म्हणून सर्व सहन करत राहिलो. पण तरिही हे मास्तर काय सुधरेनात. एकदा सरळ मला धमकी दिली “एक्सटर्नलला बघ तुझी काय अवस्था करतो” मी देखिल म्हणालो “ठिक आहे! बघुन घेऊ! “

आणि तो दिवस आलाच. मी हा प्रकार कधिच विसरलो होतो पण हा बाबा काय विसरला नव्हता. फाईनल सबमिशन दिवशी फाईलवर सही केल्याशिवाय एक्सटर्नल देता येत नाही. आणि या माणसाला तेच हवे होते. प्रत्येकवेळी “मी जरा बिझी आहे. थोड्या वेळाने ये”, “आत्ता नको उद्या ये” असे करत करत मला जवळ जवळ ७-८ दिवस झिंगवले. शेवटी वैतागुन मी म्हणालो “अहो सर माझी उद्या एक्सटर्नल आहे! आता तरी सही करा” तर म्हणाले “मला एका अर्जंट मिटिंगला जायचय HOD सोबत, तु उद्या लवकर ये आणि माझी सही घे.”  मी ठिक आहे म्हणालो आणि दुसर्‍या दिवशी कॉलेज सुरू होण्या आगोदर अर्धा तास त्या गृहस्थाची वाट पाहात राहिलो. आता दिड एक तास झाला तरी हा माणूस काही येईना. इकडे माझा रोल नंबर जवळ येत होता तरी याचा पत्ता नाही. शेवटी एकदाचा आला. मी “हुश्य्य्य्य!” म्हणून उसासे टाकत त्यांच्याकडे गेलो आणि फाईल पुढे केली. मला म्हणाले “अरे! तु अजून गेला नाहिस ओरल द्यायला?” मी म्हणालो “अत्ता जाणारे! सर पटकन सही करा, माझा नंबर जवळ आलाय!”. तेव्हा गडी म्हणाला “अरे जा तसाच. मी आहे. काही फरक पडत नाही सही नसली तर!”. मी भोळा! मी लगेच विश्वास ठेवला त्याच्या बोलण्यावर आणि नंबर आला म्हणून आत गेलो. माझ्यासोबत माझे आणखी २ नंबर असे आम्ही ३ लोक एक्सटर्नल समोर बसलो.

एक्सटर्नलने एक एक करत माझी फाईल मागितली. मी दिली. त्याने आत पाहिलं आणि विचारलं “Where’s the signature of your internal?” मी म्हणालो “He said don’t waste your time and go to your oral. I will manage that.” मग त्याने मला सरळ त्या सहिच्या जागेकडे बोट दाखवत खणखणीत विचारले “Do you know what’s the meaning of this empty space ?” मी नकारार्थी मान हलवली आणि मग त्याचा तो खणखणीत “किल्लर” डायलॉग एखादी कानफाडित बसावी असा आला “You are not supposed to be a part of this oral. Leave this hall and you can go!”. याचा अर्थ “तुझी एक्सटर्नल होणार नाही. तु जाऊ शकतोस!”

हा आत्ता पर्यंतचा जबराट फालतूपणा होता! त्याक्षणी माझा राग इतका अनावर झाला, तडक एक्सटर्नलच्या हातातली फाईल हिसकाऊन घेतली आणि त्या इंटर्नल मास्तरकडे जाऊन म्हणालो “अहो सर, एक्सटर्नल ने मला बाहेर काढले” तेव्हा त्या मास्तरने माझ्याकडे पाहिले आणि हसून म्हणाला “हे तर होणारच होतं! आता कस वाटतय?”. आई शप्पत! हे त्याने मुद्दामुन केले आहे हे कळल्यानंतर त्याक्षणी मी त्याला यथेच्छ बोललो. माझा आवाज इतका चढला होता की आजूबाजूची मुलं “एखादा थ्रीलर सिन” सुरू असल्यासारखे तोंड उघडून बसली होती.

