अंदाज अपना अपना

“गोगो मायबाप, ये भरी हुई पिस्तोल मुझे दे दो. “

संदर्भ लागला का? लागला तर हा लेख आवडू शकेल. लागला नाही तर कळायला जरा कठीण जाईल. काही काही यशस्वी विनोदी कलाकृतींचं एक वैशिष्ट्य असतं. त्यातल्या वाक्यांचे तुकडे कुठेही वापरता येतात. आणि अश्या कलाकृतींचे फ्यान भेटले की मग इतके तुकडे फेकले जातात की त्या कलाकृतींचं अभिवाचनच सुरू होतं. हा अनुभव मी अनेक अमरुंबरोबर घेतला आहे. ‘साइनफेल्ड’ आवडणारा अमरु भेटला तर त्याला/तिला फक्त “सरेनिटी नाऊ! ” इतकी सुरुवात पुरेशी होते. तसंच ‘अंदाज अपना अपना ‘चे संवाद त्याच्या फ्यान लोकांमध्ये अमाप लोकप्रिय आहेत. ‘अंदाज अपना अपना ‘ सध्याच्या काळातील एक ‘कल्ट मूव्ही’ आहे. प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचंही याकडे फारसं लक्ष गेलं नाही. हा चित्रपट लोकप्रिय होण्यात यूट्यूबचा मोठा वाटा आहे. ‘शोले’प्रमाणेच याचे संवादही भयानक लोकप्रिय झाले – फक्त भारतीयांमध्ये नव्हे तर परदेशी लोकांमध्येही. नंतर याच्या संवादाच्या मिम्स निघाल्या. आजही यावर लेख येत राहतात. ‘अंदाज अपना अपना’ का आवडतो याची कारणे दहा पाने भरतील इतकी आहेत.

आतापर्यंत आलेले हिंदी आणि मराठी विनोदी चित्रपट बघितले तर त्यात एक कथानक, त्यातले संघर्ष, अडचणी वगैरे आणि यात होणारे विनोद – बहुतेक विनोद प्रसंगाला अनुसरून. ‘अशी ही बनवाबनवी’मधला “धनंजय माने इथेच राहतात का? ” हा उत्कृष्ट विनोद आहे पण कथानकाचा संदर्भ नसेल तर तो विनोद राहत नाही. ‘अंदाज अपना अपना’ ने या परंपरेला छेद दिला. म्हणजे यात कथानकाला अनुसरून विनोद नाहीत असं नाही, पण तितकेच किंवा जास्त विनोद कथानकावर अवलंबून न राहता स्वतंत्र आहेत. आणि ‘अंदाज अपना अपना’चं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटात न दिसलेला विषय यात विनोदासाठी वापरलेला दिसतो, तो म्हणजे हिंदी चित्रपट. हॉलिवूडमध्ये ‘पॅरडी’, ‘स्पूफ’ या प्रकारातील स्वत:चं विडंबन करणारे चित्रपट भरमसाठ गर्दी खेचतात. ‘ऑस्टीन पॉवर्स’ मालिकेमध्ये ‘गॉडफादर’पासून ‘स्टार वॉर्स’पर्यंत एकाही चित्रपटाला सोडलेलं नाही. नेहमीप्रमाणे इथेही आपल्या दिग्दर्शकांचं कल्पनादारिद्र्य दिसतं. हिंदी चित्रपट हा विनोदाचा कधीही न संपणारा खजिना आहे तरीही आजपर्यंत एकाही दिग्दर्शकाला याचा वापर करावासा वाटला नाही. ‘अंदाज अपना अपना’ने हे केलं आणि यशस्वीपणे केलं.

या चित्रपटात वरवरचं एक कथानक आहे – ते ही तद्दन फिल्मी. एक राजकुमारी वर शोधायला परदेशातून येते, मग दोन हीरो, जुळ्या भावांची कहाणी इ. इ. पण हे चालू असताना राजकुमार संतोषी हिंदी चित्रपटांची मनसोक्त रेवडी उडवत राहतो आणि संगीतापासून मारामारीपर्यंत एकाही विषयाला सोडत नाही. यातली काही गाणी आधीच्या गाण्यांची विडंबनं आहेत. ‘ए लो जी सनम’ ओ. पी. नय्यरच्या शैलीत आहे. ‘दिल करता है’ गाण्यात प्रत्येक कडव्यात आमिर धर्मेंद्र, जितेंद्र, शम्मी कपूर यांच्या नाचण्याच्या शैलीची नक्कल करतो. चित्रपटात दोन प्रकारचे कलाकार आहेत. मेहमूद, केश्तो, परेश रावल, देवेन वर्मा यासारखे कसलेले आणि आमिर, सलमान, रवीना आणि करिष्मा यांच्यासारखे यथातथा, त्यातल्या त्यात आमिर जरा बरा. पण यामुळे चित्रपटाला बाधा येत नाही कारण हा चित्रपट ‘फार्सिकल’च्या अंगाने जाणारा आहे. त्यामुळे हीरो-हिरविणींचा ‘ओव्हर-द-टॉप’ अभिनय सहज खपून जातो.

काही शब्द जात्याच विनोदी असतात, ते ऐकल्यावर आपसूक, काही कारण नसताना हसायला येतं. ‘साइनफेल्ड’च्या प्रेक्षकांना त्यात कोणता शब्द विनोदी आहे यावर बरेचदा केलेली चर्चा आठवत असेल. ‘अंदाज अपना अपना’च्या संवाद लेखकांना याची अचूक जाण आहे आणि त्यामुळे त्यांनी अगदी नेमके हसू येणारे शब्द वापरले आहेत. उदा. “मेरे अंदर बहोत से आयडीयाज है जो बाहर आने के लिये उछल रहे है, फुदक रहे है”. इथे ‘फुदक’च्या ऐवजी इतर कोणताही शब्द वापरला असता तरी वाक्य सपाट झालं असतं. किंवा ‘मुष्टंडो, यहां आओ’! याचप्रमाणे यमक जुळवूनही विनोद केला आहे. ‘होजा, तेजा, होजा’ किंवा ‘पिलो, खेलो’.

सूक्ष्म विनोद. बहुतेक चित्रपटांत (यात हॉलिवूडचेही आले) एखादा विनोद झाला तर दिग्दर्शक तो विनोद ठळकपणे प्रेक्षकांसमोर कसा येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. संतोषी काही वेळा याच्या उलट करतो. ‘अंदाज अपना अपना’मध्ये काही विनोद इतके सूक्ष्म आहेत की क्षणभर तुमचं लक्ष फोनवर गेलं तर विनोद सहज सुटून जाईल. उदा. सुरुवातीला जूही म्हणते, “मै कितनी खुशनसीब हूं जो आपके मजबूत कंधों का सहारा मुझे मिला” आणि बरोबर ‘क्यू’वर आमिर स्वत:च्या खांद्यांकडे ‘सेल्फ कॉन्शस’ होऊन बघतो. किंवा आमिर हाटेलात जातो, तिथे त्याला एक कामगार भेटतो. त्यांच्या दोन मिनिटांच्या संवादात एक सूक्ष्म विनोद आहे. लक्षात आला नसेल तर परत बघा.

‘अंदाज अपना अपना ‘चा विनोद हा एखाद्या दहा हजार फटाक्यांच्या लडीसारखा आहे. कोणत्याही प्रसंगात अनेक प्रकारचे विनोद एकामागून एक येत राहतात. उदा. शेवटी अमर आणि प्रेम गोगोच्या अड्ड्यावर जातात तो प्रसंग. इथे किती विनोद आहेत पहा. प्रत्येक विनोदाच्या जागेवर * अशी खूण केली आहे.

अमर आणि प्रेमचे हात वर असतात – गोगो : हँड्स अप – हात खाली* – हँड्स अप – हात परत वर – अमर : उपर ही तो थे* – गोगो :फॉलो मी आणि स्वत: पुढे जातो. अमर, प्रेम मागून येतात* – गोगो अडखळतो – “गोगोजी, आपका घागरा*”, “उठाता हूं*” – आता गेल्यावर अमर आणि प्रेम सगळ्या गुंडांना नमस्ते करतात. *

ही एक झलक आहे, हे असंच चित्रपटभर चालू राहतं. चित्रपटात इतर चित्रपटांचे संदर्भ इतके आहेत की यामुळेच कथानक दुय्यम होतं आणि या चित्रपटाला एक स्वतंत्र अस्तित्व मिळतं. शेवटचा प्रसंग शोलेच्या क्लायमॅक्सचं विडंबन आहे. तिथे हेमामालिनीला बांधलेलं असतं, इथे रवीना आणि करिश्माला. “तुम्हारा नाम क्या है रवीना? ” हा संवाद सरळ ‘शोले’तुन घेतला आहे. आमिर आणि सलमान दोघांच्या चित्रपटांचे संदर्भही येतात, सलमानच्या पहिल्या चित्रपटात त्याचं नाव प्रेम होतं. शिवाय दोघांचं नाव एकत्र हा आणखी एक चित्रपट. ‘वाह-वाह प्रॉडक्शन्स’ हे मेहमूदच्या संस्थेचं नाव होतं. गोगो हा गब्बर, मोगॅम्बो, शाकाल अशा अनेक खलनायकांचं मिश्रण आहे. सुरुवातीच्या ड्रीम सीक्वेन्समध्ये सनीपासुन गोविंदा आणि शाहरुखपर्यंत सगळे येऊन जातात.

इथपर्यंत असतं तर ‘अंदाज अपना अपना’ एक उत्तम चित्रपट ठरला असता. पण शेवटच्या एका प्रसंगात राजकुमार संतोषी जी धमाल करतो त्यामुळे हा चित्रपट ‘अब्सर्ड’च्या पातळीला पोचतो आणि म्हणूनच उत्कृष्ट ठरतो. शेवटी जी मारामारी आहे ती तद्दन फिल्मी आहे, ‘ढिशुम-ढिशुम’ वगैरे आवाजांसकट. हे काही वेळ चालू राहिल्यावर बहुधा संतोषीला कंटाळा येतो. गोगो आणि प्रेम समोरासमोर येतात तेव्हा ते एकमेकांना स्पर्श न करता कुंग-फू च्या स्टाइलमध्ये स्टान्स घेतात आणि हवेत एकमेकांवर वार करतात. नंतर एखाद्या प्रायोगिक नाटकाप्रमाणे ही हवेतील ‘कुंग-फू-नागिन डान्स’ स्टाइल मारामारी चालू राहते. कहर म्हणजे या दरम्यान एक गुंड येतो त्याला प्रेम नेहमीसारखा ठोसा मारतो आणि परत नागिन डान्स सुरू. इथे जणू संतोषी आपल्याला सांगतो आहे की हा चित्रपट गंभीरपणे घ्यायचं अजिबात कारण नाही. इतक्या उच्च दर्जाचा ‘अब्सर्ड’ विनोद मी फक्त माईक मायर्सच्या ‘ऑस्टीन पॉवर्स’ चित्रपटात बघितला आहे.

‘अंदाज अपना अपना’ फसवा चित्रपट आहे. त्याचं रुपडं तद्दन फिल्मी, कमर्शियल आहे पण याचा अर्थ त्यावर मेहनत घेतलेली नाही किंवा त्यात गुणवत्ता नाही असा नाही. राजकुमार संतोषीने आपल्या करियरची सुरुवात गोविंद निहलाणी यांच्याकडे केली. ‘अर्धसत्य’ आणि ‘पार्टी’ यासारख्या जबरदस्त चित्रपटांचा तो सहाय्यक दिग्दर्शक होता. चांगला चित्रपट कोणता याची त्याला पुरेपूर जाण आहे. ‘अंदाज अपना अपना’ काळाच्या पुढे होता, त्यामुळे तत्कालीन प्रेक्षकांना त्याची पारख करणं जमलं नाही. आणि इथेच हा चित्रपट १९९४ मध्ये का लोकप्रिय झाला नाही याची कारणे दिसतात. त्या काळात भारतात इंटरनेट नव्हतं. बहुतेक भारतीय प्रेक्षकांना जगभरातील चित्रपटांची ओळख जवळजवळ नव्हती. १९९४ चा सर्वात हिट चित्रपट होता बडजात्याचा ‘हम आप के है कौन? ‘ इतक्या गुळचट चित्रपटांची सवय असलेल्या प्रेक्षकांना विडंबन, ‘पॅरडी’, ‘स्पूफ’ आणि ‘अब्सर्ड’ विनोद यांनी भरलेला ‘अंदाज अपना अपना’ आवडला नाही यात विशेष ते काय? मग वीस वर्षांनी ‘अंदाज अपना अपना’ लोकप्रिय होण्याचं कारण काय? एक मुख्य कारण – इंटरनेट. भारतीय प्रेक्षक – विशेषत: तरुण पिढीला या काळात जगभरचे असंख्य चित्रपट बघायला मिळाले. दरम्यान ‘सत्या’ ने नवीन हिंदी चित्रपटाची सुरुवात केली. या सर्व खुराकावर तयार झालेल्या प्रेक्षकाला वेगळ्या साच्यातील हा चित्रपट आवडून गेला. तरुण पिढीने चित्रपट डाउनलोड करण्यावरून बरीच टीका होत असते. मात्र गेल्या वीस वर्षात या पिढीच्या अभिरुचीत जो आमुलाग्र बदल होतो आहे त्यात टोरेंटचा मोठा वाटा आहे हे मान्य करायलाच हवं.

—-

१. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा रहिवासी.