फर्गसन आणि धगधगता वर्णद्वेष

मागच्या आठवड्यात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील मिझुरी राज्यातील फर्गसन शहरात माइक ब्राऊन या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यावर पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्यात तो मरण पावला. शवविच्छेदनातून कमीत कमी सहा गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालं, सर्व गोळ्या शरीराच्या वरच्या भागात होत्या, एक डोक्यात. गोळ्या झाडतेवेळी माईक कोणताही प्रतिकार करत नव्हता. या घटनेनंतर गेला आठवडाभर फर्गसनमध्ये आंदोलने चालू आहेत. याला उत्तर म्हणून पोलिसांनी आपला बेगुमान कारभार चालूच ठेवला आहे. वार्ताहरांना विनाकारण अटक करणे, जमावावर (यात स्त्रिया आणि लहान मुलेही आहेत) कोणतीही पूर्वसूचना न देता अश्रुधुराचा वापर करणे, विनाशस्त्र जमावाचा मुकाबला करण्यासाठी युद्धात वापरल्या जाणार्‍या रणगाडे, मशीनगन्स इ.सामग्रीं रस्त्यावर आणणे. माईकच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तो दुकानातून सिगारेटची पाकिटे चोरत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला – अर्थातच याचा आणि त्याला गोळ्या घालण्याचा काहीही संबंध नव्हता पण हे चारित्र्यहनन अजूनही चालू आहे. फर्गसनची परिस्थिती सध्या इतक्या टोकाला पोचली आहे की अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेने त्यांचे निरीक्षक तिथे पाठवले आहेत.

वरवर पाहता ही घटना अमेरिकेचा अंतर्गत मामला वाटू शकते पण याची पाळेमुळे बरीच खोल आहेत आणि त्यात अनेक पदर आहेत. साठच्या दशकात वर्णद्वेष कागदोपत्री जरी नाहीसा झाला असला तरी अमेरिकेत अनेक ठिकाणी तो आजही जिवंत आहे. अफ्रिकन अमेरिकन, चिनी-जपानी-भारतीय लोकांना अनेकदा याचा निरनिराळ्या स्वरूपात अनुभव येतो. बहुतेक वेळा आशियाई लोक आर्थिकदृष्ट्या वरच्या स्तरावर असल्याने वर्णद्वेषाची झळ कृष्णवर्णीय लोकांइतकी नसते मात्र गेल्या दशकात मुसलमान नागरिकांना विनाकारण त्रास दिला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. (किंवा दुसर्‍या महायुद्धादरम्यान जपानी-अमेरिकन नागरिकांना देशद्रोही म्हणून वेगळं ठेवण्यात आलं होतं.)

या घटनेचा एक मुख्य पैलू आहे – मिडिया. सुरुवातीला कोणत्याही च्यानेल किंवा वर्तमानपत्रात या घटनेचा उल्लेखही नव्हता. बातम्या यायला ट्विटवरवरून सुरुवात झाली. फर्गसनमधल्या लोकांनी आणि पत्रकारांनी तिथे काय घडतं आहे याचे फोटो आणि बातम्या द्यायला सुरुवात केली. ट्विटरवर फर्गसनने जोर पकडल्यानंतर मिडियाचं इकडे लक्ष गेलं. यात अर्थातच फक्त ट्विटर नाही तर फेसबुकचा समावेश होता पण दोन्हीमध्ये एक फार महत्त्वाचा फरक आहे. ट्विटरवर तुम्हाला काय दिसतं हे तुम्ही ठरवता, फेसबुकवर तुम्हाला काय दिसतं हे फेसबुक ठरवतं. जर तुम्ही मोदींना पाठिंबा देणार्‍या पोस्ट ‘लाइक’ करत गेलात तर लवकरच तुमची टाइमलाइन मोदींना समर्थन करणार्‍या पोस्टनी भरून जाईल, मोदींवर टीका करणार्‍या पोस्ट फेसबुक तुम्हाला दाखवणे बंद करेल. या कारणामुळे फेसबुकवर तुम्हाला निष्पक्ष बातम्या कधीच मिळत नाहीत. सध्या फर्गसनमध्ये ‘सिव्हिल वॉर’ची परिस्थिती आहे. वार्ताहरांना बातम्या देण्यापासून प्रतिबंध केला जात आहे, अटक केली जात आहे. याचा सर्वोच्च बिंदू कदाचित ९० वर्षाच्या होलोकॉस्ट सर्व्हायव्हर हेडी इपस्टीन हिला अटक करण्यात आली तेव्हा झाला. अपराध – पोलिसांवर टीका केली.

९० वर्षाच्या होलोकॉस्ट सर्व्हायव्हर हेडी इपस्टीन हिला अटक

आता इथे एक मुद्दा येतो. दंगली जगभर होतात, अराजकता प्रत्येक देशात असते. (भले आपल्या स्तंभलेखकांना पाश्चात्त्य देश स्वर्ग वाटोत!) मग फर्गसनवर इतका वेळ आणि शक्ती खर्च करण्याचं कारण काय? (आपल्याकडे काय कमी अडचणी आहेत का?) लेख लिहिण्याआधी हा प्रश्न मी स्वतःला विचारला. याचं उत्तर अनेक पदरी आहे. पहिलं – अमेरिकेबद्दल इथल्या आणि तिथल्या अनेक भारतीयांचे गैरसमज आहेत. आपले ष्टार स्तंभलेखक जेव्हा जागतिक राजकारणावर ‘इयत्ता ९ वी’च्या पातळीचे लेख लिहितात तेव्हा हे दिसतं.  इथल्यांचं एक वेळ समजू शकतो, तिथे वर्षानुवर्षे राहूनही परिस्थितीचं आकलन कसं होत नाही देवजाणे. हे गैरसमज अनेक प्रकारे दिसतात – उदा. देवयानी प्रकरण. अमेरिकेवर टीका केलेली अनेकांना आवडत नाही. बरेचदा यावर प्रतिक्रिया म्हणून उच्चविद्याविभूषित लोकही माता-भगिनी स्मरण करताना दिसतात. लक्षात घ्या, अमेरिकेवर टीका तिथे इतके भारतीय आहेत म्हणून होत नाही, अमेरिकेच्या वागणुकीमुळे होते आहे. ज्या दिवशी अमेरिका सर्व जग आपल्या पिताश्रींना कूळकायद्यानुसार मिळालेलं आहे अश्या आविर्भावात वागणं थांबवेल त्या दिवशी टीकाही बंद होईल.

फर्गसनमध्ये जे होतं आहे ते वर्षानुवर्षे अमेरिकेत होत आलं आहे. याच्या मुळाशी वर्णद्वेष आहे. खरंतर दीडशे वर्षं ‘Indians and dogs not allowed’ सहन केल्यावर प्रत्येक भारतीय वर्णद्वेषाचा कट्टर विरोधी असायला हवा पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. बरेचसे भारतीय फ्लोरिडातील गोर्‍यांना लाज वाटेल इतके वर्णद्वेषी असतात. मुक्तपीठात काळ्या कातडीवर विनोद छापताना सकाळच्या संपादकांना काहीही वाटत नाही. तिकडे खाजगीत निग्रो लोकांना ‘काळूराम’ किंवा तत्सम नावांनी संबोधण्यात येतं. (भारतात आंतरराष्ट्रीय परिषद असेल तर बाहेरून येणार्‍या भारतीय आणि पाश्चात्त्य लोकांना वेगळी वागणूक मिळते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. रजिस्ट्रेशन करताना पैसे युरोमध्ये घ्यायचे, पण सगळीकडे प्राधान्य मात्र गोर्‍या कातडीला. ‘इंडियन इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स’मध्ये जर ही परिस्थिती असेल तर इतर ठिकाणी विचारायला नको. भारतात कुठेही गोरी कातडी, निळे डोळे असलेल्या परदेशी पर्यटकांचं जे गळेपडू आदरातिथ्य केलं जातं तिथे हे दिसतं.) आणि आज काही परदेशस्थ भारतीयांनी फर्गसनमधील कृष्णवर्णीयांवर टीका केल्याचंही वाचलं.

ब्लॉगचे अनेक वाचक अमेरिकेत आहेत, इथल्यांपैकी काही कदाचित जाणार असतील. कुणी, कुठे राहावं हा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र एकदा राहायचं नक्की केल्यावर आपण कोणत्या समाजात राहत आहोत, त्याचा इतिहास काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. ग्रीन कार्ड आणि अमेरिकन ड्रीम म्हणजे आयुष्याची परमावधी नव्हे, तिथेही अडचणी आहेत. इथल्यापेक्षा वेगळ्या आहेत इतकंच. शाळा-कॉलेजात इतिहास अनावश्यक वाटायचा, मात्र निवडणूकीआधी मोदी समर्थकांनी इतिहासाचे जे तारे तोडले ते पाहून इतिहास सर्वांना ‘कंपल्सरी’ करायला हवा असं वाटायला लागलं. आधी इतर विषयांवर झालं तसंच या विषयावरही अमेरिकेतील भारतीय मौन बाळगून असतात. खरं तर ‘सिव्हिल राइट्स’ हा स्नोडेन किंवा एनएसएपेक्षा बराच ‘सेफ’ विषय आहे. याचा अर्थ प्रत्येक विषयावर रस्त्यावर येऊन आंदोलनच करायला हवं असं नाही पण किमान चर्चा झाली तर बरं. ती होत असेल तर चांगलंच आहे.

अमेरिकचं दिवसेंदिवस ‘पोलिस स्टेट’मध्ये रुपांतर होत चाललं आहे. इराक वगैरेमध्ये लोकशाहीची चिंता करण्याऐवजी आपल्या घराची दुरुस्ती केली तर सर्वांसाठीच फायद्याचं ठरेल.

डावीकडे : फर्गसनमधील नागरिकावर पोलीस शस्त्रे रोखताना. उजवीकडे : स्पॅनिश चित्रकार गोया याने १८१४ साली काढलेलं चित्र. यात फ्रेंच सैनिक स्पॅनिश क्रांतिकारकांवर गोळ्या झाडताना दिसतात. चित्राची क्ष-किरणांनी तपासणी केल्यावर सैनिकांच्या बंदुकी रंगवण्याआधी गोयाने कॅनव्हासवर खोल ओरखडे मारल्याचं आढळून आलं.