हे माझ रूप मलाही माहित नव्हत! पण या कारणाने ते बाहेर आलं! मग तडक HOD कडे गेलो. घडला प्रकार सविस्तर सांगितला. HOD नी मास्तराला बोलावले, मला म्हणाले “बाळ तू जरा १० मिनिट बाहेर जा”. मी केबीन मधून बाहेर आलो. एक दहा पंधरा मिनिटांनी मास्तर तोंड पाडून बाहेर आला. माझ्या फाईलवर सही केली. मला पुन्हा एक्सटरनल द्यायची सोय केली.

आज मी होतो म्हणून मी बोलू शकलो. उद्या एखाद्याचे करियर बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी महावद्यालयातले विद्यार्थी आणि शिक्षकांची नोक झोक तर सुरूच असते आणि असाविच, त्याशीवाय कॉलेज लाईफला खरच मजा नाही.मी असेही म्हणत नाही की माझी काहीच चुक नव्हती पण शेवटी विद्यार्थी आम्ही. शेवटची ४ वर्ष आमच्या शिक्षणाची उरलेली असतात त्यामुळे जितकं मित्रांसोबत एंजॉयमेंट करायला मिळेल तितके आम्ही करतो पण एका लिमिट पर्यंत. जेव्हा त्या दोघांतील एखादाजरी एका लिमिटच्या बाहेर जातो तेव्हा त्याचा खरच खुप मोठा परिणाम घडतो.आणि या अशा बाबतीत जेव्हा एखादा शिक्षक जाणून बूजून असला काही प्रकार स्वतःच्या विद्यार्थ्या बाबतीत करतो तेव्हा खरच त्या विद्यार्थी-शिक्षक नात्याला मैत्रीचे नव्हे तर दुष्मनीचे वळण लागते. त्यामुळ हे खरच एक इंटरेस्टिंग नातं आहे.

शीला कि जवानी

गेल्या ५-६ महिन्यात मुन्नी आणि शीला या दोन नावांचा भलताच बोलबाला झाला. मुन्नीची बदनामी आणि शिलाची जवानी दोन्ही अगदी टॉपवर होत्या. त्यामुळ बाकीच काही नसलं तरी आपल्या देशात आम्बट शौकिनांची संख्या किती आहे हे तरी दिसून आलं. मध्यंतरी उत्तर प्रदेशातल्या दोन सख्ख्या बहिणी मुन्नी आणि शीला यांनी आपापली नावच या दोन गाण्यांच्या मूळ बदलून टाकली असही वाचनात आलं होत.

 आता यात किती खर किती खोट देवच जाणे; पण अशी गाणी जन-माणसावर किती परिणाम करतात याचा अनुभव मला नुकताच आला.

मध्यंतरी अस्मादिकांच्या लग्नासाठी आमच्या घरासमोर मांडव घातला होता; आणि मग काय गाणी-बजावणी हेहि आलच. आता मांडव, त्याला लायटिंग, आणि स्टेरिओवर गाणी त्यामुळं दररोज संध्याकाळी गल्लीतली सगळी शेंबडी पोरं आमच्या घरासमोर मांडवात नुसता धुडगूस घालायची. असच एक दिवस संध्याकाळी आमचे वडील पाहुण्यांच्या सोबत गप्पा मारत मांडवात बसले होते; नेहमीप्रमाणे गल्लीतल्या सगळ्या शेंबड्या पोरांनी स्टेरिओवरच्या गाण्यांच्यावर गणपती डान्स चालू केला होता. अशीच २-४ गाणी झाली असतील. सगळेजण त्या लहान पोरांचा निरागस दंगा अगदी कौतुकाने पाहत होते. एवढ्यात काय झाल गर्दीतन ३-४ वर्षांची दोन पोरं आमच्या वडिलांच्या जवळ आली; आणि म्हणतात काशी

अहो काका कसली गाणी लावलाय हि??? शीलाकी जवानी लावा कि जरा …….

आता ह्यास्नी स्वतःची XXX धुवायची अजून अक्कल नाही आणि ह्यास्नी शीलाकी जवानी पाहिजे. ह्याला काय म्हणावं आता तुमीच सांगा.

या प्रसंगाला १०-१२ दिवस झाले असतील नसतील; आमची सुट्टी अजून संपली नसल्यामुळ आम्ही कोल्हापुरातच होतो. आमच्या घरासमोर एक एकत्र कुटुंब आहे.

तिथलाच एक ५-६ वर्षाचा चुणचुणीत मुलगा; एक दिवस घरासमोरच्या रस्त्यावर मोठ-मोठ्यांनी गाणी म्हणत उभा होता

जाने दे शीला…… शीला कि जवानी…. आयम टू सेक्सी फॉर यु…….

एवढ्यात त्याची आई आतून आली आणि असले काय २-३ धप्पाटे त्याच्या पाठीत घातले म्हणता…. ते बिचार लागलं बोंबलायला. मला पण कळेना हेच्या आईला एवढं रागवायला नेमक काय झालं …….

आणि मग थोड्यावेळान लक्षात आलं त्या मुलाच्या आईचं नावच शीला होतं.

अलिबागचे जुने वाडे

अलिबाग दरवेळेपेक्षा ह्या वेळेला मला खूप वेगळा वाटला आणि आवडला सुद्धा ते म्हणजे तेथील जुने वाडे आणि देवळांसाठी. ह्या पोस्ट मध्ये फक्त जुन्या वाड्यांचे फोटो टाकत आहे. खरच नशीबवान आहेत ह्या वाड्यात राहणारी माणसे जी अजून ही आपली संस्कृती आणि पारंपारिक निवासस्थाने जपून आहेत. मला अश्या ह्या लाकडांच्या वाड्यांचे, त्यांच्या भग्न अवशेषांचे लहानपणापासून आकर्षण आहे. 

अभिमन्युवध – भाग ७

जयद्रथाला मिळालेल्या वराची हकीगत पांडव पक्षाच्या वीराना व्यूहात शिरण्यात आलेल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी रचली असावी असा संशय येतो! जयद्रथाला स्वप्नात शंकराने वर दिला असें म्हटले आहे त्यामुळे असें वाटते. काही असो, अभिमन्यु चक्रव्यूहात एकटा अडकला. त्याने दिवसभर कोरवांच्या पक्षाच्या एकाही महावीराला दाद दिली नाही. अनेकजण मिळून चालून आले तरीहि त्याने त्याना पळवले. त्याने कोणाकोणाला मारले याची मोठी यादी होईल. अखेर द्रोणाचा सल्ला मानून कर्णाने पुन्हा अभिमन्यूवर चाल केली आणि अखेर त्याचे धनुष्य तोडले. महाभारतातील युद्धवर्णनात अनेक वीरांचीं धनुष्ये अनेकवार तोडली गेल्याचे उल्लेख येतात. त्याला अपवाद फक्त अर्जुनाचा! त्याचे गांडीव धनुष्य मात्र कधीहि तोडले गेल्याचा उल्लेख मिळत नाही. कर्णाजवळ गांडीवधनुष्याच्या तोडीचे धनुष्य होते असे म्हटलेले आहे मात्र त्याचे धनुष्य जयद्रथवधाचे दिवशी भीमाने मोजून सतरा वेळां तोडले असे वर्णन आहे. सात्यकी, अभिमन्यु आणि इतर अनेकांनीहि ते तोडले. धनुष्य तोडणे याचा अर्थ प्रत्यंचा तोडणे असाहि कदाचित असेल!
अभिमन्यूचे धनुष्य तुटले, सारथी मेला, घोडे मेले. मग हाताशी मिळेल त्या आयुधाने त्याने युद्ध चालूच ठेवले. अखेर सर्व संपल्यावर दु:शासनाचा पुत्र व अभिमन्यु यांचे गदायुद्ध झाले, दोघे मूर्छित पडले मात्र दु:शासनपुत्र आधी शुद्धीवर आला व त्याने गदेच्या प्रहाराने अभिमन्यूची अखेर केली. दिवस संपत आलेला होता. त्यामुळे युद्ध संपवून दोन्ही सैन्ये माघारीं फिरलीं.