शार्लि एब्दो आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य

पॅरिसमध्ये नुकताच ‘शार्लि एब्दो’ या मासिकाच्या कार्यालयावर अतिरेक्यांनी हल्ला केला. यात मासिकाचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारले गेले. मासिकाने मुसलमान धर्माची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रे प्रकाशित केल्यामुळे हा हल्ला करण्यात आला असा प्राथमिक अंदाज आहे. यावर पहिली प्रतिक्रिया अर्थातच तीव्र निषेधाची आहे आणि असावी. व्यंगचित्रे कोणत्याही प्रकारची असली तरीही त्यावरची ही प्रतिक्रिया निषेधार्हच आहे. यानंतर ज्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या त्या विचार करण्यासारख्या आहेत. त्याचबरोबर अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, त्याच्या सीमा/मर्यादा आहेत का, असाव्यात का यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेला येत आहेत. लेखात या प्रश्नांची ठाम उत्तरे नाहीत, किंबहुना ठाम उत्तरे असू शकत नाहीत. मात्र व्यंगचित्रकारांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कामाला विनाअट पाठिंबा दिला जातो आहे, आणि त्याचबरोबर जर त्यांच्या कामाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न झाला तर तो बरेचदा याचा अर्थ अतिरेक्यांना किंवा हल्ल्याला पाठिंबा असा घेतला जातो आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एक पैलू हा ही आहे की घटनेचा निषेध करतानाच शक्यतो ‘नी-जर्क’ प्रतिक्रिया न देता त्यामागचे इतर पैलू पडताळून बघणे. लेखात हा प्रयत्न केला आहे.

‘शार्लि एब्दो’ने सर्व धर्म आणि लोकांची सारख्याच तीव्रतेने खिल्ली उडविली हा मुद्दा सर्व लेखांमधून सांगितला गेला आहे. मात्र बहुतेक लेख एका घटनेचा उल्लेख कटाक्षाने टाळतात. २००९ साली ‘शार्लि एब्दो’ने एका लेखकाला त्याचा लेख ‘अँटी-सेमायटिक’ – ज्यू लोकांच्या विरोधात – आहे म्हणून कामावरून काढून टाकले होते. संपादकांनी आधी लेखाबद्दल माफी मागावी अशी सूचना केली, लेखकाने ती धुडकावून लावल्यावर त्याला नोकरी गमवावी लागली. शिवाय त्याच्यावर ‘हेट स्पीच’चा खटलाही भरण्यात आला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाने ज्याची खिल्ली उडविली होती तो दुसरा-तिसरा कुणी नसून फ्रेंच राष्ट्राध्यक्ष सारकोझी यांचा सुपुत्र होता.

वरच्याच मुद्द्याचा आणखी एक पैलू म्हणजे सर्व धर्मांची खिल्ली उडवली आहे मग मुसलमान लोकच डोक्यात राख का घालून घेतात? याला अपवाद आहेत हे आधीच्या परिच्छेदातून दिसलंच. दुसरं म्हणजे समाजातील शक्तिमान गटाची खिल्ली उडवणे आणि दुर्बळ गटाची खिल्ली उडवणे याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. फ्रान्समध्ये मुसलमान लोक ‘इमिग्रंट’ आहेत. फ्रेंच लोकांचा परदेशवासियांबद्दलचा ‘झेनोफोबिया’ सर्वश्रुत आहे. फ्रान्समधील परदेशी लोकांना वर्णभेदासकट अनेक प्रकारचे अन्याय सहन करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत गोऱ्या लोकांनी अल्पसंख्याक लोकांची खिल्ली उडवली तर त्याला वेगळे आयाम प्राप्त होतात. उदा. तीसच्या दशकात ज्यू लोकांची खिल्ली उडवली जात होती तेव्हा इतर लोकांच्या तुलनेत त्याला निश्चितच वेगळे आयाम होते. दुसरं म्हणजे मुसलमान विरुद्ध पाश्चात्त्य जग हा संघर्ष बराच जुना आहे. इराक युद्ध आणि ‘वॉर ऑन टेरर’पासून ते ‘अबू घैरेब’पर्यंत अनेक गोष्टी यात येतात. अशा परिस्थितीत धार्मिक खिल्ली उडवणारे व्यंगचित्र आगीत तेल टाकण्यासारखं होऊ शकतं. हे अतिरेक्यांचं किंवा हल्ल्याचं समर्थन नाही, परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अतिरेकी अल्जिरियाचे होते, फ्रान्सने अल्जिरियावर केलेले अत्याचार सर्वश्रुत आहेत. व्यंगचित्रे हे निमित्त असून यामागे खोल पार्श्वभूमी असण्याची शक्यता अधिक वाटते.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा तसा नाजूक विषय आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा विनोदाचा विषय आपल्या जिव्हाळ्याचा नसतो तेव्हा बहुतेक लोक याला पाठिंबा देतात. इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि मन मानेल तसं वागणं यात फरक काय? सटायर याची विकीतील व्याख्या “..in which vices, follies, abuses, and shortcomings are held up to ridicule, ideally with the intent of shaming individuals, corporations, government or society itself, into improvement.” अशी आहे. ‘शार्लि एब्दो’ची व्यंगचित्रे बघितली तर त्यात सटायर फारसं दिसत नाही. किंबहुना विशिष्ट गटाला टारगेट करून मुद्दाम डिवचण्याचा हेतू दिसतो.

‘टबू’ किंवा संवेदनशील विषयांच्या मर्यादा तोडणे हा आधुनिकतेचा पाया मानला जातो पण हे फक्त करायचं म्हणून केलं जातं की यातून काही साध्य होतं? विनोदाचा दर्जा बघितला तर ‘शार्लि एब्दो’ची व्यंगचित्रे सटायर पेक्षा ‘पॉटी ह्यूमर’ ह्या प्रकारात मोडतात. ही काही लोकांना विनोदी वाटू शकतात, विनोदी वाटणे सापेक्ष असतं. पण याला सटायर म्हणायला फारसा आधार वाटत नाही.

वर म्हटल्याप्रमाणे आधुनिकतेमध्ये खिल्ली उडवण्यासाठी कोणताही विषय निषिद्ध नसतो. आणि ‘शार्लि एब्दो’ने कोणतीही सभ्यतेची मर्यादा पाळलेली नाही.  प्रश्न असा येतो यात आणि ट्रोलिंगमध्ये काय फरक आहे? ‘टबू’ तोडणे ही एक आकर्षक गोष्ट बनली आहे. बरेचदा हे आवश्यक असतं पण हे करताना यामागचं हेतू काय याचा सारासारविचार व्हायला हवा. फक्त एखाद्या विशिष्ट गटाला ‘प्रव्होक’ करणे हा एकमेव हेतू असेल तर अशा प्रकाराला विनोद म्हणण्यापेक्षा ट्रोलिंग म्हणणे अधिक योग्य. विनोदाला काही विषय वर्ज्य असावेत की नाही? उत्तर नाही असेल तर बलात्कारावर विनोद चालेल का? उत्तर हो असेल तर बलात्कार झालेल्या व्यक्तीवर तिच्यासमोरच विनोद केला तर चालेल का? ही अतिशयोक्ती वाटेल पण अमेरिकन व्यंगचित्रकार जॉनी रायन याच्या मुलाखतीमधील हा भाग पाहा

When is it ok to start making jokes about something atrocious like 9-11?
Well if it didn’t happen to me, then we can do it right away. [laughs]

इथे त्याने स्वतःला का वगळलं कळलं नाही. असो. जर सभ्यतेच्या सर्व मर्यादा तोडणे हा एकमेव हेतू असेल तर मग याला पाठिंबा देणारे लोक आपल्या रोजच्या जगातही तसं का वागत नाहीत? आजारी असलेल्या माणसाला भेटायला गेल्यावर जर म्हटलं की “येता येता वैकुंठात बुकिंग करून आलो, उगीच नंतर कटकट नको” तर चालेल का? अर्थातच चालणार नाही कारण ही शाब्दिक हिंसा आहे. मग जर आपल्या रोजच्या जगात हे सभ्यतेचे नियम आपण पाळतो तर मग कलेच्या क्षेत्रातही ते का पाळू नयेत?

सर्वात शेवटी एक प्रश्न पडतो. कलेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याची प्रथा जुनी आहे. कम्युनिस्ट राजवटीपासून सध्याच्या ओबामांच्या ड्रोन हल्ल्यांपर्यंत सर्व विषयांवर अनेक व्यंगचित्रकारांनी विचारप्रवर्तक व्यंगचित्रे काढली आहेत. या पार्श्वभूमीवर एखाद्या धर्माबद्दल हिडीस व्यंगचित्रे काढल्याने नेमका कोणता हेतू साध्य होतो? ‘टबू’ तोडण्याचं आत्मिक समाधान मिळत असेल, कदाचित आधुनिक कलेच्या क्षेत्रात एखादा नवा पायंडा पडत असेल पण सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने एखाद्या गटाला मुद्दाम डिवचून नेमका काय फायदा होतो? पाश्चात्त्य जगाने इस्लामिक राष्ट्रांवर अनेक अत्याचार केलेले आहेत, सध्याचे अतिरेकी आपणहून तयार झालेले नाहीत. रेगनपासून बुशपर्यंत सर्वांनी आपापल्या फायद्यासाठी त्यांना जोपासलेलं होतं. हे थांबवण्याची एकमेव आशा म्हणजे परस्परसामंजस्य. आवडो वा न आवडो, मुसलमान लोक आणि राष्ट्रे या जगाचा अविभाज्य भाग आहेत.

जीव गेलेले व्यंगचित्रकार मला इराकमध्ये मरण पावलेल्या अमेरिकन सैनिकांइतकेच दुर्दैवी वाटतात.

—-

१. दुव्यातील व्यंगचित्रे हिडीस, बीभत्स या प्रकारात मोडतात. आपापल्या जबाबदारीवर बघावीत.