डिसक्लेमर

हल्ली ब्लॉगचं वट्ट प्रॉडक्शन थांबलेलं आहे. याबद्दल लोकांनी विचारणाही केली, त्याबद्दल अनेक आभार. खरं तर कधी कधी मला हा ब्लॉग लोक अजूनही वाचतात याचंच आश्चर्य वाटतं. काही जुने लेख आता इतके बालीश वाटतात की डिलीट करण्यासाठी हात सारखा शिवशिवत असतो. माझं बहुतेक आयुष्य कॉस्मोपॉलिटन वातावरणात गेलं त्यामुळे शुद्ध मराठीच्या नावाने बोंब. बहुतेक र्‍हस्व दीर्घ अजूनही कळत नाहीत. वीस वर्षे हिंदी-उर्दू बोलणार्‍या मुसलमान शेजार्‍यांबरोबर काढली त्यामुळे मराठीवर हिंदीचा मोठा प्रभाव. अजूनही ‘मदत केली’ की ‘मदत झाली’ हे माझ्या मठ्ठ् डोक्यात शिरत नाही. असं सगळं असूनही लोक वाचतात याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

मराठी माणसाचा स्मरणरंजनाचा गुण माझ्यातही आहे. तो इतक्या पराकोटीला पोचलाय की आता त्याचा कालावधी तीन-चार वर्षांवर आला आहे. म्हणजे तेव्हा कसं विषय डोक्यात आला, लिहून टाकला असं व्हायचं. आता ते शक्य नाही. का? नुसतं सांगण्यापेक्षा उदाहरणे देतो म्हणजे स्पष्ट् होईल.

सध्या दोन-तीन विषय डोक्यात आहेत. पहिला म्हणजे बॉक्सिंग. पूर्वी मला बॉक्सिंगचा तिटकारा होता. रानटी खेळ यापलिकडे याबद्दल माहिती नव्हती. मग ‘रॉकी’चे पाच भाग बघितले, ‘रेजिंग बुल’ बघितला, ‘मिलियन डॉलर बेबी’ बघितला, ‘द फायटर’ बघितला आणि हळूहळू यातले बारकावे लक्षात यायला लागले. बॉक्सिंग म्हणजे फक्त मैदानात जाऊन धपाधप ठोसे हाणायचे असं नसतं, त्यामागे किती खोल स्ट्रॅटेजी असते हे समजलं. सध्या महंमद अलीचं आत्मचरित्र वाचतो आहे कारण तो आता माझा आवडता बॉक्सर झाला आहे. लेख लिहायला हा एक सुरेख विषय आहे. पण हा लेख लिहीला आणि लोकांच्या प्रतिक्रिया भलतीकडेच गेल्या तर वैताग येतो. ‘ह्याला बॉक्सिंग अचानक कसं काय आवडायला लागलं? म्हणजे मसल्सवाले उघडे पुरूष बघायला आवडतात की काय? तरीच पहिल्यापासून संशय होता. म्हणूनच अजून लग्न केलं नाही..इ.इ.’ आता मला ‘गे’ असण्याबद्दल कोणतीही गैरसमजूत नाही. ती एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे असं मी मानतो. मी ‘गे’ असतो तर जाहीर करण्यातही मला संकोच वाटला नसता.  संमती असेल दोन सज्ञान व्यक्ती काय करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र सुतावरुन स्वर्ग गाठून कुणाच्याही वैयक्तिक चॉइसबद्दल आपला आपणच निर्णय घेऊन मोकळं होणे हे मला पटत नाही. मला पिझ्झा आवडतो की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. मला अली आणि शकिरा दोघेही आवडतात पण शकिराबद्दल जे आकर्षण वाटतं ते अली किंवा इतर कोणत्याही पुरुषाबद्दल कधीही वाटणे शक्य नाही. आता याहून अधिक स्पष्टीकरण अशक्य आहे. इतकं सांगितल्यावरही लेख लिहीला तर लोकांचा संशय फिटेलच याची ग्यारंटी नाही. (काय दिवस आलेत च्यामायला! एखादा खेळ का आवडतो ह्यावर इतकी डोकेफोड करावी लागतेय. दिमाग का भाजीपाला होरेलाय मामू!! )

पुढचा इषय. एक सुंदर गझल आहे, तिचे निरनिराळे अर्थ लक्षात आले. त्यावर लिहायचं आहे. पण लेख लिहीला तर गझलेत जे आहे तेच माझ्या आयुष्यातही आहे असा समज करुन घेतला तर परत पंचाईत. म्हणजे समजा मी ‘हंगामा है क्यू बरपा’ वर लिहीलं तर याचा अर्थ मी रोज संध्याकाळी खंबा घेऊन बसतो असा कुणी काढला तर त्याला इलाज नाही.

तिसरा विषय. मला हिप-हॉप आणि रॅप विशेषतः ‘गँगस्टर रॅप’ पहिल्यापासून आवडतं. त्यात नुकताच ‘स्ट्रेट आउट ऑफ कॉम्प्टन’ हा चित्रपट बघितला आणि मनापासून आवडला. यावर एक उत्तम लेख होऊ शकेल. अडचण अशी की या प्रकारच्या संगीतात शिव्या अगदी खच्चून भरलेल्या असतात. ती संस्कृतीच तशी आहे. आता लेखात उदाहरण म्हणून एखादं गाणं दिलं आणि त्यातल्या शिव्या आपल्यासाठी आहेत असा समज कुणी करुन घेतला तर काय करायचं?

मला ‘रेव्हनंट’ फारसा आवडला नाही पण असं सांगणारा लेख मी लिहीला तर ज्यांना तो आवडला त्यांच्या मताविषयी कुठलाही अनादर नाही. आवडीनिवडी फार सापेक्ष असतात. निवडणुका झाल्यावर मी या सरकारला एक संधी देऊ या अशा प्रकारचा लेख लिहीला होता याचा अर्थ मी मोदी समर्थक आहे असा नाही. माझी मतेही रोज बदलत असतात. ओबामा सुरुवातीला प्रचंड आवडले, मग स्नोडेन प्रकरण झाल्यावर नावडले, सध्या ७५-२५, म्हणजे ७५ आवडतात. हे असं चालूच राहणार. त्या क्षणाला कोणतंही मत देणारा लेख लिहीला तर त्यामागे दुसरा कोणताही हेतू नसतो.

ब्लॉग लिहिणं मला आवडतं आणि फारसे चांगले लेख नसतानाही इतके लोक वाचतात याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अशा परिस्थितीत अशा सुरेख व्यासपीठाचा वापर कोणत्याही अंतस्थ हेतूसाठी करणे मला मान्य नाही. ब्लॉगवरचे लेख वाचताना त्यामागे केवळ त्या-त्या विषयावर मतप्रदर्शन इतकाच हेतू आहे.

आता इतके फिल्टर टाकल्यावर कोणते विषय उरले? रासायनिक खतांवर लिहावं ‘मोन्साटो’वाले धावून येतील. बालाजी तांब्यांवर लिहीलं तर विज्ञानवादी खवळतील. ‘बकर्‍यांची पैदास आणि निगा’ यावर लिहीलं तर व्हेगन लोक मोर्चा काढतील.

म्हणून काही न लिहिता स्वस्थ बसलो आहे. तुम्हाला एखादा निरुपद्रवी विषय सुचला तर सांगा.