मराठी अस्मितेच्या डुलक्या

परवा ब्लॉगरच्या ड्याशबोर्डवर फेरफटका मारताना ही नोटीस दिसली.

ज्यांना अ‍ॅड्सेन्सबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी : गूगल सुरुवातीला फक्त सर्च इंजिन होतं, त्याचं आज जे महाकाय रूप आहे ते होण्यासाठी त्यांनी टाकलेलं पहिलं यशस्वी पाऊल म्हणजे गूगल अ‍ॅड्सेन्स. याद्वारे आंतरजालावर जाहिराती सर्वप्रथम गूगलने आणल्या. यात आजपर्यंत एकाही भारतीय भाषेचा समावेश नव्हता. मागच्या वर्षी गूगलने यात हिंदीचा समावेश केला. म्हणजे आता जर तुमचा ब्लॉग हिंदीत असेल तर त्यावर तुम्ही गूगलच्या जाहिराती टाकू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला पैसे मिळू शकतात. या निर्णयामागे सुंदर पिचई यांचा सहभाग नक्कीच असणार. आणि याचा अर्थ इतरही भारतीय भाषांना हळूहळू गूगल समाविष्ट करून घेईल असं मानायला जागा आहे.  म्हणजे मराठीलाही ‘अच्छे दिन’ आले, बरोबर? बरोबर? चूक!!

मराठी अस्मिता जागी आहे की दिवसाला दहा तास झोपा काढते आहे याच्याशी गूगलला काहीही देणंघेणं नाही. त्यांना मतलब आहे पैक्याशी. ज्या भारतीय भाषांच्या ब्लॉगवर जास्तीत जास्त वर्दळ दिसेल त्यांना गूगल मान्यता देणार, कारण तिथे त्यांच्या जाहिराती जास्तीत जास्त बघितल्या जाणार. आणि इथेच घोडं दहा किलो पेंड खातं. मराठी ब्लॉग आणि बहुतेक मराठी माणसं यांची फारकत का आहे याचा इथे शोध घेण्याचा प्रयत्न आहे. अर्थात इथे हिंदी भाषिकांची संख्या मराठीपेक्षा बरीच जास्त आहे हा मुद्दा विसरून चालणार नाही पण ती संख्या सारखी असती तरी फारसा फरक पडला नसता.

ब्लॉग हे माध्यम नवीन होतं तेव्हा मराठीत अनेक लोक उत्तम लिखाण करत असत, रोज नवीन लेख वाचायला मिळायचे. नावीन्य संपलं तसे बहुतेक मोहरे गळाले. आजही नवीन लोक ब्लॉगकडे वळत आहेत, मात्र प्रश्न फक्त ब्लॉग सुरू करण्याचा नाही तर तो चालू ठेवण्याचा आहे. ब्लॉग नवीन होते तेव्हा लोकांना व्यक्त होण्यासाठी फारशी व्यासपीठं नव्हती, बहुतेक मराठी सायटी बाल्यावस्थेतच होत्या. हळूहळू सायटी वाढायला लागल्या तशी बहुतेक लोकांची पसंती तिकडे लेख प्रकाशित करण्याला होती. कारणे उघड आहेत. ब्लॉगचा वाचकवर्ग तयार व्हायला वेळ लागतो, सायटींवर वाचकवर्ग तयार असतो. बहुतेक लेखांना भरभरून प्रतिसाद मिळतात, लेखकाला बरं वाटतं.

यातला तोटा असा की तुमची ओळख इथे फारशी महत्त्वाची नसते. म्हणजे असं की तुमचा लेख कितीही चांगला असला तरी एका महिन्याने तो सायटींवर येणाऱ्या लेखांच्या गर्दीत दिसेनासा होतो. एका महिन्याने सायटींवर येणाऱ्या नवीन माणसाला तुमच्या लेखाबद्दल काहीही कल्पना नसते. सध्या अनेक लोकांचे लेख वर्तमानपत्रे किंवा मासिकांमध्येही येतात. तिथेही हीच परिस्थिती आहे. सहा महिने उलटून गेल्यावर वर्तमानपत्रातील तुमचा लेख कोण वाचणार? या कारणासाठी माझी ब्लॉग या माध्यमाला पसंती आहे. इथे तुमची स्वत:ची अशी ओळख निर्माण होते. आजही ब्लॉगवर येणारे नवीन वाचक परत परत येतात आणि जुने लेख वाचून आवडल्याचं सांगतात. काही लोक दोन्ही डगरींवर पाय ठेवतात, म्हणजे लेख सायटींवरही टाकतात आणि ब्लॉगवरही. पण हे काही खरं नाही. इथे ब्लॉगचा उपयोग फक्त एक बॅकअप म्हणून केला जातो. लेख इतरत्र वाचल्यावर तुमच्या ब्लॉगकडे लोक कशाला फिरकतील? साहजिकच ब्लॉगवरची वर्दळ नगण्य आणि गूगलच्या दृष्टीने असे ब्लॉग ‘डॉर्मंट’.

ब्लॉग ही एकांड्या शिलेदाराची मनसब आहे.

माणूस समाजप्रिय आहेच पण मराठी माणूस जरा जास्तच. टिळकांना हे समजलं होतं म्हणूनच गणेशोत्सव इतका लोकप्रिय झाला. चार डोकी जमवून सहलीपासून संमेलनापर्यंत सर्व गोष्टी करणे मराठी माणसाला आत्यंतिक प्रिय. या चौकटीत ब्लॉगलेखन बसत नाही. ब्लॉग ही एकांड्या शिलेदाराची मनसब आहे. इथे मशागतीपासून पेरणीपर्यंत सगळं आपणच करायचं. पीक यायलाही वेळ लागतो. सहा महिने, वर्ष थांबायला वेळ आहे कुणाला? त्यापेक्षा सायटींवर दोन दिवसात शंभर-दोनशे प्रतिसाद येतात. सगळा इन्स्टन्टचा जमाना आहे. ब्लॉग म्हणजे टेस्ट क्रिकेट आणि सायटी म्हणजे टी-२०.

याचा अर्थ लोकांनी वर्तमानपत्रात, सायटींवर लिहू नये का? अजिबात नाही, कुणी कुठे लिहावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. ब्लॉग माझं आवडतं माध्यम आहे आणि हिंदीत ते इतकं लोकप्रिय होत असताना मराठीत त्याचं असं भजं का झालं हे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. हिंदीत असलेल्या सगळ्या ब्लॉगांची यादी देत नाही, वानगीदाखल प्रसिद्ध कवी अशोक चक्रधर यांचा ब्लॉग बघा. मराठीत किती लेखकांचे ब्लॉग आहेत यांची यादी केली तर बहुधा दोन-तीन बोटंही पुरावीत. हेच इतर कलाकार, अभिनेते, खेळाडू यांच्या बाबतीत. मराठीतील अभिनेते आणि विशेषकरून अभिनेत्री वर्तमानपत्रात आवडीने लिहितात, पण मग आपली स्वत:ची ओळख म्हणून आपली साईट असावी असं त्यांना का वाटत नाही? इथे नुसता वयाचा मुद्दा पुढे करून चालणार नाही. अशोक चक्रधरही जुन्या पिढीचेच आहेत, ते ट्विटरवरही सक्रिय असतात. त्यांना स्वत:मध्ये हा बदल करणं जमतं, मग मराठी कलाकारांना का जमत नाही?

ट्विटरवरून आठवलं, ब्लॉगप्रमाणेच मराठी माणूस इकडेही फारसा फिरकत नाही. मागे एका मित्राशी चर्चा करताना हा विषय निघाला होता. जगातील बहुतेक प्रसिद्ध बुद्धिबळपटू ट्विटरवर आहेत. कोणतीही स्पर्धा चालू असेल तर त्यावर त्यांची मते ट्विटरवर वाचायला मिळतात. आनंद-कार्लसन जागतिक बुद्धिबळस्पर्धा चालू असताना त्यातील प्रत्येक खेळीवर कास्पारोव्ह, पोलगर भगिनी, अरोनियन, नाकामुरा यांची रनिंग कॉमेंट्री वाचणे म्हणजे जणू ‘गॉडफादर’ बघताना कपोलाने शेजारी बसून समजावून देण्यासारखं आहे. (‘गॉडफादर’च्या स्पेशल डीव्हीडीमध्ये कपोलाची प्रत्येक प्रसंगावर कॉमेंट्री  आहे.) असं असूनही ट्विटरवर एकही मराठी बुद्धिबळपटू नाही. प्रवीण ठिपसे, रघुनंदन गोखले, अनुपमा गोखले, जयंत गोखले कुणीही ट्विटरवर फिरकलेलेही कधी दिसले नाहीत. असं का?

यामागची माझी कारणमीमांसा अशी आहे- हीच बरोबर आहे असं नाही. पटली तर ठीक, नाही तर सोडून द्या. आधी म्हटल्याप्रमाणे मराठी माणूस उत्सवप्रिय आहे. ‘मी एकटा अमुक करेन’ असं म्हणण्यापेक्षा ‘आपण चार जण मिळून हे करू’ असं म्हटलं तर त्याला हुरूप येतो आणि तो चटकन तयार होतो. याचाच पुढचा भाग म्हणजे जिथे संवाद जास्त आणि मोकळा होतो तिथे तो ओढला जातो. ब्लॉग आणि ट्विटर दोन्हीकडे संवादावर मर्यादा आहे, याउलट फेसबुक किंवा सायटींवर मेगाबायटी संवाद होतात. चर्चा करणे हा मराठी माणसाचा आणि एकुणातच भारतीयांचा आवडता छंद आहे. (रोज इतक्या चर्चा होतात यापेक्षा मला लोक प्रत्येक विषयावर इतक्या ठामपणे कसं बोलू शकतात याचं आश्चर्य वाटतं. गर्भपात कायदेशीर आहे की नाही यापेक्षा हाटेलात काय मागवायचं या निर्णयाला जास्त वेळ लागतो.)

तर आहे हे असं आहे. हिंदीत ब्लॉग लोकप्रिय होत आहेत. लवकरच अ‍ॅड्सेन्स इतर भारतीय भाषांमध्येही येईल. आपण मोबाइलऐवजी भ्रमणध्वनी वापरून मराठी भाषेचं संवर्धन कसं करता येईल यावर चर्चा करत राहू. ही टीका नाही तर ब्लॉगसारख्या सुंदर माध्यमाची ताकद आपल्याला ओळखता आली नाही याबद्दलची खंत आहे.
—-
१. अमेरिकेतील रो वि. वेड या गर्भपातावरील प्रसिद्ध केसबद्दल बिल क्लिंटन यांचे मत – “I made them delve deeper, because I thought then, and still believe, that Roe v. Wade is the most difficult of all judicial decisions. Whatever they decided, the Court had to play God.